हास्याचा झरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Education

गेली १९ वर्षे राजकारण-समाजकारणाच्या अनुभवांची शिदोरी आता इतक्या लांबच्या प्रवासानंतर गाठीशी आहे; पण आजपर्यंतच्या चढउताराची, यशापयशाची, सुखदुःखाच्या क्षणांची आठवण मात्र नव्याने होत राहते.

हास्याचा झरा

- रूपाली चाकणकर, rchakankar95@gmail.com

गेली १९ वर्षे राजकारण-समाजकारणाच्या अनुभवांची शिदोरी आता इतक्या लांबच्या प्रवासानंतर गाठीशी आहे; पण आजपर्यंतच्या चढउताराची, यशापयशाची, सुखदुःखाच्या क्षणांची आठवण मात्र नव्याने होत राहते. दुःख-अपयशाचे क्षण विसरून जावे आणि सुख, यशाच्या आनंददायी क्षणांची मैफल रंगून आयुष्य रुबाबदार व्हावे, यासाठी कायम प्रयत्न असतो. आयुष्यातील अनेक मजेदार क्षणांची आठवण आजसुद्धा चेहऱ्यावर केवळ स्मितहास्यच नाही, तर हास्याचा खळखळाट घेऊन येतात. तशीच ही आठवण आहे. आम्ही इतरांवर हसता-हसता स्वतःवरही हसावं आणि हास्याची कमान तयार व्हावी, अशी ही गोष्ट...

साधारण चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, मी माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नेहमीप्रमाणे नागरिकांच्या गाठीभेटी घेत होते. काही बैठका घेत बसले होते. एक महिला तिच्या पतीसोबत कार्यालयात आली, कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन. मी त्यांना सांगितले, ‘‘ताई, आपण ज्या दिवसाची वेळ सांगतात, त्या दिवशी माझा स्वतःचा बचत गटाचा कार्यक्रम आहे. आमची पूर्वतयारी चालू आहे आणि मला तुमच्या वेळेत येणे शक्य नाही.’’

नाराज होत त्या सांगायला लागल्या. ‘‘दर वर्षी आम्ही मोठा कार्यक्रम करत असतो. प्रचंड गर्दी आणि दिग्गज, नामवंत, प्रतिष्ठित मान्यवर असतात. तुम्ही महिला नेतृत्व करता, तुम्ही माझ्या कार्यक्रमाला नाही म्हणून एका उत्साही माहिलेचा हिरमोड करत आहात. तुमच्या हस्ते आम्हाला कर्तबगार महिलांचा सन्मान करायचा आहे.’’ त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही निदान तारीख तरी बदला, मी येईल.’’ त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही पुण्यातील पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृह बुक केले आहे.’’ मी म्हणाले, ‘‘मग निदान वेळ तरी बदला... म्हणजे मला येता येईल.’’ तर त्या म्हणाल्या, ‘‘दीड-दोन हजार लोकांना पत्रिका गेल्या आहेत. वेळ बदलली तरी आम्हाला एवढ्या सगळ्यांना परत सांगणे शक्य नाही. आम्ही फेटेवाला, ढोल, ताशा पथक आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या सत्कारमूर्ती यांची तयारी झालेली आहे. प्लिज, तुम्ही तुमचा कार्यक्रम एक दिवस पुढे घ्या.’’

बापरे.. माझा पण दीड-दोन हजार महिलांचा कार्यक्रम, संपूर्ण तयारी झालेली.. प्रमुख पाहुण्यांपासून अनेक मान्यवरांना आमंत्रित केलेले, हॉलपासून जेवणापर्यंतची तयारी झालेली... मी त्यांना सांगितले, माझा कार्यक्रम रद्द नाही होऊ शकत. तुम्ही दुसरे कोणीतरी पाहुणे बोलावा. मी नंतर तुमच्या कार्यक्रमाला येईन... तर त्या अक्षरशः रडत मला म्हणाल्या, ‘‘नाही ताई, काहीही करा, तुम्ही या. मी खूप तयारी केली आहे.’’

कार्यक्रमाची तयारी करताना किती नियोजन करावे लागते, किती ताण असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खिशाला खड्डा असतो. त्यामुळे कार्यक्रम होईपर्यंत वेदना जास्त असतात, हे मला अनुभवातून चांगले माहीत होते. नाराज नको करायला म्हणून शेवटी माझा कार्यक्रम दोन तास आधी घेऊन त्यांच्या कार्यक्रमाला जायचं ठरलं. जायचं नक्की झाल्यावर दोघेही खूप आनंदाने बाहेर पडले. चला, एखाद्या उमद्या माणसाला आपण नाराज नाही केलं, याचेही मनाला समाधान वाटले.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी माझ्या कार्यक्रमाची तयारी होतीच; पण सारखा त्या नवरा-बायकोचा फोन, ताई वेळेत या बरं का... मी सकाळपासून त्यांना चार वेळा ‘हो’ म्हणून सांगितलं होतं.

अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध असा माझा कार्यक्रम पार पडला. पाहुण्यांचे आभार मानून जेवणात आता वेळ नको घालवायला, गाडीतच काहीतरी खाता येईल म्हणून कार्यक्रमासाठी निघाले. अगदी वेळेत कार्यक्रमाला पोहोचले होते. त्यामुळे फार हायसं वाटत होतं. कारण पुण्यातील ट्राफिकमधून वेळेत पोहोचणं आणि तेही जरा पावसाच्या दिवसात म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखी. माझ्या सोबत गाडीत विकास धायगुडे होते, जे माझ्या कार्यक्रमाचे नियोजन बघायचे आणि सुनील गाडी चालवत होता. विकासने आयोजकांना फोन केला, गेटवर आलो आहोत. ते ‘हो, आलोच’ बोलले. बाहेर प्रवेशद्वारापाशी आणि आवारात मात्र सन्नाटा होता.

मी विकास आणि सुनीलला विचारलं, अरे पत्रिका नीट बघा, हेच ठिकाण आहे ना, का गडबडीत चुकलो आपण? दोघेही म्हणाले, नाही ताई, बरोबर आलो आहोत.

तोपर्यंत आयोजक नवरा-बायको दोघेच बाहेर घ्यायला आले. नमस्कार केला व मीच त्यांना विचारले, ‘‘उशीर झाला का मला, बहुतेक सगळे आत बसलेत वाटतं.’’

‘‘नाही नाही तुम्ही वेळेत आला. या.. या... चहा-कॉफी काय घेणार का?’’

मी म्हणाले, ‘‘नको कार्यक्रमालाच बसुया.’’ तर म्हणाले, ‘‘हो हो चला. झाली आहे सगळी तयारी.’

मला तर भीतीच वाटायला लागली, एवढा मोठा कार्यक्रम पण गेटपासून व्हीआयपी रूमपर्यंत या दोघांशिवाय तिसरा माणूस दिसू नये. चला, स्टेजवरच जाऊ म्हणाल्यानंतर तर माझी काळजाची धडधड अजूनच वाढायला लागली. एवढ्या आत्मविश्वासाने सगळीकडे वावरणारी मी, पण आता माझी अस्वस्थता वाढायला लागली. माझ्यासोबत विकास होता. आम्ही स्टेजवर गेलो...

अरे बापरे.. काय सांगू तुम्हाला, विकास तर धावतपळतच बाहेर गाडीपाशी सुनीलला बोलवायला गेला. ‘‘गर्दीमुळे मला ताईपर्यंत जाता येईना, तू लगेच सोबत चल,’’ म्हणाला. तोही धावतपळत आत आला आणि जागच्या जागीच स्तब्ध झाला.

नऊशे-हजारच्या सभागृहामध्ये पहिल्या रांगेत फक्त आठ महिला बसल्या होत्या. या आठ जणी, कार्यक्रमाचे आयोजक दोघे नवरा-बायको, एक फोटोग्राफर आणि एक सूत्रसंचालक असे बारा लोक आणि त्यात आमच्या तिघांची भर. अशी सभागृहात एकूण १५ माणसं होतो.. मी आयोजकांना विचारलं, ‘‘हे काय? काय झालं? कुठे गेली तुमची माणसं?’’

त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘कोणीतरी अफवा पसरवली ‘पुणे बंद’ आहे म्हणून आमचे कोणीच लोक आले नाहीत.’’ मला तर आत्ता चक्कर यायची बाकी होती. मला फेटा बांधण्यासाठी आग्रह करत होते; पण बांधणार कोण? बांधायलाही कोणी नव्हते.. तोही राहिला. सूत्रसंचालकांनी स्वागत केले, आयोजकांनी प्रस्तावना केली. आता मुख्य कार्यक्रम म्हणजे कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा सुरू झाला आणि इतक्या वेळ ज्यांच्यामुळे हॉल भरगच्च (?) होता, ज्यांच्यासाठी माईक सुरू होता, बिचाऱ्या त्या आठ जणीही स्टेजवर आल्या. आता स्टेज असा भारदार वाटायला लागला. पाहुणे, आयोजक, सत्कारमूर्ती, फोटोग्राफर सगळेच स्टेजवरती. समोर सगळ्या रिकाम्या खुर्च्या!

मी आयोजकांना म्हणाले, ‘‘उगाचच तुम्ही हॉल बुक केला. फक्त स्टेज बुक केला असता तरी चाललं असतं..’ त्याही हसत-हसत म्हणाल्या, ‘हो ना... गंमतच आहे ना.’

आयोजकांना ना कशाचा खेद, ना कशाचे दुःख होते. त्या खुशीत होत्या. दहा-बारा सेल्फी माझ्यासोबत काढले... छान स्माईली देत. काही कशाचा ‘गम’ नव्हता या अवलियांना... आपण काय सांगितलं... काय केलं, दीड हजार लोकांचा कार्यक्रम १२ माणसांत करतोय, काहीही दुःख नव्हतं यांना. क्षणभर मला पु. लं.चे ‘व्यक्ती आणि वल्ली’ आठवलं. माणसाला कोणत्याही प्रसंगात इतकं आनंदी राहता आलं पाहिजे.

आजही हा प्रसंग आठवला की, आम्ही पोट धरून हसतो, चला किमान हसण्यासारखं निमित्त तरी मिळालं... जे हास्य आजकाल कोणत्याच बाजारात विकतही मिळत नाही. लाखोंच्या संपत्तीचा हिशेब करता करता, आमच्या आजूबाजूला घरातल्या लेकराबरोबर लहान होऊन पुन्हा ‘बालपण’ अनुभवावे आणि हास्याची एक लकेर चेहऱ्यावरून उमटावी हेसुद्धा हल्ली दुर्मिळ झाले आहे. दुसऱ्याची प्रगती बघता बघता आमची असुया वाढत वाढत त्याबरोबर कपाळावरच्या आठ्याही वाढायला लागल्या; पण चेहऱ्यावरचे स्मितहास्य दोन सेकदांसाठी सहजासहजी देता येत नाही... म्हणूनच काय ‘एप्रिल फुल’ आयुष्यात आला असेल... किमान त्यामुळे तर आम्ही इतरांवर हसता-हसता स्वतःवरही हसावं आणि हास्याची कमान तयार व्हावी...

आयुष्याचा ‘एप्रिल फुल’ न होता आनंदाने आयुष्य ‘फुल’ व्हावे, याच शुभेच्छा...

हँसते-हँसते गुब्बारे का दम फूल गया

इतनी ख़ुशी थी कि फूलते-फूलते गुब्बारा फट पड़ा।

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)