
पतीच्या निधनानंतर फक्त एक पत्नी विधवा होत नसते, तर समाज बेढब होतो. नकारात्मकतेने फुगतो.
- रूपाली चाकणकर
पतीच्या निधनानंतर फक्त एक पत्नी विधवा होत नसते, तर समाज बेढब होतो. नकारात्मकतेने फुगतो. अज्ञानाने काळवंडतो. चुकीच्या प्रथा-परंपरेत गढून जातो. आज वेगाने धावत असलेल्या जगात जुनाट प्रथा कुरवाळत बसण्यापेक्षा खरी गरज आहे ती ‘आपलं’ माणूस जपण्याची. त्यांना हवे तसे दिसण्याचे, राहण्याचे आणि स्त्रियांच्या आनंदसोहळ्यात पूर्वीप्रमाणे मानाने सहभागी होण्याचे स्वातंत्र्य देण्याची...
धुळे दौरा करून जळगावला पोहोचतच होतो. मोबाईलवर विजयचा मेसेज आला. वडील गेल्याचे त्याने कळविले. मी लगेच त्याला कॉल केला. त्याने तो उचलला; पण फार काही बोलू शकला नाही. मी येऊन भेट घेते एवढेच आमचे बोलणे झाले अन् फोन ठेवला. बारा-तेरा दिवसांत माझा दौरा संपला. पुण्यात परत येण्याऐवजी तसेच रात्री आम्ही पंढरपूरला विजयच्या घरी गेलो. साधारण रात्रीचे साडेदहा-अकरा वाजले असतील.
दररोज काबाडकष्ट करून जगणारं कुटुंब. एका छोट्या घरात आजोबा, आई-वडील, बहिणीसह विजय राहतो. मुलाचेच निधन झाल्याने आजोबा सैरभैर झाले होते. आई अजूनही या धक्क्यातून सावरली नव्हती. शून्यात नजर हरवलेली आई, मी बोलताना मात्र मला प्रतिसाद देत होत्या. ऐकत होत्या. घरात सगळ्यांची विचारपूस करून मी निघाले तेवढ्यात विजयची आई लगबगीने पुढे आल्या. दोन मिनिटं थांबा म्हणत बाहेर गेल्या. कोणीतरी शेजारी बोलवून आणली. देवघरातले हळदीकुंकवाचे पाळे त्या शेजारणीच्या हातात देऊन ताईंना तेवढे कुंकू लावा म्हणाल्या. स्वतः एवढ्या दुःखात असतानाही मी निघताना त्यांनी आपले अश्रू पुसून क्षणात केलेली लगबग मला अनपेक्षित होती. त्या क्षणी मला काहीच सूचेना. काय बोलावे तेच समजेना.
विजयच्या आईच्या मनाची होत असलेली अस्वस्थता माझ्या लक्षात आली. यापूर्वी एकदा घरी गेले तेव्हा त्यांनी स्वतः हळदीकुंकू लावले होते. आज त्यांना आपण हळदी-कुंकू लावू शकत नाही, यापेक्षा आपल्याला आयुष्यभर हळदीकुंकवाची बोटं कुणाच्याच कपाळावर लावता येणार नाही आणि कोणीही आपल्याला लावणार नाही, याची कदाचित जास्त अस्वस्थता आणि त्या मागची असुरक्षितता होती. मी घरी गेले; पण आपण काहीच करू शकत नाही, याची प्रचंड घालमेल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
मी त्यांच्या शेजारणीच्या हातातील हळदीकुंकवाचे पाळे घेऊन विजयच्या आईच्या हातात दिले. तुम्ही लावा मला हळदी-कुंकू, मला चालेल, असे म्हणत माझे कपाळ पुढे झुकवले. त्यांच्या डोळ्यातून भराभर अश्रू वाहू लागले. त्यांचे हात थरथरत होते. काहीतरी बोलायचे होते; पण ओठातून शब्द फुटत नव्हते. ओठही थरथरत होते. हातातले पाळे कदाचित खाली पडले असते म्हणून त्यांचा हात हातात घेऊन हळदी-कुंकवामध्ये त्यांची बोटं बुडवून माझ्या कपाळावर लावायला सांगितली. त्यांनी ती बोटं लावताच, पाळे बाजूला ठेवून घट्ट मिठी मारली. त्या मिठीतच हतबललेला मायेचा आधार मिळाल्याचे जाणवत होते. खूप दिवसापासून रोखून ठेवलेला भावनांचा बांध मोकळा झाल्याची जाणीव होती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पतीचा आधार गेला, तरी या समाजाने आपल्याकडे तुच्छित नजरेने न बघता सन्मानाने पाहावे, यासाठी नव्या विचारांच्या नव्या दिवसाची पहाट होत होती, याच विश्वास होता. त्या मिठीत ‘मी लढेन, मी जिंकेल’ हा नवा आत्मविश्वास होता.
विजयच्या घरातून बाहेर पडले. मग दोन हळदी-कुंकवाच्या बोटांनी जगण्याचा साज आणि जीवनाचे सार सांगितले. कपाळावरचे पुसलेले कुंकू पुन्हा लावताना ज्ञानाची कास धरण्याचे स्वप्न उराशी बाळगावे. हातात नव्याने बांगड्या भरताना मनगटातील ताकद वाढवावी. आपल्या हातांकडे सुरक्षेची ढाल म्हणून बघावे. स्वत: आरशात न्याहाळताना स्वत:च्या देखण्या रूपाबरोबर सुंदर मनाचेही ऐकावे. खरेतर पतीच्या निधनानंतर फक्त एक पत्नी विधवा होत नसते, तर समाज बेढब होतो. नकारात्मकतेने फुगतो. अज्ञानाने काळवंडतो. चुकीच्या प्रथा परंपरेत गढून जातो. एकप्रकारे दृष्टिकोन हरवलेला समाज दृष्टिहीन होतो. कुठेतरी वाचलं होतं, ‘‘समाज हा परिवर्तनशील असतो.’’ हे परिवर्तन आपणच घडवून आणायचं असतं.
मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आम्ही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतो. दहा घरी आमंत्रण देताना, अकरावे घर गाळतो आणि पुढच्या घरांना आमंत्रण देतो... घर गाळायचं कारण विचारलं तर तिथे ‘विधवा’ रहाते हे आमचे उत्तर; पण कोणी दिला तुम्हाला या स्त्रियांचा अस्तित्वाचा अपमान करण्याचा अधिकार? भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली आणि ‘माणूस’ म्हणून जगण्याचा अधिकारही! पण जे आमच्या जगण्याचा अधिकार हिरावतात, ती कधी ‘माणसं’ होणार?
ही स्त्री आपल्यापैकीच कुणाची आई असू शकते, कुणाची बहीण, कुणाची वहिनी, कुणाची सासू; पण शेवटी ‘आपलं’च माणूस. आजच्या वेगाने धावत असलेल्या जगात जुनाट प्रथा कुरवाळत बसण्यापेक्षा खरी गरज आहे ती ‘आपलं’ माणूस जपण्याची. त्यांना हवे तसे दिसण्याचे, राहण्याचे आणि स्त्रियांच्या आनंदसोहळ्यात पूर्वीप्रमाणे मानाने सहभागी होण्याचे स्वातंत्र्य देण्याची गरज आहे फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची... कारण पुढे टाकलेले हे एक पाऊल कदाचित पुढच्या अनेक पावलांच्या दृष्टीने एक नवी सुरुवात असू शकेल... नाही का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.