esakal | रूढाचा दरोडा (एस. एस. विर्क)
sakal

बोलून बातमी शोधा

s s virk

रूढाचा दरोडा (एस. एस. विर्क)

sakal_logo
By
एस. एस. विर्क

मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना लावल्या...

ते वर्ष होतं 1978. एप्रिल महिना संपत आला होता. महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातला माझा तीन वर्षांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होत होता. देशात आणीबाणी लागू झाली, त्याच्या थोडं आधी मी यवतमाळमध्ये रुजू झालो होतो आणि आता आणीबाणी संपून एक वर्षाचा काळ उलटला तरी मी तिथंच होतो. इतके दिवस तिथं असल्यानं माझे मित्र आणि सहकारीही मला "तुम्ही आता यवतमाळचे स्थायी रहिवासी झालात,' म्हणून चिडवू लागले होते; पण मला काहीच घाई नव्हती. डोंगररांगा, जंगलं असलेलं यवतमाळ मला आवडलं होतं. आम्ही ज्या भागात राहत होतो त्याच भागात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, सिव्हिल सर्जन, एक्‍झिक्‍युटिव्ह इंजिनिअर वगैरे अधिकारी राहत असत. एखाद्या विस्तारित कुटुंबासारखं वातावरण असायचं. शहरातही मला खूप चांगले लोक भेटले. त्यापैकी काहींच्या आठवणी अजूनही आहेत आणि बरेच जण माझ्या संपर्कातही आहेत.
यवतमाळमध्ये क्रीडाप्रेमी मंडळींची संख्याही खूप होती. दरवर्षी क्रीडास्पर्धा भरवल्या जायच्या. वऱ्हाडातल्या उन्हामुळं काही वेळा या स्पर्धा रात्रीच्या वेळी व्हायच्या, त्या पाहण्यासाठी लोक गर्दी करत असत. काही क्रिकेटशौकीन त्या काळात, 1975 मध्ये, यवतमाळमध्ये मर्यादित षटकांचे सामने भरवायचे. 50-50 षटकं असायची. ते सामने खूपच लोकप्रिय होते. मला आठवतं त्यानुसार, त्या वेळचे एक प्रमुख नेते बाबासाहेब धारफळकर यांनी या सामन्यासाठी मोठी देणगी दिली होती आणि त्यांच्या नावाचा एक सुवर्णचषकही असायचा. वेगवेगळ्या शहरांतून संघ या स्पर्धेसाठी येत असत.
मराठी साहित्यात ज्यांनी स्वतःच्या रचनांनी शेरो-शायरी लोकप्रिय केली ते ज्येष्ठ कविवर्य भाऊसाहेब पाटणकर यांच्यासारखे काही चांगले साहित्यिक तिथं होते. आणीबाणीच्या काळात भाऊसाहेबांना मिसा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याची वेळ आली होती; पण नंतर ती स्थानबद्धता रद्द झाली. ती कथा नंतर कधीतरी सांगेनच. भाऊसाहेब माझे केवळ मित्रच नव्हे, तर फिलॉसॉफर आणि गाईडही होते. त्यांच्याबरोबर रंगलेल्या कवितांच्या मैफलींच्या आठवणी आजही मला त्या जुन्या दिवसांमध्ये घेऊन जातात.

यवतमाळमधले पोलिस खात्यातले माझे सहकारीही उत्तम होते. त्यातले काही मला अजूनही आठवतात. माझं त्यांना एकच सांगणं असायचं : "पोलिस अधिकारी म्हणून गुन्हेगारी रोखणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे आणि गुन्हेगारी रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूनही एखाद्या वेळी गुन्हा घडला तर त्याचा तपास करा, गुन्हा उघडकीस आणा.' त्या मंडळींकडूनही मला चांगला प्रतिसाद मिळत असे.
क्राईम डिटेक्‍शन - गुन्हे उघड करणं - हा माझ्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय असल्याचं मी याआधीही लिहिलं आहेच. एखाद्या विशिष्ट भागात घडणाऱ्या गुन्ह्यांचा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करावा लागतो. घटना कशी घडली, वेळ दिवसाची होती की रात्रीची, रात्र असेल तर अंधारी रात्र होती की चांदणं असणारी, गुन्हा दिवसा घडला असेल तर कोणत्या वेळेला घडला, ज्या भागात गुन्हा घडला तो भाग कसा आहे, गुन्हेगाराची मोडस ऑपरेंडी, म्हणजे गुन्हा करण्याची पद्धत, कशी होती, काही वेळा डुप्लिकेट किल्ल्यांचा वापर केलेला असतो किंवा बगळी, रुमाली अशा पद्धतींचा वापर झालेला असतो. हा सगळा अभ्यास करावा लागतो. जितक्‍या खोलात जाऊ तितका हा अभ्यास रंजकही होतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वसामान्यपणे रात्रीच्या वेळी घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होते, म्हणून मी माझ्या सहकारी-कर्मचाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना देत असे. त्यांनी गुन्ह्यांचा अभ्यास करून व्यावसायिक कौशल्यानिशी त्यांचा सामना करावा अशी माझी अपेक्षा असायची.
* * *

बऱ्याच वर्षांपासून सुटी न घेता सलग काम केल्यामुळे एक छोटीशी विश्रांती घेण्याच्या विचारात मी असतानाच, माझी दहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचं मला कळवण्यात आलं. माउंट अबू इथं असलेल्या अंतर्गत सुरक्षा अकादमीमध्ये ते प्रशिक्षण होणार होतं. कोर्ससाठी मला निवडलं गेल्यानं रोजच्या कामातून मला एक चांगला ब्रेक मिळाल्यासारखं वाटलं. मी लगेच रेल्वेचं आरक्षण केलं. माझ्या प्रशिक्षणकाळातही राष्ट्रीय पोलिस अकादमी माउंट अबूलाच होती, त्यामुळे त्या परिसराला पुन्हा भेट देण्याचीही उत्सुकता होती; पण परमेश्वराची इच्छा काही वेगळीच असावी.
माउंट अबूला जाण्याच्या चारेक दिवस आधी मी टूरवरून परत आलो तेव्हा माझं अंग खूप दुखत होतं. माझी पत्नीच डॉक्‍टर असल्यानं आजारपण हा काही फारसा गंभीर मामला नसायचा. बऱ्याचदा आजारी पडतोय असं वाटता वाटताच औषध मिळायचं. मी घरी आलो तेव्हा पत्नी म्हणाली : ""तुमचे डोळे लाल दिसत आहेत.'' माझ्या अंगात तापही होता. तिनं लगेच मला औषध दिलं. माझा प्रवास रद्दच झाला होता. घरात पडून राहून वेळ घालवणं फारच कठीण झालं होतं; पण वृत्तपत्रं-मासिकांशिवाय रोजच्या वायरलेस मेसेजेसची सकाळी येणारी फाईल वाचण्याचा माझा परिपाठ मात्र मी सुरू ठेवला होता.
त्या दिवशी या मेसेज-फाईलमध्ये, नांदेडमध्ये पडलेल्या एका दरोड्याबाबतची माहिती वाचण्यात आली. अज्ञात दरोडेखोरांच्या एका टोळीनं नांदेड शहराच्या एका उपनगरी भागात काही रहिवाशांना मारहाण करून दागदागिने आणि रोख रक्कम लुटून नेली होती.
हा प्रकार घडला तेव्हा दिवे गेलेले होते. गुन्हेगारांनी महिलांनाही गंभीर मारहाण केली होती. अगदी कमी वेळात लुटालूट करून गुन्हेगार पसार झाले होते. नांदेड पोलिसांनी तपास सुरू केला होता.
इकडं माझा ताप उतरत नव्हता. मी झोपूनच होतो. अंगातली प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून फळांचा रस आणि सूपचा मारा सुरू होता. धीर धरण्याखेरीज माझ्याकडं आणखी काही पर्याय नव्हता.

दोन दिवसांनी वायरलेस मेसेजेस वाचताना नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्‍यात तसाच आणखी एक दरोडा पडल्याचं वाचायला मिळालं. दिवे गेलेले, उपनगरातली घरं, घरांमधल्या सगळ्यांनाच झालेली जबरदस्त क्रूर मारहाण...मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या, त्या पाहता हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना लावल्या. माझं हे काम सुरू असतानाच सिव्हिल सर्जन डॉ. देशपांडे, त्यांची पत्नी आणि माझी पत्नी माझ्या खोलीत आली. त्यांच्या चेहऱ्यावरचे एकंदर भाव बघून मी घाईघाईनं फाईल आणि नकाशा बाजूला ठेवून त्यांना त्या दरोड्यांबद्दल सांगू लागलो : ""या दरोड्यांमुळे मी जरा चिंतित आहे,'' मी म्हणालो. ""आणि मी तुमच्याबद्दल चिंतित आहे,'' डॉ. देशपांडेंनी त्याच स्टाईलमध्ये मला उत्तर दिलं. मग मला तपासून "तुम्ही पूर्णपणे विश्रांती घ्यायला हवी' असं मला बजावून ते गेले.

विश्रांती घेतानाही, मी या नवीन टोळीबद्दल विचार करत होतो. गेल्या काही वर्षांत मी त्या भागात अशा प्रकारचे गुन्हे पाहिले नव्हते. माझे रीडर म्हणून काम करणारे उपनिरीक्षक बोडखे यांना मी बोलावून घेतलं आणि जिल्ह्यातल्या सर्व पोलिस ठाण्यांना या टोळीच्या हालचालींबाबत दक्ष राहण्याचा संदेश पाठवण्यास सांगितलं. मी यासंदर्भात लवकरच एक बैठकही घेणार असल्याचं सर्व अधिकाऱ्यांना कळवलं. प्रतिकार होईपर्यंत ही टोळी एकामागून एक गुन्हे करत राहणार, असा माझा कयास होता.
दोनच दिवसांनी मेसेजेसच्या फाईलमध्ये (त्या वेळच्या आंध्र प्रदेशात आणि आता तेलंगणात असणाऱ्या) आदिलाबाद शहराच्या उपनगरी भागात पडलेल्या दरोड्याचा रिपोर्ट होता. या वेळी दरोडेखोरांनी एका व्यापाऱ्याच्या पॉश बंगल्याला लक्ष्य केलं होतं. फक्त त्या व्यापाऱ्यानं "काय हवं ते न्या; पण मारहाण करू नका', असं सांगितल्यानं घरातल्या लोकांना फारशी मारहाण झाली नव्हती. अगदी थोड्या वेळात चीजवस्तू लुटून दरोडेखोर पसार झाले होते.

माझा कयास बरोबर असल्याचं दिसत होतं. मी पुन्हा नकाशे मागवले आणि आदिलाबाद या ठिकाणावर आणखी एक पिन लावली. आता ती टोळी यवतमाळ जिल्ह्याच्या, माझ्या अधिकारक्षेत्राच्या, जवळ आली होती. दक्षिणेकडं पैनगंगा नदी ही यवतमाळ जिल्ह्याची हद्द होती. त्या दिशेनं यवतमाळला आदिलाबादशी जोडणाऱ्या रस्त्यावर केळापूर तालुक्‍यात एकच पूल होता. गुन्हेगारांना जर यवतमाळ जिल्ह्यात यायचं असेल तर नदी ओलांडण्यासाठी फक्त हाच पूल होता. मी पांढरकवडा पोलिस स्टेशनला फोन केला. चाटे नावाचे एक उपनिरीक्षक तिथं होते. हा एवढा एकच पूल असल्याचं त्यांनीही सांगितलं. त्या वेळी नदीला भरपूर पाणी असल्यानं अन्य कोणत्या मार्गानं नदी ओलांडणं शक्‍य नाही, असंही ते म्हणाले. मुख्य रस्त्यावर पुलाजवळच्या बोरी गावात एक छोटी पोलिस चौकी होती आणि सार्वजनिक फोनही होता. मला आता या दरोडेप्रकरणाची खरोखरच काळजी वाटू लागली होती. पुढच्या दोन दिवसांत सर्व एसएचओंना बैठकीसाठी बोलवावं, असं मी रीडरला सांगितलं.
आरशात दिसणारं आपलं प्रतिबिंब काही वेळा आपली चेष्टा करत असतं, असं मला वाटतं. माझ्या खोलीतल्या आरशातला माणूस मला विचारत होता : ""विर्कसाहेब, केव्हापर्यंत तुम्ही असे मोकळे फिरणार? ते येत आहेत तुमच्या हद्दीत दरोडा घालायला. बकरे की मॉं कबा तक खैर मनाएगी?''
""मी पण पाहून घेईन. मी घाबरत नाही कुणाला...'' मीही जोरात बोललो.
आवाज ऐकून माझी पत्नी धावत आली.
""कुणाशी बोलता आहात?'' तिनं विचारलं.
""तुमचा ताप वाढलेला वाटतोय,'' मी गप्प झालो.
""तुम्हाला आरामाची गरज आहे, आराम करा,'' तिनं सांगितलं.

या टोळीनं आतापर्यंत घातलेल्या तीन दरोड्यांची माहिती सर्व अधिकाऱ्यांना मी नकाशाच्या साह्यानं बैठकीत समजावून दिली. पुढचा नंबर आपला असावा, अशी मला वाटत असलेली भीतीही व्यक्त केली. पांढरकवड्याचे उपनिरीक्षक चाटे यांनाही मी अधिक सावध राहण्यास सांगितलं. त्यांच्याकडं मनुष्यबळ कमी होतं, पोलिस ठाण्यामध्ये वाहन नव्हतं, त्यांच्या ठाण्याचं क्षेत्रही फार मोठं होतं, आयत्या वेळी मदत पुरवणं सोपंही नव्हतं तरीही "तुम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याच्या तयारीत राहा', असं मी चाटे यांना सांगितलं. कुठं गुन्हा घडल्यास जिल्ह्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर तपासणी करण्याच्या सूचना मी इतर पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनाही दिल्या. परिस्थितीचं गांभीर्य त्या सर्वांच्याही बहुधा लक्षात आलं असावं.

पीएसआय चाटे पोलिस दलात निवडले जाण्याआधी शिक्षक होते. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी काही चांगल्या उपाययोजना केल्या. पोलिस ठाण्यातली सर्व उपलब्ध शस्त्रं त्यांनी साफसूफ करून कर्मचाऱ्यांना दिली. पोलिस वसाहतीत न राहणारे सर्व कर्मचारी रात्री झोपायला पोलिस ठाण्यातच येतील, असाही आदेश चाटेंनी काढला आणि रात्रीची गस्तही सुरू केली. गावात काम करणाऱ्या काही कंत्राटदारांना त्यांनी त्यांचे ट्रक रात्री चालकांसह पोलिस ठाण्याच्या आवारातच पार्क करण्यास सांगितले. या सगळ्या गोष्टी त्यांनी मला फोनवर सांगितल्यावर चाटे म्हणाले : ""आम्ही तयारीत आहोत, ते आलेच तर आपण त्यांना तोंड देऊ. भीतीचं काही कारण नाही.''
दोन दिवसांनी, रात्री दोनच्या सुमारास माझा फोन वाजला.

"बोरी एक्‍स्चेंजमधील टेलिफोन ऑपरेटर लाईनवर आहेत', असं सहाय्यकानं मला सांगितलं. मी फोन घेतला आणि एक घाबरलेला आवाज माझ्या कानांवर पडला. "सर, मी बोरी एक्‍स्चेंजमधून ऑपरेटर जोशी बोलतोय. रूढा गावात मोठा दरोडा पडतो आहे. गाव जरी इथून जवळजवळ दोन किलोमीटरवर असलं तरी मला मोठमोठ्यानं ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज ऐकू येत आहेत.''
जोशींचं म्हणणं बरोबर होतं. फोनवर मलाही बायका-पुरुषांच्या आरडाओरड्याचे आवाज पुसटसे ऐकू येत होते. अखेरीस ते आले होते...
तो आरशातला माणूस खरं बोलला होता ः "बकरे की मॉं कबतक...'
(पूर्वार्ध)

loading image