इनर इंजिनिअरिंग : महाशिवरात्रीला जागरण का करावे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahashivratri

इनर इंजिनिअरिंग : महाशिवरात्रीला जागरण का करावे?

सद्‍गुरू - भारतीय परंपरेत, वर्षभरात ३६५ उत्सव असतात. आज, आर्थिक कारणांमुळे आणि आपण आपल्या कामाची रचना ज्या पद्धतीने केली आहे त्यामुळे, त्यापैकी बरेच सण लोप पावले आहेत. आजही सुमारे ५० ते ६० सण वेगवेगळे लोक साजरे करत आहेत, परंतु ती संख्याही कमी होत आहे. सुमारे ५/६ उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जात आहेत. जवळपास प्रत्येक भारतीय सण चंद्रसौर कॅलेंडरशी जोडलेला असतो. त्यादिवशी सूर्यमालेत काय घडत असेल याचा विचार करून आपल्यासाठी जे अनुकूल आहे, असे काहीतरी आपल्याला करायचे आहे.

हे शरीर निर्माण करण्यासाठी सौर यंत्रणा कुंभाराच्या चाकासारखी काम करत आहे. सूर्यमालेत जे काही घडते ते सर्व काही आपल्या बाबतीत घडते. या परंपरेत, सूर्यमालेत ठराविक दिवशी काय घडत आहे याचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले गेले आहे आणि त्यानुसार, आपण ठराविक प्रकारचा उत्सव तयार केला जिथे आपण ठराविक गोष्टी करतो. महाशिवरात्रीला आपला ग्रह एका ठराविक प्रकारे फिरत असतो. तो फक्त त्याच्या अक्षावर फिरत नाही - तो नेहमी किंचित डुगडुगत असतो. त्या डुगडुगण्यामुळे ग्रहावर एक ठराविक प्रकारची परिस्थिती निर्माण होते. म्हणून, महाशिवरात्रीच्या रात्री उत्तर गोलार्धात ऊर्जेचा प्रवाह नैसर्गिकपणे वरच्या दिशेला होत असतो.

महाशिवरात्रीला जेव्हा शक्ती वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असतील आणि तेव्हा जर तुम्ही आडवे झालात, तर तुम्ही त्यामध्ये अडथळा आणत आहात. तुम्ही केवळ फायदा गमावत नाही, तुम्ही एका स्तरावर स्वतःचे नुकसानसुद्धा करू शकता. या सर्व गोष्टी तुमच्यासाठी तेव्हाच महत्त्वाच्या असतात जेव्हा तुम्हाला एक संपूर्ण विकसित मनुष्य बनायचे असते. एक संपूर्ण विकसित मनुष्य असण्याचा अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये उघडता येणारी प्रत्येक क्षमता तुम्हाला उघडी करायची आहे. या उद्देशासाठी, आपण ‘जागरण’ नावाची गोष्ट तयार केली म्हणजे सतर्क राहून पाठीचा कणा ताठ ठेवणे.