भर्तृहरी आणि ज्ञानेश्वर (सदानंद मोरे)

भर्तृहरी आणि ज्ञानेश्वर (सदानंद मोरे)

ज्यांना षड्‌दर्शनं म्हणतात, ती वैदिक परंपरेतली म्हणजे वेदप्रामाण्य मानणारी दर्शनं आहेत. ‘न्याय’, ‘वैशेषिक’, ‘सांख्य’, ‘योग’, ‘पूर्वमीमांसा’ आणि ‘उत्तरमीमांसा’ अशी ही सहा दर्शनं होत. त्यांना गणेशाच्या म्हणजेच शब्दब्रह्माच्या सहा भुजा मानून ज्ञानेश्वरांनी वैदिक परंपरेतल्या तत्त्वज्ञानाला न्याय दिला, जो भर्तृहरीनंही दिला होता. काव्यनाटकांचा समावेश करून ज्ञानेश्‍वरांनी कलेलाही न्याय दिला आणि एकूण सर्वच मानवी व्यवहार ज्यामुळं सुरळीतपणानं चालणं शक्‍य होतं, त्या राजनीतीलाही त्यांनी यथोचित स्थान दिलं. मात्र, ज्ञानेश्वरांची दृष्टी याहूनही व्यापक आणि समावेशक आहे.

पारंपरिक साहित्यशास्त्रात आठ रस असून, शृंगार हा त्यातला त्यांचा राजा आहे. या पारंपरिक मतामध्ये शांत नावाच्या नवव्या रसाची भर टाकली जाणं हा इतिहासातला महत्त्वाचा टप्पा होय. पारंपरिक अष्टरसांची चौकट अस्तित्वात आली, तेव्हा तिच्याशी समांतर अशी त्रिसंमिताची चौकटसुद्धा  (Frame) अस्तित्वात आली. ‘प्रभुसंमित’, ‘मित्रसंमित’ आणि ‘कांतासंमित’ अशी ही तीन संमितं होत. त्यानुसार वेदवाङ्‌मय हे प्रभुसंमित आहे. धर्माचरणात काय करावं व काय करू नये, याविषयी वेद व्यक्तींना आज्ञा देतात. या आज्ञा प्रभूच्या म्हणजे राजाज्ञेप्रमाणे बंधनकारक असतात. दुसरीकडं इतिहास-पुराणं वेदांच्याच आज्ञांचं थोड्या सलगीच्या भाषेत रूपांतर करतात. मित्रानं मित्राला विश्‍वासात घेऊन समजून सांगावं त्याप्रमाणे. या प्रकाराला मित्रसंमित असं म्हणतात. यापुढची पद्धत म्हणजे कांतासंमित (याला ‘जायासंमित’ असंही म्हणतात). पती-पत्नींचा संबंध आणखी जवळिकेचा व विश्‍वासाचा असतो. ती दोघं जणू काही एकच आयुष्य जगत असतात. एकमेकांना समजावून घेतात, आधार देतात. ही सगळी प्रक्रिया सुखकारक असते. पत्नीनं पतीला विश्‍वासात घेऊन, लाडे लाडे एखादी गोष्टी पतीच्या गळी उतरवावी, तसा काहीसा प्रकार काव्यनाटकांच्या बाबतीत घडतो म्हणून काव्यनाटकांना ‘कांतासंमित’ मानण्यात येतं.

थोडक्‍यात, शास्त्र आणि काव्य हे दोन नय, व्युत्पत्ती आणि प्रीती ही दोन प्रयोजनं, शृंगारादी आठ रस आणि तीन संमितं हा एकूण साहित्यशास्त्रीय विचारव्यूह आहे.
आता या व्यूहातल्या एका घटकसमुच्चयात भर पडली तर तिचा परिणाम इतर घटकसमुच्चयांवर होणं क्रमप्राप्तच आहे. आठ रसांमध्ये शांत या नवव्या रसाची भर पडली, तर त्याची व्यवस्था लावण्यासाठी, त्याला सामावून घेताना इतर संकल्पनांमध्ये कमी-जास्त होणं अपेक्षित आहे. प्रत्येक घटकसमुच्चयात असा बदल करावाच लागेल असं नाही; पण जिथं आवश्‍यकता आहे, तिथं तो करावाच लागेल.
आता शांतरसाची भर पडल्यानंतर शास्त्र आणि काव्य या दोन नयांची संख्या वाढायचं कारण नाही, तसंच काव्याच्या व्युत्पत्ती आणि प्रीती या दोन प्रयोजनांमध्येही काही फरक पडणार नाही.

मात्र, संमितांचा मुद्दा आला, की वेगळा विचार करावा लागतो. शांतरसाची व्यवस्था ‘प्रभू’, ‘मित्र’ किंवा ‘कांता’ या त्रयीत लावता येत नाही. शृंगाराचा संबंध कांतासंमिताशी लागतो, हे अगदीच स्पष्ट आहे; पण शांतरसाचा लावता येत नाही. तो ‘प्रभू’ किंवा ‘मित्र’ या संमितांशीही लावता येत नाही. त्यासाठी एक वेगळंच संमित लागेल; पण ते पारंपरिक साहित्यशास्त्रात उपलब्ध नाही. म्हणजेच पारंपरिक संस्कृत साहित्यशास्त्र हे अपुरं आहे.
पारंपरिक साहित्याची ही उणीव भरून काढून त्याला पूर्णतेला न्यायचं श्रेय ज्ञानेश्‍वरांना द्यावं लागतं.
अर्थात ज्ञानेश्वरी हा साहित्यशास्त्राविषयी प्रत्यक्ष किंवा थेट विधानं करणारा ग्रंथ नाही, तो काव्यग्रंथच आहे; पण तरीही त्यात ज्ञानेश्वरांनी आपली साहित्यशास्त्रीय भूमिका ठाई ठाई सूचित केलेली आहे. तिच्या आधारे त्यांना अभिप्रेत असलेल्या साहित्यशास्त्राची पुनर्रचना करता येते.

ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वरांनी आईच्या प्रतिमेचा वैपुल्यानं व वेगवेगळ्या संदर्भात केलेला उपयोग लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. ते गुरूला माउली म्हणतात, श्रीकृष्णाला माउली म्हणतात, गीतेला माउली म्हणतात. फार काय आत्मवस्तूचा उल्लेख करतानाही त्यांनी ‘प्रियाची परम सीमा। तो माउली भेटे आत्मा।’ असंही म्हटलेलं आहे. आत्म्याला यापूर्वी कुणी माउली म्हटल्याचं ऐकिवात नाही.
याचा परिणाम वारकरी संप्रदायावर झाल्याशिवाय राहिला नाही. वारकरी आपल्या दैवताला विठूमाउली म्हणतात, खुद्द ज्ञानेश्वरांनाही ते माउलीच म्हणतात. फार काय, एकमेकांनासुद्धा ते ‘माउली’ असंच संबोधतात.

मुद्दा सरळ आहे. ज्ञानेश्वरीत जर शांतरस असेल तर तो पारंपरिक त्रिसंमितांच्या चौकटीत बसणार नाही, हे ज्ञानेश्वरांना माहीत होतं, म्हणून ते शांतरसाशी अनुरूप अशा तिसऱ्या संमिताचं सूचन करतात. ते म्हणजे ‘मातृसंमित’. यासंबंधीच्या काही ओव्या उद्‌धृत करायला हरकत नसावी.

१) बालकायिचे वोरसे। माय जै जेवऊ बैसे। ते तया ठाकवि ऐसे। घास करी।
२) तैसे गीतेचे हे दुभते। वत्स करून पार्थाते। दुभिनली जगापुरते। श्रीकृष्ण गाय।।
याच संदर्भात बाराव्या अध्यायातलं गुरूला मातृदेवतेच्या स्वरूपात पाहणारं रूपक अर्थपूर्ण ठरतं. त्यातल्या काही भागांची चर्चा आपण ब्रह्मविद्येच्या संदर्भात केलेली आहेच. आता या आणखी काही ओव्या ः
योगसुखाचे सोहळे। सेवका तुझेनि स्नेहाळे। सोऽहंसिद्धीचे लळे। पाळिसी तू।।४।।
आधारशक्तीचां अंकीं। वाढविसी तू कौतुकीं। हृदयाकाशपल्लकी। परिये देसी निज।।५।।
प्रत्यग्‌ज्योतीची वोवाळणी। करिसी मनपवनाची खेळणी। आत्मसुखाची बाळलेणी। लेवविसी।।६।।
सतरावियेचे स्तन्य देसी। अनाहताचा हल्लरू गासी। समाधिबोधे निजविसी। बुझाउनि।।७।। म्हणौनि साधकां तू माउली। पिके सारस्वत तुझा पाउली। या कारणें मी साउली। न संडी तुझी।।८।।

थोडक्‍यात सांगायचं झाल्यास ज्ञानेश्वरीमुळं मातृसंमित हे शांतरसाशी अनुरूप चतुर्थ संमित हाती लागतं आणि पारंपरिक साहित्यशास्त्रातला संकल्पनाव्यूह पूर्ण होतो. ज्ञानेश्वरीतला साहित्यविचार पुरेसा स्पष्ट होण्यासाठी पहिल्या अध्यायाच्या सुरवातीला ज्ञानेश्वरांनी केलेल्या शब्दब्रह्माच्या रूपकाचा परामर्श घेणं आवश्‍यक आहे.

इतर कोणत्याही इष्टदेवतेला नमन न करता ज्ञानेश्वर सुरवातीला आद्य अशा आत्मरूपाला नमन करतात. हे आत्मरूप वेदप्रतिपाद्य आणि स्वसंवेद्य आहे, असं म्हणून ते आत्मरूपाविषयीच्या शास्त्राचा आणि कलांचा उल्लेख करतात. या सगळ्या प्रकारात ज्ञानेश्वरांनी ग्रंथारंभी श्रीगणेशदेवतेला नमन करायचं हा पारंपरिक संकेत दूर ठेवून आत्मस्वरूपाला नमन केलं आणि आता हे आत्मस्वरूपच गणेश आहे असे समजून ते म्हणतात ः (आत्मरूपा) देवा, तूचि गणेशु। सकलमतिप्रकाशु। म्हणे निवृत्तिदासु अवधारिजो जी।।
ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेल्या (आत्मरूप) गणेशावर ते शब्दब्रह्माचं रूपक करतात. तीच गणेशाची मूर्ती आहे. ‘हे शब्दब्रह्म अशेष। तेचि मूर्ति सुवेष। तेथ वर्णवपु निर्दोष। मिरवीत असे।।’

***

ज्ञानेश्वरांचं शब्दब्रह्म समजून घ्यायचं असेल तर ते इसवीसनाच्या आरंभी होऊन गेलेले विचारवंत भर्तृहरी यांच्या संदर्भातच घ्यायला हवं. शब्दब्रह्माची रूपकात्मक संकल्पना प्रथम भर्तृहरी यांनी ‘वाक्‍यपदीयम्‌’ या ग्रंथातून मांडली. भर्तृहरींनी शब्दब्रह्मात वेद आणि वेदांगे यांचा समावेश केला आहे. स्मृती व दर्शने यांचाही समावेश त्यात होतो.

आत्मरूपाला किंवा ब्रह्माला नमन करणं आपण समजू शकतो. ते प्रतिपाद्य (व स्वसंवेद्यही) आहे. प्रतिपादनाचा (व संवेदनाधारित कलांचाही) व्यवहार मुख्यत्वे भाषेतून म्हणजे वाचेच्या माध्यमातून होतो, म्हणजेच आत्मरूप वाचा आहे. वेद (व इतर साहित्य) त्या आत्मरूपाचं - ब्रह्माचं वाचक (किंवा प्रतिपादक) आहे. ब्रह्म हे वाच्य किंवा प्रतिपाद्य असेल तर त्याचा वाचक अथवा प्रतिपादक असा जो शब्द त्यालाही ब्रह्मच म्हणावं, अशी ही भूमिका आहे. उदाहरणार्थ ः तूप हे आयुष्याच्या वर्धनाचं कारण असल्यामुळं उपचारानं तूप म्हणजे आयुष्य असं म्हणतात.
भर्तृहरी व ज्ञानेश्‍वर यांच्या शब्दब्रह्म संकल्पनांमधला भेद उलगडणं फारसं अवघड नाही.

तात्त्विक किंवा शास्त्रीय व्यवहार आणि काव्यात्म व्यवहार यांच्यातलं महत्त्वाचं साम्य म्हणजे ते दोन्ही व्यवहार शब्दांनी, म्हणजेच  भाषेतून होतात. भर्तृहरी तात्त्विक किंवा शास्त्रीय व्यवहाराला चिकटून बसल्यामुळं त्यांची शब्दब्रह्म ही कल्पना संकुचित बनली. ज्ञानेश्‍वरांनी काव्यनाटकांचा समावेश केल्यामुळं त्यांची संकल्पना व्यापक बनली.

ज्ञानेश्वरांनी शब्दब्रह्मासाठी ज्या गणेशाचं रूपक वापरलं आहे, तो गणेश सहा हातांचा आहे. तत्त्वज्ञानातली न्यायवैशेषिकादी सहा दर्शनं म्हणजे या गणेशाचे सहा हात होत. येथपर्यंत भर्तृहरी व ज्ञानेश्‍वर यांचं एकमत होईल; परंतु त्यापुढं जाऊन ज्ञानेश्वर ‘देखा काव्यनाटका। जे निर्धारिता सकौतुका। त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी।।
या ओळींमुळं ज्ञानेश्वरांच्या शब्दब्रह्मात काव्य आणि नाटक यांचा समावेश होतो. काव्यनाटकांचा संबंध संसंवेद्यतेशी आहे आणि मुख्य म्हणजे तो रसनिर्मितीचा वा आस्वादाचा भाग आहे. त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे काश्‍मिरी पंडित आनंदवर्धन यांनी ‘काव्यात रसयुक्त अर्थ पाहिजे,’ असं सांगितलं आणि त्याचबरोबर ‘हा अर्थ वाच्यार्थ वा लक्ष्यार्थ असण्याऐवजी ध्वन्यर्थ असला पाहिजे,’ असा त्यांचा आग्रह आहे. ध्वन्यर्थ म्हणजे काय व तो कसा निष्पन्न होतो, हे स्पष्ट करताना आनंदवर्धन हे घंटेच्या अनुरणनाचा दृष्टान्त योजतात. घंटेवर टोल पडला असता, पहिल्या आघाताच्या आवाजानंतर एकामागून एक आवाजाच्या लहरी निर्माण होतात. हेच अनुरणन होय. त्याचप्रमाणे शब्दाच्या उच्चारानंतर त्याचा वाच्यार्थ समजल्यावर ज्या अर्थलहरी किंवा तरंग निर्माण होतात तो ध्वन्यर्थ होय. हा अशा प्रकारे काव्याचा सूचित व सुंदर असा अर्थ होय. खरं काव्य हे असं रसध्वनियुक्त काव्य असतं. यासंदर्भात ज्ञानेश्वरांनी घंटेचाच दाखला दिला आहे. अर्थध्वनी म्हणजेच ध्वन्यार्थ.
ज्ञानेश्वर आपल्या शब्दब्रह्मात षड्‌दर्शनांप्रमाणे काव्यनाटकांचा समावेश करतात; पण ते तिथंच थांबत नाहीत. गणेशाच्या हातातल्या आयुधांचं वर्णन करताना त्यांनी त्याच्या एका हातात नीतिभेदरूपी अंकुश दिला आहे. इथं नीती म्हणजे अर्थातच राजनीती. सर्वच मानवी व्यवहारांवर नीतीचा अंकुश म्हणजे नियंत्रण असतं; त्यामुळंच समाजातल्या अराजकाची शक्‍यता संपुष्टात येऊन त्याचं अस्तित्व सुरळीत व शांततापूर्ण होतं. भारतात शुक्र-बृहस्पतींपासून कौटिल्य-कामंदक यांच्यापर्यंत राजकीय विचारांची दीर्घ परंपरा आहे. हा विचार ज्ञानेश्वरांनी शब्दब्रह्माचा भाग बनवला.
ज्यांना षड्‌दर्शनं म्हणतात, ती वैदिक परंपरेतली म्हणजे वेदप्रामाण्य मानणारी दर्शनं आहेत. ‘न्याय’, ‘वैशेषिक’, ‘सांख्य’, ‘योग’, ‘पूर्वमीमांसा’ आणि ‘उत्तरमीमांसा’ अशी ही सहा दर्शनं होत. त्यांना गणेशाच्या म्हणजेच शब्दब्रह्माच्या सहा भुजा मानून ज्ञानेश्वरांनी वैदिक परंपरेतल्या तत्त्वज्ञानाला न्याय दिला, जो भर्तृहरीनंही दिला होता. काव्यनाटकांचा समावेश करून ज्ञानेश्‍वरांनी कलेलाही न्याय दिला आणि एकूण सर्वच मानवी व्यवहार ज्यामुळं सुरळीतपणानं चालणं शक्‍य होतं, त्या राजनीतीलाही त्यांनी यथोचित स्थान दिलं.

मात्र, ज्ञानेश्वरांची दृष्टी याहूनही व्यापक आणि समावेशक आहे. अवैदिकांची अथवा श्रमणांची परंपरा हा भारतीय संस्कृतीच्या परिवेशातच विकसित झालेल्या ज्ञानाचा भाग आहे, हे ज्ञानेश्वरांना ठाऊक आहे. या परंपरेतल्या ग्रंथाचा प्रातिनिधिक का होईना समावेश करायला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा ‘एक हाती दंतु। जो स्वभावताचि खंडितु। तो बौद्धमत संकेतु। वार्तिकांचा।।’ या ओवीतून त्यांनी बौद्धमताची दखल घेतली. गणेशाच्या हातांतल्या आयुधांमध्ये तुटलेल्या दाताचा समावेश आहे. तो दात म्हणजे वार्तिकग्रंथातून प्रकट झालेलं बौद्ध मत, असं ज्ञानेश्वर सांगतात. इथं ‘वार्तिक’ या शब्दानं त्यांना प्रसिद्ध बौद्ध तत्त्ववेत्ता धर्मकीर्ती यांचा ‘प्रमाणवार्तिक’ हा ग्रंथ अभिप्रेत आहे. काश्‍मीर शैवपरंपरेतल्या तात्त्विक आणि साहित्यशास्त्रीय ग्रंथांमधून धर्मकीर्ती यांच्या ‘प्रमाणवार्तिका’तली अवतरणं नेहमी आढळतात. त्यामुळं ज्ञानेश्वरांना धर्मकीर्ती माहीत असण्यात काहीच अडचण नाही.

ज्ञानेश्वरांनी आणखी एक मौज केली आहे. ज्ञानेश्वर गणेशाच्या दातांचा उल्लेख  करताना ते शुभ्र वर्णाचे असल्याचं सांगतात. ज्ञानेश्वरांना रंगाचा उल्लेख करायचा असता तर गणेशाच्या मूर्तीच्या रंगाचाच उल्लेख करणं उचित ठरलं असतं; पण मुद्दा असा आहे, की त्यांना पांढऱ्या रंगाचाच उल्लेख करायचा होता. गणेशाच्या मूर्तीचा रंग बऱ्याच वेळा शेंदरी वगैरे असतो. निदान तो पांढरा असावा असा संकेत नाही. दातांचा रंग मात्र निश्‍चितपणे शुभ्रच असतो.

पारंपरिक रससिद्धान्तात प्रत्येक रसाचा असा एक रंग मानलेला आहे. रंगभूमीवर त्या त्या रसाचा परिपोष करायचा असेल तर नेपथ्यात त्या त्या रंगाला प्राधान्य द्यायची प्रथा असावी. शुभ्र हा शांतरसाचा रंग आहे. त्याचा उल्लेख करून ज्ञानेश्वर आपली कृती शांतरसाची असल्याचं सूचित करतात. नंतर त्यांनी स्पष्टपणे ‘तो शांतुनि अभिनवैल’ असं म्हटलंसुद्धा आहे. या ओवीखंडात ‘अभिनवैल’या शब्दातून शांतरसाचे पुरस्कर्ते अभिनवगुप्त यांच्या नावाचं सूचन होऊ शकतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com