त्या उंच माणसाच्या मागावर : 2 (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क
रविवार, 28 एप्रिल 2019

सगळा तपास यशस्वीपणे करणाऱ्या टीमला शाबासकी देण्यासाठी मीही जालंधरला गेलो असताना, त्या टोळीच्या म्होरक्‍याला भेटावं, असं माझ्या मनात आलं. इतक्‍या सुस्थितीतला माणूस गुन्ह्यांच्या वाटेवर का गेला असेल, हे मला जाणून घ्यायचं होतं...

सगळा तपास यशस्वीपणे करणाऱ्या टीमला शाबासकी देण्यासाठी मीही जालंधरला गेलो असताना, त्या टोळीच्या म्होरक्‍याला भेटावं, असं माझ्या मनात आलं. इतक्‍या सुस्थितीतला माणूस गुन्ह्यांच्या वाटेवर का गेला असेल, हे मला जाणून घ्यायचं होतं...

जालंधर हे पंजाब पोलिसांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं केंद्र होतं. पंजाब पोलिसांच्या तीनपैकी एका झोनचं मुख्यालय जालंधरला होतं. त्याशिवाय त्या रेंजचं आणि जिल्ह्याचं मुख्यालयही तिथंच असल्यानं झोनल आयजी, रेंज डीआयजी आणि वरिष्ठ एसपींची कार्यालयं तिथं होती. पंजाब सशस्त्र पोलिस दलाचं मुख्यालयही तिथंच होतं. जालंधर शहराच्या आसपासच्या एखाद्या बॅंकेवर दरोडा पडण्याची शक्‍यता आणि त्या दरोड्यात एका तगड्या, उंच व्यक्तीचा सहभाग याविषयी मी स्वतः आयजी, डीआयजी आणि वरिष्ठ एसपींना फोन करून कल्पना दिली होती. अन्य अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनाही बॅंक लुटारूंच्या या टोळीबद्दल माहिती देऊन दक्ष करावं, बॅंकांनाही सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा अलार्म बसवण्याविषयी सूचना द्याव्यात असं सुचवलं होतं.

अशा एखाद्या घटनेला तोंड द्यायला ते सज्ज आहेत, असं या सगळ्या अधिकाऱ्यांकडून मला सांगण्यात आलं. जालंधर शहरातली एखादी बॅंक या टोळीचं पुढचं लक्ष्य असणार असा माझा अंदाज असल्यानं मी अन्य अधिकाऱ्यांनाही सावध केलं होतं. तुमचा अनुभव आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांच्या विश्‍लेषणाचा दीर्घ काळाचा अभ्यास यावरून असं काही तर्क करता येतात. अर्थात, गुन्हे होण्याच्या शक्‍यतेचे अंदाज बांधण्याची क्षमता विकसित व्हायला काही दशकांचा अनुभव असावा लागतो. आणि एके दिवशी माझी भीती ही खरी ठरली.

त्या दिवशी सकाळी जालंधरमधल्या ओव्हरसीज बॅंकेच्या शाखेत चेहरे झाकलेले चार पिस्तूलधारी इसम शिरले. दहा-बारा कर्मचारी आणि कामानिमित्त आलेले सात किंवा आठ ग्राहक सोडता बॅंकेत फार गर्दी नव्हती. बॅंक लुटारूंचा म्होरक्‍या असणाऱ्या त्या उंच शीख व्यक्तीनं जरबेच्या आवाजात धमकावून सगळ्यांना गप्प राहण्यास बजावलं. "कुणी मध्ये पडलं तर ठार करू,' अशी धमकीही दिली. बॅंकेच्या मॅनेजरनं अलार्मचं बटण दाबायचा प्रयत्न केला; पण अलार्म वाजलाच नाही. त्याची ही धडपड पाहून लुटारूंपैकी एकानं मॅनेजरला जोरदार थप्पड मारून गप्प बसण्यास सांगितलं. या खेपेला बॅंकेत शिरलेल्या चारजणांशिवाय आणखी दोघं बॅंकेबाहेर पहारा देत होते. त्या उंच दरोडेखोरानं मॅनेजरला दमदाटी करत स्ट्रॉंगरूमच्या किल्ल्या मागितल्या आणि त्यांच्याबरोबर येऊन स्ट्रॉंगरूम उघडून देण्यास फर्मावलं. मॅनेजरकडं आता आणखी काही पर्याय नव्हता. त्यानं स्ट्रॉंगरूम उघडून दिली. बॅंकेतल्या सगळ्यांना मानही वर न करण्याची धमकी देऊन दरोडेखोर स्ट्रॉंगरूममध्ये शिरले. तोपर्यंत त्यातल्या दोघांनी बाहेरून कॅनव्हासच्या दोन मोठ्या बॅगा आणल्या. स्ट्रॉंगरूममध्ये असलेली रक्कम त्या बॅगांत भरायला त्यांना पाचेक मिनिटं लागली. तेवढ्या वेळात अन्य दोघांनी बॅंकेतल्या लोकांकडचे पैसे, घड्याळं, अंगठ्या आणि इतर दागिने काढून घेतले. कुणी पोलिसांना किंवा आणखी कुणाला फोन करू नये म्हणून त्यांनी सगळ्यांचे मोबाईल फोनही घेऊन त्यातली सिमकार्डस काढून घेतली होती. रोख रक्कम, दागिने वगैरे लुटून पळून जाताना त्यांनी बॅंकेच्या रखवालदाराकडची बंदूकही बाहेर नेली. रखवालदारावर हल्ला करून त्यांनी आधीच त्याला बांधून ठेवलं होतं. बाहेरच्या कोलॅप्सेबल दाराला कुलूप लावून पळ काढण्याआधी त्यांनी सगळ्या लोकांना एकत्र करून स्ट्रॉंगरूममध्ये आणि शेजारच्या आणखी एका खोलीत बंद केलं. आवाज केल्यास गोळ्या घालण्याची धमकीही दिली. खोलीत कोंडल्यानं आता आतल्या लोकांनी मदतीसाठी आरडाओरडा करूनही फारसा काही उपयोग झाला नसता. आपला कार्यभाग साधून दरोडेखोर पसार झाल्यानंतर जवळपास पंधराएक मिनिटांनी कुणीतरी बॅंकेत कामासाठी आल्यानं हा दरोडा उघडकीस आला.

थोड्याच वेळात जवळच्या पोलिस ठाण्यातले अधिकारी तिथं पोचले. पाठोपाठ वरिष्ठ एसपी, आयजी, डीआयजी सगळेच पोचले. असं काही होणार याची कल्पना असूनही ही घटना रोखण्यास त्यांना अपयश आलं होतं. माझ्याशी फोनवर बोलताना त्यांनी ते मान्यही केलं होतं. त्या परिस्थितीत मी त्यांना दुसरा उपलब्ध पर्याय दिला ः गुन्ह्याचा तपास करून गुन्हेगारांना पकडण्याचा. जवळपासच्या सगळ्या पोलिस ठाण्यांना संदेश दिले गेले. त्यांनीही रस्त्यारस्त्यावर नाकेबंदी केली. वाहनं थांबवून तपासणी सुरू केली; पण इतकं सगळं करून, इतके अधिकारी असूनही आमच्या हाती काहीच लागलं नाही.

दरम्यान, मी बॅंकेत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. गुन्ह्याच्या जागी बारकाईनं तपास करण्याच्या सूचना मी त्यांना दिल्या. कायदा व सुव्यवस्था शाखेच्या अपर महासंचालकांनाही मी जालंधरला जाऊन तपासावर लक्ष देण्यास सांगितलं. या वेळी एक मोठा दुवा आमच्या हाती लागला होता ः दोघां गुन्हेगारांच्या हाताचे ठसे. बॅंकेत सगळा गोंधळ सुरू असताना टोळीतल्या दोघांनी पाणी प्यायलं होतं. पाण्याच्या त्या ग्लासांवर त्यांच्या हातांचे आणि बोटांचे ठसे स्पष्ट उमटलेले होते. आमच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. त्यांच्या नावावर आधी काही गुन्हे असतील तर त्यांच्या हाताचे ठसे आमच्या रेकॉर्डला असते आणि त्यावरून त्यांना शोधणं शक्‍य झालं असतं. आमची फॉरेन्सिक टीम त्यावर काम करत होती. डीएसपी करमजितसिंग आणि आणखी दोघा उपनिरीक्षकांना या तपासात सहभागी करून घेण्याबद्दल मी आयजींना सांगितलं. हे तिघंही जालंधरमध्येच नियुक्त होते. करमजितसिंग यांनी आधीही माझ्याबरोबर काम केलं होतं. एखाद्या गुन्ह्याचा शोध घेणं हे एखादं उत्तम चित्र काढण्यासारखं असतं. सुरवातीला तुमच्यासमोर फक्त एक कोरा कॅनव्हास असतो, मग त्यावर तुम्ही एक आकार रेखाटता, तपासाचे काही निकष तयार करता आणि चित्र पुरं व्हायला लागतं. त्याविषयी आपण नंतर केव्हातरी चर्चा करू...पण करमजितसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडं गुन्ह्यांच्या तपासाचं एक विशेष कौशल्य होतं आणि त्यासाठी परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असायची. दृढनिश्‍चय, परिश्रम आणि शोधक वृत्ती...एखाद्या चांगल्या डिटेक्‍टिव्हकडं असायला हवेत ते सगळे गुण त्यांच्याकडं होते.

बॅंकेच्या परिसरात शोधाशोध करताना एका कोपऱ्यात करमजितसिंगना एक शर्ट सापडला होता. तो बाहेरच्या कुणाचा तरी असणार. कारण, बॅंकेतल्या कुणीही त्यावर मालकी सांगितली नाही. दरोडेखोरांनी बॅंकेतल्या सगळ्यांना "माना वर केल्या तर गोळ्या घालू' अशी धमकी दिल्यानं त्यांच्यापैकी कुणी आम्हाला फारशी माहितीही देऊ शकलं नव्हते. मी आयजींना त्या शर्टाचा आणखी तपास करण्यास सांगितलं. शर्ट ब्रॅंडेड नव्हता; पण त्यावर "कलामंदिर' या प्रसिद्ध दुकानाच्या नावाचं लेबल होतं. लेबलवर कोणत्या विशिष्ट शहराचा उल्लेख नव्हता; पण जालंधरमध्ये एक कलामंदिर होतं. आम्ही लगेचच त्या दुकानाशी संपर्क साधला. ते लेबल त्यांचं नव्हतं; पण "जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात एक तरी कलामंदिर आहे', अशी माहिती आम्हाला त्यांच्याकडून मिळाली. मी आमच्या टीमच्या संपर्कात होतो. तपासाची प्रगती कुठवर आली आहे, याची माहिती घेत होतो.

बॅंकेतून दरोडेखोरांनी 65 लाख 68 हजार एवढी प्रचंड रक्कम लुटल्याचं बॅंकेच्या ऑडिट टीमनं सांगितलं. गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला नेमका आकडा लागणार होता. भर शहरात दरोडा पडल्यानं दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत, या दरोड्यांवरून आमच्यावर जोरदार टीका होणार अशी माझी अटकळ होती. आमचे प्रयत्न सुरूच होते. बॅंकेत सापडलेले हाताचे ठसे आमच्या रेकॉर्डवरच्या कुणाही गुन्हेगाराच्या हाताच्या ठशांशी जुळत नव्हते. एकदम माझ्या मनात एक कल्पना चमकली. मी डीएसपी करमजितसिंगना फोन करून बॅंकेच्या आवारात सापडलेल्या त्या शर्टाचा आकार पुन्हा तपासायला सांगितला. तो शर्ट बऱ्यापैकी मोठा, 44-46 साईझचा, असावा असं त्यांनी मला सांगितलं. तो नक्कीच त्या टोळीतल्या उंच, धिप्पाड शीख व्यक्तीचा असणार. मला आणखी एक कल्पना सुचली. शर्ट शिवणारे लोक शर्ट शिवून झाल्यावर मग शर्टांवर दुकानाच्या नावाची लेबल्स लावत असतात. ती लेबल्स कुणीतरी तिसराच माणूस बनवत असतो. शर्ट कुणी शिवला हे शोधण्यापेक्षा लेबल्स कुणी बनवली हे शोधणं सोपं होतं. कारण, लेबल्स बनवणाऱ्यांची संख्या कमी असणार. मी डीएसपी करमजितसिंगना जालंधरमधल्या अशी लेबल्स बनवणाऱ्यांची माहिती मिळवायला सांगितली. लेबलवरून त्या रहस्यमय शर्टाच्या मालकापर्यंत पोचण्याचा आमचा बेत होता. करमजितसिंग यांनी थोड्याच वेळात काही
लेबलनिर्मात्यांची नावं मिळवली. त्यातला पहिला पत्ता होता जालंधर शहरातल्या बूटां मंडी परिसरातल्या अशोककुमारचा. दाट वस्तीच्या बूटां मंडीतल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हा अशोककुमार लेबल्स बनवत असे. करमजितसिंग आणि त्यांचे सहकारी त्याला भेटायला गेले तेव्हा अशोककुमार एका छोट्या गच्चीत सगळा जामानिमा मांडून हातात ग्लास घेऊन बसला होता. आपल्याला पोलिस ठाण्यात बोलवायच्याऐवजी एक बडा पोलिस अधिकारी आपल्याला भेटायला तीन मजले चढून आल्याचा त्याला साश्‍चर्य आनंद झाला होता. "काम जरा गोपनीय स्वरूपाचं आहे. फक्त तुम्हीच मला याबाबत मदत करू शकता,' असं सांगत करमजितसिंग यांनी त्याला ते लेबल दाखवलं आणि हे कुठं तयार झालं असेल, याची विचारणा केली. त्या दिवशी परमेश्वर आमच्यावर नक्कीच प्रसन्न असणार. कारण लेबल पाहिल्या पाहिल्या अशोककुमारनं ते ओळखलं आणि म्हणाला ः 'सर, हे मीच तयार केलं आहे, बटालातल्या "कलामंदिर'साठी.''

दोन वर्षांपूर्वी अशी साडेतीन हजार लेबल्स तयार करून दिल्याचं त्यानं आमच्या टीमला सांगितलं. अत्यंत अनपेक्षितपणे एक मोठा दुवा आमच्या हाती लागला होता.
अशोककुमारकडून मिळालेली माहिती करमजितसिंग यांच्याकडून मला समजली तेव्हा रात्रीचे आठ वाजत होते. वेळ न दवडता बटालाला जायला मी त्यांना सांगितलं. जालंधरपासून बटाला साधारणतः अडीच तासांच्या अंतरावर आहे. लगेचच मी बटालाच्या वरिष्ठ एसपींना फोन करून "जालंधरची टीम येईपर्यंत दुकानाच्या मालकाला थांबवून ठेवा' असं सांगितलं. आम्ही अत्यंत गोपनीय पद्धतीनं हा सगळा तपास करत होतो. रात्री साधारणतः साडेदहाच्या सुमारास डीएसपी करमजितसिंग त्या दुकानात पोचले. दुकानाच्या मालकानं शर्ट पाहिल्यावर तो आपल्याच दुकानातून शिवून घेतल्याचं सांगितलं. जुनं रजिस्टर पाहिल्यावर त्यात त्या शर्टाच्या कापडाचा नमुनाही मिळाला.

रणजितसिंग नावाच्या एका प्रतिष्ठित श्रीमंत माणसानं तो शर्ट दोन वर्षांपूर्वी शिवून घेतला होता. पन्नास-साठ एकर जमिनीचा मालक असलेला रणजितसिंग हा बटाला पोलिस ठाण्याच्या जवळच एका मोठ्या हवेलीत राहत होता. रणजितसिंग दिसायला एकदम रुबाबदार, धिप्पाड आहे आणि त्याची उंची सहा फूट, तीन इंचांच्या आसपास आहे, अशीही माहिती आमच्या टीमला मिळाली. माहिती घेऊन, दुकानमालकाचे आभार मानून आमची टीम तिथून बाहेर पडली. आता आमच्या हातात एका संशयिताचं नाव आणि पत्ता होता. त्याला आता ताब्यात घ्यायचं होतं.
डीएसपी करमजिसिंग यांना मी बटाला पोलिसांची मदत घेऊन रणजितसिंगला दिवस उजाडण्यापूर्वीच ताब्यात घेण्यास सांगितलं. पहाटे पाचच्या सुमारास रणजितसिंगला ताब्यात घेतल्याचं करमजितसिंग यांनी मला फोनवर सांगितलं. आमच्या टीमनी त्याचा मोबाईल फोन जप्त करून त्याच्या घराची झडतीही घेतली होती. घरात काही सापडलं नाही; पण मोबाईल फोनमध्ये बरीच माहिती मिळाली. चौकशीत आपण आदल्या दिवशी जालंधरला गेल्याचं त्यानं नाकारलं. रणजितसिंगला रीतसर अटक करून जालंधरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा हुकूम दिला. तो त्या दिवशी जालंधरला आला होता हे त्याच्या कॉल रेकॉर्डवरून दिसत असल्याचं दाखवल्यावर, एका लग्नासाठी जालंधरला आल्याचं त्यानं कबूल केलं; पण त्या लग्नाबाबत तो काहीच माहिती देऊ शकला नाही. अधिक चौकशी केल्यावर त्यानं त्याची टोळी असल्याची आणि बॅंकांवर घातलेल्या दरोड्यांची कबुली दिली. जालंधरमध्ये आदल्या दिवशीचा दरोडा घातल्याचंही त्यानं कबूल केलं.

त्याच्याकडून त्याच्या साथीदारांची नावं, पत्ते मिळाल्यावर त्यांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथकं पाठवण्यात आली. अजय पाल नावाचा एक साथीदार वगळता इतरांना चार वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक करण्यात आली. या अजय पालच्या फार्महाउसमध्ये लुटीची रक्कम लपवून ठेवल्याचं रणजितसिंगनं आम्हाला सांगितले होतं. त्याच दिवशी संध्याकाळी आमची एक टीम नूरपूर गावाजवळच्या अजय पालच्या फार्महाउसच्या परिसरातल्या शेतात दबा धरून बसली. अंधार पडल्यावर दोन स्कूटरवर चारजण फार्महाउसकडं आले. शेतात दबा धरून बसलेल्या आमच्या टीमनं फार्महाउसवर छापा घातला तेव्हा ते चौघं त्यांच्याकडच्या पोत्यांमध्ये पैसे भरत होते. जालंधरमधल्या बॅंकेतून लुटलेले 65 लाख 86 हजार आणि आधीच्या दरोड्यातले सुमारे 20 लाख रुपये अशी रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. चार पिस्तुलंही जप्त करण्यात आली. आमच्या टीमनं एकूण आठ जणांना या दरोडाप्रकरणात अटक केली.

जालंधरमधल्या बॅंकेवरच्या दरोड्याचा तपास लागल्याचं दुसऱ्या दिवशी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं. गेल्या चार वर्षांतल्या बॅंकावरच्या दरोड्यांचा तपास लागल्यानं आणि जालंधरच्या बॅंकेतून लुटलेले सर्वच्या सर्व 65 लाख 86 हजार रुपये परत मिळाल्यानं पोलिसांची प्रशंसा होत होती. हा सगळा तपास यशस्वीपणे करणाऱ्या टीमला शाबासकी देण्यासाठी मीही जालंधरला गेलो असताना त्या टोळीच्या म्होरक्‍याला भेटावं असं माझ्या मनात आलं. इतक्‍या सुस्थितीतला माणूस गुन्ह्यांच्या वाटेवर का गेला असेल, हे मला जाणून घ्यायचं होतं. त्यानं मला सांगितलं की "त्याला राजकारणात खूप रस होता. त्याला निवडणुकीसाठी पैसे हवे होते.' मग त्यानं तीन लोकांना ठार का मारलं? तो म्हणाला ः 'एका ठिकाणी पाठलाग करणाऱ्या सुरक्षारक्षकांनी टोळीतल्या एकाला जवळजवळ पकडलंच होतं, म्हणून त्याच्यावर गोळीबार केला. दुसऱ्या प्रकरणात पाठलाग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकाला भीती दाखवण्यासाठी गोळी झाडली. ती नेमकी त्याला लागली.''
'आणि बॅंक मॅनेजरला का मारलं?'' मी विचारलं.
'त्याला मारावं लागलं साहेब. तो आधी बटालामधल्या बॅंकेत होता आणि त्यानी मला ओळखलं होतं,'' रणजितसिंग म्हणाला.
काहलो नावाचे झोनल आयजी माझ्याबरोबर होते. त्यांना मी विचारलं ः 'गुन्हेगारीची वाट धरून कुणाचं काही भलं होतं का?'' 'अजिबात नाही, सर,'' ते उत्तरले.

(उत्तरार्ध)
(या घटनेतल्या व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s s virk write in and out crime article in saptarang