शिवारातलं वाचन; वाचनातलं शिवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

reading books

वाचनालयापेक्षा शिवारात अनेक पुस्तकं समजून घेता आली आणि समजली.

शिवारातलं वाचन; वाचनातलं शिवार

माझ्या वाचनाचे संदर्भ हुडकतो, तेव्हा मला माझ्या गावचे शिवार आठवते. शिवारात बसून अनेक लेखक अनुभवता आले. भाषावैभव वाढवता आले. वाचनालयापेक्षा शिवारात अनेक पुस्तकं समजून घेता आली आणि समजली.

आता शिवार अन्‌ सवंगडीही बदलले. आता ज्ञान घेण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत असा समज झालेली पिढी आहे. खिशातील मोबाईलवर जगातील घडामोडी समजत असताना पुस्तकाच्या वाटेला जाणं कमी होत आहे.

दहावी झाल्यावरच तसा माझा पुस्तकांचा संबंध आला. त्याअगोदर व्यंकटेश माडगुळकर यांच्या काही कथा वाचल्या होत्या; पण वाचायची खरी गोडी लागली दहावीनंतरच. माध्यमिक शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमाच्या बाहेरील पुस्तकं असतात एवढं माहिती होतं; पण ती पुस्तकं गोष्टीची म्हणून गणली जात.

शाळेतही तशी पुस्तकं दिसत; पण ती कधी वाचली नाहीत. आमचे आजोबा कधी कधी चांदोबा मासिक आणून देत. तेसुद्धा तालुक्यातील गावात मिळायचे. आजोबा जेव्हा तालुक्यातील गावी जातील तेव्हा ते घेऊन येत; पण अनेकदा ते संपलेले असे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे चांदोबा मासिक मिळत नसे.

आमच्या गावात काही घरांत श्रावण महिन्यात हरिविजय, भक्तिविजय अशा ग्रंथांचे पारायण असे. तेव्हा आवाज चांगला असल्याने मला अनेकदा तिथं वाचण्याची संधी मिळत होती. नंतर काही वेळ स्वतंत्रपणे ते ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील अनेक शब्दांचे अर्थ समजायचे नाहीत; मात्र कथा माहिती असल्याने अर्थ समजला नाही तरी वाचून सार कळत असे. असे वाचन अगदी माध्यमिक शिक्षण घेण्याच्या काळात झाले.

अकरावीसाठी तालुक्याच्या गावी गेलो. एक दिवस गावकडं येणारी दुपारची एसटी चुकली. पुन्हा तीन वाजता गाडी होती. आता काय करायचं? त्या शहरातून फिरायला लागलो. हे फिरणं निरर्थकच होतं. काही अंतर गेल्यावर क्रांतिसिंह नाना पाटील वाचनालय दिसलं. हे वाचनालय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि ग्रंथप्रेमी सुभाष पाटील बापू यांनी सुरू केलेलं होतं. पेपर वाचायला मिळतील म्हणून आत गेलो.

तिथं चारपाच माणसं बसलेली. त्यांच्यात गप्पा सुरू होत्या. तिथं पुस्तकांची कपाटं होती. मला वाटलं पुस्तक वाचायला देतात काय? तिथल्या ग्रंथपालला विचारलं. त्याने शाळेच्या ओळखपत्राची झेरॉक्स आणि वीस रुपये भरल्यावर पुस्तकं मिळतील असं संगितलं. मग काय, माझ्यातला जुना वाचक जागा झाला. पळतच जाऊन झेरॉक्स आणली.

वीस रुपये भरून त्याच दिवशी पहिलं पुस्तक वाचायला नेलं. ती मनोरंजनवादी कादंबरी होती. नंतर काही दिवस त्याच प्रकारच्या कादंबऱ्या वाचल्या. त्याच कादबऱ्यांनी वाचण्याची सवय लागली. अनेक लेखकांची पुस्तकांच्या माध्यमातून इथं गाठ पडली. आपण जे आयुष्य जगत आहोत, त्या प्रकारचंच लिहिलं जात आहे असे काही लेखक वाचनात आले आणि त्या पुस्तकांनी वाचनाची दिशा दिली.

आमचं महाविद्यालय सकाळचं असायचं. दुपारनंतर माझ्याकडे गुरे चरायला न्यायचं काम असायचं. दुपारनंतर गावापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या माळावर आम्ही गुरे घेऊन जायचो. गुरे राखण्यासाठी माझे वर्गमित्रही असायचे. गरिबीमुळं शाळा सोडलेले किंवा शाळेत काही येत नाही म्हणून सरळ गुरामागं आलेले.

माझ्यावर त्यांचं प्रेम होतं. त्यात मी कॉलेजला गेलो होतो याचा त्यांना अभिमान वाटत होता. मी गुराकडं जाताना एक पुस्तक घेऊन जायचो. वाचत बसल्यावर गुरं हिकडं-तिकडं पळायची. मग मी त्यांना अडवायला पळायचो. माझी तारांबळ लक्षात आल्यावर माझे दोस्तच माझी गुरं राखायला लागले. ते म्हणायचे, ‘तू बस वाचत. तुझ्या गुरांकडं आम्ही लक्ष देतो.’ त्यांनी मला वाचायला खूप वेळ दिला. त्या काळात माझं खूप वाचन झालं. गुरांमागे असताना जेवढं जास्त वाचता आलं, तेवढं पुन्हा कधीही वाचता आलं नाही.

याच काळात पुस्तकं खूप आवडायला लागली. पुस्तकात रमायला लागलो. पुस्तकावरच बोलायला लागलो. पुस्तकांचं सामर्थ्य लक्षात आलं. पुस्तकांमुळे भाषा बदलली. विचाराची दिशा पक्की झाली. एखादं चांगलं पुस्तक हातात आल्यावर खूप आनंद व्हायचा.

मी सुरुवातीला ज्या वाचनालयाचा सभासद झालो होतो, त्या वाचनालयातील पुस्तकं बऱ्यापैकी वाचून झाली. मग मी नंतर दुसऱ्या वाचनालयात गेलो. आता वाचनाचा वेग वाढला होता. नव्या वाचनालयात माझी फारशी ओळख नव्हती. ते एका वेळेस एकच पुस्तक द्यायचे. मी दुसऱ्या दिवशी ते वाचून परत करायचो. असं पाचसहा वेळा झाल्यावर तिथले ग्रंथपाल म्हणाले, ‘तू न वाचताच पुस्तक परत देतोस काय?’

‘सगळं वाचतो. मला एका वेळेस दोन पुस्तकं द्याल का? म्हणजे मला रोज यायला लागायचं न्हाय.’

‘तू, कसा येतोस?’

‘सायकलीवरून.’

‘एवढ्या दुरून?’

‘हो’

मग ते ग्रंथपाल मला एका वेळेस तीन पुस्तकं द्यायला लागले. आज मला चारपाच किलोमीटर सायकळीवरून जाता येत नाही; पण तेव्हा मी पंधरा किलोमीटर जायचे आणि यायचे असे तीस किलोमीटर केवळ पुस्तकासाठी जात होतो. पुस्तकांचं वेड हे असं असतं. आज त्या सगळ्या आठवणी समोर उभ्या राहतात.

मी गाव सोडून शहरात आलो तेव्हाही मला अनोळखी ठिकाणी पुस्तकांनीच साथ दिली. लळा लावला. मला जे मित्र भेटले त्या मैत्रीचा निकष एकच. ‘पुस्तकवेड’. पुस्तकवेड्या माणसांचा एक ग्रुप झाला आहे. आमच्या चर्चाही पुस्तकांवरच जास्त काळ होतात.

सुट्टीचा दिवस तर पुस्तकांची दुकानं फिरण्यात आणि नवं वाचण्यात जातो. पुण्यातील अगदी मोठ्या पुस्तकांच्या दुकानातील कर्मचारी ते जुनी पुस्तके विकणारे विक्रेतेसुद्धा जिव्हाळ्याचे स्नेही बनले आहेत. जवळ पैसे असोत अथवा नसोत, आवडलेली पुस्तकं उधारीवर लगेच घेता येतात. एवढी ‘पत’ तयार झाली आहे.

गेल्या पंधरा वर्षांत माझं मनोविश्व पुस्तकांनी व्यापलं आहे. पुस्तकांमुळंच मीही लिहायला लागलो. तू लिखाण करू शकशील, असं जर मला कोणी सांगितलं असतं तर मला पटलं नसतं; पण पुस्तकांनी मला लिहायला शिकवलं. पुस्तकं वाचत गेलो आणि कधी तरी लिहावं असं वाटू लागलं. मग मी लिहू लागलो.

आज मी माझ्या वाचनाच्या संदर्भाने विचार करतो तेव्हा मला माझ्या गावचे शिवार आठवते. जिथं मला वाचायला मोकळीक मिळाली आणि माझ्या सवंगड्यांनी ती मला दिली. मला माझ्या शिवारात बसून अनेक लेखक अनुभवता आले.

भाषावैभव वाढवता आले. इंद्रजित भालेराव यांचा ‘पीकपाणी’ काव्यसंग्रह मला माझ्या शिवारात वाचता आला याहुनी भाग्य कोणते? असे अनेक पुस्तकांबाबत घडले. वाचनालयापेक्षा शिवारात अनेक पुस्तकं समजून घेता आली आणि समजली...

आता शिवार बदललं. संवगडीसुद्धा. आता कोणाला अशी पुस्तके वाचायची म्हंटलं तर तशी मोकळीक मिळणार नाही. कारण तो तो एक काळ असतो. आता पुस्तकं वाचायलाही कोणी कष्ट घ्यायचा प्रयत्न करणार नाही.

ज्ञान घेण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, असा समज झालेली पिढी पुस्तकाच्या वाट्याला जातानाही विचार करेल. खिशातील मोबाईलच्या बटणावर जगातील घडामोडी समजत असताना पुस्तकाच्या वाटेला जाणं कमी होत आहे. आज शिवारातून जाताना सगळ्या आठवणी येतात. कदाचित हे शिवार नसतं तर मला एवढं वाचन करता आलं असत का, असा प्रश्न पडतो.

टॅग्स :bookssaptarang