"आर्यावर्तातील आर्यांचे आम्ही पूर्वज'

सदानंद मोरे
रविवार, 23 जुलै 2017

राजारामशास्त्री भागवत यांच्या म्हणण्यानुसार,  ‘आम्ही मराठे संकीर्ण आहोत. आम्ही आर्य आहोत तर द्रविडही आहोत. आम्ही आर्य खरे; पण आर्यावर्ताच्या बाहेरील. आर्यावर्तातील आर्यांचे आम्ही पूर्वज, असेही एका अर्थाने म्हटल्यास हरकत नाही. कारण, जे संस्कृतचे रूप आमच्या मराठीचे एक प्रकृती झाले, ते आर्यसंस्कृतच्या पूर्वीचे असून संस्कृतचीच ती प्रकृती होय. आर्यांनी दक्षिण दिशा यमाची ठरविली आहे. कारण, दक्षिणींनी अनेक वेळा आर्यांचा पराभव केला व मार मारीत त्यांस पुनःपुनः आपल्या मुलुखात पिटाळून लाविले, हेच नसेल ना? 

राजारामशास्त्री भागवत यांच्या स्वारस्याचा प्रमुख विषय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले लोक म्हणजे मराठे हा होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या मते महाराष्ट्राच्या इतिहासाचे तीन भाग पडतात. पहिला म्हणजे ः प्राक्‌शालिवाहन, दुसरा : शालिवाहनाचा काळ व तिसरा ः शालिवाहनोत्तर काळ. प्राक्‌शालिवाहन म्हणजेच शालिवाहनपूर्व इतिहासाच्या साधनांची वानवाच आहे, असे ते जे म्हणतात, ते योग्यच आहे. तथापि, गुणाढ्याच्या बृहत्कथेला त्या इतिहासाचं साधन मानायची त्यांची काही प्रमाणात तयारी आहे. 

‘काही प्रमाणात’ यासाठी म्हणावं लागतं, की ‘पैशाची’ भाषेत लिहिल्या गेलेल्या गुणाढ्याच्या मूळ ग्रंथाच्या अभावी सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी केलेल्या त्याच्या संस्कृत भाषांतरांवर अवलंबून राहावं लागतं. स्वतः शास्त्रोबोवा या भाषांतरांच्या म्हणण्यापेक्षा भाषांतरकारांच्या प्रामाणिकपणाबद्दल साशंक आहेत. तथापि, भागवतांकडून घेतलेला धागा पुढं नेणारे ‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी मात्र बृहत्कथेच्या भाषांतरांवर विश्‍वास ठेवून त्याला कात्यायन वररुचीच्या ‘प्राकृत्‌प्रकाश’नामक व्याकरणग्रंथाची जोड देऊन शालिवाहनपूर्वकालीन महाराष्ट्राचा इतिहास सिद्ध करायच्या दिशेनं पावलं टाकली. या ‘प्राकृत्‌प्रकाशा’चं माहात्म्य भागवतांनाही ठाऊक होतं; किंबहुना कात्यायनाचा हा ग्रंथ त्यांच्या इतिहासलेखनाचा पायाच आहे, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही.
बृहत्कथेच्या बळावर भागवतांनी केलेलं मुख्य विधान म्हणजे ‘मौर्यपूर्व काळात मगधमध्ये जेव्हा नंदांचं घराणं राज्य करत होतं, तेव्हा महाराष्ट्रात शालिवाहनाचा वंश सुरू होता.’

महाराष्ट्रदेशाची भागवतांना अभिप्रेत असलेली व्याप्ती विशाल होती. इतिहासलेखनाच्या सोईसाठी त्यांनी या महाराष्ट्राचे विभाग पाडायला हरकत नाही; पण एरवी अतिदक्षिणेकडचा भाग सोडला तर नर्मदेपासून कर्नाटकापर्यंतचा प्रदेश -ज्यात विदर्भ व कोकण यांचाही समावेश होतो- त्यांच्या लेखी महाराष्ट्रच होता. प्रसंगी ते महाराष्ट्राची ‘मराठी महाराष्ट्र’ आणि ‘कानडी महाराष्ट्र’ अशी विभागणी करतात, तर कधी ‘कुंतलदेश म्हणजे कर्णाटक’ असं समीकरण मांडून ‘तो महाराष्ट्राचा भाग होता,’ असं सांगून त्याला ‘कुंतली महाराष्ट्र’ असं संबोधतात.
भागवतांचा हा महाराष्ट्र अर्थातच आर्यावर्ताच्या बाहेर आहे. एवढं सांगून भागवत थांबत नाहीत, तर ते महाराष्ट्रातल्या लोकांच्या अर्थात जनांचा म्हणजेच मराठ्यांचाही आणि त्यांच्या धर्माचाही विचार करतात, त्यांच्या भाषेचाही विचार करतात.
‘आमचे देशी लोक’ म्हणजे नेमके कोण, हे सांगताना भागवत अर्थातच शालिवाहनपूर्वकाळाचा विचार करतात. भागवतांच्या निवडक साहित्याचं संपादन करणाऱ्या विदुषी दुर्गा भागवत लिहितात त्यानुसार : ‘डॉ. केतकरांच्या ‘समाजशास्त्राचे’ बीज या लेखात पेरले गेले आहे.’
राजारामशास्त्री भागवत यांच्यानुसार, ‘नाग, गोप, वानर, कोळी आणि मानव हे महाराष्ट्रातले पाच मुख्य लोक होत. दानव व द्रविड हेही महाराष्ट्रातलेच. यातील दानव किंवा द्रविड हे मूळचे एकच असावेत. मानव, दानव व राक्षस मिळून यादव झालेले.’
पुढचा मुद्दा म्हणजे ‘यादव हे गोपांतून निघालेले. कृष्णाच्या वेळी यादव थेट मथुरेपर्यंत पसरत गेले होते. कौरव-पांडवांच्या वेळेस यादव, मागध व कौरव या तिहींमध्ये काय तो हिंदुस्थानच्या प्रभुतेविषयी मोठा कलह होता. यादवांनी पहिल्यांदा कौरवांच्या मदतीनं मागधांस बुडविले व पुढे कृष्णाने पांडवांचा पक्ष घेऊन कौरवांस रसातळी नेले.’ हे महाराष्ट्राच्या पूर्वेतिहासाचं सार.
यापुढच्या इतिहासाचा दुवा जुळवताना भागवत सांगतात, ‘पुढे काही काळाने जेथे पूर्वी ‘गोप, यादव’ वगैरे लोक होते, तेथेच मराठे लोक प्रसिद्ध झाले. या लोकांस नावारूपास आणिले ते शालिवाहन वंशाने.’
गोपयादव आणि मराठे यांच्यातला दुवाही भागवत जोडतात. ते म्हणतात, ‘यादवादी वीर लढवय्ये किंवा योद्धे असल्यामुळं ते महारथी म्हणून प्रसिद्ध पावले. ‘मराठा,’ ‘मऱ्हाठी’ हा महारथीचा अपभ्रंश; त्याचे संस्कृतीकरण होऊन महाराष्ट्र व महाराष्ट्री हे शब्द रूढ झाले.’
भागवतांच्या इतिहासातला मुख्य संघर्ष हा ‘आर्य विरुद्ध अनार्य’ असा नसून, ‘उत्तरेकडील विरुद्ध दक्षिणी’ असा दिसतो. अर्थात भागवत आर्य, अनार्य, द्रवीड हे शब्द वापरतात व ते संदर्भानुसार वापरतात.
या सगळ्या प्रक्रियेत निदान शालिवाहनकाळापर्यंत तरी ब्राह्मणांना व त्यांच्या धर्माला महत्त्व नव्हतं. ब्राह्मण यदुक्षेत्रात व पर्यायानं महाराष्ट्रात दाखल झाले ते नंतर! पण महत्त्वाचा मुद्दा वेगळाच आहे. महाराष्ट्रात ब्राह्मण आले ते जैनांच्या प्रभावानं अहिंसक होऊन. भागवत म्हणतात, ‘त्यांनी जो ब्राह्मणी धर्म आणिला तो यज्ञाव्यतिरिक्त हिंसा गाळून टाकलेला वैदिक धर्म. या धर्माने हळूहळू जैन धर्माची जागा बळकावली.’
भागवत असंही सांगतात, ‘महाराष्ट्र मंडळात ‘शूद्र’ नावाने नर्मदेच्या उत्तरेस नावाजलेला वर्ग बिलकूल नाही. मऱ्हाठा मात्र - मग तो कोकणातला असो की देशावरचा असो - मूळचा म्हणून एक. महाराष्ट्र क्षत्रिय सर्व एकमेकांचे बंधू - जसे तंजावरकर व मुधोळकर, तसेच ग्वाल्हेरकर व वाडीकर. जातिभेद महाराष्ट्र मंडळात पूर्वीच्या काळी नव्हता. तो ब्राह्मणांनी आपल्याबरोबर शालिवाहनवंशाची समाप्ती झाल्यानंतर आणला.’
भाषेच्या मुद्द्याकडं येताना भागवत सांगतात ः ‘पुढं प्राकृत भाषा मऱ्हाठी याच नावाने नावाजली व ब्राह्मणांची म्हणजे धर्मगुरूंची भाषा संस्कृत तर इतर सर्व लोकांची भाषा ‘मऱ्हाठी’ जीस ब्राह्मणांनी ‘महाराष्ट्री’ असे रूपांतर दिले ती - किंवा तिच्यापासून निघालेली शौरसेनी भाषा - झाली. सारांश, मऱ्हाठी आणि संस्कृतच्या वेळची. तिचा आर्य संस्कृतबरोबर दुसरा संबंध काही नाही. काव्यसंस्कृत तर पुष्कळ वर्षांनी पुढे जन्मले. तेव्हा मानवी रूप जे संस्कृताचे होते ते व दानवी भाषा या दोन प्राचीन मराठीच्याच प्रकृती होत. वानर वगैरे जे लोक होते, ते हळूहळू गोपांत किंवा यादवांत व दानवांत मिसळून गेले.’
यावरून भागवत जो निष्कर्ष काढतात, तो महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, ‘आम्ही मराठे संकीर्ण आहोत. आम्ही आर्य आहो तर द्रविडही आहोत. आम्ही आर्य खरे; पण आर्यावर्ताच्या बाहेरील. आर्यावर्तातील आर्यांचे आम्ही पूर्वज, असेही एका अर्थाने म्हटल्यास हरकत नाही. कारण, जे संस्कृतचे रूप आमच्या मराठीचे एक प्रकृती झाले, ते आर्यसंस्कृतच्या पूर्वीचे असून संस्कृतचीच ती प्रकृती होय. आर्यांनी दक्षिण दिशा यमाची ठरविली आहे. कारण, दक्षिणींनी अनेक वेळा आर्यांचा पराभव केला व मार मारीत त्यांस पुनःपुनः आपल्या मुलुखात पिटून लाविले, हेच नसेल ना? आर्यांनी आमच्या देशाची गणना अनार्यलोकांत केली. कारण, त्यांस अतिप्राचीन इतिवृत्त माहीत नाही, हे एक व आर्य धर्माची सुरवात झाल्यानंतर ब्राह्मणांस, आपले गुरू दुसरे कोणी होते हे कबूल करणे, हे दुसरे. तशात आम्हांमध्ये जितके आर्यपण आहे, तितकेच, किंबहुना त्याच्यापेक्षा थोडेसे अधिक, द्रविडपणही आहे. आमच्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांसही शुद्ध आर्य म्हणता येत नाही. ...सारांश, आम्ही मराठे सब्राह्मण संकीर्ण आहोत. आजपर्यंत सर्वांवर आम्ही मात केली व आजमितीस आमच्यामध्ये इतर हिंदुस्थानातील लोकांपेक्षा कर्तृत्व विशेष दिसत आहे, याचे कारण हाच आमचा संकीर्णपणा आहे.’
आपला सिद्धान्त मांडताना भागवत हे भाषाशास्त्र व व्युत्पत्तिव्याकरणाचा आधार घेतात, हे आपण जाणतोच. मराठ्यांच्या प्रभुत्वाचा सिद्धान्त मांडताना आता ते हिंदी, हिंदुस्थानी किंवा ब्रज या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या भाषेकडं वळतात. ते म्हणतात, ‘सारांश ‘हिंदू’ व ‘हिंद’ हे दोन्ही शब्द अर्वाचिन काळातील आहेत. हिंदी भाषेचे मूळ नाव व्रज.’ ...तेव्हा जर व्रज भाषा, हिंदी भाषा व हिंदुस्थानी भाषा हे शब्दच प्राचीन काळी नव्हते व जर ‘महाराष्ट्री’ शब्द प्राचीन काळी कात्यायनाचा विचार करता निःसंशय होता व ही ‘महाराष्ट्री’ भाषा जर कात्यायन शौरसेनी भाषेची म्हणजे व्रजभाषेचे मातृस्थान भोगणाऱ्या भाषेची प्रकृती समजतो, तर प्राचीन मऱ्हाठी व तिच्या बरोबर ती बोलणारे मऱ्हाठे पूर्वी चांगले हिमालयापर्यंत पसरलेले असून, एव्हाकाळी हिंदुस्थानात ज्या भाषा चालत आहेत, जे आचार-विचार चालत आहेत व जे धर्म चालत आहेत, त्या सर्वांचे एक मूळ मऱ्हाठी भाषा व मऱ्हाठे असे म्हटल्यास त्यास काही गैर नाही.’
भागवतांचा युक्तिवाद हा केवळ व्युत्पत्तीवर आणि भाषाविकासशास्त्रावर आधारित नाही, तर त्याला इतरही पैलू आहेत. त्यांचा संबंध साहित्य आणि कला यांच्याशीही पोचतो. गाथा नावाचा काव्यप्रकार मुळातला महाराष्ट्री भाषेतला असून, त्याचा सर्वत्र स्वीकार झाला. भागवत सांगतात, ‘महारथांचा व अनेक प्रकारच्या विद्यांचा प्राचीन काळी संबंध जगद्विदित्‌ होता. ‘गाथा’ व ‘गीत’ हे मूळचे पर्याय दुसऱ्या विचारात येऊन गेले आहेत. गाथांची भाषा महाराष्ट्री असावी, असा आलंकारिकांनी नियम बांधला आहे. त्यावरून महारथांचा व गाथांचा किती संबंध असावा, याचे सहज अनुमान होते.’
आता नृत्यासंबंधी. भागवत म्हणतात, ‘रास वगैरे प्रकार मूळचे गोपांचे. गोप हे अतिदक्षिण लोक.’ असेच हल्लीसक या नृत्याबद्दलही म्हणता येते. याचाही संबंध गोपांशी येतो.
यानंतर नाट्याचा विचार करू. भागवत म्हणतात, ‘नाटकादिकांत चार वृत्ती प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी दोन मराठ्यांच्या. ‘कैशिक’ असे रुक्‍मिणीच्या बापाला म्हटले आहे. त्यापक्षी हे मूळचे ‘विदर्भ’ (वऱ्हाड) देशाचेच किंवा त्याच्याच जवळच्या लहानशा जनपदाचे नाव. ‘कैशिक’ लोकांमध्ये ज्या वृत्तीचा प्रचार होता ती ‘कैशिकी.’ ‘विदर्भ’ हा यदुसंततीचा देश. यास प्रमाण हरिवंश व तो महाराष्ट्रात  पान १० वरून 
येतो व यास राजशेखरादिकांची महाराष्ट्र व विदर्भ अभिन्न मानणारी काव्ये व हल्लीही तेथे मराठी भाषेचाच अंमल आहे हे. ‘सात्वत्‌’ किंवा ‘सात्वत’ हाही यादवांचाच पोटभेद किंवा फाटा. त्या लोकांची जी मूळची ‘वृत्ती’ ती ‘सात्वती.’ ‘रीति’ म्हणजे अलंकारशास्त्रात लिहिण्याची शैली. सर्व ‘रीतिं’मध्ये श्रेष्ठ व सुहृदयांच्या हृदयास आनंद देणारी म्हटली म्हणजे एक ‘वैदर्भी’ अर्थात ‘विदर्भ’ देशातील लोकांनी जिचा आदर केला ती.’
या विषयाची आणखी चर्चा मी ‘गर्जा महाराष्ट्र’ या ग्रंथात केलेली आहे. जिज्ञासूंनी ती जरूर पाहावी.
तपशिलात न शिरता आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. त्याशिवाय इतिहासाची ही जटील प्रक्रिया उलगडता येणार नाही. भागवतांनी वैदिक परंपरेतल्या अंतःसंघर्षाकडं अंगुलिनिर्देश केल्याची चर्चा यापूर्वी झालेली आहे. हा संघर्ष दोन पातळ्यांवरचा होता. एक संघर्ष ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामधला आणि दुसरा ब्राह्मणांचा अंतर्गत संघर्ष. ब्राह्मण-क्षत्रिय संघर्षात विश्‍वामित्र आणि परशुराम ही नावं अजरामर झाली आहेत. विश्‍वामित्रानं ब्रह्मर्षी पद मिळवण्याकरिता केलेला झगडा हा एक रोचक विषय आहे. परशुरामाला तर दशावतारांमध्ये स्थान मिळालं. त्याचा आणि हैहय क्षत्रिय कुलातल्या कार्तवीर्य सहस्रार्जुनाशी झालेला संघर्ष व त्यातून त्यानं पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची केलेली प्रतिज्ञा या गोष्टी पुराणांतरी गाजलेल्या आहेत. त्यानं २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, अशीही कथा आहे... ब्राह्मणांचं सामर्थ्य सांगताना ‘शापादपि शरादपि’ ही उक्ती निघाली ती परशुरामावरूनच. भागवतांच्या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला तोंड फुटलं होतं. या वादात विश्‍वामित्र हा ब्राह्मणेतरांचा नायक, तर परशुराम हा ब्राह्मणांचा अशी पुराणापुराणांची जणू विभागणी झाली होती.
शास्त्रीबोवांनी आपल्या भागवती बाण्याला अनुसरून विश्‍वामित्राची बाजू घेतली आणि परशुरामाच्या कथेतली अतिशयोक्ती व विसंगती उघड करून समकालीन ज्ञातिबांधवांचा रोष ओढवून घेतला. ते त्यांच्यासाठी जणू ‘कुऱ्हाडीचा दांडा’ ठरले. स्वजातीची बाजू न घेणारा मनुष्य विक्षिप्तच ठरणार, यात विशेष ते काय?
‘नंदांचे क्षत्रियकुलम्‌’ या पौराणिकांच्या लाडक्‍या समजुतीवरही भागवतांनी असाच हल्ला चढवला. चंद्रगुप्त मौर्य आणि त्याच्या घराण्याला शूद्र ठरवण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी घेतलेले व्युत्पत्तिशास्त्रीय आक्षेप लक्षणीय होते. मुळात त्यांच्या म्हणण्यानुसार, नलावडे (नल), मोरे ही घराणी महाराष्ट्रातली. त्यांच्यापैकी काही लोकांनी उत्तरेत जाऊन पराक्रम गाजवला. नंद राजाची शूद्र दासी मुरा या नावापासून मौर्य शब्द व्युत्पादिणे हे अशास्त्रीय ठरतं, हे त्यांनी दाखवून दिलं.
ब्राह्मणांनी ज्या राजघराण्यांना शूद्र ठरवलं, ती घराणी ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व मान्य करायला तयार नव्हती, असं भागवतांचं निरीक्षण आहे.
एकीकडं अंतःसंघर्षातून धर्मदृष्ट्या उन्नत होत असलेल्या आणि दुसरीकडं बौद्ध-जैनादी धर्मांकडं आकर्षित होणाऱ्या क्षत्रियांशी सुरू असलेल्या संघर्षातून जे काही घडलं, त्याचा संबंध महाराष्ट्राच्या धर्मेतिहासाशी लावायचा प्रयत्न भागवत करतात.
अशाच प्रकारचा प्रयत्न इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनीही केला असल्याचं आपण जाणतो; पण राजवाडे आणि भागवत यांच्या मांडणीत लक्षणीय फरक आहे. राजवाड्यांच्या मांडणीनुसार, उत्तरेतली बौद्ध-जैनादी वेदविरोधी पाखंडे व त्यांना आश्रय देणारे मौर्यांसारखे शूद्र राजे यांच्यापासून आपल्या सनातन धर्माचा व वर्णव्यवस्थेचा बचाव करण्यासाठी ब्राह्मण-क्षत्रियांनी दक्षिणेकडं प्रस्थान ठेवलं. त्या वेळी दक्षिणेतले लोक पूर्णपणे रानटी व असंस्कृत अवस्थेत होते.
भागवतांची मांडणी अशी एकतर्फी नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘याउलट दक्षिणेतल्या सुसंस्कृत व सुधारलेल्या लोकांनी म्हणजे मराठ्यांनी उत्तरेत स्थलांतरे करून तिथं प्रभुता भोगिली होती.’ दरम्यान तिथल्या संघर्षातून व समन्वयातून धर्मोन्नती झाली ती अशी ः ‘याज्ञिकांचा व भरतभूमीचा समागम होऊन, याज्ञवल्क्‍यादिकांच्या प्रभावाने उपनिषदे व त्यांच्यापासून अखेरीस भगवद्‌गीता हे रत्न उपजले. याज्ञिक ‘ईश्‍वर नाही’ असे म्हणणारे नव्हत व योगी ईश्‍वरवादी, परमकारुणिक, सर्वज्ञ व सर्वगुरू असून स्वतः गुरुविरहित व अनादि असा कोणी चेतन आहे, तो योग्यांचा ईश्‍वर व या ईश्‍वराची प्रवृत्ती सतत परार्थ असते, असे ते म्हणतात. तेव्हा याज्ञिकांची व योग्यांची सहज प्रीती जडली.’
भागवत पुढं म्हणतात, ‘अशोक राज्य करीत असता, ब्राह्मण दक्षिण दिशेस गेले ते भगवद्‌गीतेस काखोटीस मारून गेले. वेदांचे सार वेदान्त, वेदान्ताचे सार उपनिषदे व उपनिषदांचे सार भगवद्‌गीता, ती यज्ञाभिमानी विष्णूच्या पूर्णावताराच्या मुखकमलातून निघाली म्हणून तिच्या सभोवती वैष्णवांनी आपली प्रस्थाने रचिली. असुरभयाने आंधळे झालेले याज्ञिक हेच पुढे वैष्णव झाले.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sadananda more article