
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
‘द मोटारसायकल डायरीज’ नावाचा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा नायक आणि त्याचा मित्र मोटारसायकलवरून आठ देशांतून सुमारे चौदा हजार किलोमीटरचा प्रवास करतात. सुरुवातीला साहसी पर्यटन म्हणून ते प्रवासाला सुरुवात करतात, मात्र या प्रवासाने त्यांचे आयुष्य बदलून जाते. हा चित्रपट जगभरातील बाइकस्वारांसाठी प्रेरणादायी मानला जातो. एकार्थाने प्रवासाची हौस असणारे आणि त्यातही स्वत:च्या वाहनाने फिरणारे चालक हे नेहमीच नावीन्यपूर्ण ठिकाणांच्या शोधात असतात. नवीन ठिकाणांची स्थिती, हवामान, चढ-उतार याबाबत चालक अनभिज्ञ असतो. यातही तो धाडस दाखवत प्रवास करत असला तरी त्याला साथ देणारी बाइकही तितकीच ताकदीची असणे महत्त्वाचे ठरते. अशावेळी टुरिंग बाइक ही चालकाची अपेक्षापूर्ती करते. टुरिंग बाइकची श्रेणी ही मोटारसायकलच्या इतिहासात महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. आजही जुन्या मॉडेल्सपासून प्रेरणा घेऊन तंत्रज्ञानयुक्त बाइक्स लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरतात. दूचाकीवरून फिरण्याचा ट्रेंड विकसित झाला तेव्हा या बाइकला मागणी वाढली. टूरिंग बाइकची संकल्पना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आकारास आली. याचे श्रेय प्रामुख्याने १९००-१९२०च्या दशकातील युरोपीय आणि अमेरिकी मोटारसायकल उत्पादकांना द्यावे लागते.