

Marathi Literature Books
esakal
सखी राज्ञी येसूबाई
छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी, महाराणी येसूबाई यांचे चरित्र व शिकवण उलगडणारी गाथा म्हणजेच, सखी राज्ञी येसूबाई! सायली गोडबोले - जोशी यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्याच्या सूर्य तळपता ठेवण्यासाठी येसूबाईंनी केलेला संघर्ष, त्यांचे विचार, चरित्रातून मिळणारी शिकवण पुस्तकात वाचायला मिळते. येसूबाईंच्या कारकिर्दीतून उलगडणारी व्यवस्थापनाची सूत्रे यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. चरित्र व कार्य अशा दोन विभागात पुस्तकाची मांडणी करण्यात आली असून, एकूण २६ प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रकाशक : वरदा प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १४२,
मूल्य : २०० रु.
कवडसे आठवणींचे
‘कवडसे आठवणींचे’ हा डॉ. एम. आर. कुलकर्णी यांचा ललितसंग्रह आहे. यात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय करत असतानाचे काही अनुभव, होमिओपॅथिक महाविद्यालयात शिकवत असतानाच्या काही आठवणी यांना उजाळा दिला आहे. तसेच, महाविद्यालयीन जीवनात पाहिलेले चित्रपट, त्यातील गाणी, त्यामुळे झालेले चिंतन यावरही लेखन केले आहे. विनोबा भावे यांच्या ‘गीताई’ व ‘गीता प्रवचने’ या ग्रंथांच्या सातत्यपूर्ण चिंतनातून जे जाणवले, तेही त्यांनी शब्दबद्ध केले आहे. सुमारे ३० लेखांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. भावनांच्या विविध रंगाचे हे कवडसे वाचनानंद देतील, असा विश्वास वाटतो.
प्रकाशक : रावा प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे : १४०
मूल्य : १५० रु.