केसीआर यांना शर्मिला यांचे आव्हान...

राजकारणात कधीही काहीही घडू शकते. आजचे मित्र उद्या शत्रू होऊ शकतात किंवा कालचे शत्रू आज मित्र बनू शकतात याचा अनुभव आंध्र प्रदेशच्या राजकारणात सध्या येत आहे.
YS Sharmila
YS SharmilaSakal

राजकारणात कधीही काहीही घडू शकते. आजचे मित्र उद्या शत्रू होऊ शकतात किंवा कालचे शत्रू आज मित्र बनू शकतात याचा अनुभव आंध्र प्रदेशच्या राजकारणात सध्या येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी आपला नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. शर्मिला यांनी पक्षाची घोषणा केली त्याच दिवशी एका जाहीर सभेत बोलताना जगनमोहन यांनी आपला पक्ष अर्थातच वायएसआर कॉंग्रेस तेलंगणाच्या राजकारणात कसलीही ढवळाढवळ करणार नाही. आंध्र प्रदेशचे हित लक्षात घेऊन आपले सरकार तेलंगणा आणि शेजारच्या राज्याच्या सरकारांबरोबर चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न करेल हे आवर्जून स्पष्ट केले.

शर्मिला यांनी तेलंगणामध्ये ‘वायएसआर तेलंगणा पार्टी’ हा नवा पक्ष स्थापन केला आणि वायएसआर समर्थकांना आपण आता नवा प्लॅटफॉर्म देत आहोत असे वातावरण निर्माण केले. नवा पक्ष स्थापन करण्याच्या शर्मिला यांच्या पवित्र्याने विविध राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. जगनमोहन आणि शर्मिला यांच्यामध्ये मतभेद झाले आहेत, या दोघांच्या भांडणात या नव्या पक्षाची स्थापना झाली आहे, अशी चर्चा आंध्र प्रदेशच्या राजकीय वर्तुळात केली जात आहे. तेलंगणाचा विचार केला तर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) आणि त्यांचा तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्ष हा अत्यंत भक्कम असा आहे. या पक्षाचा जनाधार कमी झालेला नाही. मात्र निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने शहरी भागात या पक्षाबद्दल काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. याची झलक हैदराबाद येथे झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आली.

या राज्यात टीआरएसला विरोध करताना कॉंग्रेस आणि तेलगू देसम या पक्षांची युती असली, तरी त्यांना फारशी पसंती मिळालेली नाही. भाजपलाही तेथे वाव नाही. तेलंगणा राज्यात अशी राजकीय पोकळी असली तरी ही पोकळी शर्मिला यांचा पक्ष भरून काढेल, असे आज तरी म्हणता येणार नाही. मात्र शर्मिला यांना महिला वर्गाचा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या सभांना गर्दी होत आहे. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात जाऊन शर्मिला तेथे उपोषण करून बेरोजगारांना रोजगार मिळावा अशी मागणी करून आपल्या पक्षासाठी वातावरणनिर्मिती करीत आहेत. राज्यातील जनतेशी शर्मिला यांची नाळ जोडली गेली ती जगनमोहन ज्या वेळी तुरुंगात होते तेव्हा जवळजवळ चार हजार किलोमीटरची पदयात्रा शर्मिला यांनी पूर्ण करून जगनमोहन यांचे आव्हान राज्यात कायम ठेवले होते. आंध्र प्रदेशात जेव्हा वायएसआर कॉंग्रेसची सत्ता आली तेव्हा पक्षात चांगले पद मिळेल, अशी शर्मिला यांना अपेक्षा होती; पण तसे घडले नाही. शपथविधी समारंभानंतर काही महिने शर्मिला पक्षात सक्रिय होत्या; पण त्यानंतर एकदम सार्वजनिक कार्यक्रमांत आणि पक्षाच्या व्यासपीठावर त्यांचा वावर थांबला. या वर्षाच्या सुरुवातीला अचानक नवा पक्ष स्थापन करण्याची त्यांनी घोषणा केली आणि या बहीण-भावंडांमध्ये मतभेद असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगू लागली, या चर्चेला राज्यातील राजकीय नेत्यांकडूनही त्याला दुजोरा मिळाला.

या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत शर्मिला यांनी मी आणि माझा भाऊ जगन आम्ही दोन वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करीत आहोत, तेलंगणाच्या विकासासाठी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत काम करीत राहणार आहे. केसीआर यांच्याबद्दल म्हणजे चळवळीतील त्यांच्या योगदानाबद्दल व त्यांच्या त्या वेळच्या कामाबद्दल मला

आजही आदर आहे; पण आता केसीआर यांच्यात बदल झाला आहे. आता ते जनतेला लुटत असून, त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला असून, तेलंगणाच्या जनतेला ते त्रास देत आहेत. गेल्या साडेसात वर्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून ते पूर्णतः अपयशी ठरले आहेत. केवळ केसीआर यांच्यावर टीकेच्या फैरी झाडून त्या थांबल्या नाहीत, तर केसीआर यांचा मुलगा केटीआर यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. केटीआर यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना जो मनुष्य महिलांचा सन्मान राखू शकत नाही त्याच्याबद्दल काय बोलणार. मुख्यमंत्र्यांचा मुलगा या ओळखीपलीकडे त्यांचे काय काम आहे, असा सवालही शर्मिला यांनी केला. राज्यात सरकारी नोकरीतील दोन लाख पदे रिकामी आहेत आणि केसीआर राज्यातील तरुणांना नोकऱ्या देण्याची भाषा कशाच्या बळावर करीत आहेत, असा खडा सवाल देखील त्यांनी केला. बेरोजगार तरुणांच्या नोकऱ्यांचा मुद्दा शर्मिला यांना जनमानसात पाठिंबा मिळवून देत आहे. तेलंगणामध्ये ‘राजन्ना का राज'' अशी घोषणा देत वायएसआर यांच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत आपला प्रभाव वाढविण्याची योजना त्या आखत आहेत. देशाच्या राजकारणात विविध राजकीय पक्षाचे सत्ता मिळवून देणारे सल्लागार म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेले निवडणूक रणनीती आखण्यात तज्ज्ञ असलेले प्रशांत किशोर यांची एक शिष्याच शर्मिला यांना पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी निवडणूक सल्लागार म्हणून काम करीत आहे. शर्मिला यांची वाटचाल कशी होते यासाठी काही काळ द्यावा लागेल. या काळात त्या कोणती पावले उचलतात त्यावर त्यांच्या पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com