

महात्मा गांधींनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसा ही मूल्यं रुजवली आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याकडं जगातील थोर मंडळी आकर्षित झाली.
- एस. नितीन nonviolenceplanet@gmail.com
जगातील ४७ देशांत मागील साडेपाच वर्षांत मी सायकल आणि चालत प्रवास केला. त्यात २० देशांत सायकलने २५ हजार किलोमीटर आणि २७ देशांत १५ हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला. हा प्रवास शक्य झाला केवळ मानवतेवरील दृढ विश्वास; महात्मा गांधी, गौतम बुद्ध आणि सत्याचा शोध या प्रेरणेतून. या विश्वयात्रेतून प्रेम, सत्य, अहिंसा आणि करुणा ही सर्वोच्च मूल्यं मानवसमाजासाठी किती महत्त्वाची आहेत हे मला पावलोपावली जाणवलं.
आपल्या देशात ही मूल्यं रुजवण्यासाठी खूप साऱ्या संतांनी पदयात्रा केल्या आहेत, त्यांत गुरुनानकजींनी २३ वर्षं विविध देशांत चालत प्रेमाचा संदेश दिला. गौतम बुद्ध यांनी करुणा, येशू ख्रिस्त यांनी प्रेम, महावीर जैन यांनी अहिंसा आणि अशा अगणित लोकांनी हाच मार्ग निवडला.
महात्मा गांधींनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसा ही मूल्यं रुजवली आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याकडं जगातील थोर मंडळी आकर्षित झाली. आपल्या या बापूंचा आज १५३ वा वाढदिवस आहे. आज हा दिवस आपण ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा करत आहोत. या दिवशी आपणही काही निश्चय करणं गरजेचं आहे. जसं की - आजच्या दिवशी प्राण्यांवरील हिंसा थांबवण्यासाठी आपण शाकाहारी जेवणाचा पुरस्कार करू शकतो. मला माहीत आहे की, मानवी जीवन हे हिंसेवर आधारित आहे; पण या पृथ्वीवर आपण एक शक्तिशाली प्राणी आहोत आणि त्यामुळे आपली ही नैतिक जबाबदारी आहे की, आपण कमीत कमी हिंसेत जगायला हवं. याचबरोबर अजूनही खूप साऱ्या क्रिया आहेत, ज्यांत हिंसा सामावली आहे. जसं की - गाडीने प्रवास करणं, यामुळे प्रदूषण वाढतं आणि त्याचा फटका खूप साऱ्या जीवांवर होतो, तर एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरावी, जास्त न लागणारी खरेदी टाळावी, लोकांशी प्रेमाने बोलावं, अशा खूप साऱ्या क्रियांचा संकल्प आपण आज करू शकतो. असा संकल्प करणं, हे सर्व गांधीजींसाठी नसून आपल्यासाठी आहे, आपल्या मानवजातीसाठी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा जो प्रवास, तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. भारत देशात गांधींबद्दल अपप्रचार करणारी यंत्रणा बऱ्याच वर्षांपासून काम करत आहे. आपण शाळेत महात्मा गांधीजींबद्दल जे वाचतो, ते मला पुरेसं वाटत नाही. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जाते, त्यामुळे लोकांनी गांधीजींची पुस्तकं वाचली पाहिजेत, त्यामुळे आपल्या जीवनात खूप बदल होऊ शकतो. मला विशेषतः गांधीजींचे सत्याचे प्रयोग खूप आवडतात.
माझ्या या पाच वर्षांच्या प्रवासात महात्मा गांधी हे नाव घेतल्यावर तुम्हाला कोणते शब्द आठवतात, असा प्रश्न मी जगभरातील विविध लोकांना करायचो, तेव्हा याचं उत्तर ४-५ शब्दांत मिळायचं - ‘भारतीय’, ‘शांती’, ‘अहिंसा’, ‘हिंदू’ आणि ‘संत’. सर्व लोक गांधीजींचा खूप आदर करत आणि जेव्हा ते माझ्या सायकलवर आणि चालत यात्रा करताना असलेल्या बॅनरवरील महात्मा गांधी यांचा फोटो पाहत, तेव्हा ते मला खूप आदर देत. मी रोज रात्री पाच घरं जात असे आणि लोकांना त्यांच्या घरासमोर तंबूमध्ये (टेन्टमध्ये) राहण्याची परवानगी मागत असे. सोबत माझ्या गांधी शांतीयात्रेबद्दलही सांगत असे, तेव्हा ते माझं निरीक्षण करत व गांधीजींचा फोटोही पाहत. महात्मा गांधीजींचा फोटो हे माझ्या चारित्र्याचं प्रमाणपत्र होतं, त्यामुळे लोक माझी काळजी घेत. महात्मा गांधी यांचा फोटो घेऊन चालणं ही एक खूप मोठी जबाबदारी माझ्यावर होती आणि सोबत दडपणही होतं, कारण आपल्या चुकीच्या व्यवहाराने किंवा शब्दाने महात्मा गांधी आणि भारत देशाचं नाव खराब होऊ शकतं.
जबाबदारी व दडपणामुळे मला खूप फायदा झाला, कारण यामुळे मी स्वतःच्या कृतीवर जास्त लक्ष ठेवू लागलो. कंबोडियामध्ये जेव्हा मी यात्रा करत होतो, तेव्हा मला त्या लोकांनी सांगितलं की, आमच्याकडे कंबोडियन गांधी आहेत आणि त्यांचं नाव भन्ते महाघोषानंदा. ते एक बुद्धिस्ट धर्मगुरू होते आणि त्यांनी शांतीसाठी खूप पदयात्रा तिथे केल्या होत्या. जपानमधील बुद्धिस्ट धर्मगुरू रेव्ह. फुजी गुरुजी, जे गांधीजींच्या विचारांनी आणि आचरणाने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी युद्धाच्या, आण्विक शस्त्रांविरोधात आणि शांतीसाठी खूप मोठं काम जगभरात केलं. त्यांच्या अनुयायांसोबत मी जगभरात काम केलं आणि एक बुद्धिस्ट भन्ते ईकेदा शोनीन यांच्यासोबत आफ्रिकेत आठ महिने पदयात्रा केली. जपानच्या टीव्हीवर मी गांधीजींची पुस्तकं वाचून दाखवण्याचे कार्यक्रम स्वतः पहिले. महात्मा गांधीजींविषयी जपानमध्ये खूप आदर आहे आणि टोकियोमध्ये एक वरिष्ठ गांधीयन प्रोफेसर कसाई हे दर आठवड्याला महात्मा गांधी यांच्या विचारांवर कार्यशाळा घेतात.
अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग ज्यु., दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला या महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या व्यक्ती आहेत. चीनच्या बीजिंग शहरात महात्मा गांधीजींचा पुतळा आहे व सोबत त्यांच्या राष्ट्रीय संग्रहालयात मी जगातील महान लोकांमध्ये महात्मा गांधीजींचा फोटो पहिला आहे. अमेरिकेत तर खूप सारे गांधीपुतळे आहेत. गांधीजींचे पुतळे जगातील ७० पेक्षा जास्त देशांत आहेत आणि असे पुतळे जगभर असणारे महात्मा गांधीजी हे जगातील एकमेव राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. भांडवलशाही देश असो वा समाजवादी; गांधीजी तिथं आहेत; ख्रिश्चन, इस्लाम, बुद्धिस्ट, हिंदू या धर्मांच्या वा नास्तिक देशांतसुद्धा आहेत. महात्मा गांधींना विचारांची सीमा नाही ना धर्माची, ते जगाच्या पाठीवर सर्वत्र दिसतात, कारण ते वैश्विक आहेत. भारत देशात जेव्हा मी परतलो, तेव्हा राजस्थानमधून चालत असताना लोक मला विचारत, ‘कोणत्या जातीचा आहेस?’ मी सांगायचो ‘‘मानवता या जातीचा.’’ जातीने खुजलेल्या देशात परत आल्यावर आता मला छोटं केलं जाऊ लागलं, महाराष्ट्रात आडनाव विचारलं जाऊ लागलं आणि माझ्या जातीचा शोध सुरू झाला. पुढे मी तमिळनाडूमध्ये पदयात्रा केली आणि तिथे जातिअंताच्या लढ्याची प्रेरणा घेऊन मी माझं आडनाव काढ़ून टाकलं. आता मी एस. नितीन हे नाव लावतो.
आयर्लंडमध्ये गांधी शांती पदयात्रा करत असताना एका छोट्या गावात एक वयस्कर महिला दिसली. ती तिच्या गार्डनमध्ये काही काम करत होती आणि ती ८० वर्षांपेक्षा जास्त दिसत होती. तिने मला पहिलं आणि बोलली, ‘‘बाळा इकडे ये, कुठं चालला आहेस? थोडा आराम कर आणि मग जा.’’ मी थोडा वेळ बसलो आणि तिला महात्मा गांधीजींचा फोटो असलेला शांती बॅनर दाखवला आणि ती मला सांगू लागली, ‘‘मी कधी या पवित्र आत्म्याला भेटू नाही शकली, ते माझ्या देशाचेसुद्धा नव्हते; पण जेव्हा मी त्यांच्या हत्येची बातमी ऐकली, तेव्हा मला रडू आलं.’’ ते ऐकून मीही भावनिक झालो. असा असामान्य माणूस मला आधी भेटला यात मी माझं भाग्य समजतो. मी जॉब सोडल्यावर नवीन काही शोधात होतो आणि त्या वेळेस माझी भेट डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याशी गांधी भवन, पुणे इथे झाली आणि त्यांच्यासोबतच्या दीड वर्षाच्या काळात मी गांधीजींच्या जवळ आलो. मला ते माझे मित्र वाटत, कारण त्यांची वाटचाल ही सत्याच्या शोधात होती आणि त्यांनी खूप सारे प्रयोग त्यासाठी केले होते. मी माझ्या पाच वर्षांच्या यात्रेत त्यांना अनुभवू लागलो, वेळोवेळी नवीन काहीतरी शिकू लागलो. माझा पाच वर्षांचा प्रवास संपला असला, तरी आंतरिक सत्याच्या शोधाचा प्रवास अखंड चालू राहणार आहे. आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, यानिमित्त मी त्यांना आज वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा देतो. भेटू पुढील भागात, आपल्या विश्वशांती प्रवासातील ‘पनामा’ या देशात.
(सदराचे लेखक जगभर भ्रमंती करणारे असून महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.