...म्हणून मुंडेंनी भगवानगड सोडून सावरगाव बनविले सत्तेचे केंद्र

सचिन बडे
Wednesday, 2 October 2019

गोपीनाथ मुंडे यांचे 2014 मध्ये आकस्मित निधन झाले. त्यानंतर गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्रींनी गडावर दसऱ्यासाठी बांधलेले "स्टेज' पाडत कोणत्याही राजकीय नेत्यास गडावर बोलण्यास बंदी घातली. त्यामुळे मुंडे यांच्या वारस पंकजा मुंडे यांनाही बोलण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, पंकजा मुंडे यांना राजकारणातील आपले स्थान बळकट करण्यासाठी या मेळाव्याची गरज होती.

पुणे : दसरा हा भगवानगडाचा स्थापना दिवस. 1958 साली या दिवशी गडावर पारंपरिक पद्धतीने भगवान बाबा यांनी मेळाव्यास सुरवात केली. त्यांच्या पश्‍चात गडाचे महंत भीमसेन महाराज यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. या दिवशी गडावर राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक येऊ लागले. यात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे हे देखील होते.

कालांतराने भगवान गडाचा दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरणच तयार झाले. परिणामी, नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, मुंबईत शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा मेळावा आणि भगवान गडावर गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळावा, हे समीकरण महाराष्ट्रात तयार झाले. भगवान गडावरील मेळाव्यात मुंडे यांनी राजकीय भाष्य करणे कायम टाळले, तसेच मुंडे यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय नेत्यास गडावर बोलण्याची अनुमती कधी देण्यात आली नाही. राजकारणातील मुंडे यांच्या वजनामुळे भगवानगडास देखील मोठे वजन प्राप्त झाले. तसेच याच दरम्यान, गडाच्या विकासास गतीही मिळाली. 2014 पर्यंत राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांंपैकी भगवान गड हे एक ठिकाण तयार झाले होते.

गोपीनाथ मुंडे यांचे 2014 मध्ये आकस्मित निधन झाले. त्यानंतर गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्रींनी गडावर दसऱ्यासाठी बांधलेले "स्टेज' पाडत कोणत्याही राजकीय नेत्यास गडावर बोलण्यास बंदी घातली. त्यामुळे मुंडे यांच्या वारस पंकजा मुंडे यांनाही बोलण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, पंकजा मुंडे यांना राजकारणातील आपले स्थान बळकट करण्यासाठी या मेळाव्याची गरज होती. मात्र, नामदेव शास्त्रींच्या विरोधामुळे पंकजा यांनी गडाच्या पायथ्यालाच मेळावा घेतला. पुढे वर्षभर गडावर मेळाव्यासाठी नामदेव शास्त्रींना राजी करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यामध्ये कोणालाही यश आले नाही.

दरम्यान, परळी येथे "गोपीनाथ गडा'ची स्थापना पंकजा यांनी केली. मात्र, दसरा मेळाव्याचे महत्त्व त्यांना माहीत होते, त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत मेळावा घेणे गरजेचे होते. त्यातच भगवान बाबांचे जन्म गाव असणारे सावरगाव (घाट) (पाटोदा, जि. बीड) येथील नागरिकांनी मेळावा सावरगावत घेण्याची मागणी मुंडे यांच्याकडे केली. 2017 मध्ये दसऱ्याच्या आदल्या दिवशी सावरगाव येथे मेळाव्या घेण्याचे जाहीर केले, तरी लाखोंच्या संख्येने लोक जमले होते. याउलट भगवान गडावर ही संख्या पंचवीस हजाराच्या आसपास होती. या वेळी 100 कोटींचा निधी देऊन भगवान बाबा यांचे भव्य स्मारक बनविण्याची घोषणा या वेळी मुंडे यांनी केली आणि पुढील वर्षभरात सावरगाव येथे भगवानबाबा यांचे स्मारक उभे राहिले. 2018 च्या दसरा मेळाव्यात भगवान बाबांच्या 25 फुटी मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथे भगवान भक्ती गड स्थापन करून भगवानगडाला नवीन पर्याय निर्माण केला. त्यास निधी उपलब्ध करून तिथे विकास कामे केली, गडाची उभारणी केली. परिणामी, मागील अनेक वर्षापासून सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा आणि केंद्रस्थान प्राप्त झालेला भगवानगड मागील दोन वर्षापासून महत्त्व हीन झाला असल्याचे चित्र आहे. परंतु, दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर बाबाच्या दर्शनाला भाविक येत असतात. पण, पूर्वी भगवानगडाला जेवढे महत्त्व होते, तेवढे आता राहिले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Bade writes about Bhagwangad and Munde family