अपहरण आणि खंडणी (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल?

शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं सोन्या-चांदीच्या व्यवसायातलं एक मोठं नाव. शहरातल्या अगदी मध्यवर्ती भागात, रेल्वे स्टेशन आणि मुख्य बस स्टॅंडपासून अगदी जवळ, भरपूर जागा, दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज्‌, पारदर्शक आणि चोख व्यवहार, दोन पिढ्यांचे संबंध यामुळे शहरातल्या दागदागिन्यांच्या इतर दुकानांपेक्षा ग्राहकांची पसंती शर्मा ज्वेलर्सला अधिक असायची. ही घटना घडली त्या वेळचे ओमप्रकाश शर्मा हे तिसऱ्या पिढीचे वारसदार दुकानाचे मालक होते. त्यांच्या आजोबांनी 60 वर्षांपूर्वी ही सराफी पेढी सुरू केली होती.

ओमप्रकाश हे गुरदासपूर शहरातले प्रतिष्ठित व्यावसायिक होते. एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती होती. शहरात होणाऱ्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. दुकानापासून जवळच सिव्हिल लाईन्स भागात नव्यानं विकसित झालेल्या पॉश भागात ते पत्नी शिल्पा, 12 वर्षांचा मुलगा अभिषेक, 10 वर्षांची कन्या गायत्री आणि आई शांतिदेवी यांच्यासह राहत असत. ओमप्रकाश यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.
शर्मा कुटुंबीयांचा दिवस रोज ठराविक पद्धतीनं सुरू व्हायचा आणि ठरलेल्या नित्यक्रमानुसार त्यांचा दिवस पुढं चालायचा. सकाळी सगळेचजण लवकर आवरून तयार असायचे. मुलांच्या शाळा असायच्या, ओमप्रकाश यांना दुकानात जाण्याची घाई असायची, तर शिल्पा आणि सासूबाई सकाळच्या नाश्‍त्याच्या आणि दुपारच्या जेवणाच्या तयारीत असायच्या. अभिषेकची शाळा घरापासून तशी जवळ होती. एक किलोमीटरभरही अंतर नव्हतं. तो रोज चालतच शाळेत जायचा. गायत्री दुसऱ्या शाळेत असल्यानं ती मात्र स्कूलबसनं जायची. ओमप्रकाश बरोबर नऊच्या ठोक्‍याला दुकान उघडायचे आणि मग रात्री आठ वाजेपर्यंत ते दुकानातच असायचे. दुपारच्या जेवणाचा डबा ठरलेल्या वेळी दुकानातच जायचा. एकंदर त्यांचं आयुष्य सुखा-समाधानाचं होतं; पण नशीब काही वेळा असा एखादा धक्का देतं की सुखा-समाधानानं, शांत आयुष्य जगणाऱ्या माणसांना आकस्मिक अशा प्रचंड संकटांना सामोरं जावं लागतं.
***

फेब्रुवारी 2005 च्या पहिल्या आठवड्यात एका दुपारी अभिषेक नेहमीच्या वेळी शाळेतून परतला नव्हता. शाळेतल्या काही कार्यक्रमामुळे त्याला उशीर झाला असेल अशा समजुतीनं त्याच्या आईनं आणि आजीनं काही वेळ वाट पाहिली; पण तासभर उलटून गेल्यावर मात्र त्यांनी ओमप्रकाश यांना शाळेत जाऊन बघून यायला सांगितलं. ते शाळेत पोचले तेव्हा शाळा बंद झाली होती. त्यांनी अभिषेकच्या वर्गशिक्षकांना फोन लावला तर त्यांनी दिलेली माहिती ऐकून ओमप्रकाश यांना धक्काच बसला. काय करावं ते त्यांना कळेनासं झालं. कारण, अभिषेक त्या दिवशी शाळेत गेलेलाच नव्हता. त्यांनी लगेच जवळच्या नातेवाइकांच्या आणि मित्रांच्या मदतीनं अभिषेकचा शोध सुरू केला. त्याचे मित्र, नातेवाईक जिथं म्हणून अभिषेक जाण्याची शक्‍यता होती अशा सगळ्या ठिकाणी शोधून झालं. पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनीही शोध सुरू केला.
त्या दिवशी सकाळी अभिषेकच्या वागण्यात काही वेगळं आढळलं होतं का? पोलिस अधिकाऱ्यांनी आणि नातेवाइकांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा उत्तर नकारार्थी मिळालं. अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल?
संध्याकाळी सहाच्या सुमारास शर्मांच्या घरातला फोन खणखणला. फोनवर कुणीतरी अनोळखी व्यक्ती होती. ओमप्रकाश यांच्याकडं फोन द्यावा, असं त्या व्यक्तीनं सांगितलं. ओमप्रकाश यांनी फोन घेतल्यानंतर, ""तुमचा मुलगा आमच्या टोळीच्या ताब्यात आहे. तो परत हवा असेल तर तुम्हाला दोन कोटी रुपये आम्हाला द्यावे लागतील. पैसे कसे आणि कुठं द्यायचे ते आम्ही पुन्हा फोन केल्यावर सांगू; पण तुम्ही जर पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हाल हाल करून त्याला मारून टाकू,'' अशी धमकी देऊन पलीकडच्या व्यक्तीनं फोन कट केला. पोलिसांनी लगेचच अपहरणाचा गुन्हा दाखल करून आणखी वेगानं तपास सुरू केला.
शर्मांच्या मुलाचं अपहरण झाल्याची आणि त्याच्या सुटकेसाठी खंडणी मागितल्याची बातमी वणव्यासारखी शहरात पसरली. अनेकांनी शर्मा यांच्या घरी जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या एका शाळकरी मुलाचं अपहरण झाल्यामुळे लोकांना एकंदर परिस्थितीबद्दल काळजी वाटत होती. त्यातल्या काहींनी पोलिसांविषयीची नाराजी व्यक्त केली, काहींनी पोलिसांविरुद्ध नारेबाजीही केली.
तिथले वरिष्ठ पोलिस अधीक्षक रोशनलाल नागरा आधीच कामाला लागले होते. ते एक अनुभवी व कार्यक्षम अधिकारी होते. शर्मांच्या सगळ्या लॅंडलाईन्स आणि मोबाईल फोन त्यांनी टेक्‍निकल सर्व्हेलन्सखाली आणले होते. आधी आलेल्या फोनचाही माग काढल्यावर तो एका सार्वजनिक बूथवरून केल्याचं निष्पन्न झालं होतं. पोलिस त्या बूथच्या मालकापर्यंत पोचले; पण "तो' फोन करणारा माणूस तरुण होता, पायीच आला होता, त्याचे कपडे चांगले होते आणि तो एकूण शिकला-सवरलेला शहरी माणूस दिसत होता यापलीकडं बूथच्या मालकाकडून फार काही माहिती मिळू शकली नाही.

वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडून हा सगळा तपशील ऐकल्यानंतर, मी त्यांना म्हणालो ः "या सगळ्या मुद्द्यांवर विचार करून मी थोड्या वेळानं तुम्हाला पुन्हा फोन करतो.' आणि "दरम्यान, स्थानिक पोलिसांनी येणाऱ्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवून सगळे कॉल रेकॉर्ड करावेत, फोनवरच्या संभाषणांतून तपासाला काही दिशा मिळते आहे का ते पाहत राहावं, कॉल्सच्या वेळा, टॉवर लोकेशन्स चेक करत राहावं' अशा सूचना मी नागरा यांना दिल्या. नागरा यांनी आधीच या पद्धतीनं तपास सुरू केला होता.
नागरा यांनी दिलेल्या तपशिलातले काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे होते. त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं.
पहिला मुद्दा ः त्या दिवशी अभिषेकच्या नेहमीच्या वागण्यात काही फरक नव्हता, याचा अर्थ अपहरणाची घटना त्याच्याही दृष्टीनं अनपेक्षित होती.
दोन ः शाळेचा रस्ता गजबजलेल्या बाजारपेठेतून जात होता. अशा भर वस्तीतून शाळेत जाणाऱ्या एखाद्या मुलाला, कुणालाही न कळता जबरदस्तीनं पळवून नेता येणं शक्‍य आहे का?
तीन ः ओळखीच्या कुण्या व्यक्तीनं त्याला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं त्याचं अपहरण केलं असेल का?
चार ः अभिषेक रोजच्यासारखाच घरातून निघून शाळेला गेला होता, हे नक्की होतं. जबरदस्तीनं म्हणा किंवा गोडीगुलाबीनं म्हणा झालेल्या या अपहरणाचे दुवे त्याच रस्त्यावर, त्याच वेळेत मिळायला हवे होते.
पाच ः अभिषेकबरोबर त्याचा कुणी मित्र किंवा वर्गातलं आणखी कुणी बेपत्ता आहे का, हे त्याच्या कुटुंबीयांना विचारायला हवं.
सहा ः आधी कधी तो असा गायब झाला होता का?
सातवा मुद्दा ः गुरुदासपूर शहरात याआधी असे काही गुन्हे घडल्याची माहिती आहे का?
सगळ्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याकडं एक आव्हान म्हणून पाहावं आणि प्रत्येकानं तपासासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत, असं वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगावं, अशी माझी इच्छा होती.
या सगळ्या मुद्द्यांविषयी मी वरिष्ठ पोलिस अधीक्षकांशी बोललो आणि त्यांना या प्रत्येक मुद्द्याचा पाठपुरावा करायला सांगितलं. गुन्ह्यांचा तपास करताना मी जो धडा शिकलो होतो तोच मी त्यांनाही सांगितला ः तपास यशस्वी करायचा असेल तर प्रचंड परिश्रम, पायपीट, फिरत राहणं आणि लोकांशी प्रत्यक्ष बोलणं याला पर्याय नाही. अभिषेक ज्या रस्त्यावरून ज्या वेळी शाळेत जात असे त्या रस्त्यावर, त्याच वेळी वरिष्ठ अधीक्षकांनी स्वतः साध्या कपड्यात फेरफटका मारावा आणि रोज त्या वेळी त्या रस्त्यावर असणाऱ्या लोकांशी बोलावं. त्या दिवशी लोकांना काही वेगळं जाणवलं होतं का, त्यांनी काही वेगळी घटना पाहिली होती का हे जाणून घ्यावं, असं मला वाटत होतं. रस्त्यांवर नेहमी असणारे काही लोक असतात. इस्त्रीवाले, केशकर्तनालयवाले, चहावाले, भाजीपाला विकणारे, पानाच्या ठेल्यांवर बसणारे, वॉचमन आणि भिकारीही. अट फक्त एकच होती; हे काम वरिष्ठ अधीक्षकांनी स्वतःच करायला हवं, दुसऱ्या कुणावर ते सोपवून चालणार नाही. एखादा टीम लीडर जेव्हा स्वतः एखाद्या कामात उतरून नेतृत्व करतो तेव्हा त्याला "नशिबाच्या देवी'ची साथ मिळतेच मिळते असा माझा अनुभव आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर काही ना काही दुवा मिळतोच. ""त्या रस्त्यावरून फेरफटका मारून आल्यावर मला फोन करा,'' असं मी नागरा यांना सांगितलं.

वरिष्ठ अधीक्षकांचा फोन आला तेव्हा त्यांचा स्वर उत्साही होता. ""सर, रस्त्यावर खूप गर्दी होती. अभिषेकसारख्या धट्ट्याकट्ट्या मुलाला त्या रस्त्यावरून कुणी जबरदस्तीनं उचलून नेईल आणि कुणालाच ते कळणार नाही हे संभवत नाही, हे निःसंशय. मी जवळजवळ प्रत्येकाशी बोललो; पण कुणाकडूनच फार काही माहिती मिळाली नाही. मात्र, एका बॅंकेच्या रखवालदारानं एका पांढऱ्या मारुती गाडीतून एका मुलाला ओरडताना ऐकल्याचं मला सांगितलं. "मिकी अंकल, मुझे उतार दो, मेरा स्कूल आ गया,' असं तो मुलगा ओरडत होता; पण कार न थांबता पुढं गेली. ही माहिती महत्त्वाची होती. तीवर काम करायला हवं होतं. त्यांच्या प्रयत्नांबद्दल मी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची प्रशंसा केली आणि त्यांना साक्षीदारांकडं अधिक चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.

शर्मांच्या लॅंडलाईनवर खंडणी मागणारा आणखी एक फोन आला होता, अशीही माहिती नागरा यांनी दिली. हा कॉल मोबाईलवरून केला गेला होता. फोनवर बोलणाऱ्या माणसानं धमकी देऊन पुन्हा पैशाची मागणी केली होती; पण पोलिसांनी सुचवल्यानुसार, त्यांनी शर्मा यांना अभिषेकशी मात्र बोलू दिलं नाही. ज्या क्रमांकावरून फोन आला होता, त्याचा तपास केल्यावर ते सिमकार्ड नवं असल्याचं आणि बनावट नावानं घेतल्याचे आढळून आलं. त्या दिशेनं आणखी तपास करणं शक्‍य नव्हतं; पण त्या रखवालदारानं दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची होती. अभिषेकच्या ओळखीच्या कुणीतरी त्याला शाळेत जाण्यासाठी लिफ्ट देऊन त्याचं अपहरण केलं होतं. आता या दिशेनं तातडीनं तपास व्हायला हवा होता.
नागरा हे अभिषेकच्या वडिलांशीच बोलले ः
""मिकी, पिकी, रिक्की, सिक्की अशा काही नावाचं कुणी तुमच्या माहितीत आहे का?''
""हो सर. मोहकमसिंग ऊर्फ मिकी नावाचा आमचा एक अगदी जवळचा मित्र आहे. काल तो दिवसभर आमच्याच घरी बसून होता. काल खूप धावपळ केली त्यानं. माझ्या मुलाला पळवून नेण्यात त्याचा हात असूच शकणार नाही. मी अगदी खात्रीनं सांगतो तुम्हाला. तो आमच्या कुटुंबातला असल्यासारखाच आहे,'' ते म्हणाले.
""ठीक आहे. तुम्ही जे सांगितलंत त्यावर आमचा विश्वास आहे; पण आपलं हे बोलणं कुणालाही सांगू नका,'' वरिष्ठ अधीक्षक म्हणाले व शर्मा यांनी ते मान्य केलं.
नागरा यांनी अनेक कर्मचाऱ्यांना साध्या कपड्यात राहून मिकीच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सांगितलं. तो नेहमी मोटरसायकल वापरायचा, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी काही मोटरसायकलस्वारांवरही सोपवण्यात आली. एकच माणूस सतत पाळतीवर राहिला तर मिकीला संशय येईल म्हणून वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी दिली गेली. कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं त्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती.
खंडणी मागणारे फोन सुरूच होते; पण पैसे कसे द्यायचे याबद्दल अपरहरणकर्ते निश्‍चित असं काहीच सांगत नव्हते. "मुलाशी बोलणं करून द्यावं, मग मी पैसे देईन,' असं अपहरणकर्त्यांना सांगावं असं आम्ही अभिषेकच्या वडिलांना सांगितलं होतं.
"बोलणं करू देतो', असं फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं होतं; पण अजूनही अभिषेकशी बोलणं झालं नव्हतं.
दरम्यान, मिकीच्या हालचालींवर आमचं लक्ष होतंच. आम्हाला संशय आला, कारण तो आधी एका उपनगरात गेला. मग एका फार्महाऊसवर गेला. ते फार्महाऊस एका एनआरआयच्या मालकीचं होतं. फार्महाऊसचा मालक
दोन-तीन वर्षांनी एकदाच तिथं येत असे. अभिषेकला तिथं लपवलं असावं असा संशय आल्यानं नागरा यांनी मिकीला ताब्यात घ्यायचं ठरवलं. त्यानुसार, एक पोलिस टीम त्या फार्महाऊसवर पाठवण्यात आली. मिकीबरोबर सुरजितसिंग नावाचा एक इसम आणि त्याची पत्नी रूबिना असे दोघे तिथं सापडले. रूबिना शिक्षिका होती. ती अभिषेकची ट्यूशन घ्यायला त्याच्या घरी जात असे. फार्महाऊसवर अर्धवट जळालेली अभिषेकची स्कूलबॅग आणि पूर्णपणे फाटून गेलेलं शाळेचं ओळखपत्रही सापडलं.
वरिष्ठ अधीक्षकांनी मोहकमसिंग, सुरजितसिंग आणि त्याची पत्नी रूबीना यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं चौकशी सुरू केली. तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलिस टीम त्यांची चौकशी करत होत्या.
(पूर्वार्ध)
(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र, काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडं आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com