#SaathChal जावे पंढरीसी आवडे मानसी | (महादेवमहाराज राऊत)

महादेवमहाराज राऊत
रविवार, 22 जुलै 2018

महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक परंपरा वारीत एकत्र येतात. कोणताही प्रांतीय अभिनिवेश वारीमध्ये उरत नाही. एकसंघ महाराष्ट्राचे दर्शन केवळ वारीमध्ये घडते. कोणताही जात, धर्म, लिंग, वय भेद येथे पहायला मिळत नाही. वारीत श्रीमंत, गरीब सोबत चालतात. त्यामुळं समाजातली सामाजिक दरी कमी होण्यास मदत होते.

शास्त्रांमध्ये दैवताच्या स्थानाकडं जाणं हा भक्तीचा एक प्रकार सांगितला आहे. वारी म्हणजे परमात्म्यानं दिलेल्या कर्मेंद्रिंयांची साधना होय.

दिली इंद्रिये हात पाय कान
डोळे मुख बोलावया वचन |

महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक परंपरा वारीत एकत्र येतात. कोणताही प्रांतीय अभिनिवेश वारीमध्ये उरत नाही. एकसंघ महाराष्ट्राचे दर्शन केवळ वारीमध्ये घडते. कोणताही जात, धर्म, लिंग, वय भेद येथे पहायला मिळत नाही. वारीत श्रीमंत, गरीब सोबत चालतात. त्यामुळं समाजातली सामाजिक दरी कमी होण्यास मदत होते.

शास्त्रांमध्ये दैवताच्या स्थानाकडं जाणं हा भक्तीचा एक प्रकार सांगितला आहे. वारी म्हणजे परमात्म्यानं दिलेल्या कर्मेंद्रिंयांची साधना होय.

दिली इंद्रिये हात पाय कान
डोळे मुख बोलावया वचन |

जेणि तू जोडसी नारायण
नाचे जिवपण बहुरोग|

भगवंतांनी दिलेली कर्मेद्रिंयं त्याच्याकडं सर्वार्थानं घेऊन जाणं म्हणजे वारी होय. या नेण्यामध्ये पाय हे कर्मेंद्रिय मुख्य आहे. त्यामुळं जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत वारीतून त्याच्याकडं चालत जावं, अशी आज्ञा वारकरी संतांनी दिली आहे. जसा इमारतीचा पाया भक्कम असला, की इमारतीला धोका राहत नाही, त्याप्रमाणं पाय एकदा परमात्म्याकडे वळले, की संपूर्ण जीवनयात्रा योग्य मार्गानं वाटचाल करते. मनुष्याच्या अंतःकरणात मल, विक्षेप आणि आवरण असे तीन दोष असतात. मल म्हणजे पाप करण्याची वासना, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता आणि आवरण म्हणजे अनात्मा पदार्थाच्या ठिकाणी मी व माझी बुद्धी या तीन दोषांचं निराकरण करण्याचं काम वारी करते. या तीन दोषांच्या निराकरणाचे मार्ग म्हणजे निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि आत्मज्ञान होय. यापैकी विक्षेप या दोषाची निवृत्ती निष्काम उपासनेनं होत असते. ही उपासनासुद्धा विविध प्रकारची आहे. वारी हे एक उपासना अंग आहे. शास्त्रात पाच प्रकारची उपासना सांगितली आहे. अभिगमन, उपादान, इज्जा, स्वाध्याय आणि योग यांचा त्यात समावेश आहे. रामानुजांच्या दर्शनामध्ये या सर्वांच्या व्याख्या दिल्या आहेत. या पाचपैकी अभिगमन म्हणजे देवतेच्या स्थानाकडं जाणं. त्या मार्गाशी समार्जन करणं होय. या पाच उपासनांमध्ये अभिगमन या साधनेचा समावेश वारीमध्ये होतो.

र्तीर्थयात्रे सुखे जाऊ
वाचे विठ्ठल नाम घेऊ |

संतासंगे सेऊ
वासुदेव धनिवरी |

काया-वाचा-मनानं सावधानतापूर्वक देवतेच्या घरी जाणं याला वारी असं म्हणतात. आळंदी-पंढरपूरची वारी म्हणजे केवळ वारी नव्हे, तर देवाच्या दर्शनासाठी काशी, प्रयाग यांसारख्या तीर्थक्षेत्रांना जाणं म्हणजे ही वारी होय असा तिचा व्यापक अर्थ आहे. पंढरीची वारी ही प्राचीन काळापासून सुरू आहे. भगवान शंकर हे वारीचे पहिले वारकरी आहेत. समस्त देवगण हे वारकरी नसून, ते वारीचे सेवेकरी आहेत. चित्ताच्या ठिकाणी असलेल्या आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक अशा तीन प्रकारच्या दुःखाची निवृत्ती वारीत होते. प्रत्येक मनुष्य या तीन दुःखानं पिडीत असतो. नवविधा भक्तीतली आत्मनिवेदन भक्ती हा भक्तीप्रकार देहाचा अहंकार किंवा देहाच्या संबंधानं असणाऱ्या सर्व गोष्टींबद्दलचा अहंकार नष्ट करण्यासाठी वारी हे प्रमुख साधन आहे. वारीमध्ये सर्वजण "लागती एकएका पायी रे' या न्यायानं वारीतल्या प्रत्येकामध्ये पांडुरंगाचं दर्शन करून पुन्हा परस्परासमोर नतमस्तक होतात.

पंढरीसी नाही कोणा अभिमान
पाया पडे जन एकमेका |

कोणत्याही मानसिक दुःखाचं कारण अहंकारच असते. म्हणून मानसिक दुःखाच्या निराकरणासाठी वारी आधुनिक काळात अधिक उपयुक्त आहे.

जावे पंढरीसी आवडे मानसी
कधी एकादशी आषाढी ये |

अशी प्रत्येक वारकऱ्याची अवस्था असते. वारीत समाजसंघटन घडत असतं. समाजसंघटनातून सहकार्याची भावना निर्माण होते आणि सहकार्यातून राष्ट्रउभारणीसाठी सहकार्य होतं. वारी हे वैयक्तिक आणि सार्वजनिक उद्धाराचं साधन आहे. वारीत वारकरी सुविधांची अपेक्षा करत नाहीत. अल्प सुविधांमध्ये कसं जगावं, याचं प्रत्यक्ष दर्शन वारीत घ्यायला मिळतं. कोणतीही परिस्थिती आली, तर तक्रार न करता केवळ आनंद घ्यायचा हे वारी शिकवते. त्यामुळं आयुष्यात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचं बळ वारीमुळं येतं. सध्या आत्महत्येचं वाढलेलं प्रमाण आणि लौकिक जगातल्या काही अपेक्षांमुळं आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घटना घडत आहेत. त्याला वारी हा मुख्य उपाय ठरू शकतो. परस्परांचं दुःख एकमेकांच्या सानिध्यात आल्यामुळं वारीत समजतं. केवळ आपणच जगात दुःखी नाही, ही भावना मनात वाढते. त्यामुळं वारीत जगण्याची प्रेरणा मिळते. संसारातला आनंद हाच केवळ आनंद आहे असं नव्हे, तर अन्यही काही आनंदाची ठिकाणं आहेत, याची प्रचिती वारीत येते. हीच प्रचिती आयुष्य जगण्यास प्रेरक ठरत असते. वारीमध्ये प्रत्येकजण सद्‌भावनेनं येत असतो. कदाचित प्रत्येकाचा येण्याचा उद्देशही वेगवेगळा असू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं वारी चांगली असते, असं समजूनही काही लोक वारीमध्ये येत असतात. शारीरिक दुःख निवारणाची ताकद वारीमध्ये आहे.

महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक परंपरा- मराठवाडी, पश्‍चिम महाराष्ट्रीय, वैदर्भीय, कोकणी अशा सर्व संस्कृती- वारीत एकत्र येतात. कोणताही प्रांतीय अभिनिवेश वारीमध्ये उरत नाही. एकसंघ महाराष्ट्राचं दर्शन केवळ वारीमध्ये घडते. कोणताही जात, धर्म, लिंग, वय भेद इथं पाहायला मिळत नाही. वारीत श्रीमंत, गरीब सोबत चालतात. त्यामुळं समाजातली सामाजिक दरी कमी होण्यास मदत होते. अशा विविध अंगानं विचार केल्यास वारी हा केवळ "इव्हेंट' नसून ती सामाजिक चळवळ आहे. अनादीकाळापासून अनंतकाळापर्यंत वारी उपयुक्त आणि उपकारकच ठरणार आहे, यात शंका नाही. त्याला काळाचा कोणताही बाध असणार नाहीत. ती प्रत्येक काळात समाजाशी समरूप असेल.
(शब्दांकन ः शंकर टेमघरे)

Web Title: SaathChal mahadomaharaj raut write article in saptarang