स्वप्नं मोठी घरं छोटी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home

अमेरिकेसह जगभरामध्ये घरांच्या वाढत्या किमती आणि घरभाडेही गगनाला भिडल्याने नेहमीच्या तुलनेने कमी आकारांच्या घरांची मागणी वाढत आहे.

स्वप्नं मोठी घरं छोटी!

आपलं एक छान टुमदार घर असावं, त्यात प्रशस्त दिवाणखाना, बेडरूम, नीटनेटके किचन आणि सुंदर बाग, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जितकं घर मोठं, तितकी स्वप्नं मोठी, असं म्हटलं जातं; मात्र जपानमध्ये सध्या केवळ एक टॉयलेट, बेसिन आणि झोपण्यासाठी एक बेड अशा अवघ्या ९० ते १०० चौरस फूट आकाराची आणि तीही वातानुकूलित अशी घरे बरीच चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या घरांना जपानमध्ये बरीच मागणी आहे. नेमकी कशी आहेत ही घरं, त्याविषयी....

अमेरिकेसह जगभरामध्ये घरांच्या वाढत्या किमती आणि घरभाडेही गगनाला भिडल्याने नेहमीच्या तुलनेने कमी आकारांच्या घरांची मागणी वाढत आहे; मात्र जपानमधील कल्पनेपेक्षाही छोट्या आकाराची घरे सध्या चांगलीच चर्चेत आहेत. आता तुम्ही म्हणाल, की घरे आहेत तरी किती छोटी? ही घरे आहेत अवघ्या ९० ते १०० चौरस फूट आकाराची. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्याकडील मोठ्या आकारातील गॅलरीएवढीच. म्हणजे त्यात एक व्यक्ती झोपू शकेल एवढा बेड, त्यालाच लागून छोटे बेसीन, त्याच्यापलिकडे केवळ एका खुर्चीएवढ्या आकारातील टॉयलेट आणि फार फार तर एक छोटेसे टेबल. बास्स... संपलं तुमचं घर. ऐकून आश्चर्य वाटलं ना? ही आश्‍चर्यचकित करणारी जपानमधील घरं विद्यार्थी आणि नोकरदारांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहेत.

टोकियोतील हराजुकू, नाकामेगुरो आणि शिबुया या व्यावसायिक परिसरामध्ये दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. घरापासून कार्यालयात जाण्यामध्ये आणि परतण्यामध्ये अनेक नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया जातो. व्यावसायिक परिसर असल्याने येथे एका घराचे भाडे दरमहा साधारणतः सातशे ते हजार डॉलरपर्यंत आहे. अशाच प्रकारे दररोज प्रवास करणारे आणि स्पिलिटस या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे सीईओ नाकामा केसुके यांच्या मनात छोट्या घरांची संकल्पना आली. घरांच्या वाढत्या किमती आणि अधिक गर्दीचं शहर टोकियो मुळात छोट्या आकाराच्या घरांसाठी ओळखलं जातं; मात्र नाकामा केसुके यांनी विकसित केलेली ही छोटेखानी घरं तुमच्या-आमच्या कल्पनेपेक्षाही छोटी आहेत. जपानमध्ये या घरांना थ्री-टाटामी रूम्स म्हणून ओळखलं जातं. थ्री टाटामी म्हणजे योगा करण्याच्या तीन मॅट्स बसतील एवढ्या आकाराची घरं. ही घरं किती छोटी असतील, याची आता तुम्हाला कल्पना आली असेलच.

जपानमधील लोकसंख्येचा अभ्यास केल्यास तेथे वृद्ध आणि तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच कमी जागेत राहणं आणि काम करणं ही गेल्या काही वर्षांपासून जपानी लोकांची जीवनशैली झाली आहे. आपल्यासारखे घरी पाहुणे बोलवा, त्यांना खाऊ-पिऊ घाला, हा प्रकार जपानमध्ये फारसा दिसत नाही. अनेक जण तर घरी स्वयंपाकही करत नाहीत. बाहेरूनच खाऊन येणं किंवा जेवण ऑर्डर करणं, हीच येथील पद्धत. आपल्यासारखं भरगच्च किचन इथं सहसा दिसतही नाही. गंमत म्हणजे येथील जवळपास एक-तृतीयांश लोकांना मित्रच नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे एकटं राहणं आणि दिवसभर शाळा-कॉलेज वा काम करणं ही जीवनपद्धती बरीच रुळली आहे. बहुतांश महाविद्यालयीन तरुणाई वा नोकरदार कुटुंब, मित्र, नातेवाईक या सामाजिक व्यापात न अडकता एकटं राहण्याला अधिक पसंती देतात. त्यामुळे या लोकांकडून छोट्या घरांची मागणी प्रचंड वाढली आहे. ही बाब लक्षात घेता स्पिलिटस २०१५ पासून अशा प्रकारच्या घरांसाठी काम करत आहे.

छोट्या घरांची मागणी असलेला वयोगट, त्यांची आर्थिक क्षमता आणि गरज लक्षात घेऊन स्पिलिटसने ९५ ते १०० चौरस फुटाची घरं विकसित केली. सुरुवातीच्या काळात स्पिलिटसने प्लायवूडची छोटी घरं विकसित केली. ती ध्वनि आणि उष्णतारोधक असावीत, म्हणून भिंतीमध्ये फायबर ग्लासचा वापर करण्यात आला. आता प्रामुख्याने सिमेंट काँक्रीटची छोटी घरं बांधली जात आहेत. आतापर्यंत जवळपास १०० इमारतींमध्ये सुमारे १५०० हून अधिक अशी छोटेखानी घरं बांधली आहेत आणि ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. गंमत म्हणजे शुभ्र पांढऱ्या रंगातील ही घरं इतकी लहान असूनही तितकीच देखणी आहेत. प्रत्येक घराची रचनाही आगळीवेगळी. त्यातही तुमची गरज लक्षात घेता छोटे-मोठे बदल केले जातात. काही घरांमध्ये तर अगदी कमी जागेमध्येही टॉयलेट, बेड, वॉशिंग मशीन, फ्रीज, सोफा आणि वर्कस्पेस तयार केले आहे. बहुतांश घरं ही वातानुकूलित आहेत. खरंतर या घरांचं भाडंही नेहमीच्या घराच्या तुलनेत जवळपास दोनशे ते तीनशे डॉलरने स्वस्त आहे. विशेष म्हणजे ही घरं मेट्रो स्टेशन्सला लागूनच असल्याने या घरांना तरुणाई आणि नोकरदारांकडून प्रचंड मागणी आहे.

अशा प्रकारच्या घरांमध्ये राहणाऱ्या जपानी लोकांचे अनुभव ऐकणं हीदेखील गमतीशीर बाब आहे. १९ वर्षीय युगो किनोशिता हा महाविद्यालयीन तरुण एका हॉटेलमध्ये पार्टटाईम काम करतो. तो कॉलेज आणि काम आटोपून लांबवर असलेल्या घरी जाण्याऐवजी भाड्यानं घेतलेल्या छोट्याशा घरात राहण्यास प्राधान्य देतो. त्याच्या घराचा आकार म्हणजे जेमतेम पाच बाय पाच फूटच. तो राहत असलेल्या घरामध्ये असलेला टीव्ही स्टॅण्ड हा विविधोपयोगी असून तो गरजेनुसार अभ्यासाचा टेबल किंवा डायनिंग टेबल म्हणूनही वापरता येतो. झोपायचं असल्यास शिडीने पोटमाळ्यावर जायचं आणि झोपायचं. हॉटेलमध्येच काम करत असल्याने त्याचा जेवणाचा प्रश्न मिटला आहे. शिवाय अंघोळीसाठी तो ‘सेंटो’ या सार्वजनिक स्नानगृहात जातो. ही जागा मला राहण्यासाठी, अभ्यासासाठी पुरेशी आहे. एवढ्या छोट्या जागेमुळे कोणतीही अडचण येत नाही, असे तो विश्वासाने सांगतो.

दोन वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त २६ वर्षीय काना कोमत्सुबरा ही टोकियोत आली. तिला राहण्यासाठी घर शोधत होती. नव्यानं बांधलेल्या, काम करण्यासाठी योग्य, शिवाय टॉयलेट आणि बाथरूम असलेल्या घराच्या ती शोधात होती. खरंतर तिला छोटं घर नको होतं; मात्र तिची शोधमोहीम तिला स्पिलिटस अपार्टमेंटपर्यंत घेऊन आली. अत्यंत छोटं, पण अगदी सुटसुटीत घर पाहून ती या घराच्या प्रेमातच पडली. काम करून राहण्यासाठी हे घर माझ्यासाठी उत्तम पर्याय असल्याचं ती सांगते. २० इंची रुंदीच्या पॅसेजमधून अशा प्रकारच्या अनेक घरांची दारं आहेत. असंच एक घर कानाचे. पाच बाय पाच फूट आकाराच्या खोलीत बसण्यासाठी छोटा काऊच, कोपऱ्यात छोटे बेसीन आणि त्याच्याच बाजूला टॉयलेट. पलिकडच्या बाजूच्या भिंतीला लावलेला टीव्ही स्टॅण्डचा वापर गरजेनुसार कसाही करता येतो. मुळात मोठ्या घराच्या शोधात असलेली काना आता मात्र छोटं घर खूपच फायदेशीर असल्याचं सांगते. घर छोटं असल्याने घरातील फ्रीजही खूप छोटा आहे. त्यामुळे त्यात थोडंसंच आईसक्रीमही ठेवता येते. त्यामुळे एरवी खूप आईसक्रीम खाणारी मी आता थोडंच आईसक्रीम खाते. त्यामुळे माझं वजन नियंत्रणात असल्याचं ती गमतीनं सांगते.

टोकियोच्या बेसबॉल लीगमध्ये कार्यरत असलेली असुमी फुजिवरा पूर्वी शेअर्ड होस्टेलमध्ये राहत होती; मात्र कोरोनाची लाट आल्यावर स्वतंत्रपणे काम करता येत नसल्यानं ती स्पिलिटसमध्ये राहण्यास आली. या लहानशा घरात राहण्यास आल्यापासून कोणतीही नवी गोष्ट खरेदी करण्यापूर्वी मी दोन वेळा विचार करते. कारण ती ठेवण्यास इथं जागाच नाही. त्यामुळे खर्च बराच कमी झाला. शिवाय मी दररोज टॉयलेटपुढे बसून योगा करते. खरंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण तेवढीच जागा माझ्यासाठी मोकळी आहे; परंतु तरीही दोन्ही हात आडवे करणं अवघडच. कधीकधी व्यायाम करताना एखादी वस्तू नक्कीच खाली पडते, असं ती हसतहसत सांगते.

विशी-तिशीतील तरुणाईची सर्वाधिक पसंती

मुंबईप्रमाणेच टोकियो शहरातही अनेक जण सकाळच्या पहिल्या ट्रेनने कामासाठी निघतात आणि शेवटच्या ट्रेनने घरी परततात. त्यामुळे प्रवासात बराच वेळ जात असल्याने बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नोकरदार कामाच्या ठिकाणापासून जवळच घराच्या शोधात असतात; मात्र ही घरं बरीच महागडी असल्याने ती विशी-तिशीतील तरुणाईला परवडणारी नसल्याने स्पिलिटसचे सीईओ नाकामा केसुके यांनी ही छोटेखानी घरं विकसित केली.

टोकियोतील या छोट्या घरांना सध्या बरीच मागणी असून, बहुतांश भाडेकरू हे वीस ते तीस वयोगटातील असल्याचं केसुके सांगतात. शिवाय भाडेकरूंमध्ये पुरुष आणि महिलांचं प्रमाण ६ः४ असं आहे. त्यातही ६० टक्के तरुणाई ही नोकरदार असून ३० टक्के विद्यार्थी; तर दहा टक्के भाडेकरू ४० वर्षांवरील आहेत.

परिसरानुसार घरभाडं

स्पिलिटस घरांचं भाडं हे तेथील स्थानिक परिसरावर अवलंबून आहे. सहसा टोकियोतील सर्वसाधारण घरांचं दरमहा भाडं जवळपास ७०० ते १००० डॉलर इतकं आहे. साहजिकच विशी-तिशीतील तरुणाईसाठी ते परवडणारं नाही. त्यामुळे स्पिलिटसच्या छोट्या घराचं भाडे दरमहा ३०० ते ४०० इतकं आहे. शिवाय तुम्हाला प्राईम लोकेशनसह छोट्या घरातही हव्या त्या सुविधा मिळतात. त्यानुसार घरभाडं वाढत असल्याचं केसुके सांगतात.