...आणि सईचे आई-बाबा आश्वासक हसले!

पौगंडावस्थेतील मुलांच्या असंख्य समस्या असतात. मित्र-मैत्रिणींची वर्तणूक, गटबाजी, हळूवार भावनांचा भंग, विचित्र हुरहुर, परस्परांबद्दल वाटणारं आकर्षण अशा अनेक पातळ्यांवर मन उसळी घेत असतं.
...आणि सईचे आई-बाबा आश्वासक हसले!
Summary

पौगंडावस्थेतील मुलांच्या असंख्य समस्या असतात. मित्र-मैत्रिणींची वर्तणूक, गटबाजी, हळूवार भावनांचा भंग, विचित्र हुरहुर, परस्परांबद्दल वाटणारं आकर्षण अशा अनेक पातळ्यांवर मन उसळी घेत असतं.

पौगंडावस्थेतील मुलांच्या असंख्य समस्या असतात. मित्र-मैत्रिणींची वर्तणूक, गटबाजी, हळूवार भावनांचा भंग, विचित्र हुरहुर, परस्परांबद्दल वाटणारं आकर्षण अशा अनेक पातळ्यांवर मन उसळी घेत असतं. या अवस्थेत त्यांनी प्रत्येक गोष्ट पालकाला सांगितलीच पाहिजे असा हट्ट नको आणि ते सांगत नाहीत म्हणजे काहीतरी लपवत आहेत असा दुराग्रहही नको... मुलं जसजशी मोठी होतात तसतशी आपल्या रिमोट कंट्रोलची बॅटरी ही निष्प्रभ होते हे समजून घ्या. एका विशिष्ट रेंजबाहेर रिमोटची बॅटरी चालत नाही. पौगंडावस्था ही मुलं रेंजच्या बाहेर जाण्याची सुरुवात असते...

सईचे बाबा शांत झाले. मी बोलू लागलो. ‘आपल्या सर्वांच्याच आयुष्यात सतत बदल घडत असतात. या मुलांच्या आयुष्यात तर मोठे शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. हे बदल कधी कधी शांतपणे घडतात, तर कधी कधी खूप त्रास देऊन जातात. सईला या सगळ्याचा कदाचित त्रास होतोय असं दिसतंय. तिला तुमचा विश्वास हवा आहे. ती कदाचित गोंधळली आहे. अचानक झालेल्या बदलांमुळे बावचळून गेली आहे. तिच्यात थोडेफार मानसिक गंड आलेले असू शकतात. ते कालांतराने जातील... पण ती सध्या पौगंडावस्थेत विलक्षण हळवी झालेली असताना तिला सावरण्याऐवजी तुम्ही घालून पाडून बोलू लागला तर ती आणखी विचलित आणि विस्कळित होईल... लवकरच ती नक्की सावरेल. तिला थोडा वेळ द्यायला हवा... मुलं जेव्हा खूप हळवी होतात, तेव्हा त्यांना खूप प्रेम हवं असतं. आपण नेमकं तेच करत नाही. त्यांच्या हळव्या मानसिकतेवर आपण लागोपाठ आघात करत सुटतो. याचे परिणाम अर्थातच चांगले होऊ शकत नाही नाहीत. तुम्ही जे काही सांगत आहात त्यावरून मला असं वाटत की, तिच्यामध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल तिला अजून पचवता आलेले नाहीत. त्यात तिची अवस्था समजून न घेता तुम्ही तिला फटकारे मारत सुटला आहात...’, मला सईच्या बाबांशी स्पष्ट बोलावं लागत होतं.

‘तुम्ही आता मला जे सांगितलंत, की तुमचं तिच्यावर अतिशय प्रेम आहे... हे ऐकताना तिला किती बरं वाटेल! तुमचं तिच्यावरचं हे प्रेम व्यक्त करा. तिला तुमच्या मायेने खूप ऊर्जा मिळणार आहे. रागावण्यापेक्षा आणि ओरडण्यापेक्षा प्रेमाने, स्पर्शाने, समजून घेण्याने आपण मुलांच्या अधिक जवळ जातो आणि मुलांच्या अधिक जवळ गेलो तरच मुलं स्वतःमध्ये योग्य बदल करतात. तुमच्यातलं आणि मुलांमधलं मानसिक अंतर कमी झालं तर पालकत्वावरती त्याचा चांगला परिणाम हा होतोच होतो. तुमचं म्हणणं सईवर लादण्याआधी तिचं म्हणणं काळजीपूर्वक समजून घ्या. तिला जगण्याचा अनुभव नाही, हे मान्य आहे. पण तुम्हाला तर आहे ना? तुम्हाला हेही कळतंय ना, की वयात आलेल्या मुलांची मानसिकता कशी असते? तुम्ही एकदा तरी तिला जवळ बसवून, तिच्याशी चार धीराचे, प्रेमाचे शब्द बोललात का? तिच्यातलं तुम्हाला काय काय आवडत नाही, हे तुम्ही तिला सांगितलंत, पण तिच्यातलं काय काय आवडतं, हेही तुम्ही तिला सांगितलंत का? सध्या तिची मनःस्थिती अशी असू शकते की तिला तीच आवडत नसेल कदाचित... आणि त्यात तुम्ही-आगीत तेल ओतल्यासारखी भर घालताय कदाचित... मुलं तुमची आहेत, म्हणून तुम्ही त्यांना गृहित धरण्याची चूक करू नका... कारण ती त्यांची स्वतःची जास्त असतात. म्हणून त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान, आत्मभान वाढवणं आणि जपणं, हे आपलं पालक म्हणून काम आहे... आणि तुम्ही तर तिला खच्ची करताय, असं वाटत नाही तुम्हाला?’

माझ्या म्हणण्यावर दोघंही विचारात पडले.

मी त्यांना म्हणालो, ‘मुलांच्या आयुष्यात खूप उलथापालथी घडत असतात. आपण त्यातल्या प्रत्येक उलथापालथीच्या मुळाशी जाऊ शकत नाही. मुलांचं व्यक्तिमत्त्व जसं आकार घेतं, तसं ते त्यांचं खाजगीपण जपू लागतात. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कसं वागायला हवं आणि कसं वागायला नको याचे संस्कार आपण केलेलेच असतात. त्या संस्कारावरती विश्वास ठेवावा आणि मुलांवरही बारकाईने लक्ष ठेवावे. पौगंडावस्थेतील मुलांच्या असंख्य समस्या असतात. त्यांचे मित्र-मैत्रिणी, मित्र-मैत्रिणींची वर्तणूक, गटबाजी, हळूवार भावना आणि हळूवार भावनांचा भंग, आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना, विचित्र हुरहुर, परस्परांबद्दल वाटणारं आकर्षण, अनेक बाबींमुळे मनात येणारी अपराध भावना, चौकटीबाहेर जाण्याची उत्कंठा, बंडखोरी, अनेक गोष्टी समजून घेण्याचं कुतूहल अशा अनेक पातळ्यांवर मन उसळी घेत असतं आणि निराशही होत असतं. या अवस्थेत मुलांना आपण सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलीच पाहिजे असा हट्ट नको आणि ते सांगत नाहीत म्हणजे काहीतरी लपवत आहेत असा दुराग्रहही नको... मुलं जसजशी मोठी होतात तस-तशी आपल्या रिमोट कंट्रोलची बॅटरी ही निष्प्रभ होते हे समजून घ्या. एका विशिष्ट रेंजबाहेर रिमोटची बॅटरी चालत नाही. पौगंडावस्था ही मुलं रेंजच्या बाहेर जाण्याची सुरुवात असते...’

माझं म्हणणं दोघेही मनापासून ऐकत होते, ही माझ्या दृष्टीने समाधानाची गोष्ट होती.

‘तिचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका... त्यामुळे तिच्यात चांगले बदल व्हायला सुरुवात होईल. ती यापूर्वीही चांगलीच होती. आजही स्वभावाने चांगलीच आहे आणि उद्याही चांगलीच असणार आहे. कारण ती तुमची मुलगी आहे! तिच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा, ऑल द बेस्ट!’

सईचे बाबा मनापासून आणि आश्‍वासक हसले.

‘रिमोट कंट्रोलचं उदाहरण एकदम पटलं!’, त्यांनी हसून सांगितलं.

सईला मी कधीच भेटलो नाही. पण सईची आणि तिच्या आई-वडिलांची भावनिक पुनर्भेट घडवून आणली, या आनंदात मी व्हिडीओ कॉल समाप्त केला.

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com