महाराष्ट्रधर्माचं ‘त्रिविक्रम’ स्वरूप (सदानंद मोरे)

सदानंद मोरे
रविवार, 3 सप्टेंबर 2017

एकीकडं इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची संकुचित भूमिका व दुसरीकडं राजारामशास्त्री भागवत यांची व्यापक भूमिका यांचा समन्वय साधत महाराष्ट्रधर्माची पुनर्मांडणी करताना आचार्य विनोबा भावे यांनी विष्णूच्या ‘त्रिविक्रम वामनावतारा’च्या कल्पनेचा आधार घेतला आहे. विनोबा लिहितात, ‘महाराष्ट्रधर्म’ हा प्रथमदर्शनी जरी वामनासारखा दिसला तरी वस्तुतः तो दोन्ही पावलांत विराट विश्व व्यापून टाकणाऱ्या त्रिविक्रमासारखा आहे, असे दिसून येईल. या त्रिविक्रमाचे एक पाऊल महाराष्ट्रीय, दुसरे राष्ट्रीय आणि तिसरे आंतरराष्ट्रीय आहे.’

एकीकडं इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची संकुचित भूमिका व दुसरीकडं राजारामशास्त्री भागवत यांची व्यापक भूमिका यांचा समन्वय साधत महाराष्ट्रधर्माची पुनर्मांडणी करताना आचार्य विनोबा भावे यांनी विष्णूच्या ‘त्रिविक्रम वामनावतारा’च्या कल्पनेचा आधार घेतला आहे. विनोबा लिहितात, ‘महाराष्ट्रधर्म’ हा प्रथमदर्शनी जरी वामनासारखा दिसला तरी वस्तुतः तो दोन्ही पावलांत विराट विश्व व्यापून टाकणाऱ्या त्रिविक्रमासारखा आहे, असे दिसून येईल. या त्रिविक्रमाचे एक पाऊल महाराष्ट्रीय, दुसरे राष्ट्रीय आणि तिसरे आंतरराष्ट्रीय आहे.’

‘आमचा राष्ट्रीय धर्म आमच्या देशी भाषेतच आहे,’ असं राजारामशास्त्री भागवत सांगतात, तेव्हा त्यांना मराठी भाषाच अभिप्रेत असते, हे स्पष्ट आहे. हा संबंध इतका अन्योन्य आहे, की भागवत या राष्ट्रीय धर्मालाही देशी धर्म असं म्हणण्याचं धाडस करतात.

वैदिक धर्मास प्रमाण असणाऱ्या ग्रंथांना आगम (किंवा निगम) असं म्हटलं जातं. (प्रसंगी ‘आगम’ हा शब्द अवैदिक बौद्ध, जैन यांच्या ग्रंथांसाठीही वापरला जातो, कधी शैव व वैष्णवांमधल्या पांचरात्र संप्रदायासारख्याच तंत्रमार्गाकडं झुकणाऱ्या पंथांच्या ग्रंथांसाठीही). त्याचं साधारणीकरण करून भागवत कोणत्याही धर्मग्रंथासाठी ‘आगम’ शब्द प्रयुक्त करतात व त्यानुसार महाराष्ट्रातले धर्म व धर्मग्रंथ यांचं विवेचन करतात.
भागवत लिहितात ः ‘बाकीच्या हिंदुस्थानातील भाषांविषयी आम्हास काही माहिती नाही; पण मराठी भाषा निःसंशय आगमाची भाषा होय. ज्ञान व भक्ती या दोहोंची सांगड ज्या प्रस्थानाने घातली ते पंढरपूरचे प्रस्थान. या प्रस्थानास आपण पुंडलिकावरून ‘पुंडलिकाचे प्रस्थान’ असे नाव देऊ. ...या प्रस्थानातल्या लोकांचा आगम म्हटला म्हणजे ज्ञानेश्‍वरी व तुकारामबोवांची गाथा. सर्व महाराष्ट्रात एक मूठभर महाशास्त्री व ओंजळभर पुराणिक असतील, ते सोडून अशेष ब्राह्मणवर्ग व राहिलेले अशेष तीनही वर्ण प्रायः पुंडलिकी मार्गाचे असतात. तेव्हा ज्ञानेश्‍वरी व तुकारामबोवांची गाथा या दोन्ही ग्रंथांस आम्हा मराठ्यांचा आगम म्हटले असता ते यथार्थ आहे. आम्हा मराठ्यांस नाही श्रुतींची गरज, नाही स्मृतींची गरज, नाही भगवत्पादांच्या वेदान्तभाष्याची गरज. ...जर एखादा धर्मसंबंधी महासिद्धान्त मराठ्यांस अगदी सुलभ करून देण्याची इच्छा असली, तर जसे ख्रिस्ती लोक बायबलाच्या वचनाच्या आधारे बोलतात, त्याप्रमाणे आम्हा मराठ्यांस ज्ञानेश्‍वरांच्या किंवा तुकारामबोवांच्या वचनांचा आधार धरून काम केले पाहिजे.’

धर्म म्हटल्यावर त्या धर्माच्या अनुयायांना पवित्र वाटणारे ग्रंथ असतात, त्याप्रमाणे पवित्र वाटणारी तीर्थक्षेत्रं किंवा धर्मक्षेत्रंही असतात. आता आमच्या देशी धर्माचा आगम आमच्याच देशी भाषेत असेल, तर आमच्या धर्माची तीर्थस्थळंही आमच्याच देशात म्हणजे महाराष्ट्रात असणं अपरिहार्य आहे, ही जाणीव भागवतांकडं अर्थातच आहे. यासंदर्भात ते लिहितात ः ‘आम्हा मराठ्यांस काशीची गरज नाही व गयेचीही गरज नाही. थोडाबहुत काही कर्मठ ब्राह्मणांचा काशीयात्रेकडेस ओढा असतो; पण मराठ्यांची सार्वजनिक तिरस्थळी यात्रा म्हटली म्हणजे पंढरपूर, आळंदी व देहू.’ ज्ञानेश्‍वर-तुकोबांचं महत्त्व सांगण्यास भागवत कुठंही हात आखडता घेत नाहीत. एकनाथांचं तर त्यांनी  स्वतंत्र चरित्रच लिहिलेलं आहे. त्यांच्या मते, ‘ज्ञान व भक्ती या दोहोंची सांगड मंडळात ज्ञानेश्‍वरांनी घातलेली दिसते. याच मार्गाची एकनाथानं पुष्टी करून, आमच्या मंडळातील राष्ट्रीय धर्माचा जीर्णोद्धार केला. आमच्या राष्ट्रीय धर्मात जातिभेद मुळीच नाही. भक्ती करण्याचा प्रत्येक जातीच्यास अधिकार आहे व देवाच्या घरी केवळ भक्तीच्या तारतम्याने संभावना होत असून, जातीची किंवा कुळाची वगैरे तिथं तिळमात्र मातबरी नसते, हे आमच्या राष्ट्रीय धर्माचे रहस्य होय. सारांश, ज्ञानेश्‍वरांसारखी व एकनाथांसारखी मंडळी सर्वस्वी राष्ट्रीय होत. असली मंडळी पहिल्याने राष्ट्रीय असते व नंतर जातीकडेस दृष्टी पोचविते.’

एकीकडं धर्मकार्यातली ज्ञानेश्‍वरांची आणि एकनाथांची थोरवी वर्णिणारे भागवत दुसरीकडं स्वराज्याच्या कार्यासाठी झिजलेल्या रामचंद्रपंत अमात्य आणि प्रल्हाद निराजी या ब्राह्मणांचीही यथार्थ स्तुती करतात. हे चारजण त्यांना सदैव अनुकरणीय असे आदर्श महापुरुष वाटतात. त्यांना न मोजणाऱ्या त्यांच्याच ज्ञातिबांधवांविषयी लिहिताना भागवतांच्या लेखणीला सात्त्विक संतापाची धार येते. भागवत लिहितात, ‘ज्ञानेश्‍वरांसारख्या आणि एकनाथांसारख्या अवतारी ब्राह्मणांस शुद्ध कसपटाप्रमाणे लेखण्यास न लाजणारे, असल्या अलौकिक ब्राह्मणांची प्रासादिक सरस्वती व त्या सरस्वतीने कुरवाळल्यामुळे प्रौढपणा आलेली भाषा या आम्हां देशी लोकांच्या दोन अमोलिक निधानांस कचऱ्याची पेटी दाखविण्यास न शरमणारे किंवा असल्या व दुसऱ्याही रामचंद्रपंत, प्रल्हादपंत यांच्यासारख्या परार्थ जन्मलेल्या दरबारी पुरुषांनी एकदा सोडून दहादा निर्मळ व उजळ केलेल्या अशाही आमच्या ब्राह्मण जातीस शुद्ध पाण्यात पाहण्यास संकोच न बाळगणारे असे जे देशांगार असतील, ते कितीही विद्याढ्य, कुळाढ्य अथवा धनाढ्य असोत, सर्व वरील ब्राह्मण‘सिंहां’पुढे शुद्ध ‘शूकरां’सारखे होत व म्हणूनच ‘गच्छ शूकर भद्रं ते ब्रूहि सिंहो मयाजिताः। पंडिता एव जानन्ति सिंहशूकरोर्बलं’ असे त्यास उद्देशून प्रसंगी संबोधूनही म्हणणे हे महाराष्ट्रभूमीचे पयःपान करून जो भाग्यशाली आपणास समजत असेल त्या प्रत्येकाचे - मग तो जातीचा कोणीही असो - पहिले कर्तव्य होय.’

तुकोबांच्या अभंगांच्या वह्या बुडविण्याच्या प्रसंगाचा उल्लेख करतानाही भागवतांच्या या राष्ट्रीय दृष्टीचा लोप होत नाही. ते लिहितात, ‘रामेश्‍वरभटाने तुकारामाच्या ‘वह्या’ बुडविल्या म्हणजे महाराष्ट्र मंडळाच्या राष्ट्रीय धर्मास हरताळ लावला.’
आपल्या देशी भाषेस व देशी धर्मास ज्ञानेश्‍वरांनी केलेल्या योगदानाचे वर्णन भागवतांनी अगदी वेगळ्या प्रकारे केलं आहे. ते लिहितात,  ‘‘जसे शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्रांवर भाष्य आहे, तसेच ‘ज्ञानेश्‍वरां’चे ‘भगवद्गीते’वर आहे. इतकेच की ज्ञानेश्‍वरी भाषा ओवीमय असून, आमच्या देशी भाषेत आहे. पंढरपूरच्या संप्रदायामध्ये हे भाष्य ‘आई’ या सांकेतिक नावाने प्रसिद्ध आहे. जेव्हा पंढरपुरी संप्रदायात सिद्धान्ताच्या संबंधाने वैमत्य पडते, तेव्हा ‘आई’च्या अनुरोधाने दाव्याचा निकाल होतो. भाषेच्या संबंधाने, धर्माच्या संबंधाने, देवाच्या संबंधाने, भक्तीच्या संबंधाने व गहन विचारांच्या संबंधाने ‘ज्ञानेश्‍वरी’ हे एक भांडार होय.’

ज्ञानेश्‍वरांनी ‘भागवती धर्माचा जीर्णोद्धार केला’ व तो करताना ‘देशी भाषेचा आदर केला’ हे त्यांचं कर्तृत्व भागवत सांगतात व याच धर्माला ते महाराष्ट्राचा देशी अथवा राष्ट्रीय धर्म समजतात. या मताचं आणखी स्पष्टीकरण करताना भागवत म्हणतात, ‘ज्ञानेश्‍वरांनी एक प्रकारे बुद्धाने आणि जिनाने (महावीराने) दाखविलेली वाट स्वीकारली.’ भाषेच्या बाबतीतले साम्य दाखवल्यावर भागवत फरकही स्पष्ट करतात. ते लिहितात, ‘बुद्ध आणि जिन यांनी आपल्या गलबताचे सुकाणू शून्याच्या दिशेने फिरविले असून, ज्ञानेश्‍वरांच्या गलबताचे सुकाणू भक्तांस मरणोत्तर आपणामध्ये सर्वांशी सामील करून घेणाऱ्या परम कारुणिक देवाकडे फिरले होते. कुळ ब्राह्मणाचे, सहा शास्त्रे हातचा मळ झालेला, योगाचा अभ्यास केलेला असा तीन प्रकारचा विशिष्टपणा अंगी जडलेला असतानाही केवळ भक्तीने नामांकित झालेल्या नामदेवाच्या पाया स्वतःच पडून ज्ञानेश्‍वरांनी मराठी ब्राह्मणांस अत्युत्तम उदाहरण घालून दिले आणि हेच धोरण ठेवून जातीची मातबरी मुळीच न मानणाऱ्या पंढरपूरच्या संप्रदायाची स्थापना केली.’ भागवत साधकाचे ‘ब्रह्मज्ञानी’, ‘योगी’ आणि ‘शुष्क तार्किक’ असे प्रकार मानतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्ञानेश्‍वर यांच्यापैकी कोणत्याच वर्गात मोडत नव्हते. या तीनही प्रकारांच्या साधकांना स्वतःचा मोक्ष साधायचा असतो. ज्ञानेश्‍वरांचे हाड शुद्ध भक्ताचे ठरते, ब्रह्मज्ञान्याचे किंवा योग्याचे उघड ठरत नाही. ज्ञानेश्‍वरांचा जन्म केवळ परार्थ दिसतो.’

ज्ञानेश्‍वरी ग्रंथाच्या निर्मितीचं वर्णनही भागवत आपल्या विशेष शैलीत करतात. ते लिहितात, ‘‘जातीने कितीही निकृष्ट असला तरी अतीच उत्कृष्टपणा आणणारा भक्तिरूप चिंतामणी मराठी मंडळात सर्वांच्या हाती लागावा, असा ज्ञानेश्‍वरी-अवताराचा मोठा हेतू होता. हा मोठा हेतू सहज सिद्ध होईल, अशीच व्यवस्था ज्ञानेश्‍वरांनी पहिल्यापासून चालवली. चौफेर संतांची मंडळी माळेसारखी बसलेली असून, मेरूच्या ठिकाणी निवृत्तिनाथ असत आणि चौफेर पसरत गेलेल्या वर्तुळाच्या मध्यभागी निवृत्तिनाथाकडेस तोंड केलेले ज्ञानेश्‍वर बसून भागवती धर्माचा जीर्णोद्धार त्या काळच्या कर्मठांनी तुच्छ आणि निःसार मानलेल्या मराठी भाषेत करीत. संतमंडळी फिरती असल्यामुळे जिकडे तिकडे ज्ञानेश्‍वरांनी पाजळलेली मशाल नेत. त्यामुळे मराठी मंडळात या मशालीचा उजेड जिकडे तिकडे थोड्याच काळात पडत चालला.’

अगोदरच्या एका लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या या ज्या राष्ट्रीय किंवा देशी धर्माचं वर्णन भागवतांनी केलं आहे, त्यालाच ते  ‘महाराष्ट्रधर्म’ असं म्हणतात. हा धर्म एकाच वेळी देशी, राष्ट्रीय आणि वैश्‍विक आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, त्यात कोतेपणाला म्हणजेच संकुचितपणाला मुळीच थारा नाही. या धर्माला व्यापकता अर्थात वैश्‍विकता आहे. या वैश्‍विकतेचं द्योतक असणारं ज्ञानेश्‍वरीतलं ‘पसायदान’ भागवत समर्पकपणे उद्‌धृत करतात; किंबहुना पसायदान व त्याचा वैश्‍विक आशय यांच्याकडं लक्ष वेधणारे भागवत हे पहिले विचारवंत होत!

भागवत लिहितात, ‘हा जो ज्ञानेश्‍वरीरूपी मोठा ‘वाग्यज्ञ’ विशीच्याही पूर्वी ज्ञानेश्‍वरांनी आरंभला आणि संपविलाही, तो ‘वाग्यज्ञ’ सर्वत्र वास्तव्य करणाऱ्या परमेश्‍वराच्या पायी निवेदन केला आणि त्याच्यापासून महाप्रसाद मागून घेतला. हा महाप्रसाद यात कोणत्याही प्रकारच्या कोतेपणास वाव मिळालेला नसल्यामुळे फारच सुरेख बनला आहे.’

आता विश्र्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ।।
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी-रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ।।
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ।।
वर्षत सकळ मंगळी । ईश्र्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ।।
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।।
येथ म्हणे श्री विश्र्वेशरावो । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।

पसायदानाच्या ओव्या उद्‌धृत करून भागवत पुढं तौलनिक पद्धतीनं लिहितात, ‘‘खळांच्या संबंधाने, जीवांच्या संबंधाने, विश्वाच्या संबंधाने, प्राण्यांच्या संबंधाने, ईश्‍वरनिष्ठांच्या संबंधाने, भूतमात्रांच्या संबंधाने आणि अखेरीस जसे तिन्ही लोकांच्या, तसे आदिपुरुषांच्या संबंधाने मिळून भूपृष्ठावरील ऐक्‍याच्या संबंधाने जे सार्वत्रिक उद्गार ख्रिस्ती शतकाच्या तेराव्या शतकात मराठी मंडळामध्ये ज्ञानेश्‍वरांनी काढले आहेत, त्यांच्या वरची दिशा या ख्रिस्ती शतकाच्या एकोणिसाव्या शतकात कोणासही दिसलेली असण्याचा संभव नाही.’

भागवतांच्या उपरोक्त लेखनावर दिलेल्या टिपेमध्ये ‘भागवत लेखसंग्रहा’च्या (खंड ः ५) संपादक दुर्गा भागवत लिहितात ः ‘‘महाराष्ट्रधर्म’ या शब्दाचा इतिहास मराठी वाङ्‌मयातला एक मनोरंजक व बोधप्रद इतिहास आहे.’
दुर्गाबाई असं दाखवून देतात,‘१८९४ मध्ये हिंदू-मुसलमानांचे दंगे सर्वत्र माजले. १८९५ मध्ये पुणे येथे भरलेल्या काँग्रेसच्या मांडवातून कर्मठ मंडळींनी सामाजिक परिषदेस हाकलून देण्यात यश मिळवले. रानडे यांच्या हातून काँग्रेसचे नियंत्रण जाणे, याचा अर्थ काँग्रेसचा सामाजिक आशय लुप्त होऊन तिने फक्त राजकीय स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करणे.’

याच वर्षी न्यायमूर्तींनी (महादेव गोविंद रानडे) एका व्याख्यानात ‘महाराष्ट्रधर्म’ या शब्दाचा उच्चार केला. न्यायमूर्तींनी हा शब्द समर्थ रामदासांच्या लेखनातून (संभाजीमहाराजांना लिहिलेल्या पत्रातून) उचलला होता.
स्वतः रानडे यांनी या संकल्पनेचा पुरेसा विस्तार केलेला नाही. ते काम भागवतांनी त्याच वर्षी केलं. या विस्तारात रामदासांचा उल्लेख येणं अर्थातच स्वाभाविक असलं, तरी रामदासांनी मांडलेल्या विचारांचा आधार भागवतांनी घेतला, असं दिसत नाही. ‘ज्ञानेश्‍वर-तुकारामादींनी उपदेशिलेला भागवतधर्म हाच महाराष्ट्राचा धर्म म्हणजे देशी धर्म व तोच आमचा राष्ट्रीय धर्म’ अशी भागवतांची मांडणी होती. रानडे यांचाही रोख तसाच होता.

रानडे-भागवतांचं हे विवेचन न पटल्यामुळं इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १८९९ मध्ये ‘महाराष्ट्राच्या इतिहासाची साधने, भाग पहिला’मध्ये रामदासांना अनुसरून महाराष्ट्रधर्माची चर्चा केली. त्यात त्यांनी रानडे-भागवतांच्या मांडणीचा प्रतिवाद केला. राजवाडे यांनी महाराष्ट्रधर्मातली जातिनिरपेक्षता, व्यापकपणा बाजूला करून त्याची नाळ सनातन वैदिक वर्णाश्रमधर्माशी लावायचा प्रयत्न केला. हे करताना त्यांनी अर्थातच रामदासांच्या विचारांचा तसाच अन्वयार्थ लावून त्याचा आधार घेतला. त्याचा परिणाम म्हणून खुद्द रामदासांचीच प्रतिमा ‘प्रतिगामी व संकुचित विचारांचे’ अशी निर्माण झाली, म्हणून त्र्यं. गो. सरदेशमुख यांनी राजवाडे यांच्यावर कडाडून टीका केली.

राजवाडे यांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्रधर्माचं विस्तारित स्वरूप जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी धुळे इथले त्यांचे अनुयायी भा. वा. भट यांचं ‘महाराष्ट्रधर्म’ हे पुस्तक उपयुक्त आहे. भट यांनी राजवाडे यांचं चरित्रही लिहिलं आहे.
महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासातल्या महाराष्ट्रधर्माचं चर्चाविश्व हेगेल-मार्क्‍सच्या द्वंद्वात्मक पद्धतीनं समजून घेता येतं. रानडे-भागवतांच्या विचारांना सिद्धान्त (थिसिस) मानलं, तर राजवाडे यांच्या विचारांना प्रतिसिद्धान्त (अँटिथिसिस) मानता येतं; पण या टप्प्यांनी द्वंद्वात्मकतेचं आवर्तन पूर्ण होत नाही, त्यासाठी तिसऱ्या टप्प्याचीही गरज असते. तो टप्पा आपल्याला आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांमध्ये पाहायला मिळतो.

विनोबांनी १९२५ मध्ये ‘महाराष्ट्रधर्म’ नावाचं साप्ताहिक सुरू केलं. पुढं त्याचं मासिक झाले. ‘महाराष्ट्रधर्म’मधून प्रसिद्ध झालेल्या विनोबांच्या लेखनाविषयी दुर्गा भागवत म्हणतात, ‘त्यात भावना शास्त्रीबोवांची, बाणा राजवाड्यांचा आणि कार्य गांधीजींचं अशी एकंदरीत त्यांच्या लेखनाची परिणती झाली.’

विनोबांनी काय केलं याचं नेमकं आकलन दुर्गाबाईंच्या या वाक्‍यातून होत नाही. संतांवरच्या कठोर टीकेच्या संदर्भात विनोबा हे राजवाडे यांना सांभाळून घेतात. राजवाडे यांनी उभ्या केलेल्या तुकाराम-रामदास द्वंद्वाचा निरास करायचा प्रयत्न करतात. ‘दासनवमी’वरच्या लेखात (जो दासनवमीच्या निमित्तानं लिहिला गेला होता व त्याच दिवशी नरवीर तानाजीचा बलिदानदिवस येत होता) त्यांनी रामदासांच्या ‘दास मारुती’चं चित्र देऊन भक्तीतल्या वीरवृत्तीची मांडणी केली; तुकोबांचा ‘हेचि शूरत्वाचे अंग। हारी आणिला श्रीरंग।।’ हा अभंग त्यांनी उद्‌धृत केला. वारकऱ्यांच्या ‘ज्ञानबातुकाराम’ या मंत्राचं विवरण करताना तो ‘मध्यमपदलोपी समास’ असून, त्यात इतर संतांचाही समावेश असल्याची भूमिका घेतली. एकीकडं राजवाडे यांची संकुचित भूमिका व दुसरीकडं भागवतांची व्यापक भूमिका यांचा समन्वय साधत महाराष्ट्रधर्माची पुनर्मांडणी करताना विनोबा यांनी विष्णूच्या त्रिविक्रम वामनाच्या अवताराच्या कल्पनेचा आधार घेतला. विनोबा लिहितात, ‘ ‘महाराष्ट्रधर्म’ हा प्रथमदर्शनी जरी वामनासारखा दिसला तरी वस्तुतः तो दोन्ही पावलांत विराट विश्व व्यापून टाकणाऱ्या त्रिविक्रमासारखा आहे, असे दिसून येईल. या त्रिविक्रमाचे एक पाऊल महाराष्ट्रीय, दुसरे राष्ट्रीय आणि तिसरे आंतरराष्ट्रीय आहे. यशोदेचा बाळकृष्ण एका अर्थाने विश्वरूपाच्या मुखात असला तरी दुसऱ्या अर्थाने त्याच्याही मुखात विश्‍वरूप येते हा अनुभव जसा यशोदेच्या यशस्वी दृष्टीस आला, त्याप्रमाणे ‘महाराष्ट्रधर्म’ हा आकुंचित अर्थाने सबंध भारतीय धर्माला पोटात घालून ‘दहा अंगुळे’ वर उरण्यासारखा आहे, असेच ऐतिहासिक प्रज्ञेच्या विचारी दृष्टीस दिसून येईल.’
‘आमुचा स्वदेश/भुवनत्रयामाजी वास।।’ असं तुकोबा म्हणतात, तेव्हा एका परीनं तो महाराष्ट्रधर्माचाच विस्तार असतो; पण त्याचा पाया मात्र देशीच असतो.
राजारामशास्त्री भागवत हे एक असेच ऐतिहासिक प्रज्ञेचे डोळस विचारवंत होते, यात शंका नाही.

Web Title: sadanand more write article in saptarang