दसरा-दिवाळीनिमित्त देऊ या चिमुकल्यांच्या हातांना काम

Sachin Joshi writes about Diwali Dussehra and giving work to children
Sachin Joshi writes about Diwali Dussehra and giving work to childrenGoogle


‘आईऽ फक्त पाच मिनिटं ना...’ हे घराघरातलं सकाळचं ब्रह्मवाक्य असतं. ‘ऊठ आता. ऑनलाइन असली म्हणून काय झालं, शाळेच्या आधी आवरून नको का व्हायला?’काळाची गरज म्हणून ‘ऑनलाइन’ हा शब्द ॲड झाला असला तरी हा संवाद तसा पारंपरिकच! तूर्त, के.जी. पासून पीएच.डी.पर्यंत सर्वांचेच ऑनलाइन शिक्षण देण्या-घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता कुठे शाळा सुरू होऊ घातल्या. सगळ्या सकारात्मक बदलांची अपेक्षा करू या.


अर्थात या ऑनलाईन पद्धतीचे आभार मानायला हवेत. अन्यथा गेल्या दीड वर्षातलं चित्र काय असतं? कल्पनाही करवत नाही. कोरोना काळात तंत्रज्ञानामुळे आपण इतपत तरी तरलो. पण जेव्हा या तंत्रज्ञानाची पुसटशी ओळखही नव्हती तेव्हा माणसं कशी जगत होती? निखळ आनंदात जगत होती आणि तो अज्ञानातला आनंदही नव्हता. त्यामागे अनुभवातून आलेली समज होती. अनुभवातून शिक्षण हे प्रत्यक्ष देणं असतं, ऑनलाइनमधून माहिती देता येते.


आमच्या निरक्षर पणजी-आजीकडून खूप काही शिकायला मिळाल्याचं आजी, आई सांगत आल्या. ‘अक्षरवाचन’, ‘अंकलेखन’ यांपासून ही मंडळी कोसो दूर होती. तरीही त्यांचं व्यवहारज्ञान चोख होतं. अगदी जात्यांवरच्या ओव्यांमधून स्त्रिया साहित्यानंदही मिळवत होत्या. हल्ली डिजिटल वॉचचा जमाना आहे पण तेव्हा घड्याळही सर्वांकडे नसे; पण काही अडत नसे, वेळ कळायला सूर्यकिरणं पुरेशी होती. मूल्य आणि संस्कारांबद्दल म्हणायचं तर ते वाखाणण्याजोगे होते. त्या साऱ्या पुण्याईवरच तर आज आपण उभे आहोत. मग कशाला हा सारा शिक्षणाचा महान खटाटोप? सटासट शाळा बंद करू या की!


तसं अजिबातच नाही. मुळात चांगला असलेला उपयुक्त पदार्थ करताना तो अधिक पौष्टिक व्हावा म्हणून हा सारा पुढचा खटाटोप आहे. मुळातलं साहित्य फेकून नाही द्यायचं. ‘जुनं ते सोनं’ या न्यायाने पूर्वीचे मूल्यात्मक संस्कार जपायचे नि ते वृद्धिंगत करायचे आधुनिकतेची आणि तंत्राची जोड देऊन. छोट्या छोट्या गोष्टींमधून अभिनिवेशाशिवाय अगदी सहजपणे आपण हे करू शकतो. हा सहजपणा खूप महत्त्वाचा. अन्यथा सगळ्या गोष्टी कृत्रिम ठरू शकतात. पारंपरिक आणि आधुनिकता यांची एकत्र सांगड घालणं महत्त्वाचं.


मुलांमध्ये व्यवहारज्ञान आणायचं असेल तर त्यांना प्रत्यक्ष काम करू देणं हा एकमेव उपाय असतो. त्यासाठी घरातील छोट्या-मोठ्या निर्णयांमध्ये त्यांना सामील करून घेणं, घरातील सर्व कामं करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणं, त्यांच्यासोबत आपणही काम करणं हा उत्तम मार्ग असतो. पण या ऑनलाइन काळात मुलांना काय आपल्याला पण काम करण्याची सुस्ती आलेली आहे. ही सुस्ती पुढे जाऊन फार धोकादायक बनेल. ती झटकणं आवश्यक आहे.

आता सणांचे दिवस आलेत. नवरात्र, दसरा, दिवाळी येईल. घरीदारी वेगवेगळ्या पदार्थांचा घाट घातला जाईल. पालकांच्या कार्यबाहुल्यामुळे बाहेरूनच पदार्थ विकत आणायची सवय असलेल्या घरांतील मुलांना चकली पाडण्याचा ‘सोऱ्या’ माहीत असेलच असं नाही. जातं, उखळ यांची तर गोष्टच सोडा. या गोष्टी आपल्या पिढीनेही वापरलेल्या नाहीत. अभ्यंगस्नानासाठी तांब्याचं घंगाळ आता वापरात नाही; जे शास्त्रीयदृष्ट्या खरंतर अत्यंत आवश्यक असतं. असो!


या सर्व परिस्थितीला आपण थोडाफार शह देऊ शकतो. आपल्या मुलांना या सर्वांत सामील करून अनुभवातून शिक्षण द्या त्यासाठी- ‘दसऱ्याचं तोरण मुलांना करू द्या, दिवाळीचा कंदील करून चकल्या पाडू द्या. घरकामात त्यांची मदत घ्या. उंच झाडूने त्यांना छत झाडू द्या.’

आम्ही स्वतःच कुठे हे सर्व घरी करतो? मुलांच्या आणि त्यातून मिळणाऱ्या स्वतःच्या आनंदासाठी करून तर बघू या थोडं. एरवी इतक्या ॲक्टिव्हिटीज घेत असतो मुलांच्या आपण! आता अजूनही रेंगाळणाऱ्या कोरोनाकाळात बऱ्याच प्रमाणात घरी असल्यामुळे हे शक्य आहे आपल्याला. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने करू या सुरवात. कारण हे जीवनशिक्षण सण-उत्सवांपुरतं मर्यादित नाही तर ते अव्याहत मिळणारं आहे. घरगुती कामांपासून बाह्य जगापर्यंत पोचणाऱ्या या सगळ्या क्रिया-प्रक्रिया म्हणजे जीवनशिक्षणातले घटक आहेत. पुस्तकी ज्ञान जितकं आवश्यक तितकंच सर्व बाबतींत कृतिशील असणं गरजेचं आहे.

बाल मेंदूची जडणघडण या कृतिशीलतेने होते. मुलं जेवढं हाताने काम करतील तेवढी मेंदूतील पेशींना चालना मिळेल. ऑनलाइनमुळे आणि अतिरिक्त स्क्रीन टाइममुळे जी मेंदूला मरगळ आली आहे ती काढण्यासाठी या दसरा-दिवाळीचा चांगला उपयोग करून घ्या. मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेलाही आव्हान द्या.


माणसाचं जीवन सुख-दु:खांनी व्यापलेलं आहे. कोरोनामुळे त्यातली दु:खाची बाजू अधिकच गहिरी झाली आहे. आपल्या आसपास दु:खी असलेल्या मुला-माणसांनाही आनंद वाटायला मुलांना शिकवा. नकळत होणारा हा संस्कार त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी मोलाचा ठरेल. हे सर्व तुम्ही करत असालही; तर तुमचं अभिनंदन अन्यथा त्यासाठी शुभेच्छा.
थोडक्यात, अक्षरशिक्षण देता-घेता आपण अस्सल जीवनशिक्षणापासून दूर तर जात नाही ना याचाही वेळोवेळी विचार करू या. अन्यथा भावी पिढ्या भुईमुगाच्या शेंगा झाडावर शोधतील आणि स्वत:पुरत्या आनंदात मग्न राहतील.


असं व्हायला नको असेल तर कृतिशील जीवनशिक्षणाचा विचार करायलाच हवा.
त्यासाठी दिवाळीनिमित्त घरातील सर्व कामं मुलांवर टाकू या आपण त्यांना मदत करू या. त्यासाठी कौतुक आणि काम करण्याचा आनंद हे सूत्र वापरू या.चला, मग मुलांच्या हाताला कामं देऊ आणि दसरा-दिवाळी सुरू होण्याआधी साजरी करू.

सचिन उषा विलास जोशी
(लेखक शिक्षण अभ्यासक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com