समर्पणाचं स्मरण...

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाच्या आवारातील स्मृतिस्तंभावर कोरलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळी वाचल्या की, आपण पोहोचतो ते थेट शिवकाळातच!
sagar deshpande writes great poet Kusumagraja engraved on memorial pillar Chief of Army Staff Prataprao Gujar
sagar deshpande writes great poet Kusumagraja engraved on memorial pillar Chief of Army Staff Prataprao Gujarsakal
Summary

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाच्या आवारातील स्मृतिस्तंभावर कोरलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळी वाचल्या की, आपण पोहोचतो ते थेट शिवकाळातच!

दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा,

ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा,

क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा,

अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात,

वेडात मराठे वीर दौडले सात!

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाच्या आवारातील स्मृतिस्तंभावर कोरलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळी वाचल्या की, आपण पोहोचतो ते थेट शिवकाळातच! कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरीजवळच्या कुपे-कानडेवाडी परिसरात जिथं बहलोलखानाच्या अफाट फौजेवर प्रतापरावांसह सहा मावळे तुटून पडले, तिथंच काही वर्षांपूर्वी एक प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष (स्व.) बाबासाहेब कुपेकर यांच्या पुढाकाराने, दुर्गप्रेमी शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार सु. रा. देशपांडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने आणि या परिसरातील इतिहासप्रेमींच्या सहभागाने उभारण्यात आलेलं हे स्मारक म्हणजे शिवचरित्रातील अंगावर रोमांच उभं करणाऱ्या एका अध्यायाचं प्रेरणाशिल्पच आहे!

पन्हाळगड हातून गेल्यामुळे खवळलेल्या आदिलशहाचा कोणी सरदार पुन्हा गड घेण्यासाठी येणार असा अंदाज बांधून त्याला वाटेतच गाठण्याची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर सोपवली. महाराजांच्या अंदाजानुसार बहलोलखान स्वराज्यावर चालून आलाच. प्रतापराव सध्याच्या सांगली जिल्ह्यातील जत जवळच्या उमराणीनजीक डोण नदीकाठी दबा धरून बसले.

इथं मराठ्यांच्या तावडीत सापडलेल्या खानाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि १५ एप्रिल १६७३ ला त्याचा सपाटून पराभव झाला. खान प्रतापरावांना शरण आला. पाण्याविना तडफडणारं सैन्य आणि जनावरं पाहून प्रतापरावांनाही दया आली. खानाकडून खंडणी घेऊन त्यांनी त्याला सोडलं. मात्र, ही बातमी समजताच महाराज संतापले. त्यांनी प्रतापरावांना कडक शब्दांत पत्र धाडलं. ‘..... हा (बहलोलखान) घडोघडी येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो त्याची गाठ घालून, बुडवून फत्ते करणे, नाही तर आम्हास तोंड न दाखविणे.’

महाराज रागावले. आपलं चुकलंच. हा खानही कृतघ्नपणे स्वराज्यावर चालून येण्याच्या मसलती करीत असल्याचं पाहून प्रतापराव स्वतःवरच चिडले. पस्तावले. दया करून सोडलेला वैरी स्वराज्यावर पुन्हा नक्की चाल करणार हे त्यांना कळून चुकलं. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रतापराव आपल्या सहा शिलेदारांसह छावणीपासून दूर अंतरावर असतानाच त्यांना खबर मिळाली की, बहलोलखान नेसरीच्या बाजूने स्वराज्यात घुसतोय. आपल्या सहा शिलेदारांना घेऊन ते तडक बहलोलवर हल्ला करण्यासाठी नेसरीच्या रोखाने दौडू लागले. नेसरीजवळच्या घटप्रभेच्या उत्तरेकडे असलेल्या खानाच्या फौजेवर हे विजेचे सात लोळ अक्षरशः कडकडत कोसळले.

हजारोंच्या संख्येने असलेल्या फौजेसमोर अवघ्या सात जणांचा किती काळ टिकाव लागणार? ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी या सात तळपत्या तलवारी शांत झाल्या. प्रतापरावांच्या बलिदानाने नेसरीची खिंड पावन झाली. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू असतानाच स्वराज्याचा सरसेनापती धारातीर्थी पडला. महाराज दु:खाने उद्‌गारले, ‘आज एक बाजू पडली!’ मात्र पाठोपाठ आनंदराव भोसल्यांनी खानाच्या फौजेवर त्वेषाने हल्ला चढवला आणि त्याचा पुरता पराभव केला. स्वराज्याच्या इतिहासात आणखी एक पराक्रमी अध्यायाची नोंद झाली.

खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनाही प्रतापरावांच्या मृत्यूचं अपार दु:ख झालं होतं. आपल्या कडक शब्दांमुळे प्रतापरावांनी हौतात्म्य पत्करलं याचीही महाराजांच्या मनाला जखम झाली असावी. त्यांनी प्रतापरावांची कन्या जानकीबाई यांना आपली सून करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह झाला. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापरावांच्या हौतात्म्यानंतर त्यांचे व्याही झाले.

१९६९ च्या दरम्यान पन्हाळ्यावरील इतिहास संधोधक (कै.) मु. गो. गुळवणी यांनी प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांच्या समाधीचा शोधनिबंध सादर केला आणि अनेक शिवभक्तांचे पाय इकडं वळू लागले. कानडेवाडीचेच रहिवासी असलेले ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी, दुर्गप्रेमी सु. रा. देशपांडे आदींनी या समाधी परिसराच्या जीर्णोद्धारासाठी सतत प्रयत्न केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेनेही या कामी मदत केली. स्वतः बाबासाहेब, त्यांचे बंधू बाळासाहेब आणि भैयासाहेब, तसंच सु. रा. देशपांडे आणि परिसरातील ग्रामस्थ दरवर्षी महाशिवरात्रीला सकाळपासून समाधिस्थळी येऊन या नररत्नांच्या स्मृतींस अभिवादन करत. व्याख्यानं, पोवाडे आणि छत्रपतींच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमत असे. मंगेशकर भावंडांनी कुसुमाग्रजांची जी कविता अजरामर करून ठेवली आहे, ती ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही इथं ध्वनिक्षेपकावरून लागायची आणि सारं वातावरणच बदलून जायचं. गावागावांतील शिवप्रेमी मावळे शिवज्योत घेऊन अनवाणी धावत यायचे. सु. रा. देशपांडे यांनी अनेक किल्ले आणि नद्यांचं पाणी एकत्र करून आणलेल्या ‘गडगंगा कलशा’तील जलगंगेने समाधीला अभिषेक केला जायचा. ऐन महाशिवरात्रीला शिवकाळात जन्मलेल्या एका तीर्थक्षेत्रावर हजर राहून या प्रेरणादायी सोहळ्यातून प्रेरणा घेण्याचा योग ज्यांना लाभला असेल, ते सारेच भाग्यशाली! नेसरीच्या खिंडीतील कुपे कानडेवाडीची ही भूमी समग्र शिवप्रेमींचं एक आजन्म प्रेरणास्थानच!

सातारा जिल्ह्यातील भोसरे (ता. खटाव) इथला कुडतोजी गुजर नावाचा गुप्तहेर शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा तिसरा सरसेनापती होतो, हौतात्म्य पत्करतो, ही सारीच वाटचाल इतिहासप्रेमींनी अभ्यासण्याजोगी आहे. कुपेकरांसह नेसरीतील शिंदे सरकार, जवळच्याच अडकूर इथले चित्रपट कलावंत कृष्णकांत दळवी अशा मंडळींची अनेक ऐतिहासिक घराणी या परिसरात आपला ऐतिहासिक वारसा उराशी धरून नांदत आहेत. प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात किमान एकदा तरी या प्रेरणाभूमीचं दर्शन घ्यायला हवं.

कोल्हापूर संस्थानच्या महाराणी विजयमाला राणीसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी प्रतापराव गुजर स्मारकाच्या जीर्णोद्धारास प्रारंभ झाला. स्वतः कुपेकर यांनी या परिसराच्या विकासासाठी अखंड प्रयत्न सुरू ठेवले. नंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तर त्यांनी तिथं एक भव्य स्मारक उभारण्याची योजना हाती घेतली आणि दोन वर्षांत ती पूर्ण केली. कुपे-कानडेवाडीच्या परिसरातील हे स्मारक म्हणजे आपल्या इतिहासाची एक महत्त्वपूर्ण साक्ष आहे. सात ढाली आणि सात तलवारींच्या रूपातील मुख्य स्मारक व मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मंदिर, महादेव मंदिर, भव्य स्मृतिस्तंभ, यात्री निवास अशा स्वरूपातील हे स्मारक प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी पाहिलंच पाहिजे, असं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com