बापमाणूस

बारा लहान-मोठ्या चुलत बहिणी, सात भावंडांमध्ये शेंडेफळ म्हणून मी वडिलांच्या कडेवर सगळा गाव फिरून यायचे.
Father and Daughter
Father and Daughtersakal
Summary

बारा लहान-मोठ्या चुलत बहिणी, सात भावंडांमध्ये शेंडेफळ म्हणून मी वडिलांच्या कडेवर सगळा गाव फिरून यायचे.

- रूपाली चाकणकर, rchakankar95@gmail.com

बारा लहान-मोठ्या चुलत बहिणी, सात भावंडांमध्ये शेंडेफळ म्हणून मी वडिलांच्या कडेवर सगळा गाव फिरून यायचे. मी नानांच्या नजरेतून सुटत थोडी इकडे, तिकडे गेले, दिसले नाही तर किंवा शाळेतून रिक्षा घरी यायला पाच मिनिटे उशीर झाला, तरी ‘नाना’ कासावीस होत. रात्रीच्या प्रवासावरून घरी यायला कितीही उशीर झाला, तरी सारं घर झोपलं असलं, तरी माझा ‘बाबा’ बाहेर येरझाऱ्या घालत वाट पाहत असतो. आजही माझ्या आजूबाजूला वावरणारे माझे नाना माझी माहेरची सावली आहे, अगदी पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाप्रमाणे मिळणारा लौकिक आणि पराकोटीच्या आश्वासकतेसारखी. लेकीसाठी ‘बापाच्या’ प्रेमाचा हा झरा अखंड खळखळत राहो... अगदी शेवटपर्यंत...

लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढले. कुटुंबातील संस्कार, पुण्याच्या शाळेतील शिक्षण आणि त्यामुळे त्यातून होत गेलेली जडणघडण, ही विचारांची शिदोरी आज स्पर्धेच्या या जगात स्पर्धक म्हणून लढण्यासाठी लागणारा आत्मविश्वास प्रज्वलित ठेवत आहे. कदाचित यामुळे यश डोक्यात जात नाही आणि अपयशाने नैराश्य येत नाही. कुटुंब, शाळा, ज्या परिसरात वाढले तेथील मानसिकता यांचा प्रभाव जरी असला, तरी ‘आई’ होऊन ज्याने मला जपले, वाढवले, सांभाळले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘प्रत्येक क्षणाला तुझं आहे ते आयुष्य, आणखी सुंदर करण्यासाठी मी कायम सोबत आहे’, हे सांगणारा माझा ‘बाबा’ मला आभाळाएवढा वाटतो... हो.. लहान होते तेव्हाही आणि आजही. आम्ही भावंडे वडिलांना ‘नाना’ म्हणत. सगळेच म्हणत म्हणून आम्हीही त्याच नावाने बोलवत असू.

घरात बारा लहान-मोठ्या चुलत बहिणी, सात भावंडे, सात काका-काकू, आजी, आजोबा आणि भलं मोठं घर. घरामागे जनावरांचा गोठा, त्यामागे मोगऱ्याची बाग, पहाटेपासून बंबातील गरम पाणी आंघोळीला. थंडीत शेकोटी पेटवलेली असायची. अंगणात गावातील मंडळी येऊन बसायला सुरुवात व्हायची. आजीची पहाटेच देवपूजा झालेली असायची. धारा काढून दुधाच्या बादल्या स्वयंपाक घरात यायच्या. काकडी, बीटच्या राशी अंगणात जनावरांसाठी ठेवलेल्या असायच्या. मोगऱ्याच्या सुगंधाने घरभर दरवळ पसरलेला असायचा. लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण ‘आनंदाचे डोई आनंदाचे तरंग...’ या भावविश्वात वावरताना दिसायचा. छोटेखानी गोकुळ नांदायचे या धरतीवर...

चुलीवरच्या वाफाळलेल्या गवती चहाचा सुवास आजही आठवतो. या सगळ्यांच्या धामधुमीत मी मात्र शेंडेफळ म्हणून वडिलांच्या कडेवर सगळा गाव फिरून यायचे. पुण्यातून सुटीसाठी दिवाळीत गावी गेलो, की हा आनंदाचा सडा लुटून यायचो. लेकीच्या मागे सारा दिवस नानांचा जात. बाकीची भावंडे भांडत, खेळत, धडपडत, रडत परत एकत्र होत. मी नानांच्या नजरेतून सुटत थोडी इकडे, तिकडे गेले, दिसले नाही तर ‘नाना’ कासावीस होत. चिंचा खाऊ नको, पेरू खाऊ नको, आंबट नको, तिखट खाल्लं की सहन होणार नाही, आईस्क्रीम नको सर्दी होईल, असं म्हणून काहीच खाऊ द्यायचे नाही.

खेळायला गेले तरी पडशील, ठेच लागेल, ऊनच लागेल, असं म्हणत स्वतः आजूबाजूलाच बसून राहात. लेकीसाठी सतत ‘घारीची’ नजर करून फिरत... कायम लेकीने आपल्या पंखाखाली असावं, असं त्यांना वाटत. सुट्या संपून शाळेसाठी पुण्यात आलो की, सकाळच्या शाळेसाठी माझी रिक्षा मला घ्यायला यायची. ६:३० वाजता घरातून बाहेर पडताना आई-बाबा दोघे रिक्षापर्यंत सोडवायला उभे असत. दररोज सकाळी सहा वाजता गरम पोहे, चहा आणि बिस्कीट असा नाश्ता केल्याशिवाय हे दोघे बाहेर पडू देत नसत. शाळेतून रिक्षा घरी यायला पाच मिनिटे उशीर झाला, तर नाना का उशीर झाला म्हणत, वाटेत रिक्षा गाठायचे. मी शाळेतून आल्याशिवाय आणलेला खाऊ कोणालाच मिळायचा नाही. माझ्या मोठ्या बहीण-भावाला राहून राहून शंका यायची फक्त ‘हीच’ आई-वडिलांची आहे.

आमच्या दोघांना कोणाकडून तरी सांभाळायला घेतले असेल. मोठा भाऊ संतोष तर एकटी सापडू देत, तुला खूप मारणार आहे, असं मनातल्या मनात खुन्नस धरून हजार वेळा बोलला; पण असं कधीच झालं नाही (नंतर त्याने ते बोलून दाखवले). घरातही आई सोबत असायचीच, एक दिवसही मला सोडून कोठे जायची नाही. ती वर्षांतून एकदा शिर्डीला जायची; पण तीही मला सोबत घेऊन. आम्ही तिघेच, हसत खेळत राहणाऱ्या या गोकुळात अचानक आईच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली. नानांना आम्हाला कसं सांभाळावं, हेच समजेना. त्यातल्या त्यात मी आईशिवाय जगूच शकणार नाही, हिची अवस्था आधीच बिकट, तिला कसं सावरू, याची त्यांना काळजी. त्यांना आता बाप कमी आणि आमची तिघांची ‘आई’ होऊन आम्हाला सांभाळायचं होतं, कारण ते दोघे पती-पत्नी म्हणून सतत बरोबर असत. आता आईचं नसणं नानांना उदास करणार होतं; पण तरीही स्वतःचे दुःख बाजूला ठेवत आमच्यात एकरूप झाले.

नातवंडांना लेकीसारखं कडेवर घेऊन जग दाखवू लागले. माझं समाजकारण-राजकारण सुरू झालेलं.

सासू-सासरे आजारपणात गेले. त्यांची जागा वडीलकीच्या नात्याने घेत लक्ष देऊ लागले. बाळंतपणात बहिणीच्या जवळ हॉस्पिटलमध्ये राहिले. आई करेल त्यापेक्षा कदाचित जास्त काळजी बहिणीची घेतली. आमचे आजारपण, नातवंडांच्या क्लासच्या वेळा, घरातील पै-पाहुणे, बाजार सारेच नाना पाहत. रात्रीच्या प्रवासावरून घरी यायला कितीही उशीर झाला, अगदी पहाटे पोहोचले, तरी सारं घर झोपलं असलं तरी माझा ‘बाबा’ बाहेर येरझाऱ्या घालत वाट पाहत असतो.

मुलाचा आणि नवऱ्याचा कधी येणार, सावकाश ये, सांगणारा फोन येतो; पण नानांचा फोन ड्रायव्हरला असतो, किती वाजेपर्यंत याल.. सावकाश या, मी आहे जागा... कदाचित ‘मी आहे...’ हे प्रत्येक बापाचे शब्द लेकीला जगण्याचं बळ देत असतं. खिसा रिकामा असला, तरी माझ्यासाठी माझा बाबा जग मुठीत घेऊन देईल, हा विश्वास लेकीला असतो. बापाच्या छोट्या छोट्या कौतुकाने जग जिंकल्याचा आनंद आपल्याला होत असतो आणि जगात कोणाच्याही कौतुकापेक्षा त्या कौतुकाच्या दोन शब्दासाठी कितीही कष्ट घ्यायची आपली तयारी असत. कारण जगातील एकमेव निरपेक्ष भावनेचा तराजू त्याच्या पारड्यात झुकलेले असतं.

लेकीसाठी तिचा बाप तिचं अंगण असतो, माहेर असतो, म्हणूनच मला ‘नाना’ आभाळाएवढे मोठे वाटतात... मी आयसीयूमध्ये असताना, ‘हे तर काहीच नाही... तू लवकर बरी होशील’, असं माझ्यासमोर हसतहसत म्हणणारे नाना गॅलरीतून डोळे पुसून आलेले असतात. एखाद्या अपयशाच्या क्षणाला ‘हे क्षुल्लक आहे, त्यात काही विशेष नाही, त्याच्यापेक्षा खूप मोठं यश मिळेल...’ असे हसत हसत सांगणारे नाना बहिणीजवळ भरल्या डोळ्याने खंत व्यक्त करत असतात. आजही मी पहाटे दौऱ्यासाठी बाहेर पडताना स्वयंपाकवालीची वाट न पाहता स्वतः सुंदर पोळी-भाजीचा डबा तयार करून सगळ्या स्टाफला सुंदर चहा देऊन हसतमुखाने लेकीला गाडीजवळ सोडवायला तयार असतात. आजही त्यांना त्यांची लेक कडेवरच आहे, असं वाटत असावं...

आजही माझ्या आजूबाजूला वावरणारे माझे नाना माझी माहेरची सावली आहे. अगदी पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाप्रमाणे मिळणारी लौकिक आणि पराकोटीची आश्वासकतेसारखी. कधीही रिती होऊ नये, असी ईश्वराची ही मायेची झोळी. लेकीसाठी ‘बापाच्या’ प्रेमाचा हा झरा अखंड खळखळत राहो... अगदी शेवटपर्यंत...

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com