
लहानपणी मुलांनी कितीही त्रास दिला म्हणून आई-वडील त्यांना घराबाहेर हाकलून देत नाहीत. म्हातारपण हेही दुसरे बालपणच असते.
ठेच
- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com
लहानपणी मुलांनी कितीही त्रास दिला म्हणून आई-वडील त्यांना घराबाहेर हाकलून देत नाहीत. म्हातारपण हेही दुसरे बालपणच असते. त्यामुळे वृद्ध आई-वडिलांचे काही चुकले म्हणून त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचे नसते; तरीही समाजात अशी कृतघ्न मुले आहेतच. त्यामुळे मुलांना शिक्षण, उत्तम आरोग्य, उत्तम संस्कार देणे जशी आई-वडिलांची कर्तव्ये आहेत, तशी त्यांनी मुलांची कर्तव्येही आपल्या अनुकरणातून शिकवायला हवीत.
दिवसभर कार्यक्रमांची खूप लगबग होती. प्रत्येक ठिकाणी हजेरी लावायची यादी मोठी होती. वेळेत सगळीकडे जाणे अशक्य होते, तरी प्रयत्न होता की, सगळीकडे उपस्थित राहात आयोजकांना शुभेच्छा द्याव्यात. शेवटचा कार्यक्रम बालअनाथ व वृद्धाश्रमाधील होता. तिथे मी पोहोचल्याशिवाय त्यांच्या वर्धापनदिनाला सुरुवात होणार नव्हती. थोडा वेळ लागतोय, असे आयोजकांना कळवून सगळे कार्यक्रम वेळेत करण्याचा प्रयत्न करीत होते; तरीसुद्धा सायंकाळच्या आश्रमातील कार्यक्रमाला पंधरा-वीस मिनिट उशीर झालाच. आश्रमशाळेच्या संचालिका माधवीताई आपल्या चिमुकल्यांना घेऊन स्वागताला उभ्या होत्या. काही उत्साही कार्यकर्ते सोबत होते. ढोल आणि लेझीमच्या गजरात माधवीताईंनी स्वागत केले.
अनेक मान्यवर पाहुणे आमंत्रित होते. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, काही परदेशी पाहुणेही उत्साहात सहभागी झाले होते. पाहुण्यांसोबत चहापाणी घेऊन माधवीताई इमारत पाहायला घेऊन गेल्या. प्रत्येक विभाग स्वच्छ होता. रुममधील सर्व विद्यार्थी कार्यक्रमासाठी मैदानावर होते. काही वृद्ध कदाचित जास्त आजारपणामुळे खाटेवरच पडलेले होते. सगळ्यांची विचारपूस करून आम्ही निघालो, तोच एका कोपऱ्यात लक्ष गेले... अंगावर चादर घेऊन एका कुशीला झोपलेल्या महिलेकडे मी परत वळून गेले. कोठेतरी पाहिलेले आहे, मनात शंकेची पाल चुकचुकली. मी चादर थोडी बाजूला करून जवळ जाऊन पाहिले अन् पायाखालची जमीन सरकली. या तर आमच्या सुलभाताई.
मी नवीनच बचतगट सुरू केले होते. २००२ची घटना असेल. खूप मोठ्या प्रमाणात बचत गट आणि त्या सगळ्या सदस्यांच्या मासिक आढावा बैठका, त्यावेळी सुलभाताई गटप्रमुख म्हणून माझ्यासोबत काम करत होत्या. पती एका दुकानात काम करत होते. स्वतः त्या शिलाईकाम करत घर चालवत होत्या. गावावरून पतीच्या नोकरीसाठी २५/३० वर्षांपूर्वी पुण्यात आल्या. नव्याने संसार थाटताना काहीच हाताशी नव्हते. अशा बिकट परिस्थितीत स्वतः शिलाईकाम शिकून त्यांनी घराला हातभार लावला.
शिलाई शिकताशिकता ब्लाऊजला डिझाईन करून देणे हे हळूहळू त्या करू लागल्या. बदलत्या जगाप्रमाणे आपणही बदलले पाहिजे, नाहीतर जग आपल्याला कालबाह्य करत मागे टाकून पुढे निघून जाते, हे त्यांनी ओळखले होते. दोन्ही मुलांचे शिक्षण, त्यांचा अभ्यास शिकवणी आणि घर हे सगळे त्यांनी केले होते; पण आताची परिस्थिती वेदनादायक होती. ज्यांच्यासाठी आयुष्यभर जगली, त्यांना जन्म देणारी ‘आई’ का नको वाटली? मी तिथूनच त्यांच्या मुलांना घरी फोन लावला. संध्याकाळी भेटायला बोलावले. ती दोघेही हो म्हणाली. दोन दिवसांनी तुमच्याच घरी भेटायला येते सांगून सुलभाताईचा निरोप घेतला.
संध्याकाळी मुले आपल्या परिवारासह भेटायला आली. सुलभाताई का नाही आल्या सोबत, असे विचारताच त्यांनी आईबद्दलच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. त्यांचे ऐकून घेतले. म्हातारणपण हे दुसरे बालपण असते. लहानपणी तुम्ही त्रास दिला म्हणून त्यांनी तुम्हाला घराबाहेर हाकलून नाही दिले. वयाच्या मानाने त्यांच्याकडून काही चुका झाल्याही असतील; पण आयुष्यभर स्वतःचे सणवार, हौसमौज बाजूला ठेवून तुमचे सण त्यांनी साजरे केले. दिवाळीत स्वतःला साडी न घेता तुमची फटाके आणि नवीन कपड्यांची हौस कायम पुरवली. शाळेच्या नवीन वर्षात नवीन बूट घेणारा बाप, कायम स्वतः फाटलेली चप्पल घालत राहिला.
संपूर्ण आयुष्य ज्यांनी तुमच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी घालवले, त्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा, तुम्ही उतराई म्हणून दिल्या. ही तर तुमची कृतघ्नता. दुसरी गोष्ट म्हणजे कायद्याच्या चौकटीत आज तुम्ही दोघे दोषी आहात. तुम्हाला याची कडक शिक्षाही होऊ शकते. शिक्षा होईल म्हटल्यावर दोघांचेही चेहरे पांढरे पडले. क्षणभर थांबून एकमेकांकडे पाहून ताई थोडा वेळ देता का, म्हणत बाजूला गेले. अर्ध्या तासाने आत येत, ताई आम्ही उद्याच जाऊन आईला घेऊन येतो. चुकले आमचे. स्वार्थीपणाच्या जगात वावरताना कर्तव्यच विसरून गेलो होतो म्हणत माफी मागून निघून गेले. दोन दिवसांनी सुलभाताईंना घरी जाऊन भेटले. त्या माऊलीच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचे मोजमाप होऊ शकणार नाही.
पण मला पालकांनादेखील आवर्जून सांगायचे आहे, मुलांना शिक्षण, उत्तम आरोग्य, उत्तम संस्कार देणे जशी आपली कर्तव्य आहेत, तशी मुलांची कर्तव्यही त्यांना आपल्या अनुकरणातून जाणवून द्या. आपली संपत्ती ही आयुष्याच्या सायंकाळची आपली गरज आहे. ती शेवटपर्यंत तुमच्या स्वाधीन राहू देत. दोन पावलं, एका वेळी कधीही एकत्र टाकता येत नाही. एक पाऊल पुढे, तर दुसरे मागे.. तेव्हाच चालणे शक्य होते. आयुष्यही अगदी तसेच. कोणीतरी आधी जाणार. मागे राहिलेल्याला या जगाच्या वेदना सहन कराव्या लागणार. त्यासाठी आपणच आपली तजवीज करून ठेवावी. हे निसर्गाचे सत्य स्वीकारले तर अशी वेदनादायक अवस्था होणार नाही.
आता निश्चितीने विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया॥
(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)