
शिक्षणाने आपण आत्मनिर्भर व्हायला हवे. स्वतःच्या व इतरांच्या स्वातंत्र्यासाठी नेहमीच झगडायला हवे.
तू चाल पुढं...
- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com
शिक्षणाने आपण आत्मनिर्भर व्हायला हवे. स्वतःच्या व इतरांच्या स्वातंत्र्यासाठी नेहमीच झगडायला हवे. आपला संघर्ष हा कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही, तर तो चुकीच्या व्यवस्था व अनिष्ट रुढी-परंपरांच्या विरोधात आहे. आपल्या मनातले मोरपिसारे झडू न देण्याची जबाबदारी फक्त अन् फक्त आपलीच असते. ती जबाबदारी ओळखली तर निळे आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, उमललेली फुले आणि आपण स्वतः आनंदाचे झाड होऊन जातो. रुढी-परंपरेच्या आरपार झुलणारे, डोलणारे...!
नुकतेच आपल्याकडे गणपती बाप्पा तसेच ज्येष्ठा गौरी येऊन गेल्या. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध पारंपरिक पद्धतीने गौरीचा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी तिला महालक्ष्मीही म्हटलं जातं. ती सोनपावलानं आपल्या दारी येते. या दिवसांत जेवणात तिला पंचपक्वान्ने दिली जातात. तिची सुंदर आरास, सजावट केली जाते. पाहुण्यारावळ्यांची घरी रेलचेल असते. खूप उत्साहात तिचे स्वागत केले जाते. सगळीकडे घरोघरी आनंदोत्सव साजरा केला जातो. मग मला प्रश्न पडतो, समाजात एवढा विरोधाभास का? घरी येणाऱ्या गौराईंचे इतकं वाजतगाजत उत्साहात आपण स्वागत करतो, तर गर्भातल्या गौराईबाबत उदासीनता का?
गर्भातली गौराई जन्माला यायच्या आधीच तिचा जन्म नाकारला जातो. उमलण्याआधीच कळी खुडली जाते. आईच्या उदरातून दिसामाजी वाढत असताना या गौराया सुंदर स्वप्न रंगवत असतात. आपल्या माता-पित्यांना पाहण्याची ओढ त्यांनाही असते; पण केवळ तो मांसाचा गोळा मुलगी आहे म्हणून नाकारला जातो, केवढे हे दुर्दैव..! इतका संघर्ष करूनही ती जन्माला आली, तर तिचं जगणं असह्य करता, तिला नको नको ती दुषणे लावता... का? व कशासाठी?
‘सिमान द बोव्हा’ ज्याप्रमाणे (जे) सांगते की, पुरुष जन्माला येतो आणि ‘स्त्री’ ही घडवली जाते, हे खरंच आहे. स्त्रीच्या जन्माला काटेरी कुंपण आहे, पुरुषांचं वावरणं मुक्त माळरान आहे.
महिलांबाबत बेजबाबदार विधान, कृती व अशोभनीय वर्तन या संदर्भातल्या महिलांबाबतच्या घटना रोज वाचायला, बघायला मिळत आहेत. कुंपणाने शेत खाल्ल्याची हळहळ रोजच व्यक्त करावी लागत आहे. माणूस म्हणून रुजण्याच्या अगोदरच आपण कणाकणाने मरत आहोत आणि सहिष्णुता लोप पावते आहे, असे काहीसे वाटते. स्त्रीला शिक्षणाने आलेले शहाणपण, उपजत समजुतदारपणा आणि भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या निर्णयस्वातंत्र्याचा योग्य तो वापर करण्याचे बळ, हे सारे आवश्यक आहे. याबरोबरच, निर्भय बनण्यासाठी, माणूस म्हणून जगण्याची उभारी घेऊन पुढील वाटचाल करण्यासाठी पथदर्शक ठरावा, यासाठी आपल्या आधुनिक, शिकलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील गौरींना मैत्रिणीच्या नात्याने मला सांगावेसे वाटते, अगं, आता तू शिकून शहाणी, कर्तीसवरती, नोकरी करणारी, पदे भूषवणारी झाली आहेस. मात्र वेगवेगळ्या जाती, राजकीय विचारधारा आणि पितृसत्ताक विशेषाधिकार असलेल्या या समाजात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरणे आणि इथे या परिस्थितीत पाय रोवणे, तितकेसे सोपे नाही; तरीसुद्धा या समजामध्ये घट्ट पाय रोवून, वादळांना थोपवत चहूबाजूंनी संघर्ष करत तू आकाशाला गवसणी घालत आहेस, याचा मला अभिमान आहे.
या समाजातले बहुसंख्य नियम हे पुरुषांनी स्त्रियांना दुय्यमत्व देऊन, त्यांना स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी स्वतःच्या सोयीनुसार आखलेले आहेत. तुला ठाऊक असलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ आणि संवेदना या पुरुषप्रधान व्यवस्थेसाठी त्रासदायक आहेत. त्यामुळे तुला तुझे मानसिक बळ खच्ची करणाऱ्या पुरुषी प्रतिक्रियांशी वारंवार सामना करावा लागेल. तू घेत असलेल्या आवडीच्या शिक्षणाचा, तुझ्या आवडत्या कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचा, त्यानुसार जगण्याचा तुला निश्चितच अधिकार आहे. या समाजात जगत असताना, हे मूलभूत अधिकार आणि हक्क मिळविण्यासाठी काही वेळा आपल्याच माणसाबरोबर तुला लढाही द्यावा लागेल. तेव्हा तू हिंमत हरू नकोस. तू लढत रहा... विजयाच्या गाथेसाठी..!
सध्याच्या सामाजिक नियमांनुसार, जोडीदार निवडताना दडपणांना बळी न पडता, योग्य निर्णय घेण्याची समज तूच प्रयत्नपूर्वक वाढव. नात्याच्या किंवा सहजीवनाच्या एखाद्या टप्प्यावर तुला वाटले, तर तू निवडलेल्या आणि राहत असलेल्या जोडीदारासोबत पुढे न राहण्याचा निर्णय घेण्याचा तुला निश्चितच हक्क आहे. या हक्काबरोबरच निर्णयाची जबाबदारीही तुझी राहील. डोळसपणे या दोन्हीचा स्वीकार कर. स्वतःच्या स्त्रीत्वाचा फायदा घेऊन गैरमार्गाने कोणतेही काम करू नकोस; मात्र पुरुषी वागण्याचा मनावर झालेला आघात झेलण्याची व त्यावर मात करण्याची लवचिकता आणि ताकद मिळवण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहा. स्त्रीवर मालकी हक्क सांगण्याच्या पुरुषांच्या प्रवृत्तीमधून पतिव्रतेची कल्पना निर्माण झाली आहे, त्यामुळे आपल्या समाजात निकोप लैंगिकता रुजलेली नाही. साहजिकच, त्यामुळे विवाहबाह्य संबंध, समागम स्वातंत्र्य, गर्भपात असे विषय कुचाळक्या, हेटाळणीचे असून, त्याची योग्य चर्चा करण्यास आजदेखील पूर्णपणे नकार देणारा समाजच अस्तित्वात आहे. हे नेहमी लक्षात ठेवून, तू याचा स्वीकार कर व ताठ मानेने वागणे ठेव. नको त्या चालीने चालणारे राजकारण आणि त्याचबरोबर धर्म, वंश, लिंग, जात, भाषा या मुद्द्यांचा आधार घेऊन दुसऱ्याविषयी द्वेष करायला शिकविणाऱ्या कोणत्याही विचारधारेचा कधीच स्वीकार करू नकोस.
शिक्षणाने आपण आत्मनिर्भर व्हायला हवे. स्वतःच्या व इतरांच्या स्वातंत्र्यासाठी नेहमीच झगडायला हवे. आपला संघर्ष हा कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही, तर तो चुकीच्या व्यवस्था व अनिष्ट रुढी-परंपरांच्या विरोधात आहे. आपण या जगामध्ये फार थोड्या काळासाठीचे रहिवासी आहोत, त्यामुळे सर्वप्रथम आधी स्वतःला स्वीकार आणि स्वतःवर प्रेम कर. तुझ्यामध्ये असलेला प्रेमाचा प्रकाश कायम ठेवून आयुष्याचा आनंदीपणाने स्वीकार कर.
आपल्याला आपणच आनंदी ठेवायचे असते, ही लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. दिवंगत साहित्यिक पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’ नावाची अगदी छोटीशी, पण कमालीचा सखोल आशय सांगणारी कादंबरी आहे. त्यात एक गोष्ट आहे - एक आज्जीबाई, तिची छोटी नात गौरी आणि मोराची. ती आज्जी गावाबाहेर दूर जंगलाजवळ राहत असते. एकदा आज्जीच्या झोपडीबाहेर मोर येतो आणि मोराला पाहून आनंदाने तिची छोटी नात गौरी नाचू लागते. ते पाहून मोरही पिसारा फुलवून नाचू लागतो. गौरी हट्ट धरते, की मोराला आपल्या अंगणात बांधून ठेवावे; पण त्या मोराला दाणापाणी कोठून खाऊ घालायचे, असा प्रश्न आज्जीला पडतो. त्यावर मोर म्हणतो, ‘‘मला दाणापाणी काहीही नको. सारे जंगलरान तर सभोवतालीच आहे, मात्र गौरीने आधी नाचायला पाहिजे, या अटीवर मी रोज येईन. गौरीने नाचायचे थांबवले, तर मी येणार नाही.’’ गौरी कबूल झाली. रोज आनंदाने नाचायचे, ही काही साधी गोष्ट नव्हती; पण तेव्हापासून गौरी सतत आनंदी राहू लागली. या गोष्टीचे तात्पर्य काय? मोर हवा असेल, तर आपणच मोर व्हायचे. जे जे हवे, ते आपणच व्हायचे. आपल्या मनातले मोरपिसारे झडू न देण्याची जबाबदारीही फक्त अन् फक्त आपलीच असते. मग निळे आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, उमललेली फुले आणि आपण स्वतः आनंदाचे झाड होऊन जातो. रुढी-परंपरेच्या आरपार झुलणारे डोलणारे..!
(लेखिका महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)