बिल्ला-रोशन गॅंग : 4 (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क
रविवार, 14 एप्रिल 2019

माझे एक वरिष्ठही तिथं पोचले होते. मी त्यांना सॅल्यूट केल्यावर त्यांनी अभिनंदनादाखल हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढं केला आणि एकदम झटका बसल्यासारखा त्यांनी हात लगेच मागंही घेतला. माझ्या हातांवर सगळीकडं काळ्या कोरड्या रक्ताचे डाग होते. त्यांनी मला हात धुऊन घ्यायला सांगितलं.

माझे एक वरिष्ठही तिथं पोचले होते. मी त्यांना सॅल्यूट केल्यावर त्यांनी अभिनंदनादाखल हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढं केला आणि एकदम झटका बसल्यासारखा त्यांनी हात लगेच मागंही घेतला. माझ्या हातांवर सगळीकडं काळ्या कोरड्या रक्ताचे डाग होते. त्यांनी मला हात धुऊन घ्यायला सांगितलं.

बेलापूरमधून आमच्या तावडीतून निसटून गेलेला बिल्ला इतक्‍या लवकर परतेल असं मला वाटलं नव्हतं. वैरोवालचे पोलिस ठाणं मुख्य रस्त्यावरच होतं. तिथं बाहेरच आम्ही एक सुरक्षा मोर्चा उभारला होता. एक सशस्त्र जवान तिथं चोवीस तास तैनात असायचा. शिवाय शेजारच्याच एका खोलीत आणखी आठ ते नऊ जवानांचं राखीव दलही असायचं. पोलिसांचं मनोधैर्य खच्ची व्हावं म्हणून त्या काळात दहशतवादी अनेकदा पोलिस ठाण्यांवर हल्ले करत असत. आम्हीही अनुभवातून शिकत असल्यानं आम्ही पोलिस ठाण्यातच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका कंपनीला मुख्यालयासाठी जागा दिली होती. वेळ पडल्यास सीआरपीएफचे जवानही मदतीला असल्यानं स्थानिक पोलिसांचं संख्याबळ आणि शस्त्रबळ वाढलं होतं. मी दोन्ही दलांतील जवानांच्या एकत्रित बैठका घेऊन जवानांशी बोलायचो. दोन्ही दलांमधील जवान कधी कधी एकत्र येऊन चहा-भजी यांचा आस्वादही घ्यायचे. त्यामुळे दोन्ही दलांमधील जवानांमध्ये उत्तम समन्वय निर्माण व्हायला मदत व्हायची. एकत्र ऑपरेशन्स करताना दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास असणं आवश्‍यक असतं. आमच्या या बैठकांमुळे हा विश्वास आणि समन्वय निर्माण व्हायला मदत व्हायची.
एका रात्री उशिरा एक पांढरी मारुती कार पोलिस स्टेशनजवळ येऊन थांबली. काही तरी धोका जाणवल्यानं सुरक्षा मोर्चावरच्या जवानानं इतरांना सावध केलं. अचानक त्या कारमधून चौकीच्या दिशेनं बेछूट गोळीबार सुरू झाला. सुरक्षा पिकेटमधल्या वाळूच्या पोत्यांआडून ड्यूटीवरच्या जवानानंही कारच्या दिशेनं गोळ्या झाडायला सुरवात केली. सीआरपीएफच्या जवानांनी दुसऱ्या बाजूनं गोळीबार सुरू केला. पोलिस ठाण्याच्या छतावरूनही एक एलएमजी धडधडू लागली. कारमधून गोळीबार करणाऱ्यांना इतका जोरदार प्रतिकार अपेक्षित नसावा. त्यांनी घाईघाईनं कारसह खडूरसाहिबच्या दिशेनं पळ काढला. मी सकाळी लवकरच पोलिस ठाण्यात पोचलो. पोलिसांच्या गोळ्यांच्या खुणा त्या कारवर सापडणार या विषयी मला अजिबात शंका नव्हती; पण प्रयत्न करूनही आम्हाला ती कार मिळाली नाही.

काही दिवसांनी या टोळीनं एका पुरातन मंदिरावर हल्ला केला; पण त्या वेळी मंदिरात फारशी गर्दी नसल्यानं मोठी दुर्घटनी टळली. तरीही एक जण त्या गोळीबारात जखमी झाला होता. त्यानंतर, एका धावत्या गाडीतून एका केशकर्तनालयावर गोळीबार झाला. या हल्ल्यात सुदैवानं कुणाला इजा झाली नाही. आणखी काही दिवस उलटल्यानंतर कॉंग्रेसच्या एका पुढाऱ्याच्या घराजवळ गोळीबार झाला; पण स्वत: त्या पुढाऱ्यानं आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या पीएसओनं उलट गोळीबार केल्यानं हल्लेखोर पळून गेले. एक चांगली बाब म्हणजे, दहशतवाद्यांकडून होणाऱ्या अशा हल्ल्यांना आता आमच्या यंत्रणेकडून प्रत्युत्तर मिळायला लागलं होतं. बिल्लाला आता प्रतिकार होऊ लागला होता.

दरम्यान, अटकेत असलेल्या अंग्रेजसिंगवर उपचार सुरू होते. अत्यंत गोपनीयता राखून आम्ही त्याच्याकडं विचारपूसही करत होतो. मीदेखील त्यासाठी पुष्कळ वेळ देत होतो. आमच्या तपासाबद्दल बाहेरच्या कुणालाच काही माहिती मिळणार नाही याची आम्ही दक्षता घेत होतो. आम्हाला खूप माहिती मिळत होती; पण आम्ही काहीच हालचाल करत नसल्यानं बिल्लाची गॅंगही गोंधळली असणार. आम्हाला कोणती माहिती मिळेल याचा अंदाज घेऊन गॅंग लपायला नवीन जागा शोधेल; पण आम्ही त्यांच्या जुन्या जागांवर छापे घातले नाहीत तर वाट पाहून ते पुन्हा जुन्या जागा वापरायला सुरवात करतील, याची मला कल्पना होती.

अंग्रेजसिंगला ज्या दिवशी तरणतारणला न्यायालयासमोर उभे करायचे होते, त्या दिवशी त्याला तेथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याच दिवशी तरणतारण परिसरात मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचं मी ठरवलं होते. त्या परिसरातल्या प्रत्येक रस्त्यावर तपासणी नाकी उभारणं, पेट्रोलिंग टीम्स तैनात करणं, तसेच पायी गस्त घालणाऱ्या वेगळ्या टीम्स तयार करून अंतर्गत भागांमधलं प्रत्येक फार्म हाऊस तपासण्याचं नियोजन होतं. मुख्य रस्त्यांवरील वाहनांना वेग कमी करायला भाग पाडणाऱ्या अडथळ्यांपाशी सशस्त्र जवानांचा मोठा बंदोबस्त असणार होता. शिवाय, बराच मोठा फौजफाटा राखीवही ठेवला होता. ही तयारी पूर्ण झाल्यावर सकाळी नऊ वाजता ऑपरेशन सुरू होईल, असं मी जाहीर केलं.

अंग्रेजसिंगला अमृतसरवरून तरणतारणला नेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र टीमकडं देण्यात आलेली होती. या टीमचं नेतृत्व एका डीएसपींकडं होतं. सकाळी 11 वाजता अंग्रेजसिंगला न्यायालयात हजर करायचं होतं. या टीमच्या ताफ्यातल्या तीनपैकी मधल्या वाहनात अंग्रेजसिंग असणार होता. या ताफ्यावर गोळीबार झाला तर त्यापासून बचाव व्हावा म्हणून तिन्ही वाहनांमध्ये सर्व बाजूंना वाळूची पोती रचलेली होती. पुढच्या आणि मागच्या गाड्यांवर एलएमजी बसवण्यात आल्या होत्या. पुढून किंवा मागून या ताफ्यावर हल्ला झाल्यास तो रोखण्यासाठी ताफ्याच्या पुढं आणि मागं मोटरसायकलस्वारांची सशस्त्र पथकं असणार होती. त्यांच्याकडं वायरलेस सेट्‌सही देण्यात आले होते. मी तरणतारणच्या बटालियन मुख्यालयात सकाळी साडेआठ वाजता जिल्हा पोलिस उपअधीक्षकांची बैठक घेऊन त्यांना थोडक्‍यात संपूर्ण योजना समजावून दिली. अंग्रेजसिंगला न्यायालयात आणताना हल्ला करून बिल्लाची गॅंग त्याला सोडवण्याचा प्रयत्न करेल असा माझा अंदाज होता. न्यायालयाच्या परिसरातल्या सुरक्षेचीही जबाबदारी आम्ही राखीव दलांकडं सोपवली. हल्ला झालाच तर हल्लेखोरांच्या गाड्यांना पिटाळत तरणतारणच्या बाहेर न्यायचं, अशी योजना होती. तिथं आमची शोधपथकं असणार होतीच. बिल्ला आमच्या सापळ्यात सापडण्याची शक्‍यता मोठी होती.

अंग्रेजसिंगला आम्ही कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर केलं. अचानक परिसरातल्या गल्ल्यांमधून एक पांढरी मारुती कार अत्यंत वेगात आमच्या दिशेनं येताना दिसली. कारमधून बेछूट गोळीबार सुरू होता. रस्त्यांवरच्या अडथळ्यांमुळे ते न्यायालयाच्या फार जवळ येऊ शकले नाहीत. आमच्या काही टीम्सनी लगेचच त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. बिल्लानं एका जोडरस्त्यावरून गाडी शेतात उतरवून दोन तपासणीनाकी टाळली; पण त्या दिवशी सगळीकडं आमचे जवान तैनात होते. मुसे गावाजवळ थोड्या अंतरावर बिल्लाची गाडी दिसेनाशी झाली. त्या परिसरात लहान -मोठी अशी जवळपास दहा फार्म हाउस होती. आम्ही तातडीनं दहा टीम तयार करून प्रत्येक फार्म हाउसची तपासणी सुरू केली.

एका डॉक्‍टरांच्या मालकीच्या फार्म हाउसकडं जात असताना आमच्या दिशेनं गोळीबार सुरू झाला. आम्हीही लगेच पोझिशन्स घेऊन प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली. बिल्ला आणि त्याचे तीन साथीदार फार्म हाउसच्या छतावरून गोळीबार करत होते. गोळीबार सुरू असतानाच आम्ही त्यांच्या दिशेनं काही ग्रेनेड फेकल्यावर त्यांच्याकडून होणारा गोळीबार काहीसा थंडावला. काही क्षणांत अचानक ती पांढरी मारुती वेगात बाहेर आली आणि कच्च्या रस्त्यावरून सरळ आमच्या दिशेनं येऊ लागली. चारही बाजूंनी घेरलेल्या फार्म हाउसमधून निसटण्याचा बिल्लाचा तो आत्मघातकी प्रयत्न होता. वेगानं आमच्या दिशेनं येणाऱ्या गाडीवर आम्ही गोळीबार करत असतानाच ती गाडी रस्ता सोडून बाजूच्या शेतात जाऊन दोन पलट्या खाऊन थांबली. गाडीचा चालक गोळाबारात जखमी झाला होता. उलटून पडलेल्या गाडीत चालकाच्या सीटशेजारी मला बिल्लाचा चेहरा दिसला. त्याच्या हातात एके -47 होती. त्यानं काही हालचाल करण्याआधीच माझ्या दोन गोळ्यांनी त्याला जायबंदी केलं. माझ्या बरोबरच्या अधिकाऱ्यांनीही गाडीतल्या तिघांवर गोळ्या झाडल्या. या झटापटीत कारचा दरवाजा उघडला गेला होता. मी बिल्लाचा हात धरून त्याला बाहेर खेचलं. दहशतवाद्यांकडून होणारा प्रतिकार आता थांबला होता. तिघंही जबर जखमी झाले होते. माझे हात रक्तानं भरून गेले होते. अचानक बिल्लानं डोळे उघडले आणि बाजूला पडलेली रायफल ओढण्याचा प्रयत्न केला; पण माझ्या आणखी एका गोळीनं त्याचा तो प्रयत्नही कायमचाच थांबवला. तिन्ही दहशतवादी संपल्याची आम्ही खात्री करून घेतली. आमच्या ग्रेनेडहल्ल्यात त्या फार्म हाउसच्या छतावरच चौथा दहशतवादी मारला गेला होता. बिल्ला आणि त्याची टोळी तरणतारणमधल्या मुसे या गावाजवळ झालेल्या चकमकीत मारली गेल्याचं आम्ही वायरलेसवर घोषित केलं.

लवकरच वरिष्ठ अधिकारी, राजकारणी नेते, प्रसारमाध्यमं आणि काही प्रमुख गावकऱ्यांनी मुसे गावाकडं धाव घेतली. बिल्ला खरंच संपलाय याची त्यांना खात्री करून घ्यायची होती. आम्ही रेकॉर्डसाठी चकमकीच्या जागेची छायाचित्रं काढून घेतली. माझे एक वरिष्ठही तिथं पोचले होते. मी त्यांना सॅल्यूट केल्यावर त्यांनी अभिनंदनादाखल हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढं केला आणि एकदम झटका बसल्यासारखा त्यांनी हात मागं घेतला. माझ्या हातांवर सगळीकडं काळ्या कोरड्या रक्ताचे डाग होते. त्यांनी मला हात धुऊन घ्यायला सांगितलं. "अजून खूप काम राहिलं आहे', असे मी नम्रपणे त्यांना सांगितलं. जागेवरचं सगळं काम पूर्ण झाल्यावर आम्ही तिन्ही मृतदेह तिथून हलवले. बिल्ला संपल्याचं एका पत्रकार परिषदेत काही वेळानं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं.

नंतर जवळच्या शेतातल्या एका ट्यूबवेलवर जाऊन मी हात-पाय, तोंड धुऊन फतेहबादच्या सीआरपीएफच्या बटालियन मुख्यालयात गेलो. मंदिरात पूजा करून आलेल्या काही जवानांनी पुढं केलेला प्रसादाचा पेढा मी घेतला खरा; पण मी तो खाऊ शकलो नाही. ऑपरेशन यशस्वी झाल्याचा आनंद जरूर होता, पण मनात जिंकल्याची भावना मात्र नव्हती.

("बिल्ला-रोशन गॅंग' ही लेखमालिका समाप्त)

(काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s s virk write in and out crime article in saptarang