समाजातील असुरक्षिततेमुळे कसदार साहित्याकडे मराठी वाचकांची पाठ - भारत सासणे

वस्तुस्थिती सांगण्यासाठी लेखकाकडे एक काळीज, एक टोकदार आग्रह लागतो.
भारत सासणे
भारत सासणेSakal

वस्तुस्थिती सांगण्यासाठी लेखकाकडे एक काळीज, एक टोकदार आग्रह लागतो. अशा टोकदार आग्रहाचे लेखक कमी असतात. ज्या ज्या वेळी समाज असुरक्षिततेच्या भावनेतून जात असतो त्या त्या वेळी माहितीपर, प्रेरणादायी अशी आश्वासक पुस्तके बाजारात खपू लागतात. मराठीतही सध्या तोच प्रवाह दिसून येतो. सध्याही माणूस कुठेतरी अस्वस्थ, असुरक्षिततेची भावना जपणारा आहे. त्याला कुठे तरी भीती वाटत आहे. आपल्या भवितव्याचे त्याला आश्वासन मिळत नाही. त्यामुळे कसदार साहित्यापेक्षा तो अशा पुस्तकांकडे वळला आहे असे स्पष्ट मत उदगिर येथे होणाऱ्या आगामी अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले.

पुढच्या पिढीला काही तरी द्यावे असे आज वाटत असेल आणि त्यासाठी आपण पुस्तके जपून ठेवली तर पुढच्या पिढीला भवितव्य आहे असे मला वाटते. तुम्ही पैसा देताय की उच्च कलांचे प्रेम दिले हे महत्वाचे आहे. जर तुम्ही काहीच दिले नाही. ज्ञानही दिले नाही तर तुम्ही काय दिले? असा सवालही त्यांनी केला.

मराठी राजभाषा दिनानिमित्त `सकाळ`ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मराठीची आजची अवस्था, इंग्रजीचा वाढता प्रभाव, कसदार साहित्याचा अभाव यावर आपली मते स्पष्ट शब्दांत मांडली. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे.

प्रश्न - मराठी भाषेच्या सध्यस्थितीबद्दल काय वाटते?

भारत सासणे - सर्वप्रथम सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा. मराठी केवळ महाराष्ट्रातच बोलली जाते असे नाही. बृहनमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी माणूस राहत असून तो मराठीत बोलून भाषेला जिवंत ठेवत आहे. व्यावहारिक रेटा काहीही असला तरी त्या त्या भूप्रदेशातील भाषा व्यवहार म्हणून बोलली जात असताना घरात मात्र मराठी बोलली जाते हे विशेष. बडोदा, विलासपूर, भोपाळ, इंदूर, हैदराबाद येथे मराठी माणसे आहेत. जिथे जिथे मराठी माणूस गेला तिथे तिथे त्याने मराठीला नेले. पानिपतच्या युद्धानंतर हरियाणात स्थायिक झालेला मराठ्यांचा मोठा वंश आजही घरात मराठी बोलतो. भारताबाहेर अन्य देशांत स्थायिक झालेली मराठी माणसे आपापल्या परिने मराठीत बोलतात.

थोडक्यात मराठी भाषा आज मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी जागतिक भाषा बनू पहात आहे. इतक्या व्याप्त प्रकारे जर मराठी बोलली जात असेल तर आजची तिची अवस्था काय आहे? काही लोक असे म्हणतात मराठी आता खूपच इंग्रजी, हिंदीच्या आक्रमणाखाली दबलेली आहे. सोशल मीडिया, दूरचित्रवाहिन्यांवरील अशुद्ध मराठीमुळे विनोद निर्माण होतो अशा स्वरूपाची टीका केली जाते. याबाबत मला असे वाटते की ही आजचीच अवस्था नाही. मुघल काळात जेव्हा मोठ्या प्रमाणात भाषेची सरमिसळ होत होती. त्या काळात फौजी भाषा म्हणून उर्दूचा जन्म झाला. यामध्ये अरबी, फारशी, तुर्की आणि भारतीय भाषांची सरमिसळ होऊन उर्दू जन्माला आली. मराठी भाषेची आधी जडणघडण होत होती. त्यावेळी या भाषेवर अरबी, फारशी, उर्दूचा प्रभाव आहे. त्यामुळे अन्य भाषांतील अनेक शब्द मराठीत रूढ झालेले आहेत. इंग्रजी ही राज्यकर्त्यांची भाषा होती. त्यामुळे तिचा प्रभाव टाळता येणार नव्हता. त्यांनी ती ज्ञानभाषा म्हणून स्वीकृत करायला लावली. त्यामुळे टेबल, स्कुटर असे अनेक शब्द मराठीत रूढ जाले. जडणघडणीच्या काळात मराठी सशक्त राहिली. अनेक भाषांचे प्रवाह पचवून ही भाषा पुढे आलेली आहे.

इथून पुढे तंत्रयुगात मराठीत पर्यायी शब्द कोणते अशी चर्चा होते. असे असले तरी त्यामुळे मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. कारण मराठी ही सक्षम तसेच सर्व भाषांना पोटात घेत पुढे जाणारी जिवंत अशी लवचिक भाषा आहे. या भाषेची परंपरा प्राचीन असल्याने ती लोककला, लोकगीतांतून, बोलीभाषेतून सतत वाहते आहे. गाथासप्तपदी, कथासरितसागर, ज्ञानोबांची तसेच शिवकालीन मराठी वेगळी असली तरी तिची सरमिसळ होऊन तयार झालेली आजची मराठी सशक्त आहे.

प्रश्न - गेल्या काही वर्षात मराठी वाचक कसदार साहित्यापासून दूर जात आहे. प्रेरणादायी, माहितीपर पुस्तके, यश, पैसे कसे मिळवावे अशा प्रकारच्या पुस्तकाच्या मागे तो धावत आहे. हे कशाचे द्योतक आहे?

- यात फार आश्चर्य वाटायला नको. कारण ज्या ज्या वेळी समाज असुरक्षिततेच्या भावनेतून जात असतो त्या त्या वेळी अशी आश्वासक पुस्तके बाजारात खपतात. ज्योतिषशास्त्रावरची असतील किंवा यशाचा हमखास मार्ग सांगणारी पुस्तके असतील किंवा लखपती, करोडपती कसे व्हाल इत्यादी प्रकारची पुस्तके आजच नाही तर गेल्या पन्नास वर्षांमधून अनेक वेळा मराठीतून अवतरित झाली आहेत. या व्यतिरिक्त आता एक नवा प्रवाह आला आहे. तुम्हाला जे पाहिजे ते कसे प्राप्त करून घ्यायचे, त्यासाठी म्हणून या सबंध निसर्गाला साद घातली पाहिजे. निसर्गातील शक्ती तुम्हाला मदत करतात. त्यासाठी तुम्ही त्याला प्रामाणिकपणे साद घातली पाहिजे. या प्रकारचा विचार सध्या आकर्षक स्वरुपात इंग्रजीमध्ये प्रकट होत आहे आणि त्याचा अनुवादही मराठीत उपलब्ध होत आहे. यातूनच एकच लक्षात येते ते म्हणजे समाजात जगणारा हा जो माणूस आहे हा कुठेतरी अस्वस्थ, असुरक्षिततेची भावना जपणारा आहे. त्याला कुठे तरी भीती वाटत आहे. आपल्या भवितव्याचे त्याला आश्वासन मिळत नाही.

मग ते कुठून मिळत नाही? तर आपल्या जीवनातून मिळत नाही. आपल्या भोवती ज्या ज्या मंडळींनी आपल्या नियंत्रित केले आहे त्यांच्याकडून मिळत नाही. मग ते राज्य किंवा केंद्र शासन असेल किंवा वेगवेगळे घटक असतील. यांच्याकडून जर त्याला आश्वासन मिळत नसेल तर तौ सैरभेर होऊन अशा प्रकारच्या साहित्याकडे वळतो. समाजातील असुरक्षिततेची वाढती भावना हेच यामागचे कारण आहे. हे कमी करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. एकूण समाजमानस म्हणून चर्चा करून निकोप असे वातावरण कसे निर्माण करू शकतो यावर आपल्याला भर दिला पाहिजे.

प्रश्न – शहरे सुजत चालली आहेत तर खेडी बकाल होत आहेत. समाजातील या बदलाचे, ताणतणावाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही. असे का होते?

- याचे चित्रण साहित्यात येत नाही हे खरे आहे. याचे कारण आपला लेखक भोवतालची वस्तुस्थिती टिपतोच असे नाही. उदाहरण सांगायचे तर १९७२ चा दुष्काळ हा महाराष्ट्रात फार मोठे स्थित्यंतर घडवून गेला. पण दुष्काळानंतरचा हा वाईट कालखंड आपल्या साहित्यात उमटलाच नाही. उलट त्यावेळी आपण पुन्हा एकदा जास्त रोमॅटिंक वातावरणात गेलो. जास्त प्रेमकथा, प्रेमकविता लिहायला लागतो. मी मघाशी म्हटले त्याप्रमाणे ज्यावेळी समाज असुरक्षित असतो त्या त्या वेळी तो कुठे तरी आधार शोधायला लागतो.

सध्याही असेच घडत असावे. असाच आधार आताच्या लेखकांनी शोधला असावा. पण वस्तुस्थिती सांगण्यासाठी म्हणून एक काळीज, एक टोकदार आग्रह लागतो. अशा टोकदार आग्रहाचे लेखक कमी असतात. म्हणून त्यांच्याकडून समाजातील वास्तव मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. हळूहळू ते मांडतील अशी अपेक्षा आहे.

प्रश्न - शहरातील पालक मुलांना इंग्रजी शाळात घालत असल्याने हे लोण आता ग्रामीण भागांतही वेगाने पसरत आहे. त्यावर तुमचे मत काय आहे?

- खरंय, माझा अनुभव असा आहे की आताची लहान लहान मुले आहेत त्यांना मराठी वाचताच येत नाही. मी जेव्हा मुलांना माझी गोष्टींची पुस्तके वाचायला देतो. त्यावेळी त्यांचे आई – वडील ओशाळून जातात. त्यांना मराठी वाचता येत नाही, आम्हीच वाचून दाखवतो असे सांगतात. मग आपण हे कोणासाठी लिहितो, असा प्रश्न पडतो. पुढच्या पिढीला मराठी कळणार नाही. ना धड हिंदी, ना धड मराठी, ना धड इंग्रजी अशी अवस्था होईल का अशी चिंता काही जणांना वाटते.

ग्रामीण लोकांनी मराठी जिवंत ठेवली आहे. तिथल्या माणसांनी मराठीवर, साहित्यावर, साहित्य संमेलनावर, पुस्तक विक्रीवर प्रेम केले. शहरात मात्र मराठी शाळा बंद होत आहेत. आणि इंग्रजी शाळांत मुलांना घालायचे प्रमाण वाढले आहे. पण त्यामुळे फार काही संकट मराठीवर येईल असे मला स्वतःला वाटत नाही.

प्रश्न - शहरातील नवी पिढी मराठी संभाषणाला कमी महत्व देते का?

उत्तर - शहरातील तरुणांवर व्यवहारवादाचा प्रभाव आहे. ज्याला उद्या भाकरी कमवायची आहे, नोकरी मिळवायची आहे. भवितव्य घडवायचे आहे. त्याला जर इंग्रजीतून उद्याचे भविष्य सोनेरी दिसत असेल तर तो इंग्रजीला जवळ करणार हे उघड आहे. त्यामुळे केवळ ज्ञानाभाषा म्हणून मराठीकडे न पाहता ती भाकरी देणारी भाषा असली पाहिजे अशीदेखील चर्चा आपण काही वर्षांपूर्वी केलेली होती. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु आहेत.

उदा. मुंबईतील आजच्या तरुणाला मराठी, काही प्रमाणात गुजराथी, हिंदी, इंग्रजी येते. पण म्हणून कोणतीही भाषा तो उत्तम बोलू शकतो, लिहू शकतो, त्यामध्ये विचार करू शकतो असे घडत नाही असे माझे निरीक्षण आहे. अनेक हिंदी, उर्दू शब्दांचे अर्थही त्याला कळत नाहीत. ज्याला आपण अभिजात म्हणतो असा प्रौढ इंग्रजीचाही तर त्याला पत्ताही नसतो. त्यामुळे कामचलावू भाषांचे मिश्रण स्वीकारून तो पुढे जाताना दिसतो. तीच अवस्था अन्य महानगरांतील तरुणांचीही आहे.

अशा स्थितीत मराठी टिकवण्याची जबाबदारी केवळ साहित्यांकाची नाही. ती पालकांची, शासनाची, साऱ्या समाजाची आहे. उदा. मुलं जर इंग्रजी वाचतात असे आपण म्हणून असून तर काय वाचतात? हे देखील पाहिले पाहिजे. अभिजात दर्जाची पुस्तके वाचताना ती मला दिसत नाहीत.

मराठीसह अन्य भाषांतील अकादमी विजेती पुस्तके बाजारात दिसत नाहीत. समजा असतील तर ती तरुणांपर्यंत पोहोचतात असेही दिसत नाही. मुले इंग्रजी काय वाचतात ते कळत नाही, अभिजात मराठी वाचतच नाहीत. अशी सध्या सारी कोंडी झालेली आहे. पण ही कोंडी हळूहळू फुटणार आहे. त्यातून जोवर मराठी साहित्य ताकदीने प्रकट होईल तोवर फार अडचण होणार नाही.

प्रश्न - मराठी ज्ञानभाषा म्हणून घडविण्यात समाज म्हणून आपण मागे पडतोय का?

उत्तर - मी फ्रान्सला गेलो होतो तेथील लोकांना इंग्रजी कळतच नाही, ते केवळ फ्रेंच बोलतात. तोच प्रकार जपानमध्येही आहे. त्यांना इंग्रजी कळत नाही तरीही ती प्रगत आहेत. अशी अवस्था आपल्याकडे यायला अजून वेळ लागणार आहे. विज्ञान व गणित, अभियांत्रिकीचे शिक्षण दर्जेदार मराठीतून उपलब्ध होण्यासाठी समाजातील काही लोक संघर्ष करीत आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.

प्रश्न - मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण सर्वसामान्यांना प्रश्न पडतो हा दर्जा मिळाल्याने नक्की काय होणार आहे?

- यावर माझे थोडे वेगळे मत आहे. मराठी ही अभिजात भाषा आहेच. केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी पत्र देवून असा दर्जा द्यावा अशी आपली अवस्था आहे असे काही मला वाटत नाही. आपण केंद्राचे निकष पूर्ण करणारा अहवाल शासनाला दिला आहे. दोन ते अडीच हजार वर्षांसून मराठी अस्तित्वात आहे हे आपण त्यातून दाखवून दिलेले आहे. ती बोलली जात आहे. ती शिलालेखात, साहित्यात, लोकगीतांमधे, कथांमध्ये बोलीभाषेत दिसते. इतकंच काय कथासरितसागरचे उदाहरण घेतले तर ते दोन हजार वर्षांपेक्षा प्राचीन आहे. त्यामध्ये बुद्धकालीन तसेच तत्कालीन सारे संदर्भ येतात. त्यात मराठी मुलखचा, माणसाचा उल्लेख येतो. ही उदाहरणे घालून दिली आहेत मराठी तेव्हापासून चालत आलेली आहे, प्रवाहित होत आलेली आहे.

अमृतासी पैज लावणारी ही भाषा आहे असे आपल्याला ज्ञानोबांनी सांगितलेलेच आहे. त्यामुळे ती अभिजातच आहे. त्यासाठी आपल्याला कोणी तरी काही तरी दिले पाहिजे अशा माझी भूमिका नाही. पण तरीही काही व्यवहार्य बाजू असतात. जर मान्यता मिळाली तर केंद्राकडून आपल्याला निधी मिळेल. त्यातून आपण भाषेचा विकास करू शकू, इमारती बांधू शकू. मराठीला एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्न करू शकू. त्या दृष्टीने मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे याबाबत माझी काहीच हरकत नाही.

प्र- इंटरनेट, वाढते तंत्रज्ञान, जागतिकीरणामुळे मराठी भाषा जगात मोठ्या प्रमाणात जायला हवी पण तसे होताना दिसत नाही?

- मराठी भाषेत जे लिहले जाते ते अन्य भाषेत जाण्यासाठी तुम्हाला चांगले अनुवादक लागतात. केवळ तंत्राने प्रश्न सुटत नाही. मराठीतील सकस साहित्य इंग्रजीसह अन्य भाषांत जाण्यासाठी चांगले अनुवादक आहेत कुठे? दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणारी माणसे जर आपल्याभोवती असतील आणि ते सातत्याने काही काम करीत असतील तर ती भाषा जगभर जाईल. आणि मगच आपल्याला नोबेलसारखे पारितोषिक मिळू शकेल. पण अडचण होते ती अनुवादाची. काय लिहले जात आहे किती उंचीचे लिहले जाते हेच कळत नाही. त्यामुळे मोठी कोंडी निर्माण होते. यासाठी अनुवादकावर आपल्याकडे व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. आर्थिक निधीअभावी अनुवाद होत नाहीत आणि त्यामुळे मराठीत काय लिहले जात आहे ते बाहेरच्या जगाला कळत नाही. ही आजची अवस्था आहे.

प्रश्न - जे साहित्य शंभर वर्षांनंतरही वाचले जाते ते कायम टिकते असे म्हटले जाते. आपण त्यासाठी काही केले पाहिजे का?

- नक्कीच यात काही शंका नाही. आत्ता आपण जीए. ए. कुलकर्णी यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत. जी मंडळी शतकांच्या आधी काम करून गेले त्यांची आठवण आपण काढतोच. सतत जिवंत राहणारे साहित्य सतत प्रवाहित होत राहतेच. त्यासाठी काही खास प्रयत्न करायची गरज वाटत नाही. जे नष्ट होणारे आहे ते आपल्या कथित कनिष्ठ गुणवत्तेमुळे नष्ट होते. जे सकस आहे ते टिकतेच. जे कसदार आहे ते शतकांनतरही टिकतेच.

प्रश्न – गेल्या काही वर्षांत मध्यमवर्ग सधन झाला. मोठाले बंगले, पॉश फ्लॅट वाढत आहेत. या घरांच्या दिवाणखान्यात सर्व महाग वस्तू दिसतात पण पुस्तके आढळत नाहीत. मराठी पुस्तके घरातून हद्दपार होत आहेत असे वाटते का?

उ- आधी घरांमध्ये वाचन संस्कृती स्संकृती टिकून होती हे खरे आहे. आपल्याकडे आधीच्या पिढीतून पुढील पिढीकडे पुस्तके हस्तांतरित होत होती. दिवाणखाऩ्यात कोणती पुस्तके आहेत यावरून त्या घरातील लोकांची अभिरुची कशी आहे हे आपल्याला कळत असे. त्यामुळे त्या प्रकारची पुस्तके घरात ठेवायची याचा आग्रह ती मंडळी धरत. उत्तम, अभिजात पुस्तके घरात ठेवायला हवीत ही भावना दिसत असे.

आता पुस्तकांवरचे प्रेम कमी झाले आहे. पुस्तकांसाठी कपाट कुठे ठेवावे? आधीच जागा नाही, मग घरात कशाला हवीच पुस्तके ही भावना वाढत आहे. घरात जागा नाही, मग लायब्ररी कुठे दिसणार? शिवाय पुढच्या पिढीला ज्ञान दिले पाहिजे ही भावनाही कमी होत आहे. त्यांनाही आवड नसल्याने काय करायचे या पुस्तकांचे असा अनेक घरांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या अनेक कथा, कादंबऱ्यातून मी ही समस्या मांडली आहे.

पुढच्या पिढीला काही तरी द्यावे असे आज वाटत असेल आणि त्यासाठी आपण पुस्तके जपून ठेवली तर पुढच्या पिढीला भवितव्य आहे असे मला वाटते. जर तुम्ही काहीच दिले नाही. ज्ञानही दिले नाही तर तुम्ही काय दिले? तुम्ही पैसा देताय की उच्च कलांचे प्रेम दिले हे महत्वाचे आहे. चित्रकला, शिल्पकला जोपास, ही चांगली पुस्तके आहेत ती वाच असे आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगतो का हा खरा प्रश्न आहे. पैसा किंवा संपत्ती चिरकाल टिकत नसते. तर ज्ञान टिकते व वाढते हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रश्न - सर्वसामान्य माणसाला शासकीय आदेश, न्यायालयीन निवाडे सुलभ मराठीत उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी काय केले पाहिजे?

- मी अनेक वर्षे प्रशासकीय सेवेत काम केले आहे. मी तहसीलदार, जिल्हाधिकारी असताना मी निवाडे, निकाल मराठीत लिहीत असे. हाताखालच्या कर्मचाऱ्यांनाही मी सोप्या मराठीत टिपण्णी कशी लिहायची हे शिकवत असे. त्याचे भाषांतरही करून ठेवत असे. अनेक जाणकार अधिकारी असे करीत असत. त्यामुळे आज मराठीचा वापर राजभाषा म्हणून आपण करतोच करतो. शासनाचे सर्व अध्यादेश मराठीतूनच निघतात.

प्रशासकीय भाषेत मराठीचा वापर वाढण्यासाठी शासनाच्या समित्या, उपसमित्या आहेत. पर्यायी शब्द शोधण्यासाठी तसेच राजभाषा कोशात नवे शब्द आणण्यासाठीच्या समितीवर मी देखील सदस्य आहे. अनेक विद्वान मंडळी त्यावर काम करतात. हा शब्दकोश आम्ही जवळजवळ अद्ययावत करीत आणला आहे. पण हा कोश सर्वसामान्यांना उपलब्ध नसतो हे मात्र खरे आहे. कोष घेऊन तो काय करणार? त्याला जोवर गरज वाटत नाही त्याला तो हात लावणार नाही. पण राजभाषा व्यवहारात तरी वापरता येईल यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत.

प्रश्न - मराठी पाट्या लावण्याच्या नुकत्याच झालेल्या निर्णयाला काही मराठीजनांनीच विरोध केला. आपल्याकडे असा अंतर्विरोध कसा काय दिसतो?

- विरोध असण्याचे काहीच कारण नाही. तो बिलकूल असता कामा नये. व्यापाऱ्यांनी ज्याला इंग्रजी कळत नाही त्याला मराठीतून कळेल या भूमिकेतून मराठी पाटी लावली पाहिजे. आणि दुसरे असे की यामुळे मानसिकतेमध्ये बदल होणार आहे. मराठी पाट्या लावण्याचा आग्रह हा जर आपण धरला तर त्यामुळे मानसिकतेत बदल होणार आहे. ही माझी मातृभाषा आहे, लोकांची भाषा आहे, राजभाषा आहे आणि या भाषेतून पाटी असली पाहिजे असा नकळत अभिमान वाटेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com