वेगळं व्हायचंय; पण कुणापासून? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Different leave

ऐन तरुणपणात पतीचे निधन झाल्यानंतर रमाकाकूंनी अथर्वला लहानाचं मोठं केलं. वडील गेल्यापासून त्याची फक्त आईच नव्हे तर ‘बाबा’ही झाल्या.

वेगळं व्हायचंय; पण कुणापासून?

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

ऐन तरुणपणात पतीचे निधन झाल्यानंतर रमाकाकूंनी अथर्वला लहानाचं मोठं केलं. वडील गेल्यापासून त्याची फक्त आईच नव्हे तर ‘बाबा’ही झाल्या. त्यांनी स्वतःसाठी कसलाच आनंद आयुष्यात पाहिला नाही, स्वतःच्या सुखाचा विचार सोडून सर्व आयुष्य त्यांनी मुलासाठी खर्ची घातलं. ऐन तारुण्यात वैधव्य आले तरी मुलाच्या सुखासाठी दुसरं लग्न केलं नाही. तोच अथर्व लग्न झाल्यानंतर ‘वेगळं राहायचं’ म्हणाला आणि आयुष्यभर अनेक आव्हानांचे डोंगर सहज पार करत आलेल्या रमाकाकू एकदम कोसळल्या...

बचत गटांची मीटिंग होती. ती संपली की लगेच दौऱ्याला निघायचं म्हणून थोडी धावपळ सुरू होती. मीटिंगमध्ये आलेल्या सगळ्यांना भेटून निघेपर्यंत वेळ लागणार आहे, हे लक्षात येताच पुढे तसा निरोप सांगून थोडी निवांतच खुर्चीत विसावले. मीटिंग सुरू झाल्यापासून मी पाहत होते, रमाकाकू आज जरा अस्वस्थ वाटत होत्या. प्रत्येक मीटिंगला त्यांचा उत्साह प्रचंड असायचा. वयाने ज्येष्ठ असल्या, तरी पुढे होऊन सगळ्यात हिरिरीने भाग घ्यायच्या. इतरांना प्रोत्साहन द्यायच्या; पण आज फार काही बोलल्या नाहीत, चर्चेत सहभागीही झाल्या नाहीत. आतासुद्धा शेवटी बसून होत्या. त्यांना काहीतरी सांगायचे असेल; पण सगळ्यांमध्ये बोलू कसं, असे वाटत असेल म्हणून सगळे जायची वाट कदाचित त्या बघत होत्या.

हॉल रिकामा होताच. लगबगीने माझ्याकडे आल्या. म्हणाल्या, ‘‘रूपाली, मला बोलायचंय तुझ्याशी. पाच मिनिटं दोघीच बसू.’’ चला म्हणत, माझ्या केबिनमध्ये आलो. आत येताच माझा हात घट्ट धरला आणि बोलायला सुरुवात केली; पण कदाचित बोलायला शब्दच फुटेनात, ओठ थरथरत होते. शब्दाऐवजी डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ‘‘काय झालं काकू?’’ विचारताच घट्ट मिठी मारून रडू लागल्या. मला समजेना नक्की कांकूना काय झालं? इतक्या का त्या अस्वस्थ झाल्या.

‘काकू तुम्ही शांत बसा जरा, आपण चहा घेऊ, नंतर बोलू.’’ त्यांना खुर्चीत बसवलं. चहा घेतला, थोडा वेळ जाऊ दिला. त्यांचा हात हातात घेऊन सांगितलं, ‘‘काहीही अडचण असू देत. मी तुमच्यासोबत आहे, काळजी करू नका. मोकळेपणाने बोला.’’ त्यांना धीर दिला. थोड्या मोकळ्या झाल्या आणि बोलू लागल्या.

‘रूपाली, तुला माहिती आहे ना गं, हे गेल्यानंतर मी कसं आयुष्य काढलं. अथर्व तर अगदी तीन वर्षांचा होता. अपघातात त्यांचं निधन झालं. सासू-सासरे, छोटा अथर्व आणि आम्ही दोघे असा हसताखेळता संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. त्यांच्या जाण्याच्या धक्क्याने सासरे दोन महिन्यांत गेले. सासूबाईंना हे लागोपाठचे आघात काही सहन झाले नाहीत, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला.

दहा दिवस नातेवाईक, माहेरची माणसं आधाराला होती. हळूहळू त्यांनीही पाठ फिरवली. नेहमी त्यांच्याकडे येणारे, त्यांनी मदत केलेली माणसंसुद्धा क्षणात ओळख विसरली. छोट्या अथर्वला घेऊन कुठे जाणार? कसं जगणार? हे जग जगू देईल का? इतके वाईट अनुभव विखारी नजरेने यायला लागले. आपली चांगली वाटणारी माणसं आतून किती विद्रूप होती, हे त्यांच्या हावभावावरून जाणवत होतं. नवरा होता तोपर्यंत खरंच खूप सुखाच्या, मायेच्या आणि आधाराच्या घरट्यात होते. आता तर घरटंच वादळात उडून गेलं, जगासमोर उघड्यावर आल्यासारखं झालं. सासुबाईंचं दुखणं आणि घरासाठीचं कर्ज वाढत गेलं. पहिले सहा महिने तर मला हे जग सोडून गेलेत हे समजून घ्यायलाच गेले. चारी बाजूला अंधार दिसत होता. आपले म्हणणाऱ्यांनी तर केव्हाच पाठ दाखवली होती. इतक्या मोठ्या जगात इतके कसे आपण ‘पोरके’ आणि ‘परके’ झालो, हे तर बुद्धिपलीकडचं गणित, ते अजूनही उलगडलं नाही. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली. नवऱ्याने कायम आनंदात ठेवलं. फार घराबाहेर पडायची गरज पडू दिली नाही. पण आता..? शेवटी मनाची तयारी केली, छोट्या अथर्वला बरोबर घेऊन जवळच्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटले.

मुख्याध्यापक पतीला ओळखत होते. एक चांगला प्रामाणिक, सोज्वळ माणूस म्हणून पतीचा आदर करत होते. या ओळखीवर त्यांनी मला शाळेत साफसफाईची नोकरी दिली. नंतर अथर्वला या शाळेत घातले. त्याला पाहता पाहता माझं कामही करता येत होतं...’’

काकू पुढे सांगू लागल्या, ‘‘नंतर तो जसा मोठा होत होता, त्याने चिडचिड करायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आलं, मित्रांसोबत असताना, शाळेत मी सफाईकाम करतेय, तर तो ओळख न दाखवल्यासारखं वागतोय. मला तर दुसरीकडे काम नसतं मिळालं, पण मीच अथर्वची शाळा बदलली. त्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शाळेच्या कामानंतर अजून दोन घरी कामं करायला सुरुवात केली. हळूहळू परिस्थिती बरी झाली.’’

हा सगळा प्रवास सांगताना त्यांनी मुलासाठी खाल्लेल्या खस्ता अधोरेखित होत होत्या. त्या सांगू लागल्या, ‘‘त्याला नोकरी लागली. दोन वर्षांपूर्वी लग्नही लावून दिलं. सुखाने संसार चाललाय त्याचा. अधूनमधून चिडचिड करतो, दोघा नवराबायकोमध्ये वाद होतात, मी फार त्यांना काही विचारत नाही; पण काल काय झालं माहीत नाही, आम्हाला वेगळं राहायचं म्हणाला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आयुष्यभर त्याच्यासाठी कष्ट केले, समाजाची अवहेलना सहन केली, सासुबाईचं आणि अथर्वचं करता करता आयुष्याची संध्याकाळ कधी झाली तेही समजलं नाही. तो वेगळे राहायचं म्हणतोय; पण कोणापासून..? घरात मी आणि ते दोघेच असतो. माझा इतका का त्रास व्हावा. एकुलता एक मुलगा हीच माझ्या आयुष्याची संपत्ती. मी त्याचे बाबा गेल्यापासून त्याची आई कमी आणि ‘बाबा’ जास्त होऊन या समाजात त्याच्यासाठी जगले. मी कोणासाठी जगतेय हेच मला समजलं नाही, हरले मी.’’ असं म्हणत त्या जरा वेळ स्तब्ध झाल्या.

‘महिन्यातून एकदा तुझ्यासोबतच्या मीटिंगला यायचं म्हणून आनंद वाटायचा. सगळं काम करून येऊन बसायचे. बायकांमध्ये मन मोकळं व्हायचं; पण कालपासून पुन्हा ‘परकं’ केलं मला याने.’’ काकूंच्या भावनांचा बांध फुटला. कसंतरी समजून सांगून घरी पाठवलं.

दुसऱ्या दिवशी अथर्वला आणि त्याच्या बायकोला बोलवून घेतलं. त्यांना समजावून सांगितलं. वडील गेल्यापासून आई ‘आई आणि बाप’ म्हणून तुला सांभाळत राहिली, तिने स्वतःसाठी कसलाच आनंद आयुष्यात पाहिला नाही, ती स्वतःच्या सुखाचा विचार करू शकली असती, तर आज तुझी अवस्था काय झाली असती..? ऐन तारुण्यात वैधव्य आले तरी तुझ्यासाठी आणि तुझ्या सुखासाठी दुसरं लग्न केलं नाही. जी आपल्या सुखासाठी आयुष्यभर झिजली तिच्यासाठी आपण तिच्या दुःखाची किनार व्हावी, यासारखे दुर्दैव नाही...’’ हे ऐकून अथर्वचे बऱ्यापैकी डोळे उघडले.

आईला अंतर देणार नाही म्हणून माफी मागून गेला. दोन-चार दिवसांनी रमाकाकू, अथर्व आणि सूनबाई तिघंही एकत्र भेटायला आली. रमाकाकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटलं. मनात विचार आला, असे अनेक अथर्व आजूबाजूला वावरतात, कोरोना कालावधीत तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना स्वतः आणून सोडणारे ‘महाभाग’ कमी नव्हते. म्हणून मी पालकांना कायम सांगत आले, उंच गेलेला झोका खाली येणार असतो, उगवणारा सूर्य मावळतीला जाणार असतो... म्हणून आयुष्याच्या कमाईत आपल्यासाठी थोडं राखून ठेवा. नाहीतर ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या तेच ‘आमच्यासाठी काय केलं तुम्ही’ हे निरुत्तर प्रश्न विचारून तुम्हाला रस्त्यावरच्या गर्दीत एकटे सोडून देतील.

भावनांच्या प्रवाहात वाहताना थोडं जीवनाचं वास्तव आधीच स्वीकारून आयुष्याच्या गणिताबरोबर पुण्याच्या कमाईसोबत पैशाची तिजोरी राखून ठेवली, तर घराबाहेर ढकलणारे हात, दोन घास भरविण्यासाठी पुढे होतील... कटू पण सत्य आहे, याचाही विसर न होवो!

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.)