गृहिणी नव्हेच, मी गृहस्वामिनी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

House Wife

स्त्रियांचे कुटुंबातील दुय्यम स्थान, पारंपरिक मानसिकतेचा पगडा, सतत आपण सर्वांसमोर उजवेच ठरले पाहिजे या अट्टहासामुळे अनेकदा गृहिणींना कळत-नकळतपणे ‘मल्टीटास्किंग’चा आधार घ्यावा लागतो.

गृहिणी नव्हेच, मी गृहस्वामिनी!

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

स्त्रियांचे कुटुंबातील दुय्यम स्थान, पारंपरिक मानसिकतेचा पगडा, सतत आपण सर्वांसमोर उजवेच ठरले पाहिजे या अट्टहासामुळे अनेकदा गृहिणींना कळत-नकळतपणे ‘मल्टीटास्किंग’चा आधार घ्यावा लागतो. या आव्हानातून अनेक गृहिणी आपल्या जगण्यातील आनंदच हरवून बसतात. या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी कधी तरी ‘नाही’ म्हणायलाही शिकले पाहिजे. स्वत:मधील मर्यादा मान्य करून जबाबदाऱ्या स्वीकारण्यात कमीपणा वाटून न घेण्याची मानसिकता गृहिणींनी तयार केली पाहिजे.

आनंदीचे सहा माणसांचे कुटुंब. नवरा, दोन मुले आणि सासू-सासरे. सकाळी पाच वाजता सुरू होणारा तिचा दिवस रात्री अकरा वाजता संपतो. घरातली, बाहेरची कामे, मुलांची शाळा, त्यांच्या वेगवेगळ्या क्लासच्या वेळा सांभाळणे, सासू सासऱ्यांचे आजारपण, अपेक्षा आणि यजमानांचे वेळापत्रक अशा कितीतरी गोष्टी ती एकाच वेळी हसतमुखाने आणि झटपट करत असते. मुले तिला ‘सुपरमॉम’, तर नवरा ‘मल्टीटास्किंग लेडी’ म्हणत तिचे कौतुक करतो.

हे दोन शब्द तिला आणखी कामाची ऊर्जा देतात, तर थकवा दूर करण्याकरिता ‘मॅजिक टॅबलेट’ काम करतात. घराबाहेरही आनंदीचे खूप कौतुक होते. मात्र, या सगळ्यातून आनंदी अनेकदा नको इतकी थकून जाते. काही वेळा या अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरून जाते. हल्ली तर अनेकदा रात्री झोपेतून दचकून उठते आणि काही काम राहिले का, याचा शोध घेते. आपल्यावरील सर्व जबाबदाऱ्या आपण नीट नाही पार पाडल्या तर काय होईल, या विचाराने तर काही वेळा ती अस्वस्थ होते व हल्ली तिला अनेकदा यामुळे नैराश्यही येते.

घर सर्वांचे आहे, तर फक्त आनंदीने ‘मल्टीटास्किंग’ असणे गरजेचे आहे का? ‘मल्टीटास्किंग’ असणे ही तिचीच मानसिक गरज आहे का? गृहिणीने ‘मल्टीटास्किंग’ असलेच पाहिजे ही आपल्याकडील पुरुषप्रधान संस्कृतीमुळे समाजात निर्माण झालेली मानसिकता आहे का, असे अनेक प्रश्न आनंदीच्या निमित्ताने उभे राहतात. यामुळे उद्भवलेल्या तिच्या शारीरिक, भावनिक, मानसिक अनारोग्याचे काय? आनंदीचे उदाहरण हे प्रातिनिधिक आहे. कमी अधिक प्रमाणात आज सर्वच गृहिणी, नोकरदार गृहिणी ‘मल्टीटास्किंग’च्या या चक्रव्यूहात अडकल्या आहेत. या चक्रव्यूहात या गृहलक्ष्मीला, अन्नपूर्णेला मोकळा श्वास घ्यायला अजिबात वेळ मिळत नाही.

नवरात्रीत तिचाच जागर होत असताना ती मात्र दमलेली दिसते! देवीच्या रूपात पूजा होते खरी; पण खरी गृहलक्ष्मी, अन्नपूर्णा मात्र कामाच्या ओझ्याखाली सर्वस्व गमावून बसली आहे. आपल्याकडे ‘घरात आणि घराबाहेर’ अशा प्रकारे कामांच्या जबाबदाऱ्यांची लिंगआधारित विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे काळ बदलत गेला, तरी गृहिणींच्या पारंपरिक भूमिका आणि जबाबदाऱ्या यात मात्र फारसा बदल झाला नाही. अर्थात याला काही कुटुंबे अपवाद आहेत; पण त्यांचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके आहे.

मुलांचे संगोपन आणि स्वयंपाकघर ही दोन क्षेत्रे गृहिणींच्या पारंपरिक जबाबदाऱ्या म्हणून कायम राहिल्या. अगदी आकाशाला गवसणी घालणाऱ्या स्त्रियांनाही या दोन क्षेत्रांत मदत करायला कुटुंबीय अथवा अगदी तिचा जोडीदार फारसा पुढाकार घेताना दिसत नाही. आश्चर्य म्हणजे, या जबाबदाऱ्यांतून स्त्रिया स्वत:ही बाहेर पडण्यास फारशा उत्सुक नाहीत. ‘मल्टीटास्किंग’ करण्याचे अनेक विपरीत परिणाम मेंदू आणि शरीरावर होत असतात. मेंदूवर मोठा ताण येतो. काही वेळा स्मृतिभ्रंशाचा त्रासही सुरू होतो.

गडबडीत अथवा अनेक कामे एकाच वेळी करण्याची वृत्ती असल्यास कामातील अपघातही वाढीस लागतात. ‘मल्टीटास्किंग’मुळे अनेक गृहिणींमध्ये निर्माण झालेला विसरभोळेपणा स्वयंपाकघरातील अथवा बाहेरही अनेक अपघातांना आमंत्रण देतात. सतत कामांचे किंवा कामे उरकण्याचे टेन्शन असल्यामुळे अनेक गृहिणींना तीव्र ताणाचा त्रास अथवा नैराश्यही येते. ‘मला सर्व कामे जमलीच पाहिजे, लोक काय म्हणतील, कुटुंबीय काय म्हणतील,’ अशा प्रकारचे विचार करून गृहिणींमध्ये ‘सामाजिक चिंता’ वाढीस लागते. या प्रकारच्या विचारसरणीमुळेच आज ७० टक्क्यांपेक्षा जास्त गृहिणी या मानसिक अनारोग्याच्या विळख्यात सापडल्या आहेत. ही मानसिक अस्वस्थता नात्यांमध्येही अस्वस्थता निर्माण करते. आज अनेक गृहिणींना व्यसनांच्या आहारी जाताना आपण पाहत आहोत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण व्यसनमुक्ती केंद्रात उपचारकरिता दाखल होणाऱ्यांपैकी अनेक जणी या प्रपंचात आणि नोकरीत ‘मल्टीटास्किंग’चा बळी ठरलेल्या आहेत. यामुळे अनेक स्त्रियांना मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, वजन वाढणे असे विकार जडतात. आपला मेंदू एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. मात्र, या मेंदूला बळजबरीने एकाच वेळी अनेक कामांवर लक्ष केंद्रित करायला आपण भाग पाडत असतो. यातून मेंदू गोंधळतो आणि काही वेळा चुकीच्या कृती करून बसतो. यामुळे कामातील गती आणि त्यातील गुणवत्ताही कमी होऊ लागते. आपल्यातील कौशल्ये वाढवण्याची ऊर्मी कमी होत जाते.

कुटुंबातील अनेक कामे किंवा जबाबदाऱ्या गृहिणींनी घेण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे, आपण ‘माणूस’ म्हणून जगायचे, की ‘मशीन’ म्हणून याचा विचार करणे महत्त्वाचे असते. आपण माणूस आहोत आणि आपल्या काही मर्यादा असतात, याचाही स्वीकार करणे गरजेचे असते. एखाद्या दिवशी आपण काही गोष्टी नाही केल्या, तर काही बिघडत नाही.

स्त्रियांचे कुटुंबातील दुय्यम स्थान, पारंपरिक मानसिकतेचा पगडा, कौटुंबिक जबाबदाऱ्या घेण्यास असमर्थ ठरल्यास येणारी अपराधीपणाची भावना, सतत आपण सर्वांसमोर उजवेच ठरले पाहिजे, याचा अट्टहास करणे यामुळे अनेकदा गृहिणींना कळत-नकळतपणे ‘मल्टीटास्किंग’चा आधार घ्यावा लागतो. या आव्हानातून अनेक गृहिणी आपल्या जगण्यातील आनंदच हरवून बसतात. या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी कधी तरी ‘नाही’ म्हणायलाही शिकले पाहिजे. स्वत:मधील मर्यादा मान्य करून जबाबदाऱ्या स्वीकारण्यात कमीपणा वाटून न घेण्याची मानसिकता गृहिणींनी तयार केली पाहिजे.

मध्यंतरी दौऱ्यादरम्यान मी एका कुटुंबास भेटण्यास गेले होते. त्या कुटुंबातील चिमुकल्या आर्यनशी छान दोस्ती जमली. संबंधित कुटुंबाचा निरोप घेताना, आर्यनची गंमत करावी म्हणून मी त्याला म्हणाले, की तुझ्या आईला माझ्या घरी घेऊन जाते. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, ‘मग घरात काम कोण करेल?’ या वाक्याने मी चक्रावले आणि त्याच्या आईच्या डोळ्यांत पाणी आले. आई ही आधार देते, माया करते, खाऊ देते, गोष्टी सांगते, भीती वाटली तर जवळ घेते यापैकी आर्यनला काहीच का सांगावेसे वाटले नाही? ‘मल्टीटास्किंग’मुळे नात्यांना धक्के बसतात याचे हे एक ठळक उदाहरण आहे. यात चिमुकल्या आर्यनने आणि त्या आईने काय गमवले याचा जरूर विचार केला पाहिजे.

प्रत्यक्षात कमी वयात विवाह आणि मातृत्वाचे ओझे लादणे हे महिलांचे मानसिक खच्चीकरण करणारे  आहे. त्यामुळे तारुण्यावस्थेत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती तुलनेने कमी राहते. स्त्रीची भूमिका हा नेहमी द्विधा मनस्थितीत अडकलेली असते आणि हे वास्तव नाकारू शकत नाही. वैवाहिक महिलांना काही कडू अनुभवाचादेखील सामना करावा लागतो. प्रत्येक गृहिणीची शिक्षित महिला किंवा नोकरदार महिला, अशी तुलना केली जाते. गृहिणींच्या कामाचे कौतुक करणे दूरच, उलट कमी समजले जाते. सातत्याने होणारी उपेक्षा आणि एकाकीपणामुळे त्यांच्या मनात आपली कुटुंबाला गरज नसल्याची भावना विकसित होते. परिणामी हीच भावना त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते. गृहिणींच्या सामाजिक भूमिकेची होणारी अवहेलना ही समाजाला धोकादायक दिशेने नेत आहे. ती कुटुंबाची चालक असते, तरीही ती कायम उपेक्षित राहत आली आहे.

गृहिणींनाही स्व-विकासाची संधी आणि स्वत:ची ‘स्पेस’ असणे खूप गरजेचे आहे. स्वत:मधील कौशल्ये वाढवण्याची मुभाही हवीच. ‘मल्टीटास्किंग’च्या नादात या गोष्टी मागे पडतात आणि अनेक गृहिणी यांत्रिक, कोरडे आयुष्य जगू लागतात. आजचा काळ झपाट्याने बदलत आहे. कुटुंबातील नात्यांचा आधार, नात्यातून मिळणारे प्रेम, नात्यांचा सहवास, काही नात्यांमधील ‘पार्टनरशीप’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नात्यांना वेळ न दिल्यास नात्यातील फायदे संपताच ते नाते टाकाऊ होते, हे विसरता कामा नये.

नवरा-बायकोचे नाते हे समान पातळीवर आणि एकमेकांना स्वतंत्रपणे बहरण्यास पूरक ठरणारे असावे. याकरिता कौटुंबिक जबाबदाऱ्याही समान पातळीवर आणि एकमेकांची क्षमता ओळखून वाटून घेणे आज गरजेचे आहे. हे वाटप करताना गृहिणींची म्हणून ‘खास कामे’ असे म्हणून त्यातून पुरुषांनी पळवाट नक्कीच काढू नये. आपली मुले ही अनुकरणप्रिय असतात, त्यामुळे अगदी लहान वयापासून मुलांना कौटुंबिक कामात सहभागी करून घेतल्यास त्यांनाही कामे नित्यनेमाची वाटतील. ही मुले मोठी झाल्यानंतर कौटुंबिक कामे त्यांच्या दिनक्रमाचा एक भाग म्हणून करतील. या वर्षीचा नवा संकल्प करताना ‘मल्टीटास्किंग’ला आपल्या कुटुंबातून हद्दपार करू आणि गृहिणींना आपले अस्तित्व शोधण्याकरिता मोकळे आकाश देण्याचा संकल्प करू. ही संकल्पपूर्ती झाली, तर गृहलक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा खऱ्या अर्थाने जागर होईल!

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)