ती, समाज आणि कायदा...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Law

समाजात, ज्या देशात दर ७८ मिनिटांनी एक हुंडाबळी जाते, दर ५९ मिनिटांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार होतो, दर ३४ मिनिटांनी बलात्काराचे एक प्रकरण घडते.

ती, समाज आणि कायदा...!

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेड काढली जाते, त्यांच्याकडे बघून विक्षिप्त असे हावभाव केले जातात, त्रास दिला जातो, विनयभंग केला जातो. अशा घटना घडतात, तेव्हा फक्त पीडित मुली वा महिलांनीच प्रतिकार केला पाहिजे असे नव्हे, तर ही दृश्य बघणाऱ्या प्रत्येकाने असले घृणित कृत्य हाणून पाडले पाहिजे.

समाजात, ज्या देशात दर ७८ मिनिटांनी एक हुंडाबळी जाते, दर ५९ मिनिटांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार होतो, दर ३४ मिनिटांनी बलात्काराचे एक प्रकरण घडते, दर १२ मिनिटांनी एका महिलेला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागते आणि तीन मुलींपैकी एकीला हुंड्यासाठीचा मानसिक-शारीरिक छळ सहन करावा लागतो, तो देश आणि तो समाज स्त्रियांसाठी सुरक्षित आहे, असे म्हणता येईल का? उत्तर नकारार्थी येत असले तरी यासाठी सरकारी यंत्रणा नव्हे, तर आपली सामाजिक रचना आणि विविध प्रकारच्या रूढी-परंपरा, समाजाची बुरसट मानसिकताच जबाबदार आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये. वंशाचा दिवा म्हणून आजही मुलाकडेच पाहिले जाते, मुलीला पोटातच ठार मारण्याचे कारस्थान केले जाते. मुलगा होत नसेल तर स्त्रीला दोष दिला जातो आणि अनेकदा मुलगा व्हावा म्हणून स्त्रीला अनेक बाळंतपणांना सामोरे जावे लागते. यात अनेक महिलांना प्राणही गमवावे लागतात.

वास्तविक मुलगा किंवा मुलगी होणे हा स्त्रीचा दोष नाही, पण वैद्यक शास्त्राचे ज्ञान नसल्याने आपल्याकडे मुलीच्या जन्मासाठी स्त्रीलाच जबाबदार ठरवून तिच्यावर अत्याचार केले जातात. २१ व्या शतकातली बावीस वर्षे संपत आली असतानाही परिस्थितीत बदल झालेला नाही आणि पुरोगामित्वाचा दिंडोरा पिटणारे आजही सुधारायला तयार नाहीत.

प्रत्येकाला आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, आत्या आहे, पत्नी आहे, मुलगी आहे. त्यामुळे वाईट प्रसंग आपल्याही आई-बहिणीवर उद्‌भवू शकतो, याची जाण असूनही अनेक दुष्ट महिलांवर अत्याचार करतात, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याची दृष्टीच स्त्रियांविरुद्धच्या अत्याचारास कारणीभूत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

भारतीय समाजात स्त्रियांना अतिशय सन्मानाचे स्थान आहे, असे जबाबदारीने छाती ठोकून सांगितले जाते. स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले आहे, हेही अभिमानाने सांगतात. मग, घरातल्या स्त्रीला लक्ष्मीप्रमाणे वागवत का नाहीत, तिला मानसन्मान का देत नाही, याचा विचार कधी करतो का? भारतीय समाजात स्त्री-पुरुष असा भेद कधीच केला जात नाही, स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेही बोलले जाते; पण हे सत्य आहे? स्त्री श्रेष्ठ आहे की पुरुष, असा तर प्रश्नच उपस्थित होत नाही. तरीही स्त्रियांवरच अत्याचार का केले जातात? स्त्रीची शारीरिक शक्ती पुरुषाच्या तुलनेत कमी पडते म्हणून की पुरुषांची मानसिकता सडकी आहे म्हणून? सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी, काली अशी स्त्रीची कितीतरी विविध रूपं आहेत, त्या सगळ्या रूपांची पूजा मनोभावे केली जाते. लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून व्रतवैकल्य करतात आणि घरच्या लक्ष्मीला मात्र त्रास देतो.

ही कुठली आली संस्कृती? अभ्यासात गती यावी म्हणून सरस्वतीला पूजतो, पण प्रत्यक्षात घरच्या सरस्वतीचा मानसिक-शारीरिक छळ करतो. हे कुठले लक्षण मानायचे? शक्ती दे म्हणून काली मातेकडे मागणे मागतो आणि घरच्या कालीचा शक्तिपात करतो, हे कुठले पौरुषत्व? जे काही भोगायचे ते स्त्रियांनीच, अशी आपली संस्कृती आहे का? नवरा मेला तर स्त्रीने वैधव्य स्वीकारायचे, पण त्या वैधव्याच्या नावाखाली पुरुषी अत्याचारही सहन करायचे? मुलगी झाली तरी तीच दोषी, घरात काही वाईट घटना घडली तरी ती कुलक्षणी, हे काय प्रकार आहेत? २१ व्या शतकाच्या बाता मारणारा समाज सुधारणार आहे की नाही, सडकी मानसिकता बदलणार आहे की नाही, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा. कारण प्रत्येकाला आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, याचे भान ठेवून तरी स्त्रियांचा सन्मान करायला शिकले पाहिजे.

समाजात स्त्रियांना विविध प्रकारच्या विरोधाभासी भूमिका निभवाव्या लागतात. एकच स्त्री ही कुणाची तरी मुलगी असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी पत्नी असते, कुणाची तरी सून असते, कुणाची तरी आई असते. समाजात सगळ्या बऱ्यावाईट प्रथापरंपरांना ती सामोरे जात असते. घरात आणि बाहेर सगळ्या चांगल्या अपेक्षा फक्त तिच्याकडूनच केल्या जातात. सर्व विरोधाभासी भूमिका निभावण्यासाठीच ती या भूतलावर जन्माला आली आहे की काय, असे वाटावे एवढे कष्ट ती घेत असते. पतीला, सासू-सासऱ्यांना, मुलांना तिच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. आपल्या परीने सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती कायम झटत असते आणि असे झटत असताना तिच्या वाट्याला अनेक प्रकारचे अपमान येतात, अनेक संकटांना ती सामोरी जात असते. येणारा प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करण्याची तिची तयारी असते.

महिलांना सन्मान नाही देता आला तरी महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. महिलांवरील अत्याचाराच्या किमान ४० टक्के केसेसची नोंद पोलिसांत होते. नोंद न होणारी प्रकरणे किती असतील याचा तर अंदाजच नाही. ही आकडेवारी अतिशय भयावह आहे. हे असे का होते? एक तर पैशांचा लोभ आणि दुसरे म्हणजे मुलीकडच्यांकडून न होणारा विरोध!

अनेकदा लग्न ठरल्यानंतर हुंड्याची मागणी केली जाते. न दिल्यास लग्न मोडण्याची धमकी दिली जाते. समाजात आणि नातेवाईकांमध्ये आपली बदनामी होईल या भीतीने अनेकदा मुलीकडचे लोक हुंडा देण्यास राजी होतात आणि मग एकामागोमाग होणाऱ्या मागणीला कंटाळतात. मुलीच्या सासरच्यांकडून होणारी मागणी पूर्ण करता येत नसल्याने स्वाभाविकच मुलीचा छळ सुरू होतो आणि अनेकदा तिला प्राणास मुकावे लागते. त्यामुळे मुलीकडच्यांनी आधीच हुंड्यास नकार दिला तर पुढचा अनर्थ टळू शकतो. नातेवाईक आणि समाज काय म्हणेल याची पर्वा न करता मुलींनी धाडस दाखविले आणि हुंडा मागणाऱ्याशी लग्न करणार नाही व मागणी करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करेन, असा निर्धार जाहीर केला तर मुलाकडच्यांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत.

समाजात फक्त कुटुंबांमध्येच महिला आणि मुलींवर अत्याचार होतो असे नाही. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेड काढली जाते, त्यांच्याकडे बघून विक्षिप्त असे हावभाव केले जातात, मुलींना नाना प्रकारचा त्रास दिला जातो, विनयभंग केला जातो. अनेकदा तर सार्वजनिक ठिकाणी महिलांनी जाऊ की नये, असा विचार करावा लागतो. त्यामुळे समाजात जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा फक्त पीडित मुली वा महिलांनीच प्रतिकार केला पाहिजे असे नव्हे, तर ही दृश्य बघणाऱ्या प्रत्येकाने असले घृणित कृत्य हाणून पाडले पाहिजे. तुम्हाला आई आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, बहीण आहे, याचा विचार करायला हवा. आज जो प्रसंग इतर मुलींवर उद्‌भवला तो उद्या आपल्यापर्यंत येऊन पोहोचला तर? या तरचा विचार करून अशा घटनांचा समाजाने सामूहिक प्रतिकार केला तर असे प्रकार हळूहळू कमी होतील, यात शंका नाही. म्हणतात ना, दुर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रियता जास्त घातक असते, तेच खरे!

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)