आताचा क्षण... तोच खरा!

ट्रेकिंग करण्यात बऱ्याच जणांना एक झिंग मिळते. वेळोवेळी ती झिंग मलाही घ्यावीशी वाटते!
rupin pass trek himachal pradesh
rupin pass trek himachal pradeshsakal
Updated on

- शाहीन इंदूलकर, shahin.indulkar@gmail.com

ट्रेकिंग करण्यात बऱ्याच जणांना एक झिंग मिळते. वेळोवेळी ती झिंग मलाही घ्यावीशी वाटते! एकच आयुष्य आणि करण्यासारख्या गोष्टी हजारो... त्यातल्या त्यात वर्षातून किमान एकदातरी एक मोठा ट्रेक करावा असं वाटतं.

एरवी कुणी ओळखीचं असो किंवा नसो, कुणाशी गप्पा मारताना त्यातून काही मिळत असेल किंवा नसेल, त्याचा हिशोब मांडण्याची गरज आपल्याला कधी वाटत नसते. पण जितकं निसर्गाच्या जवळ जावं, तसतसा मात्र हा हिशोब मांडणं सुरू होतं. जसजसं आपण निसर्गाच्या पोटात शिरत जातो, सोबतची असलेली तुरळक माणसंही हळूहळू अंधूक होत जातात. मग येतो तो एकटेपणा. कधी स्वतः निवडलेला, कधी वाट्याला आलेला. ती जागा म्हटलं तर भीतिदायक असते आणि म्हटलं तर नसते. अनोळखी ठिकाणी एकट्यानं गेलो की कदाचित त्यातून काही मिळू शकतं किंवा स्वतःची नव्यानं ओळख वा अनेक पातळींवरची ती परीक्षा ठरू शकते.

मे २०२४ मध्ये हिमाचल प्रदेशाच्या किंनौर जिल्ह्यातला रुपिन पासचा ट्रेक करायचं मी ठरवलं. शिमल्याहून पुढे ११० किलोमीटर गाडीचा प्रवास. जिसकून गावातून सुरू होणारा सात दिवसांचा ट्रेक. पुढे ४० किलोमीटर अंतर. १५ हजार २७९ फूट उंची गाठून रुपिन पासची खिंड पार करायची. शिमल्यापासून मी एका ग्रुपला जॉइन करणार होते. शिमल्याला यापूर्वी अनेकदा जाणं झालेलं. तिकडे फिरण्याचा काही मनसुबा नव्हता. फक्त एक गोष्ट मनात होती, ती म्हणजे YMCA च्या हॉस्टेलमध्ये परत जाऊन राहण्याची. नॉस्टॅल्जिया ही एक कमाल गोष्ट असते.

बऱ्याचदा तर अनेक नाती तेवढ्यावरच तग धरून उभी असतात. ‘आपण पूर्वी असं केलं’ त्यावरून, मोजून तितकंच हसणं किंवा हळहळणं. मला या प्रकाराची फार गंमत वाटते आणि कधी-कधी अशा नात्यांची कीवही वाटते! अर्थात ते कमी-अधिक प्रमाणात आपणही करतो याचा अंदाज असतो. तेरा वर्षांपूर्वीचा जून महिना. आम्ही आठ मित्र-मैत्रिणी नुकतीच परीक्षा संपवून हिमाचलच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपापली ‘रूरल इंटर्नशिप’ (मी ‘जागोरी’ नावाच्या संस्थेतून, धर्मशालाहून) करून जमलो होतो. उरलेले सुट्टीचे दिवस शिमल्याहून पुढे मनाली आणि धर्मशाला असा आमचा पुढचा प्रवास होता.

त्यानंतर नोकरी आणि मग जीवनाला अर्थ देणे वगैरे यांसाठी आम्ही पसार होणार होतो. खूप हिंडलो, खिदळलो, वाद-भांडणं-रुसवे, सगळं केलं. YMCA च्या ब्रिटिशकालीन इमारतीच्या गॅलरीत बसून संध्याकाळी पांढऱ्या कपबशीतून चहा प्यायला. आता या ट्रेकच्या आधी मी परत तिथे पोहोचले. मित्र-मैत्रिणींबरोबरचे ते दिवस आठवायला किंवा त्या चहाची तलफ भागवायला. संध्याकाळ झाली आणि कातरवेळ अंगावर आली. कातरवेळ तर रोजच येत असते! ती सरून जावी असं वाटतं, पण काही वेळेस तो एकटेपणा हवाहवासाही वाटतो. या द्वंद्वाशी मी वेळोवेळी आवडीनं खेळत असते. त्या संध्याकाळीही तेच करत होते. इतकी वर्षं उलटून गेली होती आणि नुकतंच माझ्या आयुष्यात उशिरा का होईना, अल्बर्ट कामुचं ‘The Outsider’ आलं होतं!

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शिमल्याच्या स्टँडवर आम्ही १६ जण जमा झालो. ‘High on life’ असे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव! अजून एक high altitude ट्रेक करण्याचं ‘सुख’ आम्हाला मिळणार होतं. नुकतंच कामुकडून ऐकल्याचं आठवलं, की ‘सुख म्हणजे काय? याचा अर्थ शोधत राहिलात, तर तुम्हाला कधीच ते मिळणार नाही. तुम्ही जीवनाचा अर्थ शोधत राहिलात, तर तुम्ही कधीच जगू शकणार नाही.’ पुढचे सगळे दिवस हा विचार मनात तरंगत राहिला.

संध्याकाळी जिसकूनला पोहोचलो, एकमेकांची जुजबी ओळख झाली. सकाळी आवरून पुढे चालत ‘जाखा’ नावाच्या वाटेतल्या शेवटच्या गावात पोहोचलो. जाखाला ‘हँगिंग व्हिलेज’ असं म्हणतात. त्याचं कारण तीव्र उताराच्या दरीवर लटकल्यासारखी दिसणारी त्या गावातली घरं आणि दरीतून वाहणारी नदी. त्या गावात, पक्क्या घरात राहण्याची, आंघोळ करून झोपण्याची शेवटची रात्र. जसंजसं अधिकाधिक उंचावर चढत गेलो तशी एकमेकांची ओळखही वाढत गेली. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही तीन मुली एकट्या आलो होतो, बाकी दोघं-दोघं असे आठ जण आणि पन्नाशीतले एक काका आपल्या दोन मुली आणि दोन पुतण्यांसह. त्या पाच जणांचा पहिलाच ट्रेक.

रुपिन पास हा ट्रेक प्रत्येक वळणावर आपल्याला चकित करत जातो. सुरुवातीला जंगलातून जाणारी, दरीतल्या वाहत्या नदीच्या आवाजातली वाट पुढल्या दिवशी सूचीपर्णीच्या उंच वनांच्या सावलीतून वर जात राहते. पुढे जंगलाचा अचानक शेवट आणि खाली दिसणारा बर्फाचा पूल या दोन्ही गोष्टी अत्यंत विस्मयकारक ठरतात. तो मार्ग आपल्याला नदीपासून ग्लेशियर आणि नदीच्या उगमापर्यंत नेतो. नदीच्या खळाळत्या निळ्या पाण्याबरोबर तिच्या सर्व वळणांमधून आपण चालत राहतो. एका तालात, एका लयीत. विचारांच्या गोंगाटातून मार्ग काढत पायाखाली येणाऱ्या बर्फात पोहोचून थबकतो!

‘आपण का चालतोय? का दमून घेतोय? निसर्गाच्या सहवासासाठी का इतका आटापिटा करतोय? कधी जगण्यातला शून्यपणा जाणवतो, कधी किती काय-काय करायचंय याची यादी दिसायला लागते, कधी घरच्या आठवणींनी अस्वस्थ वाटतं. आला दिवस ढकलायचा की क्षणाक्षणात सुख शोधायचं?...’

त्या संपूर्ण प्रवासात मला फक्त माझ्याशीच गप्पा मारायच्या होत्या. विचारांच्या लयीत मार्ग काढत, बर्फाचा पूल पार करत, खडक आणि झऱ्यांवरून उड्या मारत, आपण एका जादुई जगात शिरतोय असं वाटायला लागतं. अशा वेळी घोटभर पाणी पिऊन, सुकामेवा खाऊन स्वतःशीच ‘टाइम प्लीज’ घेत सोबतच्या मुलांबरोबर थोड्या गप्पा सुरू व्हायच्या.

याआधी केलेले ट्रेक हा विषय अशा बोलण्यात मध्यस्थानी असतो. ग्लेशियरवरून चालताना आभाळ भरतं. कोणत्याही हिमाचली ट्रेकमध्ये पाऊस पडणं म्हणजे धोका. पुढली कॅम्पसाइट अंधाराच्या आधी गाठावी म्हणून डोक्यातले विचार बाजूला सारून पावलांचा वेग वाढवावा लागतो. ‘धंदेरस थाच’ या रमणीय कॅम्पसाइटवर जाऊन आपण थबकतो. रुपिन पासचं सगळ्यात सुंदर दृश्य म्हणजे तीन थरांचा धबधबा; जो त्या वेळेस बराच गोठला होता.

तिथे पोहोचताच, उंचावर कमी प्राणवायूमुळे त्रास होऊन, पुढे जाण्याचा धीर न होऊन आमच्यातले नवखे पाच जण गळाले. तुफान वारा आणि कडाक्याच्या थंडीत सगळे एका मोठ्या टेंटमध्ये गप्पा, गाणी म्हणत, खेळ खेळत, एकमेकांना ऊब देत-घेत राहतो. दर रात्री बर्फावरच्या आपापल्या टेंटमध्ये सामान मांडून, स्लीपिंग बॅगमध्ये घुसून नीट झोप आली तर मोठा विजय! एकदा कुशी वळवली की परत ऊब येणं अवघड. इतकं दमूनही त्या थंडीत रात्रभर नुसती चुळबुळ व्हायची.

पुढे पूर्ण बर्फाच्छादित असलेल्या त्या धबधब्याच्या बाजूनं चढताना पाठीवरच्या सामानामुळे आणि उंचीमुळे पावलं सावकाश पडतात, मात्र त्याउलट विचार परत वेग पकडतात. संध्याकाळी कॅम्पसाइटवर पुढल्या दिवशीचा संपूर्ण कार्यक्रम समोर येतो. पुढल्या दिवशी चढाईचा शेवटचा टप्पा आम्हाला पहाटे तीन वाजता सुरू करायचा होता! आपापलं मनोबल घट्ट करण्याच्या तयारीत सगळे लागतात. अखेर ती चढाई सुरू होते. ‘राता फेरी’च्या टोकावरून ‘रुपिन घळ’ दिसते आणि अंगात एक वेगळीच ऊर्जा येते.

पण जेव्हा लक्षात येतं, की ही घळ चढून आपल्याला खिंडीत जायचंय, तेव्हा मात्र धस्स होतं. मागचे सगळे दिवस माझा वेग इतर ट्रेकर्सच्या तुलनेने कमी असला तरी सातत्यपूर्ण होता. खिंड चढताना मात्र ट्रेक लीडरला जाणवलं, की हिला सोबत लागणार! ‘मैं बुजुर्ग हूं, मेरे साथ चलो,’ अशी मी त्याची मस्करी करत आदेश दिला. २०० मीटरची खिंड, ७० अंश कोनातली चढाई, त्याचा हात पकडून पार केली. ‘आप बुजुर्ग नही बच्चे हो,’ शेवटी तो म्हणाला!

खिंड पार झाली, उतार सुरू झाला. मधूनमधून बर्फात घसरगुंडी करत, किन्नौर कैलाशकडे बघत त्या दिवशी आम्ही सलग १५ तास चाललो. उंची कमी होत गेली आणि डोकं शांत झालं. शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक पातळीवर आपण स्वतःला तपासलंय याचा अंदाज आला.

त्या बर्फात, त्या निसर्गात आपण किती सूक्ष्म आहोत, याची प्रत्येक ट्रेकप्रमाणे परत एकदा जाणीव झाली. वेळोवेळी मनोधैर्य आणि शारीरिक क्षमता यांच्या पट्टीवर स्वतःला तपासण्याचा मानस दृढ होत गेला. त्याचबरोबर आपण किती ट्रेक केले, किती उंची गाठली, याचं गुणगान तर आपण गात नाही ना, हेही पडताळणं गरजेचे वाटतं. ‘The Outsider’चं निष्क्रिय असणं, तटस्थ असणं आणि टोक गाठून उदासीन होणं सतत डोक्यात असतं. म्हणूनच आलेली परिस्थिती किंवा घेतलेलं आव्हान शांतपणे स्वीकारणं हा पर्याय घेणं सध्या मला सोईचं वाटतंय. पुढचं पुढे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com