बदललेलं मेडेलिन शहर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

medellin city

कोलंबियातील कोटा या गावी भरलेला तीन दिवसांचा आध्यात्मिक मेळावा मला खूप काही शिकवणारा होता. नवीन मित्र मिळाले आणि शरीरात एका ऊर्जेचा संचार झाल्यासारखं वाटलं.

बदललेलं मेडेलिन शहर...

- एस. नितीन nonviolenceplanet@gmail.com

कोलंबियातील कोटा या गावी भरलेला तीन दिवसांचा आध्यात्मिक मेळावा मला खूप काही शिकवणारा होता. नवीन मित्र मिळाले आणि शरीरात एका ऊर्जेचा संचार झाल्यासारखं वाटलं. यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आध्यात्मिकता आणि धर्म यामधील अंतर आता मला स्पष्ट झालं होतं. अध्यात्म आणि धर्म यांचा अर्थ परदेशात थोडा वेगळा आहे. खूप लोक अध्यात्म आणि धर्म हे एकच आहेत असं मानतात; परंतु मला ते एक आहेत असं वाटत नाही. स्पिरिच्युॲलिटीसाठी भारतात वापरला जाणारा ‘अध्यात्म’ हा शब्द व रिलिजनला (धर्म) मी वापरू शकत नाही, कारण त्याचा अर्थ वेगळा आहे.

विशेष करून धर्म याचा अर्थ बुद्धिझममध्ये ‘वैश्विक कायदा आणि सुव्यवस्था’ किंवा त्याला आपण निसर्गाचा नियम म्हणू शकतो. धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती; धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरून आणता येत नाहीत, हे मूळचेच आपल्यामध्ये असतात.

उदाहरणार्थ अग्नी या तत्त्वाचा अंगभूत गुण - दाहकता. स्पिरिच्युॲलिटी हा शब्द लॅटिन भाषेतून आला. मुळात तो ख्रिश्चन रिलिजनमधून आला. जसं - होली स्पिरिट, म्हणजे भौतिक जीवांना जीवन देण्याचं महत्त्वपूर्ण पवित्र तत्त्व असा अर्थ होतो. स्पिरिच्युॲलिटी शब्दाचा वापर सुरुवातीच्या ख्रिश्चन रिलिजनमध्ये पवित्र स्पिरिटकडे केंद्रित जीवनाचा संदर्भ देण्यासाठी केला गेला. नंतर त्याचा अर्थ काळानुसार बदलत आहे, त्याची एक अशी व्याख्या नाही. मला स्पिरिच्युॲलिटीबद्दल समजलेली व्याख्या म्हणजे - ‘सत्याच्या जवळ जाण्यासाठी केला जाणारा विविध मार्गांचा प्रवास.’ सत्याचे मार्ग अनंत आहेत, त्यात जुने आपण अजमावू शकतो. जसं की, रिलिजनमधील काही जुने आणि नवीन मार्ग शोधून त्यावर चालू शकतो. महात्मा गांधी यांनी सत्याच्या जवळ जाण्याचा अहिंसा हा मार्ग निवडला, तसंच सोबत चालणं, ध्यान करणं, रोज सर्व धर्मांची प्रार्थना करणं याचीही जोड होती. महात्माजी सांगतात, ‘‘जर तुम्हाला स्वतःला शोधायचं असेल, तर इतरांच्या सेवेत स्वतःला हरवून जा.’’ हा एक स्पिरिच्युॲलिटीचा मार्ग आहे. माझं माझ्या शोधयात्रेतील पाहिलं पाऊल हे वयाच्या १७ व्या वर्षी पडलं. मी घर सोडून निघून गेलो होतो; पण दुसऱ्या दिवशी परत आलो होतो.

मला गौतम बुद्धांचा मार्ग आवडला. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रसंग, जेव्हा ते रात्री घर सोडून जातात - सत्याचा शोध घेण्यासाठी घर सोडावं लागतं, हे मला त्यातून समजलं.

या पाच वर्षांच्या यात्रेत मला खूप स्पिरिच्युअल लोक भेटले. ते सर्व मानवतावादी होते, ते जातिवादी आणि वंशवादी नव्हते; खूप प्रेमळ, खुल्या विचारांचे, सर्व धर्मांचा आदर करणारे आणि साहसी होते. दक्षिण अमेरिका हे स्पिरिच्युअल लोकांचं माहेरघर आहे. जगभरातून सत्यशोधक लोक इथे येतात आणि इथे जंगलामध्ये हजारो वर्षं वसलेल्या जमातींसोबत राहतात आणि आपल्या सत्याचा शोध घेतात. माझा मार्ग भटका होता, तो खूप अनिश्चिततेचा होता. प्रत्येक दिवस अद्‍भुत होता आणि बदलाचा होता. काल जो विचार केला, त्यात बदल करणारा होता. माझ्या मार्गात बदल हा कायम होता. रिलिजनमध्ये सहसा मार्ग बदलत नाहीत आणि बदल गुन्हा आहे असं अनेकांना वाटतं. विज्ञान हे बदलत जाणारं आहे आणि त्यामुळे ते सत्यापर्यंत पोहचू शकेल असं मला वाटतं.

माझ्या या विश्वयात्रेच्या प्रेरणा दोन आहेत, एक - सत्याच्या जवळ जाणं आणि दुसरी - महात्मा गांधीजींचे अहिंसेचे विचार लोकांसमोर मांडणं. कारण सत्याच्या जवळ जाण्यासाठी अजून किती वर्षं लागतील, माहीत नाही. तोपर्यंत माणूस या जगात राहिला पाहिजे आणि त्यासाठी अहिंसा हा विचार आवश्यक आहे, जेणेकरून तो स्वतःचा सर्वनाश करणार नाही. हे अहिंसेचे विचार कोलंबियामध्ये पसरावेत यासाठी माझे मित्र हरिवदन शहा यांची ‘फॉउंडेनसिया महात्मा गांधी’ ही संस्था मेडेलिन या शहरात काम करते. मेडेलिन हे शहर बोगोटानंतर कोलंबियातील दुसरं सर्वांत मोठं शहर आणि अँटिओक्विया विभागाची राजधानी. हे दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वताच्या मध्यवर्ती प्रदेशात, अबुरा व्हॅलीमध्ये आहे आणि २०१८ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २५ लाख होती.

हरिवदन शहा यांच्या तातडीच्या निमंत्रणामुळे मी बसने मेडेलिन शहरात गेलो. हे एक सुंदर असं शहर होतं. मोठमोठ्या उंच इमारती आणि शहराच्या सर्व बाजूला हिरवे डोंगर. हरिवदन आणि त्यांची पत्नी हसीत हे दोघे १९७५ मध्ये मेडेलिनला आले. एक व्यावसायिक म्हणून आले होते. २००२ मध्ये त्यांनी फॉउंडेनसिया महात्मा गांधी या संस्थेची स्थापना केली आणि शहरातील तरुण पिढीसमोर अहिंसेचे विचार मांडणं सुरू केलं. ते शांती पदयात्रा, शिबिरं, कला, व्याख्यानं यांच्या माध्यमातून गांधीविचारांचा तिथे प्रसार करतात.

अमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारीक्षेत्रात पाब्लो एस्कॉबर हे कुप्रसिद्ध नाव, कोलंबियाचं नाव जगात कुप्रसिद्ध आहे ते याच शहरामुळे.

पाब्लो हा मेडेलिन शहरावर राज्य करत होता. हे शहर हिंसेसाठी जगप्रसिद्ध होतं. जगभरातील खूप प्रवासी इथे पाब्लो एस्कॉबरचं घर पाहण्यासाठी येतात. इथे एक जागा आहे, तिचं नाव आहे डिस्ट्रिक्ट १३; ही लोकवस्ती एका टेकडीवर वसलेली आहे. या झोपडपट्टीतल्या गरीब युवकांना तेथील तस्करांनी आपल्या वर्चस्वाखाली घेतलं होतं. पाब्लो एस्कॉबर याने गरीब लोकांना खूप मदत केली, त्यामुळे तो या ‘डिस्ट्रिक्ट १३’मध्ये हिरो होता. पोलिसही इथे जाण्यासाठी घाबरत, कारण टेकडीवर जाण्यासाठी नीटसा रोड नाही, त्यामुळे चालत जाणं हाच एक पर्याय. त्यामुळे गुन्हेगार इथे आश्रयाला येत आणि खूप सारा हिंसाचार चाले. २०१८ मध्ये मी इथे गेलो होतो, आता मात्र चित्र बदलत आहे, हिंसा कमी होत आहे.

या ‘डिस्ट्रिक्ट १३’मध्ये एक खूप मोठा स्वयंचलित जिना (एस्कलेटर) जपानने बसवला आहे, जेणेकरून लोकांचा टेकडीवर जाण्याचा वेळ वाचेल. असा स्वयंचलित जिना आपण एखाद्या मॉलमध्ये पाहतो, तो या एका गरीब भागात आहे. याआधी असा एस्कलेटर हाँगकाँगमध्ये पाहिला, जो की जगातील सर्वांत लांब जिना आहे. या ‘डिस्ट्रिक्ट १३’मध्ये जगभरातील भित्तीचित्रकारांनी सर्व भिंतीचं रूपांतर सुंदर अशा चित्रांत केलं आहे. त्यांत शांती, प्रेम आणि विकास याचे संदेश आहेत. ही मोठ्या प्रमाणात असलेली चित्रं जगात अन्यत्र मला सापडली नाहीत आणि ती मोहक चित्रं पाहण्यासाठी जगभरातील लोक इथे येतात. या भिंतीवरसुद्धा आपले बापूजी हसत अहिंसेचा संदेश देत आहेत. भेटू पुढच्या भागात.

(सदराचे लेखक सायकलवरून जगभ्रमंती करणारे असून, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार करतात.)

टॅग्स :Colombiasaptarang