भूकंप अंदाजाचे ग्रह-तारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake

तब्बल ४० हजारांहून अधिक नागरिकांचा जीव घेणाऱ्या तुर्की आणि सीरियातील विनाशकारी भूकंपात प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली.

भूकंप अंदाजाचे ग्रह-तारे

तब्बल ४० हजारांहून अधिक नागरिकांचा जीव घेणाऱ्या तुर्की आणि सीरियातील विनाशकारी भूकंपात प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली; मात्र घटनेच्या तीन दिवसांपूर्वी नेदरलँड येथील संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी या भूकंपाबाबत अंदाज वर्तवला होता. त्यानंतर त्यांनी तुर्की आणि सीरियापाठोपाठ आगामी काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य भागातही भूकंप होण्याची शक्यता वर्तवली; परंतु भूकंपाचा अंदाज वर्तवण्यासाठी त्यांनी भूगर्भातील हालचालींसह अवकाशातील ग्रहांचा पृथ्वीवर होणाऱ्या परिणामाचा आधार घेतला; परंतु हूगरबीट्स यांच्या संशोधनाबद्दल जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी शंका उपस्थित केली.

नेदरलँडमधील सोलार सिस्टिम जिओमेट्री सर्व्हे (एसएसजीईओएस) येथील संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी ३ फेब्रुवारीला तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन आदी परिसरात सुमारे ७.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच तुर्की आणि लेबनॉन परिसरात आलेल्या ७.८ रिश्टर स्केल क्षमतेच्या विनाशकारी भूकंपाने हजारो निष्पाप नागरिकांचा साखरझोपेतच मृत्यू झाला. ऐन पहाटेच्या वेळी भूकंप आल्याने सुरक्षितस्थळी जाता आले नाही, त्यामुळे तुलनेने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. तुर्कीतील भूकंपाचा अंदाज वर्तवताना फ्रँक हूगरबीट्स यांनी आतापर्यंत जगभरात आलेल्या भूकंपाचा अभ्यास आणि त्या वेळी असलेली अवकाशातील ग्रहांच्या परिस्थितीचा कितपत परिणाम झाला, या माहितीचा आधार घेतल्याचे म्हटले.

हा अंदाज वर्तवताना तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन आदी परिसरातील भूगर्भामध्ये काही हालचाली होत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आल्याचे हूगरबीट्स म्हणाले. दुर्दैवाने त्यांचा अंदाज खरा ठरला; परंतु अवघ्या तीन दिवसातच हा भूकंप येईल, असे मलाही वाटले नव्हते, असेही ते म्हणाले. त्यानंतर हूगरबीट्स यांनी आगामी काळात भारत-पाकिस्तानसह अफगाणिस्तानचा काही भाग, हिंदी महासागराच्या परिसरात भूकंपाची शक्यताही व्यक्त केली; परंतु ग्रहांच्या परिस्थितीवरून भूकंपाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा अद्याप तरी विकसित झाली नसल्याचे जगभरातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्याही हवामान विभागानेही भारतीय उपखंडातील भूकंपाबाबत हूगरबीट्स यांनी व्यक्त केलेली शक्यता फेटाळून लावली आहे. भारतातील संशोधकांनीही या शक्यतेबाबत सहमत नसल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानलगतच्या भारताच्या वायव्य भागात सातत्याने भूगर्भ हालचाली सुरू असतात. ४-५ रिश्टर स्केल क्षमतेचे छोटे-मोठे भूकंप या परिसरात नियमित होत असल्याने त्यात काही आश्चर्य नसल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील भूविज्ञान सर्वेक्षण संस्थेनेही हूगरबीट्स यांच्या या पद्धतीवर शंका उपस्थित केल्या आहेत. आम्हीच नव्हे, तर जगातील कोणताही संशोधक भूकंपाचा अचूक अंदाज वर्तवू शकत नाही. त्यातही ग्रहांच्या स्थितीवरून भूकंपाचा अंदाज वर्तवणे हे अशक्यच आहे. हूगरबीट्स यांना कदाचित ते खरे वाटत असेल, तर त्यासंदर्भातील पुरावे, संशोधन वा ठोस माहिती जगासमोर मांडायला हवी. तसेच त्यांनी आगामी काळात जगात कुठेही होणाऱ्या भूकंपाची नेमकी तारीख आणि वेळ, नेमके ठिकाण आणि भूकंपाची तीव्रता आदीबाबतही सांगावे, जेणेकरून संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे हूगरबीट्स यांनी त्यांच्या संशोधनाची पाठराखण केली आहे. आम्ही वापरलेल्या पद्धतीबाबत संशोधकांनी शंका उपस्थित केल्या असल्या, तरी आतापर्यंत जगभरात आलेल्या विविध भूकंपाच्या घटनांचा आम्ही सविस्तर अभ्यास केला. भूकंपावेळी असणारी ग्रहस्थिती, तसेच चंद्राच्या परिस्थितीचा पृथ्वीतील भूगर्भ हालचालींवर निश्चितच परिणाम होत असल्याच्या निष्कर्षावर पोहोचलो आहोत. त्यावरूनच आम्ही भूकंपाचा अंदाज वा शक्यता वर्तवल्याचे हूगरबीट्स म्हणतात; परंतु ग्रहांच्या परिस्थितीवरून भूकंप नेमक्या कोणत्या ठिकाणी होईल, हे सांगता येत नसल्याचीही सारवासारव त्यांनी केली.

अफगाणिस्तानापासून ते हिंदी महासागरापर्यंतच्या संभाव्य भूकंपाबाबतच्या शक्यतेबाबत आक्षेप घेतल्यानंतर हूगरबीट्स यांनी नव्याने स्पष्टीकरण दिले. आम्ही जारी केलेल्या अंदाजातील जांभळा परिसर हाच भूकंपप्रवण क्षेत्र आहे, असे नाही. तसेच भूकंप अफगाणिस्तानात होऊन त्याचे धक्के हिंदी महासागरापर्यंत जाणवतीलच, असेही नाही. केवळ अवकाशातील हालचालींचा संबंधित परिसरातील भूगर्भावर होणाऱ्या परिणामावरून संबंधित परिसर जांभळ्या रंगात दर्शवला. त्यामुळे भूकंप नेमका कुठे येईल, हे सांगता येत नाही. कदाचित तो अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत किंवा हिंदी महासागरातही येऊ शकतो; परंतु या सर्व शक्यता आहेत, अचूक अंदाज नाही, असेही हूगरबीट्स यांनी स्पष्ट केले.

तुर्कीतील भूकंपाची कारणमीमांसा

उत्तर भारतापासून मध्य-पूर्व देशातून ते थेट भूमध्य समुद्रापर्यंत म्हणजे तुर्की आणि सीरियापर्यंतच्या भूगर्भातील पट्टा हा जवळपास एकसारखाच आहे. हा परिसर प्रामुख्याने ॲनाटोलियन प्रदेश (पश्चिम आशियाई प्रदेश) म्हणून ओळखला जातो. तुर्की हा विविध भूगर्भस्तरांच्या मध्यभागी येतो. उत्तरेला नॉर्थ एनॉटोलियल प्लेट, पूर्वेला ईस्ट एनॉटोलियल प्लेट, त्यालाच लागून अरेबियन प्लेटही आहे. त्यामुळे भूगर्भातील अनेक हालचाली हा भागात होत असतात. नुकताच आलेला भूकंप हा भूगर्भातील अरेबियन प्लेट (मध्य-पूर्वेकडील बाजू) आणि युरेशियन प्लेट (युरोप व आशियाला जोडणारी बाजू) यांच्यातील दबावामुळे निर्माण झालेल्या ॲनाटोलियन फॉल्टमुळे आला. त्यातही तुर्कीत नॉर्थ ॲनाटोलियन फॉल्टचा, तर सीरियामध्ये पूर्व ॲनाटोलियन फॉल्टचा परिणाम झाल्याचे हैदराबाद येथील राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे मुख्य संशोधक डॉ. विनीत गहलोत यांनी सांगितले.

तसेच भूकंपामुळे होणारे नुकसान हे रिश्टर क्षमता आणि केंद्रबिंदूची खोली यावरून अवलंबून असते. भूकंपाचा केंद्रबिंदू जितका खोलवर असेल, त्याचे धक्के दूरवरपर्यंत जाणवतात; मात्र नुकसान फारसे होत नाही. दुसरीकडे केंद्रबिंदू पृष्ठभागापासून नजीक असल्यास त्याचे परिणाम मर्यादित भागातच जाणवतात आणि हानी मोठ्या प्रमाणात होते. तुर्कीमध्ये नेमके हेच झाले. तुर्कीतील भूकंपाचा केंद्रबिंदू हा अवघ्या १८ किलोमीटर खोलीवर असल्याने अनेक ठिकाणी जमीन अक्षरशः फाटली, इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्याचे आपण सर्वांनी पाहिले. तसेच पहाटेच्या वेळी आलेल्या ७.८ रिश्टर स्केल क्षमतेच्या सर्वात मोठ्या धक्क्यानंतर पुढील दोन दिवसांत भूकंपाचे अनेक-छोटे धक्के बसल्याने जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे डॉ. गहलोत म्हणाले.

अन्य ग्रहांचा परिणाम अशक्यच!

चंद्राचा पृथ्वीवरील भूगर्भ हालचालींवर परिणाम होत असेल, तर अन्य ग्रहांचाही परिणाम होतो का, याबाबतही चर्चा होणे क्रमप्राप्त आहे. पृथ्वी आणि चंद्रामध्ये जवळपास तीन लाख ८४ हजार किलोमीटरचे अंतर आहे; तरीही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील परिणाम हा भरती-ओहोटीएवढाच मर्यादित आहे; मग अन्य ग्रहांचे उदा. मंगळाचे पृथ्वीपासून अंतर लक्षात घेतले, तर ते चंद्राच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. अन्य ग्रहांमुळे साधे पृथ्वीतलावरील पाण्याचीही हालचाल होत नाही, तर मग भूगर्भावर कसा परिणाम करेल, हा सरळसाधा मुद्दा आहे. त्यामुळे अन्य ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर भूकंप होतो, हा मुद्दा साफ चुकीचा असल्याचेही डॉ. गहलोत यांनी स्पष्ट केले.

सूर्य आणि चंद्राची महत्त्वाची भूमिका

सूर्य, पृथ्वी, चंद्र यांच्यातील अवकाशीय घडामोडींमुळे पौर्णिमा वा अमावस्या आपल्याला अनुभवता येतात. त्यावर समुद्राची भरती-ओहोटी अवलंबून असते. भूकंपावर भरती-ओहोटीचा परिणाम होतो का, याबाबत आतापर्यंत बराच अभ्यास झाला आहे. मुळात चंद्राच्या परिवलनाचा आणि पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणाचा समुद्रातलावर होत असलेल्या परिणामांबाबत निरीक्षण करणे सोपे आहे; परंतु त्याचा भूकंपावर होणारा परिणाम फारच मर्यादित आहे. मुळात भूगर्भात निर्माण झालेला ताण हा भूपृष्ठालगतच्या भागात असेल, तर त्यावर चंद्राच्या भरती-ओहोटीचा परिणाम होतो आणि त्यामुळे होणारे भूकंप हे कमी रिश्टर स्केलचे असतात. तसेच याबाबत आणखी सखोल संशोधन आणि उपलब्ध माहितीचे सांख्यिकीय विश्लेषण करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. गहलोत यांनी सांगितले.

टॅग्स :EarthquakePlanetsaptarang