कारागीर होता; कामगार झाला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balu Sutar

बाळू सुतार गावकऱ्यांना, औषध द्यायचा. चकचकीत दवाखाने आले आणि बाळू आप्पाचे काम थांबले. तो पिढीजात सुतारकामात गुंतला.

कारागीर होता; कामगार झाला!

बाळू सुतार गावकऱ्यांना, औषध द्यायचा. चकचकीत दवाखाने आले आणि बाळू आप्पाचे काम थांबले. तो पिढीजात सुतारकामात गुंतला. कालांतराने शेतकामासाठी ट्रॅक्टर आले आणि सुतारकामही थांबले. बाळू आप्पाच्या कौशल्याची आता गावाला गरज नव्हती. बाळू आप्पा आता उतरत्या वयात पुन्हा कामाच्या शोधात शहरात जाऊ लागला. तिथं एका श्रीमंत शेतकऱ्याच्या पोराने सुरू केलेल्या टिंबर वर्क्समध्ये तो कामगार बनला. कारागीर होता त्याचा कामगार झाला.

वाकडून पुण्याला येऊन बरीच वर्षे झालेली. गावाकडे जाणारी एसटी पाहिली की मन त्या एसटीच्या अगोदर गावी पोहोचायचे. परत यायचे. गाडी आणि मी तिथेच असायचो. रोज सकाळी उठलो की या ना त्या कारणाने गाव आणि गावाकडची लोकं आठवत. थोड्या वेळाने गावाकडं फोन केला की खबरबात समजत असे. शहरात राहूनही गावाकडं काय सुरू आहे हे समजून घेण्याची तळमळ असे. गावाकडची ओढ तेव्हाही आणि आताही कमी झालेली नाही.

गावाकडून अनेकदा चांगल्या; तर अनेकदा वाईट बातम्या समजत. वाईट बातम्या म्हणजे गावातील माणसाच्या मरणाची बातमी असे. त्या माणसाशी जोडलेल्या आठवणी जाग्या व्हायच्या. असंच गाडीत बसून गावाकडं जावं आणि त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हावं असं वाटायचं, पण नोकरीच्या जबाबदारीमुळे अनेकदा शक्य व्हायचं नाही. जेव्हा शक्य असेल तेव्हा जातो.

एक दिवस गावाकडून फोन आला ती वाईट बातमी घेऊन. आमच्या गावातील बाळू डॉक्टर पलूसला निघाले असताना त्यांच्या सायकलीला एका वाहनाने जोराची धडक दिली. त्यात ते गेले, अशी ती बातमी. ही बातमी ऐकून खूप हळहळलो. माझ्यासोबत राहणाऱ्या प्रत्येक मित्राला मी त्यांच्याबद्दल सांगू लागलो...

बाळू सुतार हे आमच्या गावातील डॉक्टर. आम्ही लहान असताना गावातील एकमेव डॉक्टर म्हणजे बाळू आप्पा. त्यांनी डॉक्टरकीची पदवी घेतली नव्हती. जवळपासच्या शहरातील कोणत्या तरी मोठ्या डॉक्टरकडे कंपाऊंडर सहायक म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे काही वर्षे नोकरी केल्यावर ते गावाकडे आले. त्यांनी गावातील त्यांच्या घरातून डॉक्टरकी सुरू केली. गावातील लोकांना औषध द्यायला सुरुवात केली. दोन रुपये घेऊन ते उपचार करत होते. ते गावातील असल्याने गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती त्यांना माहिती होती. जे गरीब आहेत त्यांना बाळू आप्पा फुकट औषध देत होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या दवाखान्याला टाइम नव्हता. लोकांनासुद्धा जेव्हा जाईल, तेव्हा डॉक्टर भेटतो हे माहिती झाले होते. अगदी रात्री-अपरात्री जाऊन लोक त्यांच्या घराचा दरवाजा वाजवत.

‘अय, डॉक्टर उठा. म्हातारी लय खोकायला लागलीय. औषध द्या काय तरी.’

मग बाटलीतून औषध दिलं जाई. सकाळी पुन्हा जेव्हा तो माणूस बाळू आप्पाला भेटून ‘‘रातच्या औषधानं गुण आला बरं का म्हातारीला,’’ असं सांगायचा.

या डॉक्टरबद्दलचा एक प्रसंग. आमच्या गावची एक म्हातारी सांगलीला गेलेली. वातावरणात बदल म्हणा की काय, ती तिथं जाऊन आजारी पडली. तिथले पाहुणे म्हणाले, ‘‘आजी दवाखान्यात चला.’’ तेव्हा तिने नकार देत ‘‘मला गावाकडं सोडा. आमच्या बाळू डॉक्टरचा मला गुण येतो.’

ती कोणाचेच ऐकत नव्हती. मग तिला औंध गाडीने गावाकडे पाठवले. गावाकडे आल्यावर ती थेट बाळू आप्पाच्या घराकडं आली. त्यानेही म्हातारीला औषधं दिली. मग म्हातारीने सांगलीतला किस्सा ऐकवला. तो ऐकून आप्पाही हसायला लागला.

गावात अनेक वर्षे बाळू आप्पांनी डॉक्टरकी केली. सोबतच त्याचा पारंपरिक सुतारकामाचा व्यवसाय सुरू होता. दिवस जात होते. गावं शहरांना आणि शहरं गावांना जोडली जात होती. शहरातील अनेक गोष्टी गावात येत होत्या. जुनी पिढी म्हातारी व्हायला लागली. सुविधा सोयीसोबत गावात राजकारण येत होतं. विकास येत असताना काही वाद येत होते, सोबत संवादही. दिवस येत-जात होते.

याच काळात गावात मुंबई-पुण्यात डॉक्टरकीचा कोर्स केलेले डॉक्टर आले. त्यांनी गावात दवाखाने सुरू केले. नव्या पिढीला ते दवाखाने, त्यातील स्वच्छता, टापटीप आवडली. नव्या डॉक्टरांच्या शहरी भाषेचा त्यांच्यावर प्रभाव पडला. ती पिढी तिकडे जाऊ लागली, जुनी पिढीही नव्या डॉक्टरांच्या प्रेमात पडली, मग हळूहळू डिग्री नसलेल्या बाळू डॉक्टराने आपला दवाखाना बंद केला.

मी दहावी-बारावीच्या वर्गात शिकत होतो तोवर हे सगळे बदल घडत गेले होते. आता मला बाळू आप्पा दारात बसून सुतारकाम करत असलेला दिसायचा. त्यात तो चांगला रमला होता. आपण पूर्वी लोकांना औषधं देत होतो हे विसरून गेला होता; मात्र जेव्हा कोणी त्याला डॉक्टर म्हणून हाक देई, तेव्हा मात्र काही काळ तो स्तब्ध असायचा. हलके हसून पुन्हा आपल्या कामात गढून जायचा. त्याचं खूप चांगलं चाललं होतं. संसार सुखाचा होता. यातही काही वर्षे निघून गेली. हळूहळू गावात ट्रॅक्टर आले. यंत्रयुग अगदी गावात, शिवारात आलं. बैल आणि बैलाची मेहनत बंद होत चालली. बाळू आप्पा ज्या कुळव, कुऱ्या, जू, शिवाळ दुरुस्त करायचा, ते नव्या पिढीने गुंडाळून ठेवलं. त्या वस्तू दिसायच्या बंद झाल्या. आठ दिवसांच्या मेहनतीसाठी वर्षभर बैल सांभाळत बसून काय उपयोग, हे नवं अर्थशास्त्र पोरं बापाला आणि आजोबाला शिकवू लागली. सगळीकडेच बैलाचा गोठा मोडायची एक फेज आली. त्याच वेळी गावात सहकारी संस्थांच्या दूध डेरीचे टेम्पो आले. गावातील दूधवाल्यांनीसुद्धा बदल करत सायकली टाकून मोटरसायकल घेऊन दूध गोळा करायला सुरुवात केली. ज्या गोठ्यात हत्तीसारखे बैल होते, तिथं म्हशी आणि जर्शी गाय आली. दुधाचा आठवड्याला पगार व्हायला लागला आणि मग पोरांनी मांडलेले गणित वडील-आजोबांना पटले.

याचा परिणाम म्हणजे बाळू आप्पांचं सुतारकाम बंद पडलं. त्याला गावात रोजगार नव्हता. यांत्रिकीकरणाने त्याचा पिढीजात व्यवसाय हिरावून घेतला होता. हे सगळं एवढं झटपट घडत गेलं होतं की त्याचा अर्थ त्याला लावता आला नाही. तो या बदलांकडे निमूटपणे पाहत होता आणि मग एक दिवस त्याला रोजगाराच्या शोधात जवळपासच्या शहराच्या दिशेनं जावं लागलं. त्याच्या कौशल्याची आता गावाला गरज नव्हती. त्याचं ज्ञान आता निरुपयोगी ठरलं होतं. कधी काळी शहरातून गावाकडे येऊन स्थिर झालेला बाळू आप्पा आता उतरत्या वयात पुन्हा कामाच्या शोधात पुन्हा शहरात निघाला आणि जाऊ लागला. तिथं एका श्रीमंत शेतकऱ्याच्या पोराने सुरू केलेल्या टिंबर वर्क्समध्ये तो कामगार बनला. कारागीर होता त्याचा कामगार झाला होता.

अनेक दिवस तेही काम सुरू होतं. चांगलं नाही, पण बरं चाललं होतं. सकाळी सायकलवरून शहरात जाणारा आप्पा सायंकाळी पुन्हा यायचा. जाता-येता दिसायचा. एक दिवस बाळू आप्पा निघाला होता तेव्हा त्याला मागून आलेल्या वाहनाने धडक दिली. त्यातच आप्पा संपला. आप्पाची ही गोष्ट मी अनेकांना सांगितली आणि सांगतो. सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि आप्पा न विसरावा असाच आहे.

आमच्या घरात बाळू आप्पांचा विषय निघतो. आमच्या घराचे गावगाड्याशी ऋणानुबंध आहेत. आप्पांचा विषय निघाला. आई म्हणाली, ‘‘तू बारका होतास तवा राच्चा लय तापलावतास. बाळू डॉक्टरनंच तुला गोळ्या दिल्यावत्या. मग तुजा ताप निवला होता.’’ मीही त्याचा लाभार्थी होतो. बाळू आप्पाचा लाभ घेतला नाही असा एखादाचा माणूस सापडेल. कारण रस्ते नव्हते, वाहनं नव्हती तेव्हा बाळू आप्पा हाच गावचा डॉक्टर बनला होता. लोकांना तो आपला वाटत होता. बदलत्या काळाची चाकं एवढी गतिमान होती, त्या गतीने बाळू आप्पाचं आयुष्य बदललं. एवढं, की त्याला त्याचा अर्थ लावता आला नाही. त्याच्या आयुष्यात ज्या काही अनपेक्षित घटना घडल्या, वाताहत होत गेली, त्याची मांडणीसुद्धा त्याला करता आली नाही. वाताहातीचे आकलन करता आले नाही...

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

टॅग्स :workersaptarang