

शाळेत आलेल्या राजांची नक्कल केल्यानंतर त्यांच्याकडून उपदेशाचे दोन शब्द ऐकले आणि पहाडी आवाजाची देणगी लाभलेला शंकर निकम पुढे ाहीर शंकरराव निकम झाले.
शाळेत आलेल्या राजांची नक्कल केल्यानंतर त्यांच्याकडून उपदेशाचे दोन शब्द ऐकले आणि पहाडी आवाजाची देणगी लाभलेला शंकर निकम पुढे शाहीर शंकरराव निकम झाले. ब्रिटिश राजवटीविरोधात लोकांमध्ये प्रतिसरकारबद्दल जनजागृती करणाऱ्या निकम यांच्या पोवड्यांमुळे तरुणाई लढण्यासाठी पेटून उठे. स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या निकम यांचे कार्य आणि घडवलेला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न...
‘एके दिवशी एक राजा कुंडलची शाळा तपासायला गेला. एक उत्तम गाणारा, गोजिरवाणा, निकमांचा मुलगा राजाच्या नजरेत आला. पोवाडा उत्तम म्हणायचा, नकलाही करायचा; पण तो महावात्रट आणि सर्वांची नेहमीच चेष्टाकुचेष्टा करणारा. राजा वर्गातून पुढे जातो न जातो तो मोठा हशा त्या वर्गातून ऐकू आला. राजा थांबला. त्याचीच हुबेहूब नक्कल निकम करीत होता. राजा परत वर्गात गेला आणि या मुलाच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला, ‘अरे बाळ, जगदंबेने तुला उत्तम आवाज दिला आहे. गाणेही छान म्हणतोस. या दैवी देणगीचा उपयोग लोकसेवा, लोकजागृती, गरिबाच्या उद्धाराकरिता कर, तुझे कल्याण होईल. उगीच टवाळकी करणे सोडून दे. हाच मुलगा पुढे शाहीर शंकरराव निकम म्हणून प्रसिद्धीस आला.’ औंधचे राजपुत्र आणि भारताचे अनेक देशात राजदूत म्हणून काम केलेल्या अप्पासाहेब पंत यांनी स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांच्याबद्दल काढलेले हे उद्गार...
ब्रिटिश राजवटीचा तो काळ होता. याच काळात सातारा जिल्ह्यातल्या स्वदेशी विचाराच्या शेकडो तरुणांनी एकत्र येत पत्रीसरकार किंवा प्रतिसरकार उभारलेलं. क्रांतिसिंह नाना पाटील या सरकारचे नेते होते. ब्रिटिश राजवट मानायची नाही, त्यांना कोणताही महसूल द्यायचा नाही, गावचा कारभार लोकांनी एकत्र येऊन करायचा, गावात काही तंटा झाला तर ब्रिटिशांऐवजी प्रतिसरकारच्या न्यायालयात जायचे. सुमारे साडेसहाशे गावात प्रतिसरकारची राजवट सुरू होती. याच काळात शाहीर शंकरराव निकम यांची गोष्ट सुरू होते. प्रतिसरकार स्थापन झालंच; पण या सरकारला लोकांचं पाठबळ मिळणं महत्त्वाचं होतं. तेव्हा हे सरकार नेमकं काय आहे, ते का स्थापन झालं, हे सांगितल्याशिवाय जनता मदत करणार नव्हती. म्हणून शाहीर शंकरराव निकम यांनी पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली. सह्याद्रीच्या कडेकपारीत शाहीरांचा डफ खणखणू लागला. त्यांच्या मर्दानी आवाजातील पोवाडा ऐकून गावातील तरुणाईही मिळेल त्या हत्यारानिशी ब्रिटिशांसोबत लढण्याची भाषा बोलायला लागायची.
देशात त्या वेळी ब्रिटिश सत्तेविरोधात राष्ट्रीय पातळीवर मोठा लढा उभा राहिला होता. त्याच लढ्यापासून प्रेरणा घेऊन साताऱ्यातल्या कुंडल गावात प्रतिसरकार उभा राहिले. कुंडल ही प्रतिसरकारची राजधानी. येथील एक हरहुन्नरी, हुशार, प्रतिभा आणि पहाडी आवाज लाभलेला तरुण म्हणजे शंकर निकम. पुढं हाच शंकर शंकरराव निकम होणार, हे फक्त औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी ओळखले आणि आदेशवजा शाबासकी देत त्याच्याकडील क्षमतेची जाणीव करून दिली. राजांनी जेव्हा शाळेला भेट दिली तेव्हा त्यांच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्यात लक्ष देण्यासाठी सांगितले. राजांचा आदेश मानत निकम यांनी आपल्या कलेवर लक्ष दिले; पण ही कला स्वतःच्या फायद्यासाठी न वापरता देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या उभारणीसाठी डफ हातात घेतला.
कारभारनी स्वराज्य मिळवायचं औंदा,
म्हणून मी सोडलाय धंदा...
असं नवरा आपल्या बायकोला सांगत असणारा पोवाडा सादर करत, लोकांना स्वतंत्र होण्याची आस लागली आहे, हे प्रभावीपणे मांडत. पोलिस आणि शाहीर यांच्यात लपंडाव सुरू होता. शाहीर येणार असल्याची वर्दी अगोदर गुप्तपणे त्या गावात जाई. मारुतीचे मंदिर, गावाचा पार किंवा एखादे माळावर उभा असलेले भैरोबाचे मंदिर आणि अधिकच धोका असेल तर पोलिस कधीही पोहोचणार नाहीत, अशा ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पटांगणात किंवा प्राचीन देवळात उभा राहून शाहीर निकम प्रतिसरकारबद्दल सांगायचे.
अधिकार दिला पंचाला | कोर्टाचा निकाल लागला।
पुंड-गुंड बसले कोपऱ्याला । गोरगरीब सुखी झाला ।
दहशत बसली फितुराला । गावागावात न्याय लागला।
गुन्हेगार भिऊ लागला । धडकी भरली अधिकाऱ्याला ।
शिक्षा दिली गुन्हेगाराला । नाना पाटील जाई गावाला ।
बोलावून साऱ्या गावाला । सांगे भिऊ नका गोऱ्या सायबाला ।
गांधी-राज्य आले गावाला । हात लावील कोण अबलेला ।
फाशीची शिक्षा तयाला | जिल्हा सारा आनंदून गेला ।
आशीर्वाद प्रतिसरकारला । प्रतिसरकारचा जय बोला ।
असा पोवाडा म्हणताच लोक एकच जल्लोष करत. क्रांतिसिंह नाना पाटील आणि महात्मा गांधींच्या नावाचा जयजयकार करत पोवाडा ऐकणारे गणपती यादव या आठवणी सांगतात. इंग्रजांचे सरकारी बंगले जाळणे, टपालगाड्या लुटणे या प्रतिसरकारच्या मोहिमांत निकम सहभागी होतेच; पण त्यांच्यावर विशेष जबाबदारी लोकांना जागृत करण्याची होती; मग भूमिगत राहून शाहीर निकम महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाऊन लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हावे म्हणून आवाहन करत होते. गावात जायचे अन पोवाडा गायचे. लोकांच्या मनात देशभक्तीचा विचार पेरायचा. त्यांना निर्भीड बनवायचे हे काम मोठ्या ताकदीने ते करत होते. लोकांनी या जुलमी राजवटीविरोधात बंड केले पाहिजे, अशा रचना त्यांनी केल्या होत्या. सरकारी धान्याची कोठारे लुटण्याचे आवाहन पोवाड्यातून केले होते. पुढे शाहीर निकम यांच्यावर प्रतिसरकारच्या प्रचारमंत्रीपदाची जबाबदारी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सोपवली. एकदा ते पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांनी त्यांना खूप मारहाण केली. चळवळीच्या भूमिगत नेत्यांबाबत पोलिसांनी विचारणा केली, पण शाहीर निकम यांनी ब्र उच्चारला नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळाले. शाहिरांनी काँग्रेस पक्षासोबत राहून सामाजिक काम आणि शाहिरी सुरू ठेवली. याच काळात त्यांनी शेकडो पोवाडे लिहिले. त्यांचे सहकारी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. वसंतदादा पाटील, जी. डी. बापू लाड, नागनाथ नायकवडी अण्णा हे सर्व सहकारी राजकारण करत समाजाची सेवा करत राहिले. तेव्हा शाहीर मात्र काँग्रेसमध्ये राहून सांस्कृतिक कार्य करू लागले; परंतु बदलत्या राजकारणाचे आकलन त्यांना झाले नाही. कधीकाळी पोवाड्याच्या बळावर स्वातंत्र्यलढ्यासाठी हजारो रुपये मिळवून देणारा शाहीर आयुष्याच्या संध्याकाळी मात्र कफल्लक आयुष्य जगत राहिला. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक सहकारी आमदार, मंत्री झाले; मात्र त्यांच्याकडे जावे आणि आपली कैफियत मांडावी, असे या स्वातंत्र्यशाहिराला कधी वाटले नाही. वांगी गावातील कोरडवाहू जिरायती शेतीवर संसाराचा गाडा रेटला; पण स्वाभिमानी बाणा सोडला नाही. औंधच्या राजाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. ‘हा पोरगा खूप मोठा झाला होता नावाने आणि मनाने. घरात दारिद्र्य असले, तरी सोबत स्वाभिमानी विचाराची श्रीमंती होती. त्याच कैफात शाहीर जगले.’
आता शाहिरांना जाऊनही बरीच वर्षे झाली आहेत, त्यांच्यासोबत काम केलेले लोकही आता खूप कमी आहेत. त्यांच्या कामाचंही आता लोकांना विस्मरण व्हायला लागलं आहे. त्यांचं कार्य आणि घडवलेला इतिहाससुद्धा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. प्रतिसरकार उभारण्यात योगदान असलेला हा योद्धा उपेक्षित राहू नये.
(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.