esakal | डेटा ब्रोकर्स, तुमची माहिती आणि प्रायव्हसी...
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदीसाठी तुम्ही इंटरनेटवर सर्च करायला लागलात की तुमच्यासमोर नेमक्या जाहिरातीचा ओघ सुरू होतो मग तुमची खरेदी त्यातूनच होते.

माध्यम 
अमेरिकेतील मिनियापोलिस येथे राहणाऱ्या जॉन्सन कुटुंबाला काही दिवसांपूर्वी लहान मुलांचे डायपर्स, पाळणा आणि लहान मुलांच्या कपड्यांसाठीचे डिस्काउंट कुपन्स त्यांच्या मेलबॉक्समध्ये मिळाले. हे कुपन्स त्यांच्या मुलीसाठी होते व ती अद्याप महाविद्यालयात शिकत आहे.

डेटा ब्रोकर्स, तुमची माहिती आणि प्रायव्हसी...

sakal_logo
By
रिषी भुतडा rishibhutada@hotmail.com

अमेरिकेतील मिनियापोलिस येथे राहणाऱ्या जॉन्सन कुटुंबाला काही दिवसांपूर्वी लहान मुलांचे डायपर्स, पाळणा आणि लहान मुलांच्या कपड्यांसाठीचे डिस्काउंट कुपन्स त्यांच्या मेलबॉक्समध्ये मिळाले. हे कुपन्स त्यांच्या मुलीसाठी होते व ती अद्याप महाविद्यालयात शिकत आहे. श्री. जॉन्सन यांनी संबंधित इ-कॉमर्स कंपनीला ‘तुम्ही माझ्या मुलीला या वयातच आई बनवण्याच्या विचारात आहात का,’ असा जाब विचारला व खटला दाखल करण्याचा इशाराही दिला. हा विषय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पोचल्यानंतर त्यांनी श्री. जॉन्सन यांची माफी मागण्यासाठी त्यांना फोन केला. या संवादादरम्यान असे लक्षात आले, की श्री. जॉन्सन यांची महाविद्यालयात शिकणारी मुलगी गर्भवती आहे. येथे असा प्रश्न उपस्थित झाली की, इ-कॉमर्स कंपनीला या कुटुंबातील अगदी वैयक्तिक घटना, तीही मुलीच्या कुटुंबीयांना माहिती नसताना कशी समजली? नंतर असे लक्षात आले की, या इ-कॉमर्स कंपनीकडे एक अल्गॉरिदम असून, तो एखाद्या कुटुंबाचा गेल्या पाच ते सहा महिन्यांतील खरेदीचा कल तपासून त्या घरात मूल जन्माला येणार आहे का याचा अंदाज बांधला जातो. हा अल्गॉरिदम कंपनीच्या बेबी केअर उत्पादनांचा खप वाढविणे, निष्ठावंत व मोठ्या कालावधीसाठी ग्राहक तयार करणे यासाठी विकसित करण्यात आला आहे. आजच्या गळेकापू स्पर्धेच्या युगात कंपन्यांमधील विपणन आणि जाहिरात अशा विचित्र स्तरापर्यंत पोचली आहे. विशिष्ट ग्राहकांसाठीची जाहिरात (टार्गेटेड ॲडव्हरटाइजमेंट) हा नवा परवलीचा शब्द आहे आणि दररोज नवनव्या वैयक्तिक ग्राहकांचा शोध घेतला जातो आहे. हे सर्व डेटा ब्रोकर्सकडून आपली वैयक्तिक माहिती जाहिरात एजन्सींना पुरवली जात असल्याने शक्य होते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टेक ॲडव्हर्टाइजमेंटच्या कार्यपद्धतीबद्दल काही उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करूयात...
डेटा ब्रोकर्स कोण आहेत आणि ते तुमच्याबद्दलच्या कोणत्या माहितीवर प्रक्रिया करतात? डेटा ब्रोकर्स (ऊर्फ इन्फर्मेशन ब्रोकर्स, डेटा प्रोव्हायडर्स आणि डेटा सप्लायर्स) अशा कंपन्या असतात ज्या स्वतःच डेटा गोळा करतात किंवा इतर कंपन्यांकडून खरेदी करतात (जसे की क्रे़डिट कार्ड कंपनी, इ-कॉमर्स साइट आणि ॲप्स.), युजर्सच्या महत्त्वाच्या माहितीसाठी इंटरनेटवर शोध घेतात आणि ही व इतर स्रोतांपासून मिळालेली सर्व माहिती एकत्र करतात. (उदा. ऑफलाइन स्रोत, सरकारी रेकॉर्डस, ग्राहकाने ऑफलाइन भरलेले अर्ज.) अनेक लोकांना अशा कंपन्या अस्तित्वात असल्याची माहितीही नसते, मात्र डेटा ब्रोकरेज ही मोठा फायदा कमावणारी इंडस्ट्री झाली असून, ती वर्षाला २०० अब्ज डॉलरचा व्यवसाय करते आणि हा व्यवसाय वाढतच चालला आहे.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

या कंपन्यांना तुमचा पत्ता, तुमचे वय, लिंग, तुमचा आधार आणि पॅन कार्ड नंबर, तुमचा पगार, तुमचे कामाचे ठिकाण, तुमच्याकडे असलेली वाहने व ती कधीपासून आहेत, तुम्ही विवाहित आहात की अविवाहित, तुमची मुले आणि त्यांची माहिती, तुमचे घर स्वतःचे आहे की भाड्याचे, तुम्ही कपडे धुण्यासाठी कोणते डिटर्जंट वापरता, तुम्ही कोणता शाम्पू वापरता, तुम्हाला एखादा आजार आहे का, तुम्ही टीव्हीवर कोणते कार्यक्रम पाहता, तुमचा राजकीय कल काय आहे....ही सर्व माहिती असते आणि ही यादी वाढतच जाऊ शकते. 

एका चांगल्या डेटा ब्रोकरकडे एखाद्या व्यक्तीची ३०० विविध घटकांवर आधारित माहिती असते व ती त्यांच्याकडे साठवून ठेवलेली असते. तुमची जितक्या अधिक घटकांवरील माहिती उपलब्ध, तेवढी डेटाची किंमत अधिक  असते. त्यांना तुमच्या विषयीच्या सर्वच घटकांबद्दलचा डेटा सुरवातीलाच उपलब्ध नसतो, मात्र तो हळूहळू गोळा केला जातो किंवा उपलब्ध घटकांना नव्याने मिळालेला डेटा जोडला जातो. काहीवेळा अनेक डेटा ब्रोकर्सचा डेटा एकत्र केला जातो, त्यामुळे डेटा अधिक विश्वासार्ह आणि समृद्ध होत जातो.

तुमची माहिती गोळा कशी करतात?
या कंपन्यांना तुमची वैयक्तिक माहिती अगदी सहज उपलब्ध असते, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. डेटा ब्रोकर कंपन्यांना तुमचा डेटा मिळण्यासाठी फारशी मेहनतही घ्यावी लागत नाही. कंपन्या सार्वजनिक रेकॉर्ड्समधून तुमची बहुतांश माहिती सहज मिळवतात. यातून त्यांना तुमच्या खरेदीचा कल व तुम्हाला कोणते ब्रॅण्ड आवडतात याची माहिती मिळते. तुम्ही एखाद्या वेबसाइटवर विंडो शॉपिंग केली, तरी ते तुम्ही कोणत्या उत्पादनावर किती काळ थांबलात याचा मागोवा ते घेतात. तुम्ही सोशल मीडिया किंवा ऑनलाइन विश्वाला खूप वेळ दिल्यास तुम्ही डेटा ब्रोकर्सना तुमच्याबद्दल खूप अधिक माहिती विनासायास सोपवता. ते तुम्ही सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट किंवा केलेल्या लाइक्सवरूनही तुमची वैयक्तिक माहिती मिळवतात. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाइन प्रश्नमंजुषांमध्ये घेतलेला सहभाग, ऑनलाइन सर्वेक्षणात भरलेली माहिती व तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइट्सवरूनही तुमची माहिती गोळा केली जाते. तुम्ही एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी इंटनेटवर सर्फिंग केल्यास ती माहिती गोळा करून तुमच्या वैयक्तिक माहितीशी जोडली जाते व त्यातून तुमच्या वागण्याची, खरेदीची पद्धत शोधली जाते. तुम्ही गुगल करून एखाद्या रिअल इस्टेट कंपनीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर तुम्ही फेसबुक किंवा यू-ट्यूबसारख्या दुसऱ्या कोणत्याही साइटवर गेल्यास तुमचे तुमच्या भागातील रिअल इस्टेट साइट्सच्या जाहिराती दाखवून स्वागत केले जाईल...हे सर्व रिअल टाइममध्ये आणि काही सेकंदामध्ये होते...

जाहिरातींचा मारा नक्की कसा होतो?
प्रत्येक वेबसाइट आणि अॅपवर जाहिरातींसाठी विशिष्ट जागा राखीव ठेवलेली असते. त्यामुळे समीर नावाच्या एखाद्या व्यक्तीने वेबसाइट उघडताच ही माहिती जाहिरात संस्थेला दिली जाते, जिच्यावर त्या वेबसाइटवर जाहिराती दाखवण्याची जबाबदारी असते. या एजन्सीकडे अनेक क्षेत्रांतील विविध उत्पादनांच्या जाहिराती तयार असतात. आता त्यांमधील नक्की कोणती जाहिरात डिस्प्ले होईल, यासाठी या सर्व जाहिरातदारांमध्ये ‘बोली लावण्या’चे युद्ध रंगते आणि ज्याची बोली सर्वांत मोठी तो जिंकतो. 

त्यामुळे तुम्ही पुढील वेळी जेव्हा ऑफलाइन किंवा ऑनलाइन माहिती भराल, इंटरनेटवर सर्फिंग कराल, यू-ट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहाल, इ-कॉमर्स साइटवरून एखादे उत्पादन खरेदी कराल, तेव्हा तुम्ही जाहिरात एजन्सीला तुमची माहिती पुरवत आहात, हे लक्षात ठेवा. हीच माहिती ती एजन्सी तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी उपयोगात आणेल व तुम्हाला एखादे उत्पादन खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करण्यास भाग पाडेल किंवा तुमच्या निर्णयावर प्रभाव पाडेल.

जगभरात खासगी माहिती सार्वजनिक होऊ नये अशी मागणी होत असून, डेटा ब्रोकर्ससाठी अधिक कडक निर्बंध लावण्याची मागणी सातत्याने होते आहे. तुम्ही वादग्रस्त व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसीसंदर्भात नक्कीच वाचले असेल. व्हॉट्सॲप त्यांच्याकडची युजर्सची माहिती फेसबुकला विकणार होते व ती माहिती युजरला त्याच्यासाठी बनवलेल्या जाहिरातीत दाखवण्यासाठी वापरणार होते. अनेक लोकांनी आपल्या बाबतीत हे आधीपासूनच घडायला सुरुवात झाल्याचे सांगितले आहे. त्यातील एकाने आपल्या मित्राशी व्हॉट्सॲपवरून बोलताना एका विशिष्ट कंपनीची बाईक खरेदी करण्यासंदर्भात रस दाखवला आणि त्याच दिवशी त्याला फेसबुकवर त्या कंपनीच्या बाईकची जाहिरात दिसली. त्यातील एका युजरला आलेला अनुभव तर कहर म्हणावा असाच होता. तो आपल्या बहिणीबरोबर एका कंपनीचे स्पोर्ट्स शूज खरेदी करण्यासंदर्भात चर्चा करीत होता व त्यावेळी खोलीमध्ये त्याचा मोबाईल फोन ठेवलेला होता. दुसऱ्याच दिवशी इंटरनेट सर्फिंग करताना त्याला त्याच कंपनीच्या त्याच स्पोर्ट्स शूजची जाहिरात दाखवली गेली. हा केवळ योगायोग होती की गुगल आपले संभाषणही ऐकते? आपल्याला नक्की काय, हे कधीच समजणार नाही...

(सदराचे लेखक मान्यवर जाहिरात संस्थेत डेटा इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. )
(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

Edited By - Prashant Patil

loading image