
ऋषिराज तायडे
उन्हाचा पारा वाढू लागताच पाणीटंचाईचे सावट जाणवू लागले आहे. काही भागांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. प्रशासनाचीही पिण्याचे पाणी, शेती, उद्योगासाठी पाण्याचे नियोजन करताना तारेवरची कसरत होते. राज्यासह देशातील डेटा सेंटर्सकडून पाण्याची मागणी वाढत आहे. सध्या देशात ९५० मेगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर्स कार्यरत असून, पुढील दोन वर्षांत ही क्षमता १,८०० मेगावॉट होणार आहे. एक मेगावॉटच्या डेटा सेंटरमध्ये कूलिंगसाठी वर्षाला २.५५ कोटी लिटर पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नियोजन करताना, डेटा सेंटर्सला लागणाऱ्या पाण्याचाही विचार करावा लागणार आहे.