लेकरू अंगणातलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेकरू अंगणातलं

मुलींच्या जगण्याचा संघर्ष हा जन्मानंतर नाही, तर दुर्दैवाने आईच्या गर्भातूनच सुरू होतो. वंशाला वारसदार हवा म्हणून कित्येक कळ्या उमलण्याआधी गर्भातच खुडल्या जातात.

लेकरू अंगणातलं

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

मुलींच्या जगण्याचा संघर्ष हा जन्मानंतर नाही, तर दुर्दैवाने आईच्या गर्भातूनच सुरू होतो. वंशाला वारसदार हवा म्हणून कित्येक कळ्या उमलण्याआधी गर्भातच खुडल्या जातात. परक्याचं धन म्हणून शिक्षणावर खर्च करण्याऐवजी लग्नानंतर लेक सुखी राहावी म्हणून हुंड्याच्या बाजारात मागेल ती रक्कम देता यावी म्हणून बाप पोटाला चिमटा घेऊन लेक वाढवत असतो. ही समाजमनातली मानसिकता बदलण्याची गरज आहे.

कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील खोची या छोट्या, शांत गावासाठी ३१ ऑक्टोबर २०२१चा दिवस दुर्दैवी होता. एका शेतमजूर आई-बाबांची एकुलती एक सहा वर्षांची मुलगी श्रावणी (नाव काल्पनिक) घरी एकटीच खेळत होती. हातावर पोट असलेले आई-बाबा शेतावर मजुरीसाठी गेलेले. दुपारी आई घरी परत आली तेव्हा श्रावणी जवळपास दिसली नाही. शेजारी, परिचितांकडे चौकशी केली; पण श्रावणी आढळली नाही. गावातील सर्वांनी शोधाशोध केल्यानंतर साधारण सात तासांनी जखमी अवस्थेत ही चिमुरडी गावाबाहेर निर्जन ठिकाणी निपचित आढळली.

अतिशय क्रूर अनुभवातून जात तिने जगाचा निरोप घेतला होता. स्थानिक रुग्णालयाने तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. पोलिसांनी अपहरण, बलात्कार असा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ज्या वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, त्या हद्दीत पहिल्यांदाच असा क्रूर प्रकार घडला होता. गावातील वातावरण संवेदनशील झालं होतं. या घटनेची मला रात्री उशिरा माहिती मिळाली. ताबडतोब मी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांशी बोलून त्यांना जलद कारवाई करण्याचे निर्देश दिले. दुसऱ्याच दिवशी २८ वर्षीय आरोपीला अटक झाली. लहान मुलांबाबत घडणाऱ्या लैंगिक गुन्ह्यात आरोपी परिचित असल्याचे वारंवार समोर आले आहे. या घटनेतील आरोपी या चिमुरडीला ओळखत होता. याचा गैरफायदा घेत, तिला आमिश दाखवत त्या मुलीसोबत त्याने दुष्कृत्य केले होते.

एकुलती एक लहान मुलगी जिला अजून व्यावहारिक जगाची ओळखही नाही, अशा पोटच्या गोळ्याला गमावण्याचं दुःख या आई-वडिलांना सोसावं लागत होतं. त्यांच्या घरी त्यांची मी सांत्वन भेट घेतली. साधं कुडाचं घर, आई-वडील मोलमजुरी करून घराचं घरपण जपण्याचा प्रयत्न करत होते. उन्हानेही सगळीकडे सहज डोकवावं आणि पावसाच्या पाण्याने आतून अख्खं घर लखलखीत स्वच्छ करावं, असं साधं कुडाचं घर. मी बाहेर अंगणातच बसलेले. गाव गोळा झालेलं. सोबत पोलिस, तपास अधिकारी तसेच आयोगाचे स्थानिक समुपदेशक आनंद शिंदे होते.

थोड्या वेळातच घरातून एक १४-१५ वर्षांची मुलगी हातात पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. खूप उत्सुकतेने आणि अपेक्षेने माझ्याकडे बघत होती. कदाचित तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, मी तिला जवळ येण्यासाठी खुणावलं. ती अंग चोरून जवळ येऊन बसली. ती काही बोलेना. नुसतीच भरल्या डोळ्याने पाहत होती. आता कोणत्याही क्षणी तिचा बांध फुटेल, असं वाटत असताना मी हळूवारपणे तिला विचारलं, ‘‘काय बोलायचंय का तुला?’’ त्यावर तिने अस्वस्थपणे होकारार्थी मान डोलावली. गोळा झालेल्या गावाकडे एक नजर फिरवून माझ्याकडे पाहत म्हणाली, ‘‘माझी बहीण हायं ती, तिला मारणाऱ्या माणसास्नीबी तुम्ही शिक्षा करा आणि त्यालापण तसंच मारा म्हणजे किती तरास होतो, त्यास्नी बी समजंल.’’ हे सांगताना तिचे ओठ थरथरत होते आणि ती रडू लागली. सांगताना तिच्या आवाजातील वेदना आणि भावना मी समजू शकत होते. तिला किती त्रास होत होता, हेही मला जाणवत होतं. तिचं काय सांत्वन करू हेच मला समजेना. तिला जवळ घेत तिच्या पाठीवरून हात फिरवला. माझे शब्दच निःशब्द झाले होते... नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढलेलं लेकरू असं कोणीतरी ओरबाडून घेऊन जावं आणि तिच्या आयुष्याशी खेळावं, ही कल्पनाच किती भयावह आहे.

ज्या दिवसांत झोक्यावर बसून आनंदाचं गाणं गावं, आईचा पदर धरून हट्ट करावा, मागितलेली वस्तू नाही मिळाली म्हणून हातपाय आपटून सारं घर डोक्यावर घ्यावं, सांगितलेलं ऐकलं नाही म्हणून मोठ्या बहिणीचे चार धपाटे खावे, बाबांकडे मागितलेला खाऊ मिळाला की बाबाच्याच कडेवर घरभर फिरावं, असं हे वय. या वयात अशा सगळ्या गोष्टी करायच्या सोडून असं निष्ठूर मरण यावं आणि तेही या गिधाडांच्या वासनांमुळे. सगळंच असह्य होतंय. तिची आई शून्यात नजर लावून बसलेली. काय बोलणार मी तिच्याशी तरी? पोटचं लेकरू गमावलेल्या या माऊलीच्या वेदना पाहावत नव्हत्या. या क्षणाला इथे कोणाशीच काही बोलू शकले नाही, पण या अन्यायला न्याय द्यायचाच, हा निर्धार करून घराच्या बाहेर पडले.

महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून राज्यभर दौरे सुरू असले, जन सुनावण्या घेत असले, तरी या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात होते. सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत राहिले. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना फोनवरून संपर्क साधत सातत्याने त्यांना सूचना देत होते आणि अखेर विविध कठोर कलमांचा पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिनाभरात जलद तपास करत, पुरावे गोळा करत पोलिसांनी २ डिसेंबर २०२१ ला दोषारोपपत्र दाखल केले.

आता लढाई न्यायालयात लढायची होती. दरम्यान राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटून फास्टट्रॅक न्यायालयात याची सुनावणी व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू झाला होता. निष्णात वकील ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती सरकारी वकील म्हणून झाली होती. त्यांच्याशी संपर्क- संवाद होत होता. जिल्हा न्यायालयात २२ मार्च २०२२ ते २ एप्रिल २०२२ या कालावधीत एकूण १३ दिवस सुनावणी चालली. २८ साक्षीदार तपासले गेले. पोक्सोसारख्या बालकांचे संरक्षण करणारा कायदा, विविध कलमे, पोलिसांनी घेतलेले अथक प्रयत्न त्यामुळे केस भक्कमपणे उभी राहिली होती. सरकारी वकील यांनीदेखील आपले कौशल्य पणाला लावले. सहावर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या संपूर्ण प्रकरणात विविध टप्प्यांवर, विविध यंत्रणांशी मी संपर्कात होते. गुन्हा दाखल करत असताना कठोर कलम लावली जावी, तपासात काही त्रुटी राहू नयेत, चार्जशीट दाखल झाल्यावर न्यायालयीन प्रक्रिया, गृहमंत्र्यांशी संपर्क असा दररोज पाठपुरावा होता. श्रावणीला जलद न्याय मिळाला, आरोपीला कठोर शिक्षा झाली. पण अनेक प्रलंबित खटल्यांची प्रक्रिया वेगाने पुढे गेली पाहिजे. अशा घटना घडूच नयेत, यासाठी मानसिकतेत बदल घडवण्याचं मोठं ध्येय आहे.

मुलींचा जगण्याचा संघर्ष हा जन्मानंतर नाही, तर आईच्या गर्भातूनच सुरू होतो. वंशाला वारसदार हवा म्हणून कित्येक कळ्या उमलण्याआधीच गर्भातच खुडल्या जातात. परक्याचं धन म्हणून शिक्षणाला खर्च करण्याऐवजी लग्नानंतर लेक सुखी राहावी म्हणून हुंड्याच्या बाजारात मागेल ती रक्कम देता यावी म्हणून पोटाला चिमटा घेऊन तो बाप लेक वाढवत असतो. लग्नात हुंडा दिला म्हणून लग्नानंतर लेक सुखी नांदेल, या घोर अज्ञानापायी तो रात्रंदिवस काबाडकष्ट करून पै-पै जमवत असतो.

त्या बापाला सांगावंसं वाटतं,

‘अपनी बेटीओ को चार किताबे पढने दीजिये साहब, कोक से बच आयी है, दहेज से भी बच जाएगी’

(लेखिका महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Web Title: Rupali Chakankar Writes Children Girl Life Mother Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..