Less Is More | अप्रूप अन्‌ सरप्राइजची अनुभूती

Students
Studentsesakal

आमची आई नेहमी म्हणत असे, ‘या हल्लीच्या मुलांना कशाचं काही अप्रूप राहिलेलं नाही.’ आमची ‘अप्रूप’ म्हणजे काय इथपासूनच सुरवात... अप्रूप म्हणजे एखादी गोष्ट मिळाल्यावर तिचं वाटणारं महाप्रचंड कौतुक. खरंच ते दिवसेंदिवस कमी होत चाललंय. क्षणापुरती ‘सरप्राइज’ परंपरा सुरू झाली असली तरी अप्रूपातली आत्मीयता त्यात नाही. अलीकडे मुलांना मागताक्षणी किंवा त्याहीपूर्वी सारं मिळत जातं हे त्याचं मुख्य कारण आहे. एसएससीचा रिझल्ट चांगला लागला तर काका किंवा मामा यांच्याकडून पहिलं मनगटावरचं घड्याळ मिळायचं ही गोष्ट आमच्या पिढीपर्यंत घडत होती.

आताच्या काळात तोवर मुलांची चार-पाच घड्याळं वापरून मोडून फेकून झालेली असतात. काही जण तर बालवाडीपासून घड्याळ घालतात. त्यात त्यांचा दोष नाहीये, वापरून फेकून देण्याची म्हणजे ‘यूझ ॲन्ड थ्रो’ अशी त्यांची मानसिकता घडण्याला आपणच जबाबदार आहोत. ‘मागितलं की मिळतं’ हा संस्कार आपणच केला. आजोबांनी खूप काळ वापरलेलं पेन त्यांनी आपल्याला बक्षीस म्हणून दिल्यावर त्याच प्रेमाने ते जपून ठेवायला आपणच त्यांना शिकवायला हवं, नाहीतर ‘आता असं शाईचं पेन फारसं कोणी वापरतच नाही, आजोबा’ म्हणत ते नाकारलं जाण्याचीच शक्यता अधिक. म्हणूनच वस्तूंचं, माणसाचं महत्त्व आपणच वेळोवेळी त्यांना सहजपणे समजावून द्यायला हवं. मुळात आपलं वागणं तसं असेल तर ते त्यांना आपोआपच कळत जाईल. आता दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करताना, भेटवस्तू देता-घेताना या सगळ्याचा विचार करू या. एक वेगळं भान बाळगू या. वस्तू आणि माणसं यांच्यातल्या दुवा असलेल्या भावनांची जाणीव ठेवू या.

Students
डोळ्यांतनं आभाळ वाहिलं...

आवश्यक त्याच वस्तू घ्यायला-द्यायला मुलांना शिकवू या, त्याआधी स्वतःला ती सवय लावून घेऊ या. बिन गरजेची खरेदी आपणच टाळू या तर तो संस्कार मुलांवर आपोआप होईल. एक मोबाईल असताना दुसरा मोबाईल, असंख्य कपडे, ढीगभर केलेलं ऑनलाइन शॉपिंग... ते करून झाल्यावर मग त्याची जाणीव होऊन कुरकुर करण्याला किंवा हळहळण्याला काहीच अर्थ नसतो. पूर्वीच्या काळात गरजेपुरते कपडे असायचे. त्यामुळे दिवाळीला मिळणाऱ्या नवीन कपड्यांचं अप्रूप असायचं. आता वर्षभर ऑनलाइन खरेद्या सुरू असतात. मग दिवाळीला त्या साऱ्याहून जास्त महागातल्या गोष्टी घ्यायच्या. मुलांच्या मित्रमंडळाच्या वर्तुळात कोणाकडे काय आहे त्याहून अधिक चांगलं आणि अधिक संख्येने त्यांना ते हवं असतं. त्यांच्या या मागणीला आळा घालायला आपणच त्यांना शिकवायला हवं. डझनावारी जीन्स घरात असताना केवळ अमुक एका पॅटर्नची मला हवी ही मागणी करण्यापूर्वीच आपण हे शहाणपण त्यांना देऊ या. बाजारातून आणलेल्या महागड्या चॉकलेट्सइतकंच किंवा त्याहून अधिक महत्त्व आई-आजीने केलेल्या नारळाच्या वडीला असतं हे मुलांना जाणवायला हवं.
याचा अर्थ हौस-मौज करायचीच नाही असा अजिबातच नाही. हौसेला मोलच नसतं. हल्ली एकुलती एक मुलं असण्याच्या जमान्यात त्यांना हौसेने सगळं घेण्या-करण्यातच आपलंही सुख सामावलेलं असतं; पण ‘तारतम्य’ हा शब्द त्यांना सांगणं, शिकवणं, त्यांच्या मनात रुजवणं हे आपलंच काम आहे. अन्यथा ती वाहवत जायला वेळ लागणार नाही.

एकदा मागितलं की मिळतं हा विचार मनात रुजला तर मोठेपणी हे अवघड होतं. मुलं हट्टी होतात आणि मग या हट्टी मुलाचा एक दिवस हट्टी बॉस बनतो आणि जॉबमध्ये... नोकरीमध्ये... ॲडजस्ट करण्याची सवय राहत नाही. वस्तूंना महत्त्व आहे माणसांना महत्त्व नाही असा चुकीचा अतार्किक विचार त्यांचं तत्त्वज्ञान बनतं. हे घडू नये म्हणून आजच मुलांवर काम करणं आवश्यक आहे. दिवाळीत घरी केलेला आकाशकंदील आणि हजार-पाचशे रुपयांचासुद्धा बाजारातून विकत आणलेल्या आकाशकंदील यातला फरक त्यांना कळायला हवा. या वस्तू विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा विचार करतानाच आपल्या मुलांच्या मानसिकतेचाही विचार करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या विचारप्रक्रियेची मुळं घट्ट झाली पाहिजेत. ती योग्य दिशेने विस्तारली पाहिजेत. त्यासाठी आपल्याला चार जास्त कष्ट घ्यायला लागले तरी हरकत नाही. या सगळ्या गोष्टी मुलांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी प्रतीकात्मक असतात. त्या आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहणार असतात.

प्रश्न कंदील आणि बाकी कशाचा नसतो, आपण त्यांच्याबरोबर बसून तो करण्यातल्या आनंदाचा असतो. शाळेत त्यांना सांगितलेली प्रोजेक्ट्स आपण त्यांच्याबरोबर करायला बघतो कारण तिथे मार्कांचा प्रश्न असतो. मग कंदील का नाही? अर्थात, अनेक घरांमधून आता असाही विचार केला जातो. पण जिथे केला जात नाहीये तिथे तो जरूर व्हायला पाहिजे. संकटजन्य परिस्थितीतून जग जात असताना सणा-उत्सवांना अधिक वेगळं वळण देऊन ते निभावायला आपणच मुलांना शिकवलं पाहिजे.

Students
माउंट मंदाचे स्वप्न ...

अनावश्यक खरेदी आणि खर्च टाळून तो अनेक गरजू माणसांच्या उपयोगी कसा पडू शकतो त्याचं उदाहरण घालून दिलं पाहिजे. वास्तवात ज्यांना खरे ठिगळ लावलेले कपडे वापरायला लागत आहेत त्यांच्याकडे मुलांचं लक्ष वेधलं पाहिजे; तरच महागातल्या जीन्सवरच्या कृत्रिम पॅचचा अर्थ त्यांच्या लक्षात येईल. नो डाउट ती फॅशन आहे. असेल गरज तर ती स्वीकारायची पण त्याच वेळेस इतरांची गरज भागवायलाही शिकायचं हा संस्कार मुलांवर झालाच पाहिजे. तरच आपल्याबरोबर इतरांची ही दिवाळी आनंदाने साजरी होऊ शकते. त्यात आनंद मानायला मुलांना शिकवा. दिवाळीच्या निमित्ताने नवीन कपडे, खेळ, वस्तू यांची खरेदी जरूर होऊ द्या. पण भान राखून संयमाने आणि गरजेच्या गोष्टींची.
तर सरप्राइजबरोबरच ‘अप्रूप’ शब्दालाही त्याचं महत्त्व राखता येईल!

- सचिन उषा विलास जोशी, शिक्षण अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com