रूढाचा दरोडा -2 (एस.एस. विर्क)

s s virk
s s virk

आपण जो निर्णय घेतो तो यशस्वी होतो, अशा वेळा पोलिसांच्या आयुष्यात क्वचितच येतात. त्या दिवशी आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर ठरला, म्हणून हे प्रकरण माझ्या कायमचं लक्षात राहिलं.

पीएसआय चाटेंना फोन करावा, असं मी ऑपरेटर जोशींना सांगितलं.
"सर, त्यांनीच मला तुम्हाला फोन करायला सांगितलं,'' जोशी म्हणाले.
"ते जर तुमच्या एक्‍स्चेंजवरून जाताना दिसले, तर त्यांना मला फोन करायला सांगा,'' असं सांगून मी फोन ठेवला. थोड्याच वेळात चाटेंचा फोन आला. ते रूढाकडंच निघाले होते. दरोडेखोर नदी ओलांडण्याची शक्‍यता असल्यानं मी त्यांना तातडीनं नदीवरच्या पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्याच्या, नदीकाठावर मोटरसायकलवरून गस्त घालण्याच्या आणि गस्त घालणाऱ्या वेगवेगळ्या टीम्सकडं संपर्कासाठी ऑपरेटरसह वायरलेस सेट्‌स देण्याच्याही सूचना दिल्या.
त्या भागातल्या अन्य पोलिस अधिकाऱ्यांनाही मी
रूढाकडून येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर चेकनाकी उभारून तपासणी सुरू करायला सांगितली. नदीकाठानं तपास करण्यासाठी आवश्‍यकता भासल्यास 200 प्रशिक्षणार्थी पोलिस रिक्रूट मिळू शकतील असंही मी चाटेंना कळवलं होतं. पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुखांनाही फोन करून मी सकाळी 11 वाजेपर्यंत 200 प्रशिक्षणार्थी पोलिस सर्व तयारीनिशी रूढाला पोचतील अशी तजवीज करायला सांगितलं.
सकाळी सहा वाजताच मी बाहेर पडण्याच्या तयारीत होतो. माझ्या पत्नीनं फोनवरील सर्व संभाषण ऐकलं होतं. माझी तब्येत बरी नसल्यानं काळजीपोटी तिनं माझ्या सहाय्यकाला भरपूर सूचना दिल्या. थंड पाणी आणि आईस बॉक्‍स ठेवला आहे... सॅंडविचेसही आहेत... साहेब वेळेवर खातील असं पाहा... वगैरे. ती म्हणाली ः ""मला माहीत आहे, तुम्ही चिंतित आहात; पण काळजी करू नका. मी प्रार्थना करीन, ते दरोडेखोर पकडले जातील.''
मीही देवघरात जाऊन मनापासून प्रार्थना केली आणि "त्याचे' आशीर्वाद मागितले. मी काही फार देव देव करणाऱ्यातला नव्हे; पण मानवी मर्यादांची मला कल्पना आहे. तरी पण, तुमच्या प्रयत्नांना दैवी साथ लाभली तर चमत्कार घडू शकतो, असं मला वाटतं. "का चिंता करतो आहेस. मी आहे ना. तू तुझं काम कर, मी माझं काम करेन,' असंच जणू दहावे गुरू मला सांगत आहेत, असं प्रार्थना करत असताना मला सारखं वाटत होतं.

सकाळी दहाच्या सुमारास मी रूढाला पोचलो. मारहाणीत जखमी झालेल्यांपैकी बहुतेकजण केळापूरच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार घेऊन परत आले होते. काही जणांना यवतमाळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं होतं. लुटालूट करताना त्यांनी गावकऱ्यांना बेदम मारहाणही केली होती. अंगावरून दागिने ओरबाडून काढले होते. अश्रूभरल्या डोळ्यांनी गावातल्या बायका, पुरुष त्यांची करुण कहाणी सांगत होते. वायरलेस मेसेज-फाईलमध्ये मी आधी वाचलेल्या रिपोर्टसनुसार इथंही दरोडेखोरांनी मेन स्विच बंद करून गावाचा विद्युत्‌पुरवठा तोडला होता.
संपूर्ण गाव दहशतीखाली होतं. मी गावकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. उपअधीक्षक कोहोक आणि पीएसआय चाटे माझ्याबरोबर होते. एकूण स्थिती पाहाता 10-12 हून जास्त लुटारूंच्या टोळीनं हे कृत्य केलं असणार, असं दिसत होतं. गावातल्या शाळेत आम्ही तात्पुरता पोलिस कॅम्प उभारला. प्रशिक्षणार्थी पोलिसांपैकी निम्म्या लोकांना राखीव ठेवून उरलेल्यांना योग्य त्या सूचना देऊन आम्ही, नदीकडं काही संशयास्पद सापडतं का, ते पाहण्यास पाठवलं. दरम्यान, पुलावर तपासणी करणाऱ्या पोलिस टीमनं दोन-तीन जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याजवळ काही दागिने सापडले होते. त्याबद्दल ते नीट माहिती देऊ शकत नव्हते. मी त्यांना वेगवेगळं बसवून ठेवायला सांगितलं. "एका लग्नाला चाललो होतो' असं ते तिघं सांगत होते; पण ते सांगत असलेल्या गोष्टी एकमेकींशी जुळत नव्हत्या. त्यांच्यातल्या यासीन नावाच्या 20 वर्षांच्या एका तरुणाची मी चौकशी सुरू केली. त्याच्या म्हणण्यानुसार, तो आदिलाबादचा होता. त्याच्याजवळ सापडलेले काही दागिने गावातल्या महिलांना दाखवल्यावर काहीजणींनी ते आपले असल्याचं ओळखलं. एका बाईनं गळ्यातल्या गंठनावर तिचं नाव कोरून घेतलं होतं, तेही दाखवलं. याचा अर्थ आम्ही योग्य मार्गावर होतो. आता पुढची चौकशी महत्त्वाची होती.

मी रौद्र रूप धारण करून यासीनला म्हणालोः ""तुम्हा लोकांना जे करायचं होतं ते तुम्ही केले. आता मी काय करतो ते पाहा. माझा पट्टा आणा रे.'' कुणीतरी एक पट्टा मला आणून दिला. त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. ""साहेब, मला मारू नका,'' तो म्हणाला. ""तुम्हीलोक गावकऱ्यांना मारहाण करा आणि मी तुझ्याशी नीट वागावं अशी तुझी इच्छा आहे तर! आता बघच मी काय करतो ते,'' मी ओरडून म्हणालो. ""साहेब, मी जर तुम्हाला सगळं खरं सांगितलं तर तुम्ही मला मारणार नाही ना?''
""मग का मारेन? पण तू सगळं खरं खरं सांगितलं पाहिजेस मात्र. अर्धवट सांगितलंस तर मग तुझी काही खैर नाही...'' मी त्याच्यावर मानसिक दबाव टाकला.
""साहेब, आम्ही सगळे - एकूण 14 जण - बीड जिल्ह्यातले आहोत. हनीफ आमचा म्होरक्‍या आहे. गेले सहा महिने आम्ही दरोडे घालतो आहोत. आमच्या टोळीतला एक गट दरोडा घालण्यासाठी गावाची निवड करतो, मग आमचा म्होरक्‍या दरोड्याचा प्लॅन आखतो. आमचा म्होरक्‍या चांगला शिकलेला आहे. आम्ही लूटमारीत जे काही पैसे मिळवतो त्यातले अर्धे टोळीतल्या सगळ्या सदस्यांना समप्रमाणात वाटले जातात, उरलेले अर्धे दानधर्मावर खर्च होतात. दरोडा घातल्यानंतर आम्ही दोन-दोन, तीन-तीनच्या गटानं पसार होतो आणि मग ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी भेटतो.'' त्याच्या बरोबरच्या दोघांची नावंही - अनीस आणि रियाझ - त्यानं सांगितली.
""तुला आम्ही बुरखा घालून नेतो, तू तुमच्या ठरलेल्या जागेवर बाकीचे साथीदार दाखवशील का?'' असं विचारल्यावर तो तयार झाला. यासीनला बुरखा घालून पुलावर घेऊन जाण्यास मी चाटेंना सांगितलं.

दुसऱ्या खोलीत रियाझची चौकशी चालली होती. तो स्पष्ट काहीच सांगत नव्हता. मी यासीनशी ज्या स्वरात बोललो त्याच स्वरात रियाझवर ओरडलो ः ""मला सगळं समजलं आहे; पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे.'' ""साहेब मला मारू नका; मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो.''
""ठीक आहे; पण लबाडी अजिबात चालणार नाही,'' मी पुन्हा त्याच्यावर ओरडलो.
यासीननं आधी दिलेली माहिती रियाझनंही दिली. आता आम्हाला आणखी काही नावं समजली होती. दरम्यान, बुरखा घालून पुलावर नेलेल्या यासीननं आणखी दोघांना ओळखल्याचा निरोप चाटेंकडून आला होता. रफीक आणि हाफीज अशी त्यांची नावं होती. त्यांच्याकडं आणखी काही दागिने सापडले. हे दागिनेही गावातल्या बायकांनी ओळखले.

दुपारी तीनपर्यंत आम्ही आठ जणांना अटक केली होती. प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी करून त्या चौकशीवर आधारित टिपणं आम्ही तयार केली. गुन्हा नीट पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा म्होरक्‍या जवळच्या गावी जाऊन नमाज अदा करतो, असं आम्हाला कळलं. आजही संध्याकाळी तो आदिलाबादमध्ये नमाज अदा करण्यासाठी जाणार आहे, अशीही माहिती मिळाली. आदिलाबादच्या बस स्टॅंडवर संध्याकाळी साडेसहा वाजता भेटायचं असे त्यांचं ठरलं होतं, हेसुद्धा त्यांच्याकडून समजलं. आता हनीफला ताब्यात घ्यायचं होतं; पण ही कारवाई आम्हाला शेजारच्या राज्यात करायची होती. स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी का, ते मदत करतील का, याबाबत मी द्विधा मनःस्थितीत होतो.
प्रशिक्षणार्थींपैकी बऱ्याच मुलांना मी ओळखत होतो. त्यातले सबीर आणि असगर चांगले फूटबॉल खेळाडू होते, तर अफजल आणि शाहीद हॉकी उत्तम खेळायचे. मी त्यांना बोलावून म्हणालो ः ""संध्याकाळी तुम्हाला साध्या वेशात आदिलाबादला जाऊन एका माणसावर नजर ठेवायची आहे. जसा तो प्रार्थना संपवून बाहेर येईल तसा त्याला उचलून गाडीत टाकून रूढाला घेऊन यायचं, पीएसआय सोळंकी त्या कारमध्ये असतील.'' ही कारवाई कितपत यशस्वी होईल याची मला खात्री नव्हती; पण माझ्याकडं दुसरा पर्याय नव्हता. मात्र, त्या दिवशी परमेश्वर खरोखरच आमच्यावर प्रसन्न होता, असंच म्हणता येईल. पीएसआय सोळंकी आणि त्यांच्या टीमलाही मी व्यवस्थित सूचना दिल्या. ""कारवाई संपल्यावर वेळ न घालवता लागलीच परत यावं,'' असंही मी त्यांना बजावून सांगितलं.

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही 14 पैकी आठ आरोपींना अटक केली होती. आमच्याकडं अजून काही तासांचा वेळ होता. आता आमच्याकडं हनीफचीही पूर्ण माहिती होती. आम्ही शाळेसमोर बसलो होतो; पण माझं मन आदिलाबादमध्ये होतं. रूढा हे गाव मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटरवर होतं. शाळेसमोर बसल्या बसल्या मी रूढाच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांचे दिवे बघत होतो. अंधार पडता पडता पीएसआय सोळंकी परतले. काहीशा अधीरतेनंच मी सोळंकींना विचारलं ः ""काय झालं?''
""सर, हनीफ सापडला,'' ते म्हणाले.
सोळंकींच्या कामाची प्रशंसा करत मी कारकडं धावलो. आमच्या योजनेप्रमाणेच सगळं घडलं होतं, असं सोळंकींनी सांगितलं.
मला आठवलं, माझे गुरू मला म्हणाले होतेः "तू तुझं काम कर, मी माझे काम करेन'.
""तुमच्या टोळीतल्या 14 पैकी 11 साथीदारांना आम्ही पकडलं आहे,'' असं मी हनीफला सांगितलं. ""त्यांनी तुझ्याबद्दल सर्व काही आम्हाला सांगितलं आहे,'' असंही मी त्याला सांगून पुढं म्हणालो ः ""लुटीतला जो माल तुझ्याकडम आहे तो सगळा आमच्या ताब्यात देण्यावाचून तुला आता गत्यंतर नाही.'' यावर त्यानं त्याचे दोन साथीदार ते दागिने घेऊन आदिलाबादहून बसनं हैदराबादला जाणार असल्याची माहिती आम्हाला दिली. त्या बसचा पाठलाग करण्यासाठी एक टीम पाठवण्याचं आम्ही ठरवलं; पण आदिलाबादमधले सगळे पेट्रोलपंप बंद होते, अशी माहिती सोळंकींनी दिली. इतक्‍यात गर्दीतून एक माणूस पुढं आला आणि म्हणाला ः ""सर, मी आगरवाल. आदिलाबादमध्ये या टोळीनं माझंही घर लुटलं होतं. तुम्ही त्यांना पकडलंत हे खूप बरं झालं. पेट्रोलची आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी तुमच्या टीमला घेऊन जाण्याची व्यवस्था मी करेन. मला पण तुमच्या टीममध्ये घ्या.'' साडेनऊच्या सुमारास आमची टीम हैदराबादला जाणाऱ्या बसच्या पाठलागावर निघाली.
प्रकरणाचा तपास लागल्यानं आता मी जरा निवांत झालो होतो. तपासाबद्दल एक संदेश मी वरिष्ठांना पाठवला आणि अचानक, आपण दिवसभरात काहीच खाल्लेलं नाही, याची जाणीव झाली. खूपच काम होतं आणि भूकही जाणवली नव्हती. मी एक कप चहा मागवला.

हैदराबादच्या बसच्या पाठलागावर गेलेली टीम पहाटे अडीचच्या सुमारास दोन वयस्कर लोकांना घेऊन परतली. सोन्याचे जवळपास दोन किलो वजनाचे दागिने आणि एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम चोरीला गेली होती. त्यातले जवळजवळ 80 हजार रुपये आणि सगळे दागिने आम्ही परत मिळवले होते. संपूर्ण टोळी आता आमच्या ताब्यात होती. एव्हाना सगळं गाव तिथं जमलं होतं. मी त्यांना सर्व आरोपी आणि पकडलेले दागिने आणि रक्कम दाखवली. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

अमरावतीचे डीआयजी सकाळी साडेआठपर्यंत पांढरकवडा इथं पोचतील असा निरोप मला पहाटे साडेतीनच्या सुमारास मिळाला. मी रेस्टहाऊसला जाऊन आंघोळ केली, थोडं खाऊन विश्रांती घेऊन डीआयजींच्या भेटीसाठी तयार झालो. गुन्हा धक्कादायक असला तरी आम्ही केलेल्या तपासावर डीआयजी खूश होते. स्थानिक पंचायत समितीचे सभापती रूढाचेच होते. डीआयजी रूढाला पोचल्यावर सभापतींनी त्यांचं हार आणि गुच्छ देऊन स्वागत केलं. ""सर, आम्ही असा दरोडा याआधी पाहिला नव्हता आणि असा तपासही पाहिला नव्हता. इतक्‍या झटपट तपास केल्याबद्दल आम्ही पोलिसांचे आभार मानतो,'' असं सभापतींनी डीआयजींना सांगितलं. डीआयजींनीही आमच्या कामाची प्रशंसा केली. नंतर सर्व कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करून, या तपासात मोलाची कामगिरी केलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून मीही निघालो.

घरी पोचल्यावर, गुरूंचे आभार मानण्यासाठी आधी मी सरळ देवघरात गेलो.
आपण जो निर्णय घेतो तो यशस्वी होतो, अशा वेळा पोलिसांच्या आयुष्यात क्वचितच येतात. त्या दिवशी आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर ठरला, म्हणून हे प्रकरण माझ्या कायमचं लक्षात राहिलं. यातला आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संघभावनेनं काम करणारी टीम. त्या टीमस्पिरिटमुळेच हा गुन्हा इतक्‍या लवकर उघडकीस येऊ शकला होता.
(उत्तरार्ध)

(या घटनेतल्या काही व्यक्तींची नावं बदलण्यात आलेली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com