पनामातील भव्य गुरुद्वारा

१८५० मध्ये पनामा इथं पहिल्यांदा काही शीख बांधव कामासाठी आले
S Nitin writes about Grand Gurdwara in Panama
S Nitin writes about Grand Gurdwara in Panamasakal

- एस. नितीन

पनामा या देशात भारतीय दूतावास आहे. मध्य अमेरिकेतील मेक्सिकोनंतरचं मला भेटलेलं हे दुसरं भारतीय दूतावास होतं. या दूतावासाची स्थापना १९७३ मध्ये झाली. १८५० मध्ये पनामा इथं पहिल्यांदा काही शीख बांधव कामासाठी आले. ते कामगार म्हणून ट्रान्सकॉन्टिनेंटल रेलरोड लिंकमध्ये सामील झाले. यामुळे इथं शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. इथं त्यांनी बांधलेला एक सुंदर गुरुद्वारा आहे. भारतीय लोक जेव्हा दुसऱ्या देशात स्थायिक होतात, तेव्हा त्यांची संख्या वाढल्यावर ते हिंदू असतील तर मंदिर, शीख असतील तर गुरुद्वारा आणि मुस्लिम असतील तर मशीद बांधतात. या ठिकाणी सर्व गाठीभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधी केले जातात. शहरामध्ये हे मोठं गुरुद्वारा आहे आणि मी तिथं राहण्यासाठी गेलो.

पुढील काही दिवस तिथं राहिलो आणि खूप भारतीय लोकांना भेटलो. इथं हजारो भारतीय लोक राहतात. सर्वांत जास्त लोक गुजरातमधील, त्यानंतर पंजाबमधील आणि मग अन्य राज्यांतील. बहुसंख्य भारतीय इथं सामान्य लोकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू हप्त्याने देतात आणि त्यांना त्या वस्तूंची सवय लावतात. त्याचबरोबर इथं सावकारी व्याजाने पैसेही देतात. काही भारतीय लोकांनी मला सांगितलं की, पनामाचे राष्ट्राध्यक्षसुद्धा भारतीयांकडून व्याजाने पैसे घेतात. जसं थायलंडमध्ये मी पाहिलेले गोरखपूर, उत्तर प्रदेशमधील लोक तिथं लहान व्यावसायिकांना व्याजाने पैसे देतात. भारतीयांची इथं खूप मोठी-मोठी दुकानं आहेत, तिथं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकल्या जातात. खूप सारे बाहेरदेशातील लोक इथं मोठमोठ्या बँकांमध्ये नोकरी करतात.

पनामा कालवा (कॅनॉल) हा अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. कालव्यामुळे उत्तर आणि दक्षिण अमेरिका दुभंगला जातो. या कालव्याची निर्मिती ही प्रशांत आणि अटलांटिक महासागराला जोडते. पनामा कालव्याच्या शॉर्टकटमुळे जहाजांना अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांमध्ये प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होतो, ज्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील टोकाच्या आसपासचा लांब, धोकादायक केप हॉर्न मार्ग टाळता येतो. एकोणिसाव्या शतकात फ्रान्स या देशाने प्रकल्पावर काम सुरू केलं; पण पैशांच्या कमतरतेमुळे, अभियांत्रिकी समस्या आणि उच्च कामगार मृत्युदर यामुळे प्रकल्प रद्द केला गेला. १९०४ मध्ये अमेरिकेने पनामा कालवा प्रकल्प ताब्यात घेतला आणि अथक परिश्रम घेऊन तो १९१४ मध्ये १५ ऑगस्टला पूर्ण केला. या प्रकल्पात हजारो कामगारांचा मृत्यू झाला,यामध्ये मुख्यत्वे पीत ज्वर (यलो फिव्हर) हा विषाणूजन्य रोग जास्त प्रमाणात होता. पनामा कालव्याची लांबी ही ८२ किमी आहे. पनामा कालवा जगातील ६ टक्के व्यापार प्रभावित करतो. २०२१ मध्ये १३ हजार ३४२ जहाजांनी या कालव्यातून प्रवास केला. पनामा कालवा हा १९९९ पर्यंत अमेरिकेच्या ताब्यात होता. त्यानंतर पनामा देशाने तो आपल्या ताब्यात घेतला आणि या देशाच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के वाटा आहे.

भौगोलिकदृष्ट्या पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागरापेक्षा थोडा उंच आहे. समुद्रसपाटीतील या फरकामुळे जहाजांना पनामाच्या भूभागावर जावं लागतं. कालव्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी जहाजांना उचलावं वा खाली न्यावं लागतं. यासाठी पाण्याच्या टाक्यांचा वापर केला जातो, टाकी भरली की जहाज वरती येतं आणि पाणी सोडलं की खाली. अशा तीन टाक्या असतात आणि जहाज हळूहळू वर उठतं. पनामा शहराजवळ मीराफ्लोरेस या ठिकाणी हे पाहण्यास मिळतं. तो एक माझ्यासाठी रोमांचकारी अनुभव होता. मी पाहिलं तेव्हा ३०० मीटर लांब आणि त्यामध्ये हजारो टन माल असलेलं जहाज कालव्यातून जात होतं.पनामा शहरात रोडवर मला सामोसे खाण्यासाठी मिळाले, सोबत ते पोळीभाजी विकत असत. हिंदू मंदिरांतील पुजाऱ्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि त्यांनी मंदिरात येणाऱ्या सर्व भारतीय लोकांशी माझी ओळख करून दिली. भारतीय लोक इथं चांगलं अर्थार्जन करतात आणि पुढे त्यांचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न असतं. पुढे मी कोलंबिया या शहरात जाण्याचा निर्णय घेतला.

तसं पाहता कोलंबिया देशाची सीमा पनामाला लागून आहे व ती डॅरिन गॅप नावाच्या प्रदेशात दुभागते. हा डॅरिन गॅप उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडाला जोडतो. या भौगोलिक प्रदेशात पाणलोट, जंगल आणि पर्वत आहेत. काही मूळ निवासी या प्रदेशात राहत आहेत. डॅरिन गॅप प्रदेशाची परिसंस्था (इकोसिस्टिम) रोड निर्मितीमुळे बिघडू शकते, त्यामुळे पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्या पॅन अमेरिकन महामार्गाला विरोध केला. हजारो वर्षं या प्रदेशाने उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील रोगग्रस्त गुरांचा प्रसार रोखला. येथील भौगोलिक परिस्थिती रोडनिर्मितीसाठी खूप खडतर आहे. याला ‘गॅप’ असं संबोधलं जातं, कारण पॅन अमेरिकन महामार्ग जो की जगातील सर्वांत लांब ४८ हजार किलोमीटरचा रोड आहे आणि अलास्का ते अर्जेन्टिना यांना जोडतो, तो डॅरिन गॅप इथं १०६ किलोमीटर इतका खंडित आहे. डॅरिन गॅपमधून मला सायकलने जाता येईल का म्हूणन मी कोलंबियाच्या दूतावासात गेलो होतो आणि त्यांनी मला माहिती दिली की इथं जाऊ नये. जर जायचं असेल तर एक विशेष परवानगी काढावी लागेल. काही सायकलिस्ट येथून प्रवास करतात, ते एका बोटीने काही अंतर पार करतात; पण त्यासाठी ५० हजार रुपये बोटवाले घेतात, त्यामुळे मी तसं जाण्याची योजना रद्द केली. या प्रदेशातील जंगलात काही टोळ्या आहेत आणि कोलंबियातून अमली पदार्थांची तस्करी येथून केली जाते. ते पुढे अमेरिकेमध्ये जातात. सोबत मानवी तस्करीसुद्धा येथून होते. खूप लोक अमेरिकेमध्ये राहण्याचं स्वप्न घेऊन इथून प्रवास करतात. त्यात मी काही भारतीय लोकांबद्दल ऐकलं आहे. त्यांनी आपला जीव इथं गमावला आहे. या खडतर भागातून प्रवास करणं हा एक साहसी खेळ बनला आहे आणि त्या साहसाच्या खूप कहाण्या प्रसिद्ध आहेत.

पनामा शहर हे माझं उत्तर अमेरिकेतील शेवटचं शहर होतं. मागील काही महिने मी इथं खूप काही शिकलो आणि अनुभवलं. या उत्तर अमेरिका खंडाला प्रणाम करून मी १५ जून रोजी दक्षिण अमेरिकेत विमानप्रवास सुरू केला. भेटूयात कोलंबिया या देशात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com