

मूळचा पिंड पत्रकाराचा, त्यामुळं कोणत्याही विषयात उत्सुकता, माहिती काढण्याची आणि योग्य तिथं वापरण्याची हातोटी आणि शब्दांवर विलक्षण प्रेम, ही सुधीर गाडगीळ यांची वैशिष्ट्यं. घरातील संस्कारांमुळं शुद्ध, स्पष्ट वाणी व शब्दोच्चार, हजरजबाबीपणा, जरा जास्तच आत्मविश्वास, प्रचंड जनसंपर्क, या गुणांच्या जोरावर पहिल्यांदा ते ‘चैत्रबन’च्या निमित्तानं सुधीर मोघेंसारख्या शब्दप्रभू कविराजांनंतर रंगमंचावर आले आणि नंतर आजतागायत हजारो प्रयोगांतून त्यांनी निवेदक व सूत्रसंचालक म्हणून प्रभुत्व सिद्ध केलं.
मराठीतील एकही कलाकार, साहित्यिक, राजकारणी नसेल; ज्यांच्याबरोबर गाडगीळांनी सुसंवाद साधलेला नाही. नावांची व कार्यक्रम, प्रयोगांची जंत्री मोठी, हजारांमध्ये आणि त्या कलावंतांनासुद्धा गाडगीळांविषयी आत्मीयता वाटणं, यातच त्यांचं यश आहे. एकदा कार्यक्रम त्यांच्याकडं सोपवला, की तो पूर्ण तयारीनिशी व उत्तमच होणार, याची आयोजकांना खात्रीच असते, त्यामुळं तेही निर्धास्त! गाडगीळांच्या ‘बाप्पाच्या’ कृपेनं, कार्यक्रम ठरवताना ‘साहेबांची’ तारीख नक्की झाल्यावर गाडगीळांना नक्की करूनच थिएटर शोधलं जायचं!
‘चैत्रबन’ आणि ‘दूरदर्शन’चं फार मोठं ऋण त्यांच्यावर आहे. सुधीर गाडगीळ घराघरांत पोचण्यासाठी दूरदर्शन या प्रभावी माध्यमाचा आणि त्यांना संधी देणाऱ्या अरुण काकतकर, विनय आपटे, विजया जोगळेकर अशा दिग्गज निर्मात्यांचा मोठा वाटा आहे. गाडगीळांची मुशाफिरी फक्त पत्रकारितेत, निवेदन, मुलाखतीत थांबली नाही; तर आकाशवाणी, दूरदर्शनवर बातम्या देऊन, अनेक वर्तमानपत्रांत आपल्या फिरस्तीवर, खवय्येगिरीवर, भेटलेल्या विक्षिप्त माणसांवर स्तंभ व नंतर पुस्तकंही लिहिली. काही चित्रपट, मालिकांमध्ये अभिनयही केला! रोजनिशी न चुकता लिहिणाऱ्या गाडगीळांना उत्तम स्केचेस काढायचीही सवय आहे. आतमध्ये कुठंतरी कार्टूनिस्ट मनही आहे. जवळच्या मित्रांना मात्र कायम वाटत राहिलं, आजही वाटतं, की सुधीरनं लेखनाकडं लक्ष केंद्रित करावं. याचं कारण त्यांची स्वतःची वेगळीच निरीक्षणं, स्मरणशक्ती व शैली आहे. त्यांचा पाच दशकांचा अनुभव लेखनात उतरला पाहिजे. पण, ऐकतील ते गाडगीळ कसले? ते त्यांच्याच धुंदीत जगतात! हवं तसं! तंत्रज्ञानाचंही त्यांना असंच वावडं! त्यामुळं इंटरनेट, सोशल मीडिया, ई-मेल वगैरेपासून ते कित्येक मैल लांब असतात. त्यामुळं आपलं नुकसान झालेलं त्यांना चालतं. पण, फरक काहीच पडत नाही! अक्षर तर मोत्यांसारखं सुंदर!
माझ्यासारख्या साठच्या दशकात जन्माला आलेल्या आणि पुढं माध्यमांमध्ये मुशाफिरी केलेल्यांवर सुधीर मोघे आणि नंतर सुधीर गाडगीळांचा प्रभाव होता. शब्दांची जाण, रंगमंचावरचा वावर, संशोधन, उच्चार, आवाजातील चढउतार, सहजता, या दोघांकडून निरीक्षणानं शिकता आली. अनेक निवेदक सूत्रसंचालकांना, माध्यमकर्मींना या दोन सुधीरांनी माध्यमांचं, मंचाचं, सादरीकरणाचं आत्मभान आणि आत्मविश्वास दिला. संधी नि प्रोत्साहन दिलं. गाडगीळ हा अवलिया पाऊणशे वेळा परदेशात गेला, हजारो कार्यक्रम केले. पण, आजही पूर्ण तयारी केल्याखेरीज, आपल्या जुन्या पोतडीतील माहिती काढून अभ्यास केल्याखेरीज ते स्टेजवर पाऊल ठेवत नाहीत.
‘मनोहर’ साप्ताहिकातील नोकरीनंतर आयुष्यात पुन्हा कधीही नोकरी करायची नाही, असा पण करून तो कायम पाळणाऱ्या गाडगीळांना फिरण्याचं, गप्पांचं, खवय्येगिरीचं आणि माहिती काढून घेण्याचं व्यसन आहे. अनेकदा मोठे पुरस्कार गाडगीळांना मिळाले. पण, शासनमान्यतेची मोहोर उमटली नाही. इतर कलांप्रमाणे निवेदन, सूत्रसंचालन हीसुद्धा कला असते आणि त्यामागं कौशल्य व प्रतिभा असते, याची लालफितीला माहिती नसल्याचा हा परिणाम. पण, गाडगीळांना त्याची ना खंत ना खेद. आज सत्तरीत पोचलेले सुधीर गाडगीळ मोकळे असले, की आपल्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाच्या मित्रांबरोबर मध्यरात्री पुण्याच्या कट्ट्यांवर हिंडत गप्पांत रमलेले दिसतात, आणि दर महिन्याला एकदातरी आपला नवा मोबाईल हरवल्याचं सांगतात, तेव्हा यथेच्छ टीकाटिंगलीचे बळी होतात! हिंडणं व गप्पा त्यांचं टॉनिक. रात्री तीनपर्यंत जागून पूर्वी सकाळी सहालाच डेक्कन क्वीन गाठायला ते स्टेशनवर पळायचे. आजही त्यांची भ्रमंती थांबलेली नाही. सुधीर गाडगीळ या कलासक्त, दिलखुलास, आनंदी मुशाफिराला दीर्घायुष्य लाभो, ही शुभेच्छा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.