जशास तसं (ऋता बावडेकर)

ruta bawdekar's article in saptarang
ruta bawdekar's article in saptarang

तो माणूस चिंतित चेहऱ्यानं म्हणाला ः ‘‘काय सांगू तुला...अरे, मी ती नाणी त्या दिवशी माझ्या लाकडी कपाटात ठेवली. एक-दोन दिवस कामामुळं मला वेळ झाला नाही; पण कामं आटोपल्यावर नाणी लॉकरमध्ये ठेवावीत म्हणून मी ती काढायला गेलो, तर उंदीर-घुशींनी ती कुरतडून खाऊन टाकली होती...आता तुला तर माहीतच आहे, की मी धान्याचा व्यापारी...त्यामुळं आमच्या घरात उंदीर-घुशींचा मोठा उपद्रव आहे. काय करू...? मला फार वाईट वाटतंय...’’

एका गावात एक तरुण आई आणि पत्नीबरोबर राहत असतो. गावातला एक श्रीमंत माणूस त्यांचा ‘फॅमिली-फ्रेंड’ असतो. तरुणाच्या वडिलांचे आणि या श्रीमंत माणसाचे चांगले संबंध असतात. त्याच्या वडिलांच्या निधनानंतरही त्या माणसानं या कुटुंबाशी असलेले संबंध तोडलेले नसतात. तरुणही त्यांना वडिलांच्या जागी मानत असतो.

एक दिवस आई आणि पत्नीला घेऊन यात्रेला जायचं तरुण ठरवतो. घरातल्या सगळ्या चीजवस्तूंचा बंदोबस्त तो करतो. सगळी बांधाबांध होते. आता उद्या पहाटे निघायचं म्हणून झोपण्याची तयारी ते करू लागतात, तेवढ्यात लाल रंगाची एक पुरचुंडी घेऊन त्याची आई येते. तरुण आश्‍चर्यानं तिच्याकडं बघत असतो. ती हळुवारपणे ती पुरचुंडी उघडते आणि बिछान्यावर रिती करते. तरुण आणि त्याची पत्नी डोळे फाडफाडून बघतच राहतात. त्या झगमगाटानं त्यांचे डोळे दिपून जातात. ती जवळजवळ २०-२५ सोन्याची नाणी असतात.

तरुण आईला विचारतो ः ‘‘ही कुणाची नाणी? तुझ्याकडं कुठून आली?’’ आई म्हणते ः ‘‘अरे, ही आपलीच नाणी आहेत. वाडवडिलांपासून चालत आलेली. माझ्या लक्षातच राहिलं नाही. आपण इतके दिवस बाहेर राहणार आहोत. ही नाणीही कुठंतरी जपून ठेवायला हवीत..’’ ‘‘अगं आई, आधी नाही का सांगायचंस? इतक्‍या रात्री बॅंका कशा उघड्या असतील? आधी सांगितलं असतंस तर इतर दागिन्यांबरोबर ही नाणीही लॉकरमध्ये ठेवली असती. आता काय करायचं?’’ मुलगा म्हणाला. ‘‘राहिलं खरं बाबा तुला सांगायचं...पण आता काहीतरी करायला हवं. बघ विचार कर...’’ आई म्हणाली.

तिघंही विचार करू लागले. तरुणाची बायको म्हणाली ः ‘‘इतक्‍या रात्री आपण एकच करू शकतो...काकांना विनंती करून आपण येईपर्यंत ही नाणी त्यांना सांभाळायला सांगू किंवा त्यांच्या लॉकरमध्ये ठेवायला सांगू. आल्यावर परत घेऊ. ते काही ‘नाही’ म्हणणार नाहीत...’’ तिघांनाही कल्पना आवडली आणि तरुण त्या श्रीमंत माणसाकडं निघाला.
त्याला इतक्‍या रात्री बघून तो माणूस काळजीत पडला.

‘‘सगळं ठीक ना रे?’’ त्यानं विचारलं. तरुण म्हणाला ः ‘‘घाबरू नका काका. सगळं ठीक आहे...’’ आणि त्यानं सगळी हकीकत सांगितली. थोडा विचार करून श्रीमंत माणूस म्हणाला ः ‘‘अरे, खुश्‍शाल ठेव. उद्याच मी बॅंकेत माझ्या लॉकरमध्ये ही नाणी ठेवतो आणि आल्यावर तुम्हाला देतो.’’
तरुण समाधानानं घरी आला. तिघेही शांतपणे झोपले आणि दुसऱ्या दिवशी यात्रेला निघून गेले. काही दिवसांनी ते परत आले. घरात सगळी आवराआवर करून आठेक दिवसांनी तो तरुण श्रीमंत माणसाकडं गेला आणि आपली नाणी परत मागू लागला. तो माणूस चिंतित चेहऱ्यानं म्हणाला ः ‘‘काय सांगू तुला... अरे, मी ती नाणी त्या दिवशी माझ्या लाकडी कपाटात ठेवली. एक-दोन दिवस कामामुळं मला वेळ झाला नाही; पण कामं आटोपल्यावर नाणी लॉकरमध्ये ठेवावीत म्हणून मी ती काढायला गेलो, तर उंदीर-घुशींनी ती कुरतडून खाऊन टाकली होती...आता तुला तर माहीतच आहे, की मी धान्याचा व्यापारी...त्यामुळं आमच्या घरात उंदीर-घुशींचा मोठा उपद्रव आहे. काय करू...? मला फार वाईट वाटतंय...’’

झाला प्रकार तरुणाच्या लक्षात क्षणार्धात आला...‘‘काही हरकत नाही, काका... तुम्ही तरी काय करणार?’’ असं म्हणून तो वळला आणि काहीतरी आठवून म्हणाला ः ‘‘दीपक आहे का घरात?’’ दीपक म्हणजे त्या माणसाचा आठवीतला मुलगा. तो ‘हो’ म्हणाला. ‘‘काय आहे काका, यात्रेहून येताना एका गावात मला खूप छान, मोठ्ठा पतंग मिळाला. दीपकसाठी मी तो आणलाय; पण इथं आणायला विसरलो. त्याला माझ्याबरोबर पाठवा ना, त्याला पतंग खूप आवडतात ना...’’  मुलाला हाक मारली आणि दीपक तरुणाबरोबर निघाला.
दोघं घरी पोचले. तरुणानं त्याचं चांगलं स्वागत केलं.

तो दीपकला म्हणाला ः ‘‘तू दोन-चार दिवस आमच्याकडंच राहा. आपण मज्जा करू. मी काकांना तसा निरोप पाठवतो.’’ दीपक खूश झाला. त्याचे खूप लाड होत होते. मुख्य म्हणजे अभ्यासाला सुटी होती. दिवसभर मुलगा घरी आला नाही म्हणून श्रीमंत माणसानं तरुणाला रात्री अखेर फोन केला आणि कारण विचारलं. तरुण रडवेल्या स्वरात म्हणाला ः ‘‘काका, आपला दीपक पतंगाबरोबर उडून गेला. तुम्हाला कसं सांगावं कळेना, म्हणून फोन केला नाही.’’ श्रीमंत माणूस प्रचंड खवळला. म्हणाला ः ‘‘अरे, एवढा मोठा मुलगा पतंगाबरोबर कसा उडून जाईल? काहीही सांगतोस का?’’ पण तरुण आपल्या म्हणण्यावर ठाम होता. अखेर श्रीमंत माणूस काही लोकांना घेऊन तरुणाच्या घरी आला. सगळे जण तरुणाला वेड्यात काढू लागले. तेव्हा तो म्हणाला ः ‘‘काकांकडं ठेवायला दिलेली आमची वडिलोपार्जित सोन्याची नाणी जर उंदीर-घुशी कुरतडून खाऊ शकतात, तर मग दीपकही पतंगाबरोबर का उडून जाऊ शकत नाही?’’ सवाल तर बिनतोड होता. श्रीमंत माणूस वरमला. त्यानं तरुणाची माफी मागितली आणि त्यानं त्याची नाणी त्याला परत केली.

तरुण म्हणाला ः ‘‘काका, मीही बोधकथा वाचल्यात.. तुम्ही आयडियाही तीच जुनाट वापरलीत. आजच्या काळात कुणी असं फसेल का? मनात आणलं असतं तर मी पोलिसांतही जाऊ शकलो असतो; पण तुम्हाला ‘जशास तसं’ उत्तर द्यावं असं ठरवलं...’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com