अपहरण, 'फिरौती' आणि खून (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क
Sunday, 23 June 2019

चांगल्या परिस्थितीत राहणारे सुशिक्षित लोक पैशाच्या लोभानं गुन्हेगारीच्या मार्गावर किती सहजपणे पाऊल ठेवतात हे पाहून अनेकांना धक्का बसला होता. आपण कधीच पकडले जाणार नाही अशी मिकी, रुबिना आणि सुरजितची खात्री होती; पण गुन्हा करताना प्रत्येक पातळीवर त्यांनी त्यांच्या खुणा सोडल्या होत्या.

चांगल्या परिस्थितीत राहणारे सुशिक्षित लोक पैशाच्या लोभानं गुन्हेगारीच्या मार्गावर किती सहजपणे पाऊल ठेवतात हे पाहून अनेकांना धक्का बसला होता. आपण कधीच पकडले जाणार नाही अशी मिकी, रुबिना आणि सुरजितची खात्री होती; पण गुन्हा करताना प्रत्येक पातळीवर त्यांनी त्यांच्या खुणा सोडल्या होत्या.

मिकी, सुरजितसिंग आणि रुबिना या तिघांना ताब्यात घेऊन वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तिघांची विचारपूस सुरू केली. दरम्यान, एक पोलिस टीम त्या फार्महाउसची झडती घेत होती. अभिषेकची जळालेली स्कूलबॅग ज्या खोलीत सापडली होती, त्याच खोलीतल्या एका ड्रॉवरमध्ये बेशुद्धीच्या इंजेक्‍शनची दोन बिलं सापडली. बिलांवरून ती इंजेक्‍शनं एका स्थानिक केमिस्टकडून नुकतीच खरेदी केल्याचं दिसत होतं. जळालेली स्कूलबॅग आणि अभिषेकच्या शाळेच्या फाटून गेलेल्या ओळखपत्राविषयी मिकी आणि इतर दोघं काहीच बोलत नव्हते. काही वेळानं रुबिनाचा मुखवटा गळून पडला आणि ती सगळा घटनाक्रम सांगायला तयार झाली. तिच्या बोलण्यातून अपहरण, "फिरौती' आणि हत्येची, दंतकथा वाटावी अशी एक कहाणी समोर येत गेली. अनेक गुन्ह्यांच्या तपासाचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठीही तो सगळा घटनाक्रम धक्कादायक होता.
रुबिना तिच्या पतीबरोबर गुरदासपूरच्या एका उपनगरात राहायची.
सुरजितसिंगशी वर्षभरापूर्वीच तिचं लग्न झालं होतं. एका खासगी शाळेत ती पार्टटाईम शिक्षिका होती. अभिषेकबरोबर आणखी काही मुलांच्या ट्यूशन्सही ती घेत असे. सुरजितसिंग एका खासगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला होता. दोघं मिळून महिन्याला चांगले पैसे मिळवत असले तरी मिळणाऱ्या पैशाबद्दल रुबिना फारशी समाधानी नव्हती. मनासारखे पैसे खर्च करता आले पाहिजेत, अशी तिची इच्छा होती आणि असा खर्च करण्यासाठी पैसा कसा कमवायचा याचा तिला फारसा विधिनिषेध नव्हता. सुरजितसिंगही तसा बेदरकारच होता. जास्त पैसे कमावण्यासाठी एखाद्या वेळी कायदा मोडायचीही त्याची तयारी असायची.

अभिषेकच्या ट्यूशनमुळे रुबिनानं शर्मा कुटुंबीयांची श्रीमंती जवळून पाहिली होती. शर्मांच्या सांपत्तिक स्थितीबद्दल बऱ्याचदा तिला द्वेष वाटायचा. "काही लोकांना जगभरचा पैसा मिळतो, ते भाग्यवान असतात आणि काही जणांना जगण्यासाठी, दोन वेळच्या जेवणासाठीही खूप कष्ट करावे लागतात, दुःख भोगावं लागतं, असं का असतं?' असा प्रश्‍न ती नेहमी स्वत:लाच विचारायची. याबाबतीत तिचा नवराही तिच्याशी सहमत असायचा. भरपूर पैसे मिळवून ऐशोआरामाचं आयुष्य जगण्याची त्याचीही इच्छा होती; पण भरपूर पैसा कमवायचा म्हटला की त्यांच्या मनात काहीतरी गुन्हेगारी स्वरूपाचे विचारही यायचे. मिकी उर्फ मोहकमसिंग आणि सुरजितसिंग चांगले मित्र होते. एकदा गप्पागप्पांमध्ये मिकीलाही खूप पैसा कमवायची इच्छा असल्याचं सुरजितसिंगच्या आणि रुबिनाच्या लक्षात आलं. पैशासाठी काहीही करण्याची, अगदी अमली पदार्थांची तस्करी करण्यापासून ते एखादा जुगारअड्डा चालवण्यापर्यंत कोणतंही बेकायदेशीर काम करायचीही मिकीची तयारी होती.
बऱ्याचदा त्यांच्या भेटींमध्ये अशा काही मार्गानं सहजपणे भरपूर पैसा कमावण्याच्या शक्‍यतेवर चर्चा व्हायची. अशाच एका चर्चेत एखाद्या श्रीमंत व्यक्तीचं अपहरण करण्याबद्दल त्यांनी खूप विचार केला; पण पकडले जाण्याची भीती असल्यानं ती चर्चा तिथंच राहिली. एक दिवस मिकीनं शर्मा ज्वेलर्सच्या मालकाच्या मुलाचं अपहरण करण्याचा विचार मांडला. 12 वर्षांचा तो मुलगा त्यांच्या जाळ्यात सहज फसण्याजोगा होता. रुबिना अभिषेकची ट्यूशन घेत असल्यानं तिला त्या कुटुंबाची माहिती होती. आणखी माहिती मिळवणं आणि परिस्थितीचा अंदाज घेणं तिला सहज शक्‍य होतं. मिकीला कुटुंबातले सगळेच ओळखत असल्यानं शाळेत जाताना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं अभिषेकला कारमध्ये बसवलं तर कुणाला शंकाही आली नसती. शिवाय, अभिषेकनं त्याचं ऐकलंही असतं. प्रश्न होता तो अभिषेकला पळवल्यानंतर कुणालाही संशय येणार नाही अशा बेतानं त्याला ठेवण्यासाठी जागा मिळवण्याचा. त्या परिसरातल्या त्यांच्या वावरण्याबद्दल कुणाला शंका येऊनही चालणार नव्हतं. त्या त्रिकुटानं मग त्यांचा तो अघोरी प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी थोडी तयारी करायचं ठरवलं. अभिषेक त्या सगळ्यांना ओळखत होता, त्यामुळे "फिरौती' घेतल्यानंतर त्याला सोडून देणं शक्‍य नव्हतं. ""त्यात काय, आपण संपवून टाकू त्याला,'' मिकी म्हणाला ः ""आपण त्यांचे (अभिषेकच्या कुटुंबीयांचे) मित्र आहोत. आपण त्यांच्याबरोबरच राहू, त्यांचं सांत्वन करू. पोलिसांविरुद्ध मोर्चे काढू. कुणीही आपल्यावर संशय घेणार नाही.''

"फिरौती'साठी अपहरण करण्यावरच हे प्रकरण थांबणार नव्हतं. त्याबरोबर खुनासारखा गंभीर गुन्हाही घडणार होता; पण ते तिघंही झटपट पैसे कमावण्यासाठी इतके उतावीळ झाले होते की आपला प्लॅन अमलात आणण्यासाठी लागेल ते सर्व काही करण्याचं ठरवून ते तिघं कामाला लागले. अभिषेकला उचलल्यावर त्याला ठेवण्यासाठी त्यांना एक सुरक्षित जागा (सेफ हाऊस) हवं होतं. अभिषेकला तिथं नेण्यासाठी एक कार लागणार होती. याबरोबरच प्लॅनमध्ये काही त्रुटी राहू नयेत याचीही काळजी घ्यायची होती. मग त्यांनी अभिषेक ज्या रस्त्यानं शाळेत जायचा-यायचा त्या रस्त्याचा, त्याच्या येण्या-जाण्याच्या वेळांचा अभ्यास केला. सगळ्या कटाबद्दल गुप्तता बाळगणं आणि एकमेकांबरोबर समन्वय ठेवणं आवश्‍यक होतं. लिफ्ट देऊन अभिषेकचं अपहरण करायचं, कुणालाही संशय न येऊ देता त्याला सेफ हाउसमध्ये घेऊन जायचं, कुणाच्याही नकळत त्याला तिथं ठेवायचं, फोन करून "फिरौती' मागायची, पैसे घ्यायचे, प्रत्येकानं शर्मांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करायचं, पैसे मिळाल्यावर अभिषेकची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावायची असा काहीसा त्यांचा प्लॅन होता.

मिकीनं एका मित्राकडून काही दिवसांकरता वापरायला म्हणून गाडी मिळवल्याचं रुबिनानं पोलिसांना सांगितलं. अपहरणाच्या दिवशी तिचा नवरा गाडीत मागच्या सीटवर बसला होता. मिकीनं अभिषेकला लिफ्ट दिल्यावर अभिषेक पुढं मिकीच्या बाजूला बसला. शाळेजवळ कार न थांबल्यानं अभिषेकनं ओरडाआरडा करायला सुरवात केली, त्याबरोबर मागं बसलेल्या सुरजीतनं त्याचं तोंड दाबून त्याला गप्प केलं. अभिषेक काहीतरी प्रतिकार करेल हे गृहीत धरून मिकीनं बेशुद्धीचं इंजेक्‍शन तयार ठेवलं होतं. थोड्या झटापटीनंतर अभिषेक बेशुद्ध झाला आणि त्यांनी त्याला सेफ हाउसमध्ये आणलं. हे फार्महाऊस मिकीच्या एका एनआरआय नातेवाइकाचं होतं. त्यांच्या अनुपस्थितीत मिकी त्याची देखभाल करत असे. थोड्या वेळानं अभिषेक शुद्धीवर येतोय असं पाहून मिकीनं त्याला बेशुद्धीच्या औषधाचा आणखी एक डोस दिला. मग मिकीनं बाहेर जाऊन शर्मांच्या घरी फोन केला; पण "फिरौती'ची रक्कम कशी घ्यायची ते त्याला ठरवता येत नव्हतं. शर्मांना रात्री एका निर्जन स्थळी पैसे घेऊन बोलवायचं आणि सुरजितनं जाऊन पैसे घ्यायचे असं त्यांनी ठरवलं; पण सुरजितला एकट्याला जायची भीती वाटल्यानं तो बेत बारगळला. गोष्टी आता त्या त्रिकुटानं ठरवल्याप्रमाणे घडत नव्हत्या. इकडं अभिषेक थोड्या थोड्या वेळानं शुद्धीवर येत असल्यानं मिकीनं त्याला बेशुद्धीच्या औषधाचा एक मोठा डोस दिला आणि हाच डोस प्राणघातक ठरला.

अभिषेक मरण पावल्याचं पाहून त्यांनी फार्महाउसवर सापडतील ती
कुदळी-फावडी घेऊन अभिषेकचा मृतदेह 35 किलोमीटरवर आदमपूर गावाजवळच्या एका निर्जन ठिकाणी नेऊन पुरला. त्या रात्री प्रचंड पाऊस पडत होता. ते सकाळी फार्महाउसवर परतले तेव्हा चिखलानं माखून गेले होते.
अभिषेकच्या मृत्यूमुळे त्यांची मूळची योजना फिस्कटली होती. मिकी "फिरौती'साठी शर्मांना फोन करतच होता; पण पैसे कसे आणि कुठं घ्यायचे ते त्याला ठरवता येत नव्हतं. शर्मा म्हणत होते त्यानुसार त्यांचं आणि अभिषेकचं बोलणं करून देणंही आता शक्‍य नव्हतं. त्यातच पोलिसांना मिकीचा संशय आल्यानं त्यांनी मिकीचा पाठलाग सुरू केला आणि तो पाठलाग त्यांना फार्महाउसपर्यंत घेऊन गेला. फार्महाउसवर
पोलिसांना अभिषेकची स्कूलबॅग आणि आयकार्ड सापडलं आणि गुन्हा उघडकीस आला. चिखलानं माखलेली एक पांढरी मारुती कारही फार्महाउसमध्ये सापडली. आता रुबिनाचा बांध फुटला होता; अशा गुन्हेगारी कटात सामील होऊन अभिषेकसारख्या एका निष्पाप मुलाला मारून टाकल्याबद्दल ती स्वतःलाच दोष देत होती. या सगळ्यादरम्यान इतर दोघांकडंही विचारपूस सुरू होती. त्यांनीही आता त्यांच्या कृत्याची कबुली द्यायला सुरवात केली होती. अभिषेकचा मृतदेह जिथं पुरला होता ती जागा त्यांनी पोलिसांना दाखवली. त्या जागेचा पंचनामा वगैरे सोपस्कार करण्यात आले. मृतदेह सापडला त्या ठिकाणचे मातीचे नमुने घेण्यात आले. आरोपींचे चपला-बूट, गाडीचे टायर, खड्डा खणण्यासाठी वापरलेल्या कुदळी-फावड्यांवर सापडलेल्या मातीशी ताडून पाहण्यासाठी ते नमुने महत्त्वाचे होते. या सगळ्या कारवाईचं पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलं होतं. अभिषेकच्या शरीरात गेलेल्या ऍनेस्थेशियाचं प्रमाण शोधण्यासाठी मृतदेहाची रासायनिक तपासणी आवश्‍यक होती. त्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. "फिरौती' मागणारे फोन पोलिसांनी रेकॉर्ड केले होते, त्यामुळे आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले.
वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन अपहरणाच्या प्रकरणाचा तपास लागल्याचं, अभिषेकची हत्या झाल्याचं व मृतदेह सापडल्याचं बातमीदारांसमोर उघड केलं. गुरदासपूरमध्ये कित्येक दिवस या प्रकरणाची चर्चा होत राहिली. चांगल्या परिस्थितीत राहणारे सुशिक्षित लोक पैशाच्या लोभानं गुन्हेगारीच्या मार्गावर किती सहजपणे पाऊल ठेवतात हे पाहून अनेकांना धक्का बसला होता. आपण कधीच पकडले जाणार नाही अशी मिकी, रुबिना आणि सुरजितची खात्री होती; पण गुन्हा करताना प्रत्येक पातळीवर त्यांनी त्यांच्या खुणा सोडल्या होत्या. मित्राची मारुती कार घेण्याच्या घटनेपासून तपास अधिकारी पुरावे गोळा करत गेले. त्या गाडीचा अभिषेकच्या अपहरणासाठी झालेला वापर, अभिषेकचा मृतदेह जिथं पुरला होता तिथल्या मातीचे नमुने गाडीच्या टायरवर, आरोपींच्या बुटांवर सापडलेल्या मातीशी जुळले. ऍनेस्थेशिया देण्यासाठी खरेदी केलेली इंजेक्‍शनं थेट मिकीकडं बोट दाखवत होती. त्या केमिस्ट दुकानदारानं मिकीला ओळखपरेडमध्ये ओळखलं होतं, तसंच पीसीओच्या मालकानंही मिकीला ओळखलं होतं. टेलिफोनवर पाळत ठेवल्यानंही या कटाचे आणखी काही धागेदोरे हाती लागले. प्रत्यक्षात मिकी, रुबिना आणि सुरजित या त्रिकुटानं स्वतःभोवतीच एक जाळं विणलं होतं. प्रत्येक पायरीवर ते स्वतःच त्यात अडकत गेले.

त्या त्रिकुटानं आपल्या कृत्याचा पाढा अभिषेकच्या कुटुंबीयांसमोरही वाचला होता. अभिषेकच्या आई-वडिलांच्या दुःखाला पारावार नव्हता. पोलिसांनाही फार वाईट वाटत होते. गुन्ह्याचा तपास लागला होता; पण अभिषेकचा जीव वाचू शकला नव्हता.
खूप मोठी प्रक्रिया अजूनही शिल्लक होती. तिघंही आरोपी न्यायालयात आपला जबाब नाकारणार अशी आमची अटकळ होती. ही शक्‍यता लक्षात घेऊन आम्ही कायदेशीर लढाईसाठी बरीच तयारी केली होती. पोटाची खळगी भरण्याकरता एखाद्या वेळी गुन्हेगारीच्या मार्गावर पाऊल पडू शकते; पण इथं या तिघांसमोर असा काहीच प्रश्न नव्हता. त्यांचं राहणीमान चांगलं होतं; पण केवळ पैशाच्या लोभानं त्यांना तुरुंगाची वाट दाखवली होती.

या प्रकरणातली कायदेशीर लढाई अत्यंत आव्हानात्मक असणार होती. आरोपींनी स्वत:च्या बचावासाठी उत्तम कायदा-सल्लागारांची मदत घेतली होती. आम्हीही आमच्या बाजूनं केसची तयारी केली होती. या प्रकरणाची सुनावणी, सादर केलेले पुरावे, ते नाकारण्याचा प्रयत्न हीदेखील एक स्वतंत्र कहाणी आहे. तिच्याविषयी पुढच्या अंकात. तोपर्यंत गुडबाय.
(उत्तरार्ध...क्रमशः)
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडं आहेत.)
(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र, काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s s virk write in and out crime article in saptarang