रोजगाराची फेरमांडणी

रोजगाराची फेरमांडणी

औद्योगिक क्रांतीतला चौथा टप्पा म्हणजे ‘इंडस्ट्री ४.०’. या इंडस्ट्रीमुळं तंत्रज्ञानावर आधारित अनेक नोकऱ्यांवर संक्रांत येणं आणि नव्या नोकऱ्या निर्माण होणं अपेक्षित आहे. वाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनात हस्तक्षेप करू लागलं आहे, याचं लक्षणीय उदाहरण म्हणजे माणसं करत असणारी कित्येक कामं आता संगणकाच्या साह्यानं सहज शक्‍य होऊ लागली आहेत. यामुळं नोकऱ्या आणि इतर रोजगारांचा समाजाशी असलेला संबंध आणि व्यवहार यांची फेरमांडणी होऊन नवं चांगलं जग निर्माण होईल.

‘इंडस्ट्री ४.०’ ही आता कायमस्वरूपी असेल, असंच बहुतांशी जणांना वाटतंय. ‘४.०’ चं का? कारण, पहिली क्रांती झाली ती वाफेच्या शक्तीवर यंत्र चालवून उत्पादननिर्मिती केली गेली तेव्हा. दुसरी क्रांती झाली विजेचा शोध लागल्यानंतर! विजेमुळं ‘मास प्रॉडक्‍शन’ होऊ लागलं. या दोघांनंतर तिसरा टप्पा ‘साध्यासुध्या’ डिजिटायझेशनचा होता. आताचा काळ आहे तो ‘कॉम्प्लेक्‍स डिजिटायझेशन’चा. संगणक आणि प्रोग्रॅमिंगच्या अतिक्‍लिष्ट वाटणाऱ्या काही जोडण्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. हीच ती ‘४.०’ इंडस्ट्री. या इंडस्ट्रीमुळं तंत्रज्ञानावर आधारित अनेक नोकऱ्यांवर संक्रांत येणं आणि नव्या नोकऱ्या निर्माण होणं अपेक्षित आहे.

औद्योगिक क्रांतीनंतर गेली जवळपास अडीचशे वर्षं यांत्रिकीकरणामुळं अनेक नोकऱ्यांवर गदा येत आहे. त्याच वेळी बेरोजगारीच्या तुलनेत नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र, प्रथमच हे चित्र बदलत असल्याचं मत प्रथमच व्यक्त होताना दिसत आहेत. तंत्रज्ञानावर आधारित रोजगार आणि बेरोजगारीचा आलेख मांडण्यासाठीच हा प्रयत्न.

ढोबळमानाने कामाचे तीन भाग आपल्याला करता येतील. पहिला भाग म्हणजे माणसं करत असलेलं शारीरिक कष्टाचं काम यंत्रांद्वारे केलं जातं. काही तंत्रज्ञानामुळं बौद्धिक कामही करता येतं, हा दुसरा भाग. या कामामध्ये विचारप्रणाली, ज्ञानाधिष्ठित काम यंत्राद्वारे करणं, कृत्रिम बुद्धिमत्ता असे घटक येतात. ग्राहकसेवा क्षेत्रासंदर्भातील तिसऱ्या भागात नव्या तंत्रज्ञानामुळं ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये अधिक सुकरता आणली आहे. सेल्फ हेल्प कियॉस्क, ग्रोसरी स्टोअर स्कॅनर ही त्यातलीच काही उदाहरणं.

नोकऱ्या जाण्याचं-निर्माण होण्याचं चक्र
तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्या जाणं आणि निर्माण होणं हे एक आश्‍चर्यकारक चक्र असल्याचं दिसून येतं. म्हणजे, यांत्रिकीकरणामुळं कामगारांच्या नोकऱ्या जात असल्या, तरी उत्पादन मात्र वाढते. याचा परिणाम म्हणून आर्थिक वाढ होते आणि याचा परिणाम म्हणून पुन्हा नोकऱ्या निर्माण होतात. अधिक उत्पादन झालं की, वस्तूंच्या आणि सुविधांच्या किमतीही आटोक्‍यात येतात, त्यामुळं ग्राहकांना कमी किमतीत सुविधा मिळतात. सगळ्याची निष्पत्ती ग्राहकवर्गाची अधिकाधिक बचत आणि खर्च करण्याची क्षमता वाढते. साहजिकच यामुळं ग्राहकोपयोगी वस्तू बाजारात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. म्हणजेच, यांत्रिकीकरणामुळं उत्पादन वाढून आर्थिक विकास वाढतो आणि नोकऱ्या निर्माण होण्याचं चक्र सुरू होतं.

अर्थव्यवस्थेचं अंतरंग बदललं, तरी यंत्रांचं आणि नव्या तंत्रज्ञानाचं आगमन हे थेट बेरोजगारी निर्माण करत नाही, असं इतिहास सांगतो. कृषी उद्योगाचं उदाहरण या ठिकाणी घेता येईल. एकट्या अमेरिकेचा विचार करायचा झाल्यास, एकोणीसशे ते दोन हजार या शंभर वर्षांच्या कालावधीत तिथल्या कृषी क्षेत्रातल्या रोजगाराचं प्रमाण ४१ टक्‍क्‍यांवरून दोन टक्‍क्‍यांपर्यंत घसरलं. मात्र याच वेळी शेती उत्पादनही इतकं वाढलं की सरकारला शेतकऱ्यांना अंशदान द्यावे लागले. तंत्रज्ञानातील नव्या शोधांमुळे लोहार, बीन कटर्स असे रोजगाराचे प्रकार कमी होऊन कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ होऊ लागली. त्यानंतर असेंब्ली लाइन्सवर आलेल्या रोबोंमुळे कामगारांचीही संख्या घटली. नवं तंत्रज्ञान नवे रोजगारही निर्माण करतं. तंत्रज्ञान कायम वाढत्या वेगात धावत असतं. त्यामुळं नवे तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या अधिक लोकांचीही आपल्याला गरज आहे. अशा संशोधकांच्या सोबतीनंच हे नवे तंत्रज्ञान योग्यप्रकारे उपयोगात आणणारं आणि ते जपणारे आवश्‍यक असतात. मग हे नवं तंत्रज्ञान रोबोटिक्‍समधील असो वा थ्रीडी प्रिंटिंगमधील. शिवाय नवं तंत्रज्ञान वापरणाऱ्या लोकांना साह्य करण्यासाठीही आणखी लोकांची गरज भासते. अंतिमत:, नव्या तंत्रज्ञानाला नव्या प्रकारचे कामगार लागतात आणि तेही मोठ्या संख्येत. भारतात मोबाईल फोन दुरुस्त करणारे प्रचंड आहेत, हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. डिझाईन, टेस्टिंग, संशोधन, प्रत्यक्ष वापर, दुरुस्ती अशा विविध क्षेत्रांत कायमच तज्ज्ञांची गरज असते.

एखाद्या रोजगाराच्या संदर्भात एखादे तंत्रज्ञान रोजगारनिर्मिती करत असेल, तर दुसरे तंत्रज्ञान काही गोष्टी कायमच्या संपुष्टातही आणू शकते. उदाहरणार्थ ‘उबेर’ या टॅक्‍सी सर्व्हिस कंपनीने स्मार्टफोन आणि ॲपच्या मदतीनं टॅक्‍सीचालक आणि टॅक्‍सी ही संकल्पनाच आमूलाग्र बदलून टाकली. त्यातून अनेक नव्या ‘स्मार्ट’ ड्रायव्हर ना नवा रोजगार उपलब्ध झाला. त्याचा ग्राहकांनाही फायदाच झाला. मात्र, याची दुसरी बाजू अशीही आहे की, येत्या काळात जेव्हा स्वयंचलित (चालकविरहित) गाड्या रस्त्यावर येतील, तेव्हा लाखो टॅक्‍सीचालक बेरोजगार होऊन रस्त्यावरही येऊ शकतील.

यातून पुढं येणारं चित्र अगदी सरळ आहे. कामगारांच्या बाबतीत ‘कमी कौशल्य-कमी मोबदला’ आणि ‘अधिक कौशल्य-अधिक मोबदला’ अशा सरळसरळ दोन बाजू येत्या काळात निर्माण झालेल्या पाहायला मिळतील.

उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवरील परिणाम
मार्टिन स्कूलच्या २०१६ मधील एका अहवालानुसार, तंत्रज्ञानाचा रोजगारावर होणारा परिणाम हा विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये कितीतरी पटीनं अधिक असेल. उदाहरणार्थ- यांत्रिकीकरणामुळं भारतातील ६९ टक्के आणि चीनमधील ७७ टक्के रोजगार अडचणीत आले असून, त्या तुलनेत अमेरिकेत मात्र हेच प्रमाण ४७ टक्‍क्‍यांच्या आसपास असल्याचं हा अहवाल सांगतो. आजवर दरडोई उत्पन्न कमी असलेल्या देशांना कृषी, तसेच उत्पादन क्षेत्रातील कमी किमतीचा फायदा मिळत होता. पण आता या अहवालानुसार, सामान्य कामगारांची जागा रोबो तंत्रज्ञानानं घेतल्यावर हा कमी किमतीचा फायदा मिळणार नाही. एकीकडं रोबोटिक तंत्रज्ञानाच्या झपाट्यानं कमी होत चाललेल्या किमती आणि दुसरीकडं कामगारांच्या वाढत चाललेल्या वेतन अपेक्षा यात असा समतोल साधला गेला, तर ते अनपेक्षित नाही.

अलीकडच्या काळात चीनमध्ये वाढत असणारा रोबोंचा वापर नजरेत भरण्यासारखा आहे. चीनमध्ये उत्पादन क्षेत्रात सध्या १० हजार कामगारांच्या मागे केवळ ३६ रोबोट्‌सचा वापर होत असल्याने या देशाला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. कारण हेच प्रमाण, जर्मनीत २९२ रोबोट्‌स, जपानमध्ये ३१४ रोबोट्‌स तर दक्षिण कोरियात ४७८ रोबोट्‌स असं आहे. पण २०१३ पासून चीनने इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक रोबोंची मागणी केली असून जर्मनी, जपानप्रमाणेच हे रोबो अत्याधुनिक आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत चीन जपानला मागं टाकून जगातील सर्वांत मोठा इंडस्ट्रियल रोबोट्‌स ऑपरेटर देश बनेल, असे ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्‍स’नेच म्हटलं आहे. एक थेट उदाहरण पाहू. चीनमधल्या शेनयांग इथला बीएमडब्ल्यूचा प्रकल्प परवानगी मिळाल्यापासून ते फॅक्‍टरी उभारणे आणि दोन शिफ्टमध्ये उत्पादनही सुरू होणे, हे सारे केवळ अठरा महिन्यांत झाले. ८५ टक्के स्वयंचलित असणाऱ्या या फॅक्‍टरीत कारचा सांगाडा तयार करणाऱ्या विभागात (बॉडी शॉप) ६७५ रोबोट्‌सचा ताफा आहे. त्यामुळं शॉप फ्लोअरवर क्वचितच एखादा ‘माणूस कामगार’ पाहायला मिळतो.
भारतातही आताशा तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करण्याच्या दृष्टीनं सुरवात झाली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वांना सहभागी करून घेणे, हा याचाच भाग आहे. ‘जन-धन योजने’अंतर्गत दोनच वर्षांत वीस कोटी गरीब नागरिकांची बॅंक खाती उघडली गेली. अब्जावधी भारतीयांनी नोंदणी केलेले आधार कार्ड हेही असेच एक उदाहरण. समजा देशातील प्रत्येकाचा मोबाईल, आधार खाते आणि बॅंक खाते हे परस्परांशी जोडले गेले, तर भारतातील कितीतरी जनता अर्थव्यवस्थेत थेट सहभागी होईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वसमावेशकतेकडं वाटचाल करणं म्हणतात, ते हेच.

रोजगाराचं चक्र बदलतंय?
प्रा. ब्रिन्जॉल्सफ्सन आणि मॅकॲफे यांच्या एका अभ्यासानुसार ‘इंटेलिजंट मशिन्स’मुळे सरसकट बेरोजगारी येईल, असे नाही. पण रोजगाराचे विस्थापन मात्र नक्कीच होईल. त्यामुळं कामगारांचेही एका प्रकारच्या रोजगारातून दुसऱ्या प्रकारच्या रोजगारात विस्थापन होऊ शकेल. अर्थात, नवे पर्याय निर्माण होत जाणे, हे होय.
अलीकडच्या काळात ‘हाय-टेक सिंथेसायझिंग मशिन्स’मुळं संगीतकरांपुढं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सिंथेसायझरसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळं नवी पिढी संगीतनिर्मितीच नव्या पद्धतीनं निर्माण करू पाहत आहे. एका पाहणीनुसार सिंथेसायझर वापरात आल्यापासून संगीतकार आणि रेकॉर्डिस्ट यांच्या नोकऱ्यांत सुमारे ३५ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. लवकरच संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे गुगल ‘मॅग्नेटा’ हा एक आर्टिफिशियल इंटिलिजन्स गट तयार करू पाहत आहे. यामुळं संगणकाला स्वतःहून अप्रतिम दर्जाचं संगीत तयार करता येणं शक्‍य होणार आहे. पुढं त्याचा उपयोग व्हिडिओसाठीही करण्याचा गुगलचा विचार आहे. थोडक्‍यात, आजवर जे मूळ संगीत फक्त कलाकारचं तयार करू शकायची, तेच आता संगणकही तयार करू शकणार आहे. ‘मॉर्फिंग’ तंत्रज्ञानामुळं एखाद्या अभिनेत्याची लकब, हावभाव, आवाज एका चित्रफितीतून वेगळा काढून डिजिटल तंत्राच्या साह्यानं आणि प्रोग्रॅमिंगच्या मदतीनं दुसरीकडंही बेमालूमपणानं वापरला जाऊ शकतो, अगदी नव्या पद्धतीनं वाटावा असाच. यामुळं कलाकारांचीही भूमिका बदलली आहे.

मानवी हस्तक्षेपाचे रोजगार
ज्या ठिकाणी भावनिक संदर्भ असतात, मानवी नातेसंबंध असतात किंवा सर्जनशील काम अपेक्षित असते अशा सर्व ठिकाणी अद्यापही माणसेच आवश्‍यक आहेत. अर्थात, पूर्वीपेक्षा हे प्रमाण आता कमी होत आहे. उदाहरणार्थ- गुगल ट्रान्सलेट या सॉफ्टवेअरमुळे अनुवादकांच्या नोकऱ्यांवर गदा यायला सुरवात झाली आहे तर, ऑटोमेटेड लॅंडिंग तंत्रामुळे विमानाच्या पायलटच्या कौशल्याची गरजच संपुष्टात येऊ घातली आहे. मानवी आवाज आणि हावभाव लक्षात ठेवून त्याबरहुकूम वागणारी सॉफ्टवेअर्स आताशा ‘माणसांसारखीच’ वागू लागली असल्याचे आपण पाहतो. ॲपलच्या आयफोनमध्ये वापरलेले ‘सिरी’ किंवा गुगलचे ‘गुगल नाऊ’ ही त्याचीच उदाहरणे. तंत्रज्ञानाचा असाच वाढता वापर आता वैद्यकीय क्षेत्रातही वेग धरत आहे. त्यामुळे मानवी अचूकतेच्या कितीतरी पुढे असणारे तंत्रज्ञान स्थिरावते आहे.

संगणकाकडून ‘मानवी नोकऱ्या’
वाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनात कसे हस्तक्षेप करू लागले आहेत, याचं लक्षणीय उदाहरण म्हणजे माणसं करत असणारी कित्येक कामं आता संगणकाच्या साह्यानं सहज शक्‍य होऊ लागली आहेत. कॉम्प्लेक्‍स अनालिसिस, क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अशा अनेक गोष्टी आता संगणकनामक यंत्र करू लागलं आहे. आपल्या सहयोगी कर्मचाऱ्याशी संवाद साधावा, अगदी तसाच काहीसा संवाद आता संगणकाशी आपल्याला साधता येणं शक्‍य झाले आहे. स्मार्ट संगणकांना आधुनिक प्रोग्रॅमिंगमुळे प्राप्त होत असणारी ‘स्वतःची बुद्धिमत्ता’ हे घडवून आणत आहे. विशेष म्हणजे या सगळ्याचा पैस दिवसेंदिवस कैक पटीने वाढू लागला आहे. आजवर बुद्धिबळासारखे जे खेळ केवळ आणि केवळ मानवी बुद्धिमत्ता, अंदाज क्षमता आणि विश्‍लेषणाच्या ताकदीवरच जिंकणं शक्‍य होतं, ते आता अतिबुद्धिमान संगणकांनाही शक्‍य झाले आहे आणि ते मानवाला त्यात हरवूही लागले आहेत! हे पुढं चालत राहणार यात शंका नाही.
पारंपरिक पद्धतीच्या रोजगारांना चिकटून राहण्याचं प्रमाण कमी होत जाणार आहे. मला प्रचंड विश्‍वास आहे, की यामुळे नोकऱ्या आणि इतर रोजगारांचा समाजाशी असलेला संबंध आणि व्यवहार यांची फेरमांडणी होऊन नवं चांगलं जग निर्माण होईल.
(अनुवाद - स्वप्नील जोगी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com