
सावरकरांच्या वेदनेचा हुंकार : ने मजसी ने
पं. हृदयनाथ मंगेशकर
ने मजसी ने परत मातृभूमीला : या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कवितेला संगीतबद्ध केले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. सावरकर यांच्या मनातील आर्त भाव व्यक्त करणारी ही कविता मनामनामध्ये देशप्रेमाची ज्योत पेटविणारी आहे. आपल्या मातृभूमीबद्दलची ओढ दर्शविणारी आहे. आजही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे. सावरकरांची आज (२६ फेब्रुवारी) पुण्यतिथी, त्यानिमित्त या गाण्याच्या आठवणी सांगताहेत पं. हृदयनाथ मंगेशकर
धारण १९५२-५३ च्या सुमारास मी बालमोहन विद्यामंदिर येथून चालत पुढे निघालो होतो. तेव्हा सहजच वर पाहिले. मला एक व्यक्ती दिसली. ती व्यक्ती त्या घरातील- बंगल्यातील- गच्चीवर फेऱ्या मारीत होती. मी त्या व्यक्तीला ओळखले. ती व्यक्ती होती तात्यासाहेब सावरकर. मग मी त्यांच्या दारात गेलो. तेथे लिहिलेले होते सावरकर सदन. तेव्हा मी साधारण पंधरा-सोळा वर्षांचा होतो. मी दारावरची बेल वाजविली. तेव्हा एक व्यक्ती आली आणि तिने दरवाजा उघडला. ती व्यक्ती होती बाळाराव सावरकर. तात्याराव सावरकर यांचे सचिव. त्यांनी मला विचारले, काय पाहिजे. मी त्यांना सांगितले, की मला तात्याराव सावरकर यांना भेटायचे आहे. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. मग त्यांनी मला विचारले की, तुझे काय काम आहे... तुझे नाव काय? मी सांगितले, हृदयनाथ मंगेशकर. मग त्यांनी तात्यारावांना माझे नाव सांगितले. तात्यासाहेबांनी मला बोलावून घेतले. ते म्हणाले, की अरे, तू दीनानाथांचा मुलगा ना. दीनानाथ आणि मी एकत्र राहिलो आहोत. त्यांची नाटके मी पाहिली आहेत. त्यांनी माझ्याकडे आमच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. लता कशी आहे वगैरे विचारले आणि तेथून निघताना त्यांनी मला दोन पुस्तके भेट दिली.
मी घरी आलो. तेव्हा आम्ही वाळकेश्वरला राहायचो. घरी आल्यानंतर मी सगळ्यांना सांगितले, की आज मी तात्याराव सावरकरांना भेटून आलो स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटून आलो. घरातील कुणाचाच या गोष्टीवर विश्वास बसला नाही. कुणाला हे खरे वाटतच नव्हते; परंतु ही गोष्ट खरी होती. त्यानंतर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यांच्याकडे मी जात राहिलो. दीनानाथांचा मुलगा म्हणून मला ते बसायला सांगायचे. त्यांच्या विविध बैठका व्हायच्या.
त्यानंतर साधारण दहा-बारा वर्षांनंतरची गोष्ट.त्या वेळी माझी भेट राजा बढे यांच्याशी झाली. त्यांनी मला सांगितले, रेडिओसाठी महिन्याला तीन गाणी तू कंपोझ करायची आहेस आणि त्याचे मानधन तुला मिळणार आहे. एका महिन्याला तीन गाणी कंपोझ करण्याचा माझा करार झाला. त्यानुसार मी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी पहिले गाणे रेकॉर्ड केले. ते गाणे होते, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या. दुसरे गाणे केले, ‘चांदणे शिंपीत जाशी हे गाणे खूप लोकप्रिय झाले. तिसरे गाणे भा. रा. तांबे यांचीच आणखीन एक कविता होती.
त्यानंतर गप्पांच्या ओघात राजा बढे मला म्हणाले, की अरे तू तात्यारावांचे एखादे गाणे का नाही घेत.मी लगोलग त्यांना म्हणालो, की आपण भेटूया तात्यारावांना. मग आम्ही दोघेही तात्यारावांना भेटायला गेलो. मी तात्यारावांना म्हणालो, की तुमची गाणी खूप गाजलेली आहेत. मला एखादे तुमचे गाणे द्या ध्वनिमुद्रित करायला. तेव्हा ते मला म्हणाले, की अरे माझे गाणे ध्वनिमुद्रित करून तुला काय तुरुंगात जायचे आहे काय?
त्यावर मी हसलो. कारण त्यांना काय म्हणायचे आहे, ते मला समजले नाही; तरीही मी त्यांना पुन्हा म्हणालो, की तुमचे एखादे गाणे करून मला तुरुंगात जावे लागले तरी चालेल... पण एखादे गाणे द्या. मी केलेली विनवणी पाहता त्यांनी मला एक गाणे दिले. ते गाणे होते ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला.मी त्या गाण्याला चाल लावली आणि मी व राजा बढे आकाशवाणीमध्ये गेलो. आता नवीन महिना उगवला होता आणि माझ्या करारानुसार तीन गाणी मला आकाशवाणीकरिता कंपोझ करायची होती. तेथील अधिकाऱ्याला मी सांगितले, आम्हाला हे गाणे रेकॉर्ड करायचे आहे... आणि अन्य दोन गाणी राजा बढे यांची आहेत. आकाशवाणीवरील अधिकाऱ्याने हे गाणे कुणाचे आहे, असा प्रश्न मला केला. मी त्यांना सांगितले, की हे गाणे तात्याराव सावरकर यांचे आहे. लगेच ते म्हणाले, की आम्ही ओळखले आहे ते. तुम्ही हेच गाणे का करू इच्छिता, असा प्रश्न त्यांनी पुन्हा केला. मी उत्तर दिले, की हे स्वातंत्र्यसंग्रामाचे गीत आहे. त्यानंतर ते ‘ठीक आहे’ एवढंच म्हणाले.
आता ते गाणे ध्वनिमुद्रित करायचे आहे म्हटल्यानंतर मी आणि राजा बढे पुन्हा आकाशवाणीत गेलो तर त्यांनी आमच्या हातात कागदच दिला की, तुमचा करारनामा संपलेला आहे. आता काही ध्वनिमुद्रित करायचे नाही. आमचा करार नाकारला गेला. त्यामुळे मी काही आकाशवाणीवर नोकरी करीत नव्हतो, तर आमचा तीन-तीन महिन्यांचा करारनामा होता. तो चौथ्या महिन्यात नाकारला गेला. मग राजा बढे यांनी मला रस्त्यात सांगितले, की हे गीत या अधिकाऱ्यांना काही पटलेले दिसत नाही.
त्यानंतर साधारण दहा-बारा वर्षांनी म्हणजे १९६५मध्ये मी एचएमव्ही कंपनीसाठी गाणी करायला लागलो. तेव्हा मी ठरविले ते गाणे ध्वनिमुद्रित करायचे आणि एक दिवस निश्चित केला. मी ते गाणे ध्वनिमुद्रित केले. आम्ही चौघा भावंडांनी- लतादीदी, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि मी- ते गाणे गायले. ते गाणे अतिशय गाजले. मग आम्ही पाचही भावंडे विविध ठिकाणी हे गाणे गाऊ लागलो. या गाण्याने मला अख्खे जग दाखविले. माझे अनेक कार्यक्रम अमेरिकेत झाले ते या एका गाण्यामुळेच. सावरकर अंदमानातील ज्या कोठडीत होते, तेथे जाऊन या गाण्याचा एक कार्यक्रम केला आहे. मी, शंकरराव अभ्यंकर, उषा मंगेशकर वगैरे मंडळी आम्ही गेलो होतो तेथे. संपूर्ण जगात हे गाजलेले गाणे आहे.
तात्याराव सावरकर यांच्या साहित्याचे मी खूप वाचन केले आहे. त्यांच्या साहित्याचा-कवितांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यांच्या बहुतेक कवितांना मी चाली लावलेल्या आहेत आणि त्या लोकप्रियदेखील झालेल्या आहेत. ‘ने मजसी ने...’ हे गाणे ध्वनिमुद्रित झाल्यानंतर स्वतः सावरकर यांनी हे गीत ऐकलेले होते. दादर- शिवाजी पार्क येथील एका कार्यक्रमात सावरकर उपस्थित होते. तेथे आम्ही पाचही भावंडांनी हे गाणे गायले आणि तेव्हा त्यांना ते खूप आवडले. मुळात सावरकर यांच्या शब्दामध्येच धार होती. आपल्या मातृभूमीला भेटण्यासाठी आसुसलेल्या त्यांच्या मनातील ही वेदना होती. त्याच्या मनातील वेदनेचा तो हुंकार कवितेच्या रूपात उतरला होता. त्यामुळे हे गाणे लोकप्रिय होईल, अशी मला तेव्हाच खात्री होती आणि आजही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे.
Web Title: Roar Savarkar Pain Ne Majsi Ne
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..