एम्पायर सिटी इस्टेट मर्डर : भाग 2 (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

सगळे अतिशय भक्कम असे परिस्थितिजन्य आणि काही प्रत्यक्ष पुरावे आमच्याकडं होते...पण तरीही आम्ही आमचे आणखी प्रयत्न सुरूच ठेवण्याचं ठरवलं. आणखी पुरावे गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कार्यालयात पुन्हा भेटायचं असं आमचं ठरलं.

"जनाब, मी त्या बाईंशी काहीच वाईट वागलो नाही. तिचे पती मारले गेले होते, तिला सहानुभूतीची आवश्‍यकता होती,'' गुरदितसिंग मला सांगू लागले. ""बाई शवागारात त्यांच्या पतीच्या मृतदेहाजवळ बसल्या होत्या. बाहेर खूप थंडी होती. आम्ही व्हरांड्याजवळच्या एका खोलीत बसून ऑटोप्सीसाठी आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता करत होतो. खोलीतून आम्हाला बाईंच्या हालचाली दिसत होत्या. मला त्यांचं वागणे जरा "मश्‍कूक' (संशयास्पद) वाटलं. त्या हॉलमध्ये जेव्हा कुणी येत असे, तेव्हा बाई एकदम हमसून हमसून रडायच्या. आत आलेली व्यक्ती बाहेर गेल्यावर एकदम रडणं थांबवून त्या पुन्हा त्यांच्या मोबाईल फोनवर बोलण्यात व्यग्र व्हायच्या. फोनवर बोलताना मात्र त्या अगदी नॉर्मल असायच्या. असं बऱ्याच वेळा झाल्यामुळे मी फक्त त्यांना त्यांचं असं वागणं लक्षात आणून दिलं. त्यावर त्या रागावल्या. "माझ्या पतीचा खून झालाय, तरीही तुम्ही माझ्यावरच संशय घेताय म्हणून वरिष्ठांकडं तक्रार करेन' असा आरडाओरडा त्यांनी करायला सुरवात केली.''

ज्या पद्धतीनं गुरदितसिंग यांनी आपला संशय व्यक्त केला ती टिपिकल पोलिसी पद्धत असली, तरी कोणत्याही पोलिसाकडं असायलाच हवा असा एक योग्य मुद्दा त्यांच्याकडं होता व तो म्हणजे "संशय'! मला गुरदितसिंग यांचा फारसा दोष वाटला नाही. ""गुरदितसिंग, तुम्ही पुन्हा कामावर रुजू व्हा. राहिलेली कागदपत्रं पूर्ण करा, तुमच्याविषयी आपण नंतर बोलू,'' असं मी म्हटल्यावर आनंदी चेहऱ्यानं मला सॅल्यूट करून ते बाहेर पडले. त्यांच्या गणवेशातून वजा झालेला बेल्ट त्यांना परत मिळाला होता.

सगळं काही गोठवून टाकेल असं तीन अंश फॅरनहाईट तापमान असताना शमिंदर व मनी बाहेर का पडले, हा प्रश्न मला टोचत होता. तीन अंश ही काही थंडीची मजा लुटण्याची स्थिती नाही. बरं, रोजच रात्री जेवणानंतर ते असा फेरफटका मारत असत का, हा माझ्यासमोरचा दुसरा प्रश्न होता. माझ्या मनातल्या या प्रश्नांबद्दल अशोक बन्सल यांनी बरीच माहिती गोळा केली होती. घरातली मोलकरीण सविता, शमिंदरचे आणि मनी दोघांचेही आई-वडील, त्यांचे काही जवळचे कौटुंबिक मित्र आणि कंपनीत शमिंदरबरोबर काम करणाऱ्या काही लोकांशी ते बोलले होते. वर्षभराहून अधिक काळ त्या कुटुंबाकडं काम करणाऱ्या सविताच्या म्हणण्यानुसार, बरोबर फिरायला जाणं दोघांनाही फारसं पसंत नव्हतं; किंबहुना ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी पहिल्यांदाच ते दोघे रात्री जेवणानंतर फिरायला गेले होते. त्या दोघांची बऱ्याचदा आपापसात भांडणं व्हायची. मनीचं अजय पाल ऊर्फ शेरी नावाच्या एका तरुणाबरोबर प्रेमप्रकरण सुरू होतं, अशीही माहिती तिच्याकडून मिळाली. हा शेरी एक स्थानिक व्यापारी होता. कॅसानोव्हा टाईपचा हा माणूस एका श्रीमंत कुटुंबातला होता. तो महागड्या गाड्या वापरत असे. शमिंदर खाऊन-पिऊन सुखी असले तरी बहुधा मनीच्या "उच्च राहणी'च्या कल्पना वास्तवात आणण्याइतके ते श्रीमंत नव्हते. शमिंदर कंपनीच्या कामासाठी दौऱ्यावर असताना कधी कधी शेरी त्यांच्या घरी मुक्कामालाही असायचा, असंही तिच्याकडून समजलं होतं. बन्सल ही कथा सांगत असताना, अशा माहिती "उकरून' काढण्याचा उद्योग करणाऱ्या आमच्या बाकीच्या शाखाही आपापल्या पद्धतीनं माहिती जमा करत होत्या व त्या माहितीचा अर्थ लावत होत्या.

शमिंदरचे आई-वडील मनीबद्दल फारच कडवटपणे बोलत होते. त्यांच्या मते त्यांचा मुलगा आणि सून यांचे संबंध अजिबातच चांगले नव्हते. या घटनेच्या काही आठवडे अगोदरच मनीनं तिच्या वकिलामार्फत घटस्फोटाची नोटीस दिली होती; पण नंतर तिने ती मागं घेतली होती. शमिंदरनी त्या नोटिशीला उत्तरही दिलं नव्हतं; पण त्यांच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीनं माफी मागून, यापुढं एखाद्या आदर्श पत्नीप्रमाणे संसार करण्याचं मान्य केलं होतं. ही घटना घडेपर्यंत काही दिवस ती खरोखरच तशी वागलीही होती. बन्सल यांनी शमिंदरच्या आई-वडिलांकडून त्या नोटिशीची आणि ती मागं घेणाऱ्या पत्राची प्रतही मिळवली होती. शमिंदरच्या हत्येत मनीचा काहीतरी हात असणार, असा संशय त्यांना होता.

आमच्या टेक्‍निकल सर्व्हिलन्स टीमही एव्हाना कामाला लागल्या होत्या. मनी, अजय पाल आणि इतर काही संशयितांच्या फोनवर आम्ही लक्ष ठेवून होतो. आमच्या टीमनं शमिंदर, तसंच सर्व संशयितांच्या मोबाईल फोनवरून झालेल्या कॉल्सची यादी केली होती. या यादीतून शमिंदर यांच्या हत्येच्या काही तासांपूर्वीपर्यंत झालेल्या संपर्कांचा "एक नकाशा' तयार झाला होता. सर्व संशयास्पद फोनचं कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) तयार केलं गेलं. दुसरी एक टीम होणाऱ्या कॉल्सची यादी करत होती. यातल्या काही संभाषणांवरही आमची नजर होती. यातून काही बाबी उघड होत होत्या. अशाच एका संभाषणात मनी शेरीला सांगत होती ः "पोलिस तुझंही नाव घेत आहेत. सावध रहा'. यावर शेरी उत्तरला होता ः "काळजी करू नकोस, त्या हल्ल्याशी माझा संबंध कधीच जोडला जाऊ शकत नाही. मी त्या वेळी तिथं नव्हतोच.' तरीही "काळजी घे' असा सावधगिरीचा सल्ला दोघांनी एकमेकांना दिला. इकडं आम्हीही सर्वतोपरी काळजी घेत होतोच! काही वेळानंतर मनीनं पुन्हा तिच्या प्रियकराला फोन केला. ती घाबरली असावी असं तिच्या आवाजावरून वाटत होतं.

ती त्याला सांगत होती ः "तू न आल्यामुळं त्यांना तुझा संशय येतोय. मला वाटतं की तू यायला हवंस.'
"पण माझ्याकडं पैसे नाहीयेत,' शेरीचं उत्तर.
त्यावर मनी त्याला म्हणाली होती ः "मी तुला माझं एटीएम कार्ड दिलं आहे. त्यावरून पैसे काढ आणि ये. कसल्याही परिस्थितीत उद्यापर्यंत येण्याचा प्रयत्न कर.'
म्हणजे हा तथाकथित श्रीमंत माणूस त्याच्या मैत्रिणीचं कार्ड वापरत होता! सीडीआरवरून आम्ही शेरीच्या हालचाली तपासण्याचा प्रयत्न केला. त्याचा फोन चंडीगडच्या उत्तर भागातल्या मोबाइल टॉवरच्या परिसरात असल्याचं दिसत होतं. मनीचे दोन फोन येऊन गेले होते. त्यानंतर मोबाईलचं लोकेशन बदललं आणि ते दक्षिणेकडं मोहालीच्या - म्हणजे जिथं मनी आणि शमिंदर राहत होते, जिथं शमिंदरवर हल्ला झाला होता - त्या दिशेनं सरकलं. गुन्हा घडला त्या वेळीही शेरीचा मोबाईल फोन मोहालीच्या मोबाईल टॉवरच्या परिसरात असल्याचं दिसत होतं. नंतर तो चंडीगड-मोहालीचं उपनगर असणाऱ्या मुबारकपूरच्या दिशेनं सरकला. मोबाईल टॉवरच्या लोकेशननुसार, पुढचे काही तास तो तिथंच होता. शेरी हा मुबारकपूरमध्ये एका विवाहसमारंभाला उपस्थित होता, असं आमच्या चौकशीत आढळून आलं होते. आमची चौकशी सुरूच होती.

शवविच्छेदन झाल्यावर दुपारनंतर शमिंदरचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अंत्यसंस्कारही लगेचच उरकण्यात आले. मी संध्याकाळी सहा वाजता माझ्या कार्यालयात अधिकाऱ्यांची एक गोपनीय बैठक घेतली. काय घडले असावं ते आता स्पष्ट होत होतं; पण या खुनाचा हेतू स्पष्ट करणारे अधिक तपशील मिळवावे लागणार होते. शमिंदर आणि मनीचे वैवाहिक संबंध ताणले गेलेले होते, मनीनं घटस्फोटाची नोटीस दिली होती आणि नंतर तिनं ती मागंही घेतली होती. मनी आणि शेरी यांच्यातले विवाहबाह्य संबंध दीर्घ काळापासून होते. त्या रात्री जेवणानंतरचा फेरफटका हे शमिंदर यांना घराबाहेर काढण्यासाठीचं निमित्त होतं; जेणेकरून त्यांच्या खुनाचा बेत तडीस नेता यावा. मनीनं शेरीला तिचं एटीएम कार्ड दिलं होतं, म्हणजे या कटात ते दोघंही सहभागी होते. खून झाला तेव्हा शेरी त्या परिसरातच होता हे मोबाईल टॉवरच्या लोकेशनवरून स्पष्ट होत होतं. खून झाल्यानंतर केलेले फोन कॉल्स कदाचित, शमिंदरचा मृत्यू झाला आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी केले गेले असावेत. शमिंदरचा मृतदेह शवागारात हलवल्यानंतरही मनी शेरीच्या संपर्कात होती. त्या काळात त्यांचं एकमेकांशी किमान दहा वेळा बोलणं झालं होतं. एवढे मुद्दे आमच्या समोर होते. हे सगळे अतिशय भक्कम असे परिस्थितिजन्य आणि काही प्रत्यक्ष पुरावे होते; पण तरीही आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवण्याचं ठरवलं. आणखी पुरावे गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कार्यालयात पुन्हा भेटायचं असं आमचं ठरलं.

अशोक बन्सल आणि सर्व्हिलन्स टीमकडं दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी बरीच चांगली माहिती होती. अपेक्षेनुसार, मनी आणि शेरी आता फोनवर जरा अधिक मोकळेपणानं बोलू लागले होते. एका संभाषणात त्यांनी पुन्हा एकमेकांवरच्या प्रेमाची ग्वाही दिली आणि आता कोणत्याही अडथळ्याशिवाय एकत्र राहण्याचं वचनही एकमेकांना दिलं. आम्ही ते रेकॉर्डिंग ऐकलं; पण हे प्रकरण धसास लावण्यासाठी आणखी काही पुरावे आवश्‍यक होते. दुसऱ्या एका संभाषणीत शेरीनं मनीला "मी उद्या येतो,' असं सांगितलं. आणि मनीनं त्याला "तू येशील तेव्हा त्याच्या (शमिंदरच्या) आई-वडिलांसमोर त्याच्या मृत्यूबद्दल भरपूर दुःख व्यक्त कर,' असा सल्लाही दिला. अर्ध्या अर्ध्या तासानं ते एकमेकांशी बोलत होते. हे संभाषण आणि खून होण्यापूर्वीच्या काळातले कॉल रेकॉर्डस समोरासमोर ठेवल्यावर खुनाचं एक अत्यंत नियोजित असं कारस्थान उलगडत होतं. एका चांगल्या यशस्वी माणसाची त्याच्या मोहक दिसणाऱ्या पत्नीनंच हत्या घडवून आणली होती.

दुसऱ्या दिवशी शेरी अमृतसरहून चंडीगडला बसनं जात असताना आमच्या एका टीमनं जालंधर इथं बस थांबवून त्याला अटक केली. त्याची झडती घेतल्यावर मनीच्या नावाचं एटीएम कार्ड त्याच्याकडं सापडलं. खून झाल्यानंतरच्या काळातलं त्या दोघांचं एकमेकांशी असलेलं वागणं ज्या प्रकारचं होतं, त्यावरून त्या दोघांचे आपापसातले प्रेमसंबंध सिद्ध होऊ शकले असते. शेरीला अटक करत असतानाच दुसऱ्या एका टीमनं मनीलाही अटक केली आणि दोघांनाही न्यायालयासमोर उभं करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मग मी उद्योग खात्याचे प्रधान सचिव गुप्ता यांनाही फोन केला आणि त्यांना ही बातमी सांगितली. पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद येतोय की काय अशा चिंतेत असलेले गुप्ता लगेचच माझ्या कार्यालयात आले. शमिंदर यांची हत्या आणि त्याबाबतचे तपशील ऐकल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या पाठोपाठ राझ्वीही त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर माझ्या कार्यालयात पोचले. प्रेम, व्यभिचार, खून असा सगळा मसाला असल्यानं वृत्तपत्रांनीही ही बातमी उचलून धरली होती. दोन दिवसांत आम्ही या खुनाचा छडा लावला होता. आता फक्त काही कागदपत्रांची पूर्तता होणं बाकी होतं. राझ्वी यांना हे सगळंच अविश्वसनीय वाटत होतं. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. ते सगळे गेल्यानंतर आम्ही आमच्याकडच्या प्रचंड तांत्रिक माहितीवरून पुरावे एकत्र करण्याच्या कामाला सुरवात केली.

शेरी यानं स्वतःसाठी एक बचावकथा रचली होती. खून झाला त्या रात्री चंडीगड क्‍लबमध्ये बसून त्यानं दारू घेतली होती, थोडं खाल्लंही होतं. "खून झाला तेव्हा आपण क्‍लबमध्ये होतो, त्यामुळे या खुनाशी आपला काही संबंध नाही,' असा पवित्रा त्यानं घेतला. पुरावा म्हणून त्यानं क्‍लबची सह्या केलेली बिलंही दाखवली. आम्ही ते नाकारलं नाही; पण मग त्याचा फोन मोहाली टॉवरच्या परिसरात कसा काय होता, असं विचारल्यावर मात्र तो गोंधळला. त्याच्याकडं त्याबाबत सांगण्यासारखं काहीच नव्हतं. मग, विवाहसमारंभात आपण नाचलो होतो आणि एका मित्राच्या पिस्तुलातून हवेत गोळीबारही केला होता असं तो सांगायला लागला. हवेत गोळीबार करतानाचे फोटोही त्यानं दाखवले. आमच्या तपास-अधिकाऱ्यानं त्याच्याकडं लग्नाची निमंत्रणपत्रिका मागितली आणि विचारलं ः ""तुला मुलाच्या बाजूनं बोलावणं होतं की मुलीच्या?'' निमंत्रणाशिवायच आपण त्या लग्नाला गेलो होतो हेच शेरी विसरून गेला होता. नंतर त्या दोन्ही कुटुंबांनी "आपण शेरीला बोलावलं नव्हतं' असं तपास-अधिकाऱ्याला सांगितलं. शेरी त्या लग्नातला "बिनबुलाया महमान' होता. त्यानं अचानकच तिथं येऊन नाचून हवेत गोळीबार वगैरे केल्याचं दोन्ही कुटुंबांनी सांगितलं. तो त्यातल्या कुणालाच ओळखत नव्हता.

शेरीनं मित्राकडून आणलेलं पिस्तूल ताब्यात घेण्यात आलं. शमिंदरची हत्या झाली तिथं सापडलेल्या काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या त्या पिस्तुलाबरोबर जुळत असल्यानं याच पिस्तुलातून गोळ्या झाडून खून झाल्याचं बॅलेस्टिक तज्ज्ञांचं मत होतं. प्रचंड प्रमाणात गोळा झालेला फोन रेकॉर्डिंग वगैरे तांत्रिक पुरावा समोर ठेवल्यावर मात्र त्यानं मनीबरोबच्या विवाहबाह्य संबंधांची आणि खुनाच्या कटाची स्पष्ट कबुली दिली. ""सर, माझं चांगलं चाललं होतं; पण त्या चेटकिणीनं - मनीनं - माझ्यावर जादूटोणा केला आणि मला बरबाद केलं,'' असं म्हणत तो तिला शिव्याशाप देऊ लागला.

मनीनंही सुरवातीला तपास-अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण तपास अधिकारी तिच्यासमोर पुरावे ठेवू लागले. मात्र, तरीही "आपण एक असहाय्य विधवा आहोत', असाच तिचा पवित्रा होता. शेरी तिच्याबद्दल काय बोलला ते जेव्हा तिला ऐकवलं तेव्हा मात्र ती खवळून उठली. ""हो, माझे त्याच्याशी प्रेमसंबंध होते; पण मी शमिंदरला घटस्फोट देत होते. मी त्याला तशी नोटीसही दिली होती; पण "दरिद्री घटस्फोटिता होण्यापेक्षा; श्रीमंत विधवा हो' असं सांगून शेरीनं मला ती मागं घ्यायला लावली. "त्याच्याकडं जे काही आहे ते मिळव मग काही वर्षांनंतर आपण सेटल होऊ या', असं शेरीचं म्हणणं होतं. तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे, त्यानंच हा सगळा कट आखला होता आणि तो आता मलाच चेटकीण म्हणतोय, शिव्या देतोय, मी त्यालाच उघडा पाडेन.'' नंतर तिनं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. आम्हाला भक्कम पुरावे मिळाले होते, त्याआधारे आम्ही दोषारोपपत्र दाखल केलं.

शेरी आणि मनी दोघंही न्यायालयात, त्यांनी दिलेली कबुली नाकारणार, हे लक्षात घेऊन आम्ही खटल्याची तयारी केली होती. आमच्याकडं त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र पुरावेही होते. त्यांनी सुनावणी लांबवण्याचेही प्रयत्न केले. पाच वर्षं खटला सुरू होता; पण या सगळ्या काळात त्यांना जामीन मिळू शकला नाही. अखेरीस शमिंदरच्या खुनाबद्दल दोघांनाही जन्मठेप सुनावण्यात आली. शमिंदरच्या आई-वडिलांनाही या प्रकरणाचा खूप पाठपुरावा केला; पण या सगळ्याचा शेवट मात्र सगळ्यांसाठीच दुखःद होता.
गुन्ह्याच्या तपासात आम्हाला जरी यश मिळालं होतं, तरी मला चांगलं वाटलं नाही. माणुसकीसंदर्भातलं एक शल्य मनाला बरेच दिवस टोचत राहिलं.
(उत्तरार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com