प्रकाशोत्सवी सिडनी!

सहा वाजता घड्याळाचा ठोका वाजल्यावर ऑस्ट्रेलियाचे सिडनी शहर नवे रूप धारण करते. थंडीच्या काळात आकाशात हजारो लाईटच्या प्रकाशात हे ऐतिहासिक शहर झगमगून उठते.
Sydney
SydneySakal
Updated on

- रिद्धी दोशी, riddhi09@gmail.com

सहा वाजता घड्याळाचा ठोका वाजल्यावर ऑस्ट्रेलियाचे सिडनी शहर नवे रूप धारण करते. थंडीच्या काळात आकाशात हजारो लाईटच्या प्रकाशात हे ऐतिहासिक शहर झगमगून उठते. एरवी थंडीच्या मोसमात घरात बसणे पसंत करणारे सिडनीवासीय आपल्या शहराला वेगळ्या नजरेतून बघण्यासाठी हजारोंच्या संख्येत घराबाहेर पडतात...

प्रकाश, संगीत, संस्कृती आणि कल्पनेचा वार्षिक उत्सव म्हणजे ‘विविड सिडनी’! या अनोख्या उत्सवात सिडनी शहरातील प्रसिद्ध ऑपेरा हाऊस, हार्बर ब्रिज, ओल्ड कस्टम हाऊस, वनस्पती गार्डन, निर्मनुष्य रेल्वे बोगदे, तसेच शहरातील प्राणिसंग्रहालयांसह अनेक इमारती प्रकाशात न्हाऊन निघतात. ‘कोविड १९’ च्या महासंकटात ब्रेक घेतल्यानंतर पहिल्यांदा हा उत्सव होतोय. सिडनी आणि मुंबई शहरात अनेक साधर्म्य आहेत. हा उत्सव होत असताना आपल्या मुंबईत असला उत्सव का होत नाही, हा विचार नकळतपणे मनात येतो.

समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक इमारती मुंबईत आहेत. आपल्याकडे कलाकारांची कुठलीच कमी नाही. जरा विचार करा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर विविध कलाकारांची कला या अनोख्या पद्धतीने दाखवली गेली तर काय होईल! आपल्या शहराची सुंदरता उजळून निघेलच, सोबत देशाच्या कला-परंपरेची आणि आपल्या कलाकारांबद्दल माहितीदेखील मिळेल.

थंडीच्या मोसमात जनतेला त्यांच्या घरातून बाहेर खेचण्यासाठी ‘विविड सिडनी’ या उत्सवाचे आयोजन केले जाते. जेणेकरून कला आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. सोबत सिडनी शहराच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी पैसे खर्च करतील. हा उत्सवाचा एक मोठा भाग विनामूल्य आहे. कामावरून घरी परतणारे नागरिक या उत्सवाचा आनंद घेतात. अनेक कुटुंबे आपल्या मुलांसोबत आणि पाळीव कुत्र्यांसोबत या उत्सवात सहभागी होतात. या उत्सवात पाळीव प्राण्यांसाठीही नियोजन केले गेले आहे.

लाईटिंग ऑफ सेल

दिवंगत ऑस्ट्रेलियन कलाकार जॉन ओल्सेनच्या जीवन आणि ऊर्जाच्या जिवंत चित्रांनी सिडनीचे ६४ वर्षीय ऑपेरा हाऊस प्रकाशाने सजवले गेले आहे. दहा मिनिटांच्या व्हिडीओ प्रोजेक्शन फिल्ममध्ये ऑस्ट्रेलियाचे प्राणी, पक्षी, सागरी जीव आणि कलाकारांचे चित्र पांढऱ्या शुभ्र इमारतीवर झळकतात. या महान कलाकाराचे निधन ११ एप्रिल २०२३ ला झाले.

लाईटस्केप

जगप्रख्यात लाईट इन्स्टॉलेशन समजला जाणारा सिटीस्केप हा सिडनीच्या रॉयल बॉटनिक गार्डनमध्ये पसरला आहे. प्रकाश आणि आवाजाचा हा सुंदर मिलाफ ‘विविड सिडनी’चे गाजलेल्या आर्टपैकी एक आहे. मोठ्या पडद्यावर एलजीबीटी कम्युनिटीचा इंद्रधनुष्य रंग, तर समुद्राच्या एका तुकड्यातून अचानक व्हेव मासा अवतरतो. तो खेळतो. हजारो छोट्या लाईट आणि आवाजाच्या माध्यमातून हे दाखवले जाते. प्रकाशाच्या या उत्सवातील मोठ्या छत्र्या, विशालकाय फुले आणि पाने बघून क्षणभर स्टिवन स्पिलबर्गच्या ‘अवतार’ या चित्रपटाच्या जगात आल्यासारखे वाटते.

डार्क स्प्रेक्ट्रम

सिडनी शहराच्या वीनार्ड रेल्वे स्टेशनच्या खाली भूमिगत रेल्वे बोगद्यात इलेक्ट्रॉनिक्स भुलभुलैया तयार केली आहे. अंडरग्राऊंड डान्स फ्लोर या कलेपासून हे प्रेरित आहे. असंख्य ट्यूब लाईट्स जणूकाही नृत्य करत असल्याचा भास इथे होतो. ‘द मॅट्रिक्स’ या हॉलीवूड पटात दाखवल्याप्रमाणे अनेक लहान हिरवी लाईन, बीम आणि बोगद्याच्या यू छटा या लाईटने दाखवल्या आहेत. विविध रंगांच्या आठ लाईटमधून मानवी भावना याद्वारे दाखवली जाते.

इनसाईट ऑऊट

सिडनी शहराच्या जुन्या कस्टम हाऊस या इमारतीवर शहरातील वास्तुविशारदांनी पेंटिंग केलेले वॉल पेपर, फॅब्रीक्सची डिझाईन दाखवली गेली आहेत. ‘ऑस्ट्रेलियन म्युझियम ऑफ डिझाईन’च्या सात हजार ५०० आर्ट कलेक्शनमधील या निवडक डिझाईन ६०, ७० आणि ८० च्या दशकातील आहेत.

ऑस्ट्रेलियन ओशन

ऑस्ट्रेलियाचा प्रख्यात छायाचित्रकार क्रेग पॅरी यांच्या समुद्रातील छायाचित्रणाने एक मोठी रूम भरलेली आहे. यात पॅरीने क्लिक केलेले समुद्रातील कासव, डॉल्फीन आणि व्हेल यांचे लार्जर दॅन लाईफ फोटो तुम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.

बायोटेक्चर

असे म्हटले जाते की, निर्जीव इमारतीदेखील मनुष्याच्या शरीरापासून वेगळ्या नसतात. मनुष्य प्राणीसुद्धा एक कलात्मक आश्चर्य मानले जाते. मनुष्याने तयार केलेल्या इमारतीही श्वास घेतात. जर या इमारती जिवंत झाल्या तर त्या कशा दिसतील, हा विचार करून एक स्पॅनिश स्टुडीओ असलेल्या होटारु विजूअल्ल गुरील्लाने आपल्या कल्पनाशक्तीने सिडनीच्या जगविख्यात एएसएन क्लॉक टॉवरला प्रकाशाने जिवंत केले.

टरोंगातील वाईल्ड लाईट

टरोंगा प्राणिसंग्रहालयातील नाईट ट्रेलमध्ये ऑस्ट्रेलियातील वन्य प्राण्यांना जादुई लाईट शिल्पाच्या माध्यमातून दाखवले गेले आहे. हे प्राणिसंग्रहालय बच्चे कंपनीला आकर्षित करणारे आहे. यामध्ये कांगारू, जेलीफीश, बटरफ्लाय, कोलास, इमुज, जुगनू यांना वेगळ्या आणि आकर्षक रूपात दाखवले गेले आहे.

(लेखिका मुंबईतील एक मुक्त पत्रकार असून, त्या कला, संस्कृती लाईफस्टाईल, प्रवास आणि डिझाईन या विषयावर लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com