'त्या' उंच माणसाच्या मागावर : 1 (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

मी आधीही एका असाधारण उंचीच्या गुन्हेगाराबद्दल वाचलं होतं. माझ्या आठवणीनुसार, त्या गुन्हेगाराच्या उंचीबद्दल मी माझी टिप्पणीदेखील लिहिलेली होती. माझ्या टिप्पणीसह पाठवलेला तो आधीचा रिपोर्ट माझ्याकडं परत पाठवायला मी संबंधित विभागाला सांगितलं.

ही गोष्ट आहे सन 2004 च्या मध्यातली. मी पंजाबच्या गुप्तचर विभागाचा अपर महासंचालक होतो. राजकारण, शेती, कामगार, उद्योगविश्व, संघटित गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतली, तसेच राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का देऊ शकेल अशा कोणत्याही विषयावरची माहिती गोळा करणं हा त्या वेळी माझ्या कामाचा मुख्य भाग होता. काही किरकोळ घटना वगळता पंजाबमधला दहशतवाद संपुष्टात आला होता. दहशतवादाच्या काळ्या छायेतून आम्ही बाहेर पडलो होतो. पंजाबमधली शेती आणि उद्योग-व्यवसाय पुन्हा बहरू लागला होता. दहशतवादानं त्याआधीचा जवळजवळ दोन दशकांचा काळ व्यापला होता. या काळात शिक्षण, विशेषतः ग्रामीण भागात, आरोग्यसुविधा, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा, औद्योगिक उत्पादन आणि एकूणच विकासाची कामं ठप्प झाली होती; पण दहशतवाद नावाचा एक मोठा अडथळा आम्ही पार केला होता. हिंसाचार, हत्या आणि अन्यायानं निर्माण केलेली पोकळी भेदून आम्ही येणाऱ्या पिढ्यांकरता आमच्या स्वप्नातला नवा पंजाब निर्माण करू शकू अशी एक नवी आशा, आत्मविश्वास आमच्यात निर्माण झाला होता.
माझ्या टेबलावरच्या एका पुस्तकातल्या उर्दू कवितेत त्या वेळची ती परिस्थिती अगदी योग्य शब्दांत मांडली होती ः
ज़िदगी के वास्ते जितने जहॉं बनते रहे।
वक्त के चेहरे पे उतने ही निशॉं बनते रहे।
रातभर बरसात ने छप्पर मेरा टपका किया
ज़हन में लेकिन मेरे कितने मकॉं बनते रहे।
आह भी कोई नही, फरयाद भी कोई नही
ज़ख्म लेकिन सब मेरे मेरी जुबॉं बनते रहे।
मुद्दतो से मेरे गुलशन का यही अहवाल है
बिजलियॉं गिरती रही पर आशियॉं बनते रहे।


पंजाबच्या एका पूर्ण पिढीनं खूप सहन केलं होतं; पण हळूहळू आता आम्ही त्यातून सावरत होतो. वादळानं भले आम्हाला उद्‌ध्वस्त केलं असेल; पण आम्ही आमची मुळे पुन्हा भक्कम करणार, आमची घरटी पुन्हा बांधणार यात काहीच शंका नव्हती.
मी अशा विचारांमध्ये गढलेला असतानाच, "सर, आजचे क्राईम रिपोर्टस' या शब्दांनी मला पुन्हा वर्तमानात आणलं. कार्यालयातल्या माझ्या सहाय्यकानं रोजच्याप्रमाणे माझ्या टेबलावर फाईल ठेवली होती. रोजच्या कामाचा भाग म्हणून माझ्यासमोर वेगवेगळे अनेक विषय येत असत; पण गुन्ह्यांचा तपास हाच माझा सगळ्यात आवडता विषय होता. खून, दरोडे, चोऱ्यामाऱ्या किंवा अगदी घरफोड्यांचा तपास हे मला नेहमीच एक आव्हान वाटत असे. म्हणूनच रोजच्या रोज वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती घेऊन माझ्यासमोर येणारे हे क्राईम रिपोर्टस्‌ मी वेळ देऊन अत्यंत बारकाईनं वाचत असे. पंजाबच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेले गुन्हे आणि बाहेरच्या राज्यांमध्ये घडलेले गुन्हे अशा दोन फायली मला रोज मिळायच्या. मी ती सगळी प्रकरणं अत्यंत बारकाईनं वाचत असे. बहुतेक वेळा नेहमीचेच गुन्हे असत. त्या दिवशी सकाळी बाबा बकाला शहरातल्या एका बॅंकेवरच्या दरोड्यानं माझं लक्ष वेधून घेतलं. क्राईम रिपोर्टमध्ये तसं नवीन काही नव्हतं. नेहमीच्याच पद्धतीनं माहिती भरलेली होती. बाबा बकाला शहरातल्या एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेत चार अनोळखी लोक घुसले. त्यातले दोनजण शीख होते आणि दोघांनी दाढी-मिश्‍या राखलेल्या होत्या. चौघांनीही चेहरे झाकून घेतले होते. बॅंकेतल्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांनी साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम पळवून नेली होती. पळून जाताना बॅंकेच्या बाहेरच्या कोलॅप्सेबल दाराला बाहेरून कुलूप लावून, कर्मचाऱ्यांना आतच कोंडून ते स्कूटरवरून पसार झाले होते. चार गुन्हेगारांपैकी एका शीख व्यक्तीची उंची नजरेत भरण्यासारखी होती. माझ्या समोर आलेल्या रिपोर्टनुसार ही व्यक्ती जवळपास सहा फूट तीन इंच उंच आणि अंगापिंडानं चांगली धष्टपुष्ट होती. नेहमीप्रमाणे फेटा न बांधता त्यांनी डोक्‍याला मफलरसारखं काहीतरी गुंडाळलं होतं. बॅंकेतला रखवालदार रजेवर होता. बॅंकेतल्या कर्मचाऱ्यांकडून प्रतिकार न झाल्यानं गुन्हेगारांनी काही हिंसाचार केला नव्हता. "पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तर गोळ्या घालू' अशी धमकी दरोडेखोरांनी दिल्यानं तसाही प्रयत्न कुणी केला नव्हता.

बॅंकेतल्या रकमेचा विमा उतरवलेला असतो, त्यामुळे अशा घटनांमध्ये क्वचितच प्रतिकार होतो. तसा तो इथंही झाला नव्हता; पण एका उल्लेखानं माझं लक्ष वेधून घेतलं. अशाच प्रकारच्या गुन्ह्यांविषयीच्या क्राईम रिपोर्टमध्ये मी आधीही एका असाधारण उंचीच्या गुन्हेगाराबद्दल वाचलं होतं. माझ्या आठवणीनुसार, त्या गुन्हेगाराच्या उंचीबद्दल मी माझी टिप्पणीदेखील लिहिलेली होती. माझ्या टिप्पणीसह पाठवलेला तो आधीचा रिपोर्ट माझ्याकडं परत पाठवायला मी संबंधित विभागाला सांगितलं. जंडियाला शहराच्या परिसरातल्या एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेवर साधारणतः सहा आठवड्यांपूर्वी अशाच प्रकारे पडलेल्या दरोड्याबद्दलचा तो रिपोर्ट होता.

गुन्हेगारांनी जंडियालामध्येही तशाच पद्धतीनं दरोडा घातला होता. बाबा बकालाप्रमाणेच ही बॅंकही फारशी वर्दळ नसलेल्या परिसरात होती. ही घटनाही सकाळी साडेअकराच्या आसपास घडली होती. बॅंकेच्या रखवालदाराला काही किरकोळ कामासाठी इकडं तिकडं पाठवलेलं असताना चेहरे झाकलेले चार गुन्हेगार हातात पिस्तुलं घेऊन बॅंकेत शिरले. तिघांनी आत जाऊन कर्मचाऱ्यांना आणि बॅंकग्राहकांना धमकावून पैसे मागितले आणि त्यांचा चौथा साथीदार बाहेर उभा राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होता. त्यांनी बॅंकेच्या स्ट्रॉंगरूमच्या किल्ल्या मागितल्या नाहीत. या शाखेत स्ट्रॉंगरूम नव्हती हे बहुधा त्यांना माहीत असावं. अत्यंत वेगानं आपला कार्यभाग साधून, बाहेर पाठवलेला रखवालदार परत यायच्या आत बॅंकेच्या मुख्य दाराला कुलूप ठोकून ते पसार झाले होते. रखवालदार परत आल्यानंतर कुलूप तोडून त्याला आत जावं लागलं होतं.

क्राईम रिपोर्टमध्ये लिहिल्यानुसार, गुन्हेगारांपैकी दाढी-मिश्‍या राखलेल्या दोघांपैकी एक जण साधारणतः पाच फूट, सात इंच उंचीचा, सडपातळ असा होता. त्यांच्या दुसऱ्या मध्यम बांध्याच्या साथीदाराची उंची पाच फूट, दहा इंचांच्या आसपास होती. बॅंकेबाहेर उभा राहणारा गुन्हेगार साधारण तेवढाच उंच, बळकट बांध्याचा होता. त्यानं फिकट रंगाचा फेटा बांधला होता. सहा फूट, तीन इंच उंचीच्या गुन्हेगाराचे कपडे त्यातल्या त्यात बरे असायचे. जंडियाला आणि आता बाबा बकालामध्ये घडलेल्या गुन्ह्यांमधल्या गुन्हेगारांची वर्णनं जुळत होती. जंडियालाच्या दरोड्याच्या वेळी या उंच माणसानं फेटा बांधला होता आणि बाबा बकालामध्ये त्यानं डोक्‍याला मफलर गुंडाळली होती इतकाच फरक होता. मात्र, दोन्ही ठिकाणी चेहरा झाकलेला असल्यानं त्याची चेहरेपट्टी कशी होती ते मात्र समजलेलं नव्हतं; पण हा सहा फूट, तीन इंच उंचीचा, अंगापिडानं चांगला धडधाकट शीख इसम या बॅंकदरोड्यांच्या प्रकरणातला आमच्या हाताला लागलेला महत्त्वाचा दुवा होता. बाबा बकालातील आमच्या अधिकाऱ्यांना मी त्या सर्व गुन्हेगारांबद्दल शक्‍य तेवढी सगळी माहिती काढायला सांगितली. त्यांच्या हालचाली, आपापसात आणि बॅंकेतल्या लोकांशी बोलण्याची पद्धत वगैरे...पण त्यातून फार काही हाताला लागलं नाही. दोन्ही ठिकाणी गुन्हेगार बॅंकेच्या रखवालदारावर लक्ष ठेवून होते आणि रखवालदार जागेवर नाही हे पाहूनच त्यांनी दरोडे घातले होते. त्यांनी कशालाही स्पर्श न केल्यानं त्यांच्या बोटांचे ठसेही कुठं सापडले नव्हते.

बॅंकांवर एकामागोमाग पडलेले दरोडे, ज्या पद्धतीनं दरोडे पडत होते त्यातल्या समान बाबी, दोन्ही प्रकरणांत एका उंच व्यक्तीचा सहभाग असे काही मुद्दे मी एकत्र केले. या दोन्ही प्रकरणांमध्ये यशस्वी झाल्यानं ते असे आणखी काही गुन्हे करण्याचा प्रयत्न करतील असा माझा अंदाज होता. या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्या दिवशी दुपारी मी एक मीटिंग बोलावली. आम्ही पाच-सहा अधिकाऱ्यांनी एकत्र बसून त्या गुन्हेगारांना पकडण्याविषयी आणि आणखी असे गुन्हे घडण्याच्या शक्‍यता रोखण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. ती टोळी, त्यांची दरोडे घालायची पद्धत याचा अभ्यास करून त्यांना लवकरात लवकर पकडणं गरजेचं होतं.
आमची ही चर्चा खूप उपयोगी ठरली. कारण, अशी एक टोळी अस्तित्वात आहे आणि ती बॅंकांवर दरोडे घालत आहे हे आवश्‍यक त्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचलं. दोन दरोडे यशस्वी झाल्यानं ही टोळी असाच आणखी प्रयत्न करणार याविषयी निदान माझ्या मनात काही शंका नव्हती. चर्चेदरम्यान आम्ही काही गोष्टी ठरवल्या. त्या अशा ः सुरवातीला वर्ष सन 2000 पासून बॅंकांवर पडलेल्या दरोड्यांची एकत्र यादी करायची...त्यातही ज्या दरोड्यांमध्ये एका उंच व्यक्तीचा हात होता, त्या प्रकरणांची वेगळी यादी करायची...या दोन्ही याद्यांचा अभ्यास करून काही ठिकाणी सापळे रचता येतील का किंवा गुन्हे घडणार नाहीत असे काही उपाय करता येतील का यावर विचार करायचा...या सगळ्या गुन्ह्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या तपासात समन्वय ठेवण्यासाठी एक विशेष कृती दल तयार करण्यात आलं. या विशेष दलातल्या अधिकाऱ्यांनी अशा सगळ्या गुन्ह्यांबद्दल माझ्याशी चर्चा करायची असंही ठरले. सगळ्या जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून अशा प्रकारे होणाऱ्या गुन्ह्यांबाबत बॅंकांना सावधगिरीच्या सूचना देण्याचाही निर्णय झाला. या टोळीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी "मोडस ऑपरेंडी ब्यूरो'ची म्हणजे गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीच्या नोंदी ठेवणाऱ्या विभागाची मदत घ्यायची... कारण, काही जुन्या गुन्हेगारांनी एकत्र येऊनही हे दरोडे घालायला सुरवात केली असण्याची शक्‍यताही नाकारता येत नव्हती. याशिवाय, अशा प्रकारच्या गुन्ह्यांत सहभागी असणाऱ्या उंच गुन्हेगारांची यादी करून त्यांना शोधून काढायचं आणि या दरोड्यांशी त्यांचा काही संबंध होता का याचीही खात्री करून घ्यायची...असं ठरलं.
दोन-तीन दिवसांत आवश्‍यक ती सगळी माहिती गोळी झाली. त्यातून आणखीच रोचक माहिती समोर आली. उंच दरोडेखोराची ही टोळी पहिल्यांदा रिपोर्ट झाली होती ती सन 2000 मध्ये. त्या वेळी त्या टोळीनं अमृतसर जिल्ह्यातल्या एका खेड्यातल्या सहकारी बॅंकेतून पन्नास ते साठ हजार रुपये लुटून नेले होते. असेच आणखी एक दोन दरोडे घातल्यानंतर बहुधा त्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडं मोहरा वळवला होता. त्यांच्या दोन दरोड्यामध्ये साधारणतः तीन ते चार महिन्यांचं अंतर असायचं. या सगळ्या माहितीतून पुढं आलेले आणखी काही मुद्दे महत्त्वाचे होते. एक ः आत्तापर्यंत या टोळीनं नऊ बॅंकांवर दरोडे घातले होते. दोन ः सुरवातीला ते खेड्यांमधल्या सहकारी बॅंकांमधून लहान रकमा चोरत असत. तीन ः मग ते शहरांमधल्या राष्ट्रीयीकृत बॅंकाकडं वळले. या बॅंकांमधून प्रत्येक वेळी त्यांनी काही लाख रुपये लुटून नेले होते. चार ः ते साधारणपणे बॅंकेच्या स्ट्रॉंगरूम असणाऱ्या शाखांची निवड करायचे. कारण, तिथं त्यांना एकदम मोठी रक्कम मिळण्याची शक्‍यता असायची. पाच ः तीन प्रकरणं वगळता या दरोडेखोरांनी कुठं हिंसाचार केला नव्हता; पण तीन घटनांमध्ये मात्र त्यांनी तीन खून केले होते. एके ठिकाणी टोळीतल्या एकाला रखवालदार थेट भिडला होता, त्या प्रसंगी रखवालदाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या ठिकाणी दरोडेखोरांनी पाठलाग करणाऱ्या रखवालदारावर गोळीबार केला होता. तिसऱ्या प्रकरणात मात्र काहीही प्रतिकार झाला नसतानाही दरोडेखोरांनी बॅंकेच्या मॅनेजरलाच ठार मारलं होतं. सहा ः काही ठिकाणी त्यांनी चेहरे झाकलेले नव्हते म्हणून त्यांच्या चेहऱ्यांची थोडीफार वर्णनं आम्हाला मिळाली; पण त्यांची ओळख पटवायला ती वर्णनं पुरेशी नव्हती. सात ः ही टोळी शहरी भागांतल्या बॅंकांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही आमच्याकडं जमा झालेल्या माहितीवरून दिसत होतं. मग आम्ही सगळ्या जिल्ह्यांमधल्या आमच्या यंत्रणांना सावध राहण्यास सांगितलं आणि असे प्रकार रोखण्याकरता काय करता येईल याविषयीही काही सूचना दिल्या. आठ ः अमृतसर आणि जालंधर पट्ट्यातल्या ग्रॅंड ट्रंक (जीटी) रोडच्या आसपासच्या भागातल्या बॅंका हे त्यांचं विशेषकरून लक्ष्य होतं.

या टोळीला रोखण्याचे, पकडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी आणखी दोन दरोडे घातले. कपूरथळा जिल्ह्यातल्या भोलत्थला इथं एक आणि दुसरा जालंधरमधल्या कर्तारपूरच्या एका बॅंकेवर. दोन्ही बॅंका जीटी रोडच्या परिसरात होत्या, दोन्ही बॅंकांमध्ये स्ट्रॉंग रूम होत्या; पण त्या उघडण्याइतका वेळ दरोडेखोरांना मिळाला नाही. मात्र, त्यांच्या एकंदर हालचालींवरून ते शहराच्या दिशेनं सरकत आहेत आणि आणखी मोठी रक्कम लुटण्याचा त्यांचा बेत आहे हे दिसत होतं. जालंधर किंवा कपूरथळा जिल्ह्यातली एखादी बॅंक हे त्यांचे पुढचं लक्ष्य असणार असं मला वाटत होते. दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिसप्रमुखांना आम्ही हे कळवलं आणि त्यांच्या जिल्ह्यांमधल्या सर्व पोलिस ठाण्यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यास सांगितलं.
(पूर्वार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com