गोष्ट काळ्या निर्गुडीची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abul Baba Shikalgar

अब्दुल बाबा शिकलगार हे माझ्या आजोबांचे सवंगडी. मी लहान असताना आजोबांसोबत त्यांच्याकडे जायचो. शेतीच्या मशागतीसाठी लागणारी कुळव, कुऱ्या तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय होता.

गोष्ट काळ्या निर्गुडीची

अब्दुल बाबा शिकलगार हे माझ्या आजोबांचे सवंगडी. मी लहान असताना आजोबांसोबत त्यांच्याकडे जायचो. शेतीच्या मशागतीसाठी लागणारी कुळव, कुऱ्या तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. वयोमानानुसार त्यांना गुडघ्यांचा त्रास झाला. त्यावर गावच्या वैद्याकडून उपचार करून घेण्यासाठी काळ्या निर्गुडीची गरज होती, पण ती चार वर्षं शोधूनही मिळाली नव्हती. मिळाली तेव्हा मोठ्या आनंदाने अब्दुलबाबांना निर्गुडी मिळाली म्हणून सांगायला गेलो, पण म्हणाले, त्याचा आता काही उपयोग होणार नाही...

अब्दुल बाबा शिकलगार हे माझ्या आजोबांचे सवंगडी. मी लहान असताना आजोबांसोबत त्यांच्याकडे जायचो. गावाच्या पूर्वेला असलेल्या येरळा नदीच्या काठावर त्यांची वस्ती होती. शेतीच्या मशागतीसाठी लागणारी कुळव, कुऱ्या तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. याशिवाय ते लोहारकामही करायचे. त्यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. नदीच्या काठावर असलेल्या त्यांच्या झोपडीजवळ सकाळी १० वाजल्यापासून गावकरी जमायचे. या वेळी लोकांच्या गप्पा रंगायच्या. जुन्या काळातील आठवणी निघायच्या. या आठवणीतून गावचा मौखिक इतिहास समजत असे. याच काळात जुन्या काळातील विलक्षण गोष्टी मला समजल्या. गावाच्या आसपासच्या गावांतील लोकही अब्दुल बाबा यांच्याकडे येत, त्यामुळे त्याही लोकांना मी ओळखू लागलो. त्यांचं ऐकू लागलो. हळूहळू इथं जाऊन गप्पा ऐकत बसायची सवय मला लागली. इथं लोकांच्यात एकमेकांची थट्टा-मस्करी चालायची. एकमेकांची दुःखं सांगितली जायची, ऐकली जायची. एकमेकांना आधारही दिला जायचा. इथं संवाद व्हायचा. अब्दुलबाबा त्यांचं काम करत या गप्पांत सहभागी व्हायचे. ते सगळे दिवस आजही मला आठवतात. माझे आजोबादादा गेल्यानंतर माझंही अब्दुलबाबांकडे जाणं कमी झालं आणि ते थकल्यावर त्यांनीही काम बंद केलं. त्यांच्या छपरासमोरची वर्दळ कमी झाली. तिथली बैठकही बंद झाली. मला तिथं बाबा एकटेच बसलेले दिसायचे.

मी नोकरीच्या निमित्तानं शहरात गेल्यावर अब्दुल बाबांची भेट व्हायची बंद झाली. शहरात मी रमत गेलो; मात्र अधूनमधून गावाकडच्या आठवणी यायच्या तेव्हा मला बाबांची आठवण यायची. अनेकदा प्रवासात आमच्या गावासारखे एखादे खेडे दिसले, की मग जुने दिवस आठवत. बाबांच्या त्या ठिय्याची आठवण होई. काही वर्षे निघून गेली. बाबांच्याकडे येणारे जुने दोस्त वयोमानानुसार काळाच्या पडद्याआड जाऊ लागले. त्या बातम्या पुण्यात मला अस्वस्थ करायच्या. दिवस आठवायचे. माझं बालपण आणि त्यांचं तरुणपण आठवत राहायचं.

एक दिवस गावाकडे गेल्यावर अब्दुलबाबा मला समोरून येताना दिसले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांना विचारलं, ‘‘बाबा, तब्येत कशी आहे?’’

‘‘आता कसली तब्बेत? माझं गुडघं लै दुखाय लागल्याती.’’

थोडा वेळ थांबून ते म्हणाले, ‘‘बाळा, विसापूरच्या रानात काळी निरगुडी हाय असं मला समजलंय. तिकडं कवा गेलास तर बघ. घिऊन ये. मला गुडघ्याच्या औषधाला पायजेल.’’

मी बरं म्हणून गेलो. काही दिवसांनी विसापूर शिवारात काळी निर्गुडी मिळते का बघितलं. माझ्यावर लहानपणी प्रेम केलेल्या आजोबांच्या मित्राने काम सांगितलं होतं, त्यामुळे मीही खूप प्रयत्न केले, पण मला काळी निर्गुडी मिळाली नाही. मग हळूहळू मीही अब्दुल बाबांनी सांगितलेलं काम विसरून गेलो. दिवस निघून गेले.

एक दिवस वाल्हे जेजुरीमार्गे गावाकडे जाताना एका हॉटेलात माणसं बोलताना त्यांच्या बोलण्यात काळी निर्गुडीचा विषय ऐकला. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यातील एकाला विचारलं, ‘‘पाव्हणं, कुठं हाय काळी निर्गुडी?’’

मग त्यातील एकाने त्यांच्या रानातील बांधावर आहे असं सांगितलं.

मी त्यांना म्हणालो, ‘‘आम्हाला औषधासाठी पाहिजे.’’ ते म्हणाले, ‘‘कधीही न्या.’’ गेल्या चार वर्षांपासून शोधत असलेलं अब्दुलबाबांच्या गुडघेदुखीवरचं औषध मिळालंय याचा मला खूप आनंद झाला. कधी एकदा गावी जातोय आणि बाबांना सांगतोय असं मला झालेलं. मी गावाकडं गेल्यावर उत्साहात बाबांकडे गेलो. बाबांची अलीकडं बरेच दिवस भेट झालेली नव्हती. ते आता खूपच थकलेले. दृष्टीही अधू झालेली, पण नुसत्या आवाजावर त्यांनी मला ओळखलं.

‘काय, बरं हाय का तुझं?’’ त्यांनी आस्थेनं विचारलं.

मग मी त्यांना काळी निर्गुडी मिळाली आहे. चारपाच दिवसांत घेऊन येतो असं सांगितलं. बाबांनी एकवार माझ्याकडं बघितलं आणि म्हणाले, ‘‘पोरा, तुला निर्गुडी घावली; पण आता काय उपयोग न्हाय बघ.’’

‘का वं बाबा?’’ मी विचारलं.

‘आरं त्यो आवशीद तयार करणारा माणूस दोन सालापूर्वीच गेला, आता काय उपयोग,’’ बाबा हताश होत म्हणाले.

ते ऐकून मलाही खूप वाईट वाटलं. ज्या उत्साहानं मी बाबांना बातमी सांगायला आलो होतो, तो उत्साह मावळला. कारण आता बाबांची गुडघेदुखी तर बरी होणार नव्हतीच; पण गुडघेदुखीवरच्या एका रामबाण औषधाची पद्धत आणि एका चांगल्या वैद्याला आपण मुकलो होतो. शिकलेली लोक ज्यांना अडाणी समजतात, त्या लोकांना नक्कीच लिहायला-वाचायला येत नसेल. ती धावत्या आणि आधुनिक जीवनशैलीपासून दूर असतील. शिकलेल्या लोकांना जे माहिती आहे ते त्यांना माहीत नसेलही; पण आजही खेडोपाडी पारंपरिक ज्ञान असणारी माणसं आहेत. त्यांना अडाणी ठरवू पाहणाऱ्यांनी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे, की गेल्या काही वर्षांपासून आलेलं ज्ञानही काळाच्या पडद्याआड निघालं आहे.

काही दिवसांनी अब्दुलबाबाही गेले; पण जेव्हा जेव्हा मला त्यांची आठवण येते, तेव्हा त्यांनी सांगितलेली काळ्या निर्गुडीची गोष्ट आठवते. मला निर्गुडी मिळूनही त्यांना त्याचा काही उपयोग झाला नाही याची सतत खंत वाटते. आता मीही काळ्या निर्गुडीची गोष्ट विसरायची म्हणतो; पण काही केल्या विसरता येत नाही.

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे महत्त्वाचे भाष्यकार आहेत.)

Web Title: Sampat More Writes Black Nirgundi Tree

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :treesaptarang