मैत्री : शांततेची पहिली पायरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Friendship

मी हरिवदन शाह आणि त्यांच्या परिवाराचे आभार मानून मेडेलिन या शहरातून सायकल यात्रेला सुरुवात केली. मी इक्वेडोर या देशाच्या दिशेने निघालो होतो.

मैत्री : शांततेची पहिली पायरी

- एस. नितीन nonviolenceplanet@gmail.com

मी हरिवदन शाह आणि त्यांच्या परिवाराचे आभार मानून मेडेलिन या शहरातून सायकल यात्रेला सुरुवात केली. मी इक्वेडोर या देशाच्या दिशेने निघालो होतो. माझा हा प्रवास अँडीज पर्वतरांगांमध्ये असलेल्या मेडेलिन शहरातून सुरू झाला होता. या अँडीज पर्वतांची साथ मला पुढे पेरू या माझ्या अमेरिकेतील शेवटच्या देशापर्यंत लाभली आणि पर्वतरांगांमध्ये मला अद्‍भुत असे अनुभव आले, ज्यांना शब्दांत मांडणं कठीण आहे, त्याबद्दल पुढे पाहूच. अँडीज पर्वतरांगा या ८९ हजार किलोमीटर लांब आहेत आणि त्या व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, बोलिव्हिया, चिली आणि अर्जेंटिना या देशांतून जातात व त्यांची रुंदी २०० ते ७०० किलोमीटर इतकी आहे. या जगातील सर्वांत लांब खंडीय पर्वतरांगा आहेत, यावरून आपण या पर्वतरांगांची व्याप्ती समजू शकतो.

या अँडीज पर्वतरांगेत विकसित झालेल्या मानव समाजाला अँडीयान सभ्यता असं म्हणतात. अशा या पर्वतातून सायकल चालवणं ही माझ्यासाठी एक पर्वणीच होती; मात्र त्याचबरोबर एक आव्हानही होतं. सर्वांत कठीण मार्ग, जिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी आणि खूप सारे चढ-उतार आहेत. माझा पहिला दिवस खूप कठीण होता, कारण मागील काही दिवस मी सायकल चालवणं खंडित केलं होतं.

आजूबाजूला असलेला निसर्ग मात्र मला खूप प्रेरणा देत होता आणि या खडतर रस्त्यावर खूप सारे सायकलपटू सराव करत होते, त्यामुळे त्यांची एक दिवसाची साथ मला मिळाली. पण, संपूर्ण शरीर हे थकलेलं आणि त्यात रात्री झोपण्यासाठी जागा शोधणं कठीण होतं, कारण येथील जमीन ही समतल नव्हती. अंधार झाल्यामुळे मी लोकांकडे न जाता एका बंद दुकानाच्या समोर तंबू टाकून झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा यात्रा सुरू केली. वाटेत सर्वत्र छोट्या छोट्या टेकड्या, त्यांच्यावर सर्वत्र शेती केली जात होती. कधी कधी केळीची झाडंडी दिसत होती आणि सोबत खूप सारी कॉफीची लागवड केलेली मी या भागात पाहिली. या भागात कॉफीची प्रचंड लागवड केली जाते, कारण या पिकांसाठी लागणारी समुद्रसपाटीपासूनची उंची, तापमान, आणि अन्य घटक इथे आहेत. आजचा प्रवास हा काल्डास या भागातील होता, तो कोलंबियातील प्रमुख कॉफी क्षेत्रांपैकी एक, त्यात जगातील सर्वोत्तम अरेबिक बीन्सचं उत्पादन होतं. येथील तापमान १३ अंश सेल्सिअस ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत वर्षभर असतं. जसं- आपल्या महाराष्ट्रातील हिवाळा. कॉफीचं पीक घ्यायला १७९८ मध्ये कोलंबियात सुरुवात झाली. सध्या कोलंबिया कॉफी उत्पादनात ब्राझील आणि व्हिएतनामनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

परेरा या शहरातून मी पुढं काली या शहराकडे निघालो. वाटेत रेस्टरेपो या गावाबाहेर माझे मित्र हम्बोरतो यांच्या घरी मला निमंत्रण मिळालं. हम्बोरतो आणि त्यांची पत्नी हे दोघे शेतात बांधलेल्या सुंदर घरात राहत होते. त्यांच्या शेतात केळी आणि संत्र्याची लागवड केली होती. भारतीय अन्न हे जगभरात प्रसिद्ध आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी अख्ख्या मसूरची भाजी बनवली आणि त्यांना ती खूप आवडली. मी पुढे काली या शहराकडे रवाना झालो. हे शहर साल्सा या नृत्यासाठी जगप्रसिद्ध आहे. जगभरातील लोक इथे साल्सा शिकण्यासाठी येतात. स्त्री आणि पुरुष जोडीने हे नृत्य करतात. आपण बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये हे पाहिलं असेल. कोलंबियामध्ये नृत्य करणं लोकांना आवडतं. इथे प्रत्येक कोपऱ्यावर साल्सा क्लब असल्याने, संगीत हा देशातील दैनंदिन जीवनाचा एक मोठा भाग आहे. ‘ वॉक वॉक ’ हे जगप्रसिद्ध गाणं आपण ऐकलं असेल. या गाण्याची गायिका शकिरा ही कोलंबिया देशाची आहे.

काली या शहरात मला जगभरातील अनेक प्रवासी हॉस्टेलमध्ये भेटले, त्यातील बरेच जण रोज रात्री साल्सा क्लबमध्ये जात आणि दिवसा ते क्लासमध्ये शिकत. मीही एका मोफत क्लासमध्ये एक दिवस साल्सा शिकलो आणि रात्री एका क्लबमध्ये नाचू लागलो. पहिली पाच मिनिटं मी तो डान्स केला, शेवटी आपला भारतीय मुक्त डान्स सुरू केला.

काली आणि कोलंबियातील प्रत्येक शहरात सुंदर अशा जुन्या इमारती आहेत, त्यांची बांधणी ही स्पॅनिश साम्राज्याच्या काळात झाली. ही शहरं सुव्यवस्थित आहेत. जसं आपलं शहर, चंदिगढ. सर्व शहरांतील रस्ते हे साधारणपणे सरळ. येथील लोक खुल्या विचाराचे आहेत आणि स्त्री-पुरुषांमध्ये मला समानताही दिसली. येथील महिला खूप सुंदर आहेत, असं खूप लोक सांगत; पण मला तसं काही दिसलं नाही. कदाचित माझी सुंदरतेची व्याख्या वेगळी असेल. माझे गुरुजी कुमार सप्तर्षी सांगत, जर आफ्रिकेतील एका राजाने जगावर राज्य केलं असतं, तर जगामध्ये महिला-पुरुष यांची सुंदरतेची व्याख्या वेगळी झाली असती. जसं- त्या आफ्रिकेतील राणीची सुंदरता तिचा काळा रंग, कुरुळे केस आणि बसकं नाक.

कोलकातामधील एक तरुण अरुण पाल यांनी १९७२ मध्ये सायकलने जग पाहण्यासाठी सबंध जगाचा प्रवास केला. त्यांची भेट बगोटे शहरात झाली. ते एक इंडियन हॉटेल तिथं चालवतात आणि त्यांनी मला सांगितलं की, सायकल यात्रा करत असताना ते कोलंबियात आले आणि इथं एका मुलीच्या प्रेमात पडले. पुन्हा सायकल यात्रा सुरू केली. ते एक आठवडा इक्वेडोरमध्ये गेले; पण आपल्या प्रेमासाठी परत कोलंबियाला येऊन त्यांनी त्या मुलीशी लग्न केलं आणि ते कायमचे कोलंबियामध्ये स्थायिक झाले. त्यांनी मला जेवणासाठी बोलावलं आणि आम्ही तास न् तास गप्पा मारल्या, कारण आमची सायकल यात्रा. त्यांनी १९७२ मध्ये आणि मी २०१६, काळाचा हा खूप मोठा फरक होता. त्या काळात ना मोबाईल आणि इंटरनेट. अरुणजींनी सबंध जगाचा प्रवास करून इथे लग्न केलं, तसंच युरोपातील मुलंही इथे येऊन लग्न करतात.

सहसा पुरुषांमध्ये गप्पा होताना मला एक प्रश्न नक्की येतो तो म्हणजे, ‘जगात सर्वांत सुंदर मुली कोणत्या देशात आहेत?’ त्यावर माझं उत्तर आहे कोलंबिया. काली शहरातून पुढे मी सायकल यात्रा सुरू केली. पाटिया नावाच्या एका गावातून जात असताना इथे तापमान जास्त होतं. सोबत हवेतील बाष्प, झाडं, जमीन आणि तिचा गंध मला अनुभवता येत होता. मला माझ्या राशीन गावात असल्यासारखं वाटलं. तो एक सुखद क्षण होता आणि तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. त्याच संध्याकाळी मी तंबू टाकण्यासाठी जागा शोधत असताना एका घरी गेलो. ते मूळचे आफ्रिकन असलेले लोक होते. त्यात दोन मुलं आणि त्यांचे आजी-आजोबा होते. त्यांना मी विचारलं, ‘‘मी रात्री इथे राहू शकतो का?’’ त्यांनी मला होकार दिला आणि एक रूमही दिली, सोबत जेवणदेखील दिलं. त्यांच्या एका मुलाशी माझी गट्टी जमली. तो क्षण मी विसरू शकणार नाही. मी महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यातील व्यक्ती आणि तो कोलंबियातल्या एका गावातला मुलगा; आम्हा दोघांमधील अंतर १६ हजार किलोमीटर आणि मध्ये मोठमोठे महासागर; पण आम्ही भेटलो आणि एका स्नेहाच्या बंधाने जोडलो, मित्र बनलो. मैत्री हीच शांतीची पहिली पायरी आहे, असं मला वाटतं.