रानभान

‘जो करील सेवा, त्यो खाईल मेवा’ हे देवमनदादाचं वाक्य आहे आणि ते मी अगदी कळत्या वयापासून ऐकत आलो आहे. तसा हा शब्द खास हलवायाच्या दुकानातला.
Village Sweet Shop
Village Sweet ShopSakal

‘जो करील सेवा, त्यो खाईल मेवा’ हे देवमनदादाचं वाक्य आहे आणि ते मी अगदी कळत्या वयापासून ऐकत आलो आहे. तसा हा शब्द खास हलवायाच्या दुकानातला. तो शब्द ऐकला की तोंडाला कसं चळचळ पाणी सुटायचं लहानपणी. कारण, त्या शब्दाला जोडूनच मिठाई हा शब्द येतो आणि त्या ‘मेवामिठाई’ या शब्दातून हलवायाचं दुकान आणि त्याच्या दुकानातले पेढा, जिलेबी, लाडू असे गोडधोड खाद्यपदार्थ डोळ्यांपुढं येतात.

एखादं जिवावर येणारं काम आईला माझ्याकडून करून घ्यायचं असलं की ती पैसे द्यायचं हमखास कबूल करायची, मेवा आणण्यासाठी. दिवसभरात शेतावर राबून घरी आली की म्हणायची : ‘‘आज आंग लय ठणठण ठणकून राह्यलं रे बाबू...मी भिताडाले खेटून झोपते. तू जरा आंग तुडवं बरं मपलं...नसा मोकळ्या होऊन आंग दुखायचं तरी थांबील बाप्पा.’

मग अशा वेळी मी जरा नानागुणा करायला लागलो तर म्हणायची : ‘तुडव रं बाबू आंग...मंग मी तुले खवा आणायला पैसं देईल...’

‘खवा’ हा तिचा शब्द ‘पेढा’ या शब्दासाठी असायचा. कारण, गावातल्या पांडू हलवायाच्या दुकानात पितळेच्या डब्यात जो पेढा असायचा तो काही त्यानं विशिष्ट आकारात गोल गोळे बनवून ठेवलेला नसायचा, तर सरळ एकच एक मोठाच्या मोठा गोळा त्या डब्यात असायचा. आपण पैसे घेऊन गेलं अन् ‘छटाक खवा द्या’ असं म्हटलं की तो डब्याचं झाकण उघडून चाकूनं गोळ्यातली लांबट पेढ्याची पट्टी तराजूत टाकून मोजून द्यायचा. घरी आणून मायला दाखवून तो चाखत-माखत खाताना मग कमालीचा आनंद व्हायचा.

जसा हा हलवायाच्या दुकानातला मेवा, तसाच देवमनदादाचा ‘रानमेवा’सुद्धा आमच्या खूप आवडीचा असायचा. आणि, मेवा हा फक्त हॉटेलमध्येच मिळतो असं नाही तर, रानावनातल्या झाडा-झुडपांमधूनसुद्धा मिळतो हे देवमनदादामुळे कळून यायचं.

देवमनदादाचं आता वय झालंय. साठीच्या आसपास. धोतर, पांढरा सदरा, डोक्यावर टोपी आणि हातात नायलॉनची पिशवी अशाच रूपात तो दिसतो. मेळजानोरी गावाच्या रस्त्यावरून पुन्हा आतल्या बाजूनं एक गाडीवाट जाते. तिथंच माळाच्या बगाऱ्याच्या वरच्या अंगानं त्याचं सात-आठ एकर शेत आहे; पण तो कधी नाराज दिसत नाही. पूर्वी त्याच्याकडं दोन बैल आणि काही ढोरं, म्हसरं होती; पण आता बैलं, गाई असं काही नसतं. फक्त एक म्हैस आणि तिची एक पैलाडू वगार असं दृश्य सकाळी दहाच्या दरम्यान आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान तो शेतावर जाताना-येताना दिसतं.

आता स्वतःची शेती सांभाळत तो उतारवयातल्या आपल्या बायकोसह आनंदानं राहतो. म्हैस एकदा घरच्या दावणीवर नेऊन सोडली की तिचा ताबा त्याची बायको गुंपाबाई घेते. म्हशीचं दूध काढणं, ते डेअरीवर विकणं, दही विकणं असं घरच्या घरी तिचं सुरू असतं. दोन पोरी आहेत. त्या आपापल्या संसारात रमल्यात.

शेतमजूर म्हणून त्याची पोरगी अन् जावई त्यानं गावातच आणलेला आहे. ते दोघं नवरा-बायको शेजारीच छोट्या घरात राहतात. शेतमजुरी करतात, त्याची पोरगी सिंधू अधूनमधून माय-बापाकडे जाऊन त्यांचं हवं-नको ते पाहते. ‘माझ्या माघारी माझा हा सहा-सात एकरांचा तुकडा दोन्ही पोरींचा होईल,’ असं देवभानदादानं जाहीर केलं आहे.

‘आपल्या माघारी ते स्वोता शेती कसो, नाईतर विकून टाको. आपुन हाये तवरोक आपली चिंता कराव. आपुन गेल्यावर पुढं काय होईल याची कायले चिंता कराव?’ असं दोघं बोलतात. एकमेकांना साथ देत सुखानं जगतात. ‘जो करील सेवा, त्यो खाईल मेवा,’ असं म्हणतात.

जगताना प्रत्येक कुटुंबाचा आपापला एक ढाचा बनलेला असतो. हा ढाचा स्थिर राहण्यासाठी पैशाचा आधार लागतो. प्रत्येक कुटुंब आपापल्या पद्धतीनं तो आधार जुळवत असतं. देवमनदादानं अन् त्याच्या बायकोनं आपल्या संसाराला लागणारा पैसा मिळवण्याचे मार्ग निवडले आहेत. निवडून जुळवून ठेवले आहेत.

देवमनदादाचं आणखी एक सकाळचं काम...नेहमीचं नाही; पण मधून मधून त्याची हाळी गावातल्या गल्लीत ऐकू येते.

‘बोरं घ्या बोरं ऽऽ खास गावरान रानमेवा ऽऽ! कारबेटं घ्या कारबेटं... खास गावरान मेवाऽऽ! आवळे घ्या आवळेऽऽ खास गावरान आवळे...’’ दिवसभर म्हशीमागं फिरताना त्यानं रानावनातून हा रानमेवा जुळवलेला असतो. तो सकाळी सात ते नऊ या वेळेत गावात हाळ्या देऊन विकतो.

आषाढी एकादशीच्या दिवसांत वाघाटे, कंटुले, तर कधी कवठं, बेलफळं, गवळणफळं अशी तो विकताना दिसतो. कुणी आवाज देऊन बोलावलं की दाराशी जाऊन त्या रानमेव्याचं काय वैशिष्ट्य आहे, कोणते औषधी गुणधर्म आहेत हे अतिशय विस्तारानं तो सांगत राहतो आणि समोरच्याच्या खिशातून अगदी सहज दहा रुपये काढू शकतो. त्या रानफळाचं किंवा रानभाजीचं, रानवनस्पतीचं वैशिष्ट्य समोरच्या बाईमाणसाला कळतं, त्यामुळे त्याही समाधान पावलेल्या दिसून येतात.

‘रानभान घ्या रानभान...रानाले अन् माणसाले भानावर आणणारी रानभान...’

देवमनदादाचा आवाज आला तसा माझी पत्नी वनीता हिनं त्याला बोलावलं.

‘काय इकून राह्यले दादा आज...? ही रानभान म्हणजे काय?’

‘लय आवषधी गुणधर्म आस्ते ताई इच्यात...रानभान हाये ही...’

‘पण हे तं गवत दिसते. गाजरगवताच्या पानासारखं!’

‘हाव, गवतच हाये ते...मी मुद्दाम बांधोडीवर राखून ठेवतो त्याले अन्‌ उत्तरा-पूर्वा नक्षेत्रात इकतो. काहून की, या नक्षेत्रात लय कारक आवषधी गुणधर्म येते ह्या रानवनस्पतीत...’

‘कोणता गुणधर्म येते?’

‘वर्षभर घरातल्या देखण्या पोरीची, सूनबायरीची अन्‌ लेकरा-बाळायची दीठ उतरायसाठी कामी येती ही...पुन्हा घरात रोगटमोगट जीवजंतू होत नाही हिच्या घमकाऱ्यानं...घरात बर्कत राह्यती. आनंदीआनंद राह्यते...एक-दोन जुड्या घिऊन ठिवा तुम्ही...लय कारक रानवनस्पती हाये ही...लय घरी घेतली. तुम्ही बी घ्या...फक्त दहा रुपयांत दोन जुड्या...’

त्याच्या जवळच्या झोळीत रानभान नावाच्या गवताच्या आठ-दहा जुड्या असतात. गवतच...पण जरा ठोकरकाड्याचं, बारक्याबोटक्या काटेरी पानांचं. भुईवाफ्यात जे गाजराचं पीक घेतलं जातं त्याच्या वरच्या पालगटासारखं; पण जरा जरगट असणारं...असं हे गवत सगळ्या रानाला भानावर ठेवतं. शेतात पेरलेल्या पिकाला भरघोस झडती द्यायला लावतं. म्हणूनच ते जर वर्षभर आढ्याला खोचून ठेवलं तर ते घराला बरकत देतं. घरातलं वातावरण आनंदी ठेवतं, असं तो पुनःपुन्हा पटवून देत असतो.

‘कशासाठी एवढे टोले घेता देवमनदा? काय कमाई होते का एवढं रानात अन्‌ गल्लोगल्ली गावात फिरून?’ मी विचारतो.

‘माह्या कमाईसाठी करत नाही भाऊ मी हे... घराघरात निरोगी अन्‌ आनंदी वातावरण राहावं म्हणून करतो मी हे धरमधावणीचं काम... तशी फुकटच देली आस्ती ही रानभान...पण फुकटचं महत्त्व कळत नाई लोकायले, म्हणून पैसं घेतो...घरंदारं, लेकरंबाळं आनंदी राह्यले पाह्यजे हाच महा हेतू आस्ते...’ असं तो म्हणतो अन्‌ त्याच्या चेहऱ्यावरचा तो सकारात्मक भाव मला लाखमोलाचा वाटतो. त्याच्या हातातल्या रानभान नावाच्या त्या वनस्पतीवरही मला तो झळकताना दिसतो.

(लेखक हे सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com